बालकाण्डाची विषयसूची -
सर्ग १ :
’ या पृथ्वीवर पराक्रमी राजा कोण आहे बरे ? ' असा वाल्मीकि मुनिंनी नारदास प्रश्न
केला (१-५). नारदमुनि या प्रश्नाचे 'रामराजा महापराक्रमी आहे,' असे उत्तर देतात व त्यास
संक्षिप्त रामचरित्र सांगतात (६-९७). रामायण पठणाचे फळ (९८-१००).
सर्ग २ :
नारदमुनि निघून गेल्यावर वाल्मीकिमुनि तमसा नदीवर स्नानास गेले व
तेथे ते स्नानाच्या तयारीस लागले (१-६). तेथे एक क्रौंचपक्ष्याचे जोडपे
क्रीडा करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले. इतक्यांत एका निषादाने बाण
मारून त्यापैकी एकास घायाळ केले. हे पाहून ऋषीचे मन कळवळले व एकदम 'मा निषाद....' हे निषादा, तू फार दिवस जगणार नाहीस, अशा आशयाचा शापमय श्लोक
त्यांच्या तोंडातून बाहेर पडला (७-१५). शापमय छंदोबद्ध श्लोक सहज तोंडावाटे बाहेर
निघालेला पाहून मुनींस फार आश्चर्य वाटले व असा विचार मनात आला की न
जाणो आपले तपही या शापयुक्त वाणीने कदाचित् कमी होईल (१६-२२). स्नान
करून मुनि आश्रमात आले, इतक्यात ब्रह्मदेव
तेथे आले व वाल्मीकिमुनींनी घडलेला सर्व वृत्तांत त्यांस सांगितला. तेव्हा ब्रह्मदेव
म्हणाले की, 'हे फारच
उत्तम झाले. याच छंदामध्ये
तू सर्व रामचरित्र वर्णन कर.' ब्रह्मदेवाने असे सांगितले व ते निघून गेले (२३-३८).
ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे सर्व रामायण व रामवणवधरूप महाकाव्य मुनींनी
रचले (३९-४३).
सर्ग ३ :
रामायणाचे संक्षिप्त निरूपण (१-४०).
सर्ग ४ :
वाल्मीकींनी रामायण लिहिले व हे रामचंद्राच्या राजसभेमध्ये
जाऊन गाण्यास कोण बरे समर्थ आहे, असे आपल्या शिष्यास विचारले, तेव्हा 'लव व कुश' पुढे आले व म्हणाले की, 'आम्ही या रामायणाचे
गायन राजसभेमध्ये करूं.' ते ऐकून
मुनींनी ते त्यांना शिकविले (१-७). ते दोघेही ते काव्य उत्तम तालसुरामध्ये एकतारीवर गाऊं
लागले (८-१३).
जेव्हां या लवकुशांनी ते ऋषिमंडळीमध्ये गाइले, ते ऐकताच सर्व ऋषि फार संतुष्ट झाले व त्यांनी
लवकुशांची फारच प्रशंसा केली (१४-२७). पुढे लवकुश अयोध्येच्या रस्त्यांतून हे काव्य
गात जाऊ लागले. यांची कीर्ति ऐकून श्रीरामचंद्रांनी त्यंस आपल्याजवळ बोलावून
आणले व त्यांना आदराने चरित्र गाण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ते
रामचंद्रासमोर गाऊन दाखविले. ते ऐकून श्रीरामचंद्र फारच प्रसन्न झाले
(२८-३६.
सर्ग ५ :
सरयु नदीच्या उत्तर तीरावर कोसलदेश आहे. त्याची राजधानी अयोध्या
होय. ही उत्तम वैभवसंपन्न नगरी असून सर्व प्रकारे समृद्ध होती (१-९). अयोध्येच्या
समृद्धीचे वर्णन (१०-२३).
सर्ग ६ :
अयोध्येमध्ये महापराक्रमी दशरथ राजा राज्य करीत होता
(१-४). त्या राजधानींत सर्व लोक आनंदी, विद्वान् व शूर असे होते. राजा दशरथाने या
नगरीचे असे रक्षण केले होते की, त्यामुळे
ती शत्रूला अगदी अभेद्य बनली होती (५-२८).
सर्ग ७ :
दशरथाचे आठ अमात्य होते. ते सर्व स्वकर्तव्यात
तत्पर होते. त्याचे दोन ऋत्विज असून, त्यांचे सहायक अनेक ऋषि होते (१-१५).
दरथाने अमात्यांच्या सहाय्याने उत्तम रीतीने राज्य चालविले होते (१६-२४).
सर्ग ८ :
दशरथाला पुत्र
नव्हता म्हणून फार वाईट वाटत होते. पुत्रासाठी व्रते वैकल्ये करूनही त्यास
पुत्र झाला नाही, म्हणून
अश्वमेध व पुत्रकामेष्टी करून पुत्र प्राप्त करून घ्यावा असा त्याने विचार केला
(१-३). हा विचार मनांत येतांच त्याने पुरोहितांस बोलाविले व आपला विचार
सांगितला. सर्व पुरोहितांनी त्यास अनुमोदन दिले. यज्ञाची जुळवाजुळव
केली व सरयू नदीच्या तीरावर यज्ञभूमीची सिद्धता झाली (४-१६). राजाने
पत्नींस सांगितले की, पुत्रप्राप्तीसाठी
यज्ञ करणार आहे, तेव्हां
त्यांनी दीक्षा घेऊन व्रतस्थ राहावें (१७-२५).
सर्ग ९ :
सुमंत्र नावाच्या मंत्र्याने
सनत्कुमार विरचित एक
जुना वृत्तांत दशरथराजास सांगितला (१-३). विभांडक नावाचा एक ऋषि होता.
त्याला ऋष्यश्रृंग नावाचा एक पुत्र होता. वडिलांच्या कडक शिस्तीत वागला
असल्यामुळे तो कडक ब्रह्मचारी राहिला होता (४-७). अंग देशात रोमपाद नावाचा एक
राजा राज्य करीत होता. त्याच्या कडून काही पाप झाल्यामुळे त्याच्या राज्यांत मोठे
अवर्षण पडले (८-९). रोमपादाने ब्राह्मणांना बोलावून अवर्षणाचे निरसन करण्यासठी
अनुष्ठान करण्यास सांगितले. ब्राह्मण म्हणाले, ऋष्यश्रृंगास आपल्या राज्यांत आण व आपली
मुलगी त्यास दे; म्हणजे त्या
ब्रह्मवेत्त्याच्या आगमनाने वृष्टि होईल (१०-१४). राजाने त्यांना ऋष्यश्रृंगास
आणण्यास सांगितले, पण
विभांडकाचा प्रभाव जाणत असल्यामुळे तसे करण्यास कोणी धजेना. तेव्हां राजाने ते काम
मंत्र्यांना सांगितले (१५-२१).
सर्ग १० :
मंत्र्यांनी रोमपादास
सांगितले की, कांही
सुंदर वारांगनांना
पाठवून युक्तिने ऋष्यश्रृंगास आणण्यास सांगावे. त्याप्रमाणे वारांगना पाठवल्या गेल्या.
ऋष्यश्रृंगाने पित्याशिवाय कोणा इतर पुरुषास पाहिले नव्हते, आणि स्त्रियांना तर मुळीच
नाही (१-९). ऋष्यश्रृंग एकदा आश्रमाबाहेर पडला तेव्हां त्याला वारांगना
दृष्टीस पडल्या. त्यांचे सुंदर रूप पाहून तो त्यांच्या मैत्रीची इच्छा करू
लागला. पुढे त्यास नगरात आणण्यात आले. ऋष्यश्रृंग नगरात येतांच पाऊस पडून आनंदीआनंद झाला.
राजाने त्याच्याशी
आपल्या मुलीचा विवाह केला व ऋष्यश्रृंग राजवाड्यात राहूं लागला (१०-३३).