॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥ । अथ तृतीयोऽध्यायः - अध्याय तीसरा । । कर्मयोगः ।
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत् किं कर्मणि घोरे माम् नियोजयसि केशव ॥ १॥
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्ही जें वाक्य बोलिलें । तें निकें म्यां परिसिलें । कमळापती ॥ १ ॥ तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां । ऐसें मत तुझें श्रीअनंता । निश्चित जरी ॥ २ ॥ तरी मातें केवीं श्रीहरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं । इये लाजसी ना महाघोरीं । कर्मीं सुतां ॥ ३ ॥ हां गा कर्म तूंचि अशेष । निराकरिसी निःशेष । तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी ॥ ४ ॥ तरी हेंचि विचारीं ऋषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशां । आणि येसणी हे हिंसा । करवीतु आहासी ॥ ५ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २॥
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणती काय करावें । आतां संपले म्हण पां आघवें । विवेकाचें ॥ ६ ॥ हां गा उपदेश जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा । आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा ॥ ७ ॥ वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये । तरी रोगिया कैसनि जिये । सांगैं मज ॥ ८ ॥ जैसें आंधळें सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा । तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥ ९ ॥ मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें । श्रीकृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥ तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाजीं गोवाई । तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ? ॥ ११ ॥ आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें । आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हण ॥ १२ ॥ आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी । एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥ तरी ये जाणिवेचें तरी सरलें । परी आणिक एक असे जाहलें । जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥ तेवींचि श्रीकृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे । जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें ॥ १५ ॥ ना तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्त्वचि कथिले ध्वनितें । हें अवगमितां निरुतें । जाणवेना ॥ १६ ॥ म्हणौनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा । मज विवेकु सांगावा । मर्हाटा जी ॥ १७ ॥ मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियेसें । श्रीकृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥ देखैं रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । परी तें अति रुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥ तैसें सकळार्थभरित । तत्त्व सांगावें उचित । परी बोधें माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥ देवा तुज ऐसा निजगुरु । आजि आर्तीधणी कां न करूं । एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची ॥ २१ ॥ हां गां कामधेनूचें दुभतें । दैवें जाहलें जरी आपैतें । तरीं कामनेची कां तेथें । वानी कीजे ? ॥ २२ ॥ जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांछेचें कवण सांकडें । कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ? ॥ २३ ॥ देखा अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहाना जरी फुटावें । तरी सायासु कां करावे । मागील ते ? ॥ २४ ॥ तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां श्रीलक्ष्मीपती । तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥ २५ ॥ तरी आपुलिया सवेशा । कां न मागावासि परेशा ? । देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥ देखैं सकळार्तींचें जियाले । आजि पुण्य यशासि आलें । हें मनोरथ जहाले । विजयी माझे ॥ २७ ॥ जी जी परममंगळधामा । सकळ देवदेवोत्तमा । तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणौनियां ॥ २८ ॥ जैसें मातेच्या ठायीं । अपत्या अनवसरू नाहीं । स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी ॥ २९ ॥ तैसें देवा तूतें । पुसिजतसे आवडे तें । आपुलेनि आर्तें । कृपानिधीं ॥ ३० ॥ तरीं पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित । तें सांगैं एक निश्चित । पार्थु म्हणे ॥ ३१ ॥
श्रीभगवानुवाच । लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । ज्ञानयोगेन सांख्यानाम् कर्मयोगेन योगिनाम् ॥ ३॥
या बोला श्रीअच्युतु । म्हणतसे विस्मितु । अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो ॥ ३२ ॥ जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था । प्रकटिली स्वभावता । प्रसंगें आम्हीं ॥ ३३ ॥ तो उद्देशु तूं नेणसीचि । म्हणौनि क्षोभलासि वायांचि । तरी आतां जाणें म्यांचि । उक्त दोन्ही ॥ ३४ ॥ अवधारीं वीरश्रेष्ठा । ये लोकीं या दोन्ही निष्ठा । मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा ॥ ३५ ॥ एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठिजे । जेथ ओळखीसवें पाविजें । तद्रूपता ॥ ३६ ॥ एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण । होऊनियां निर्वाण । पावती वेळे ॥ ३७ ॥ हे मार्गु तरी दोनी । परी एकवटतीं निदानीं । जैसी सिद्धसाध्य भोजनीं । तृप्ती एक ॥ ३८ ॥ कां पूर्वापर सरितां । भिन्न दिसती पाहतां । मग सिंधुमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं ॥ ३९ ॥ तैसीं दोनीही मतें । सूचितीं एका कारणातें । परी उपास्ति ते योग्यते- । आधीन असे ॥ ४० ॥ देखैं उत्प्लवनासरिसां । पक्षी फळासि झोंबें जैसा । सांगैं नरु केवीं तैसा । पावे वेगा ? ॥ ४१ ॥ तो हळूहळू ढाळेंढाळें । केउतेनि एके वेळे । तया मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥ ४२ ॥ तैसे देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥ ४३ ॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥ ४४ ॥
न कर्मणामनारंभान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४॥
वांचोनि कर्मारंभ उचित । न करितां सिद्धवत । कर्महीना निश्चित । होईजेना ॥ ४५ ॥ कीं प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्य होईजे । हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें ॥ ४६ ॥ सांगैं पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे । तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं ? ॥ ४७ ॥ ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे । कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगैं ? ॥ ४८ ॥
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः ॥ ५॥
जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं । मग संतुष्टीच्या ठायीं । कुंठें सहजें ॥ ४९ ॥ म्हणौनि आईकें पार्था । जयां नैष्कर्म्यपदीं आस्था । तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे ॥ ५० ॥ आणि आपुलिये चाडे । आपादिलें हें मांडे । कीं त्यजिलें कर्म सांडे । ऐसें आहे ? ॥ ५१ ॥ हें वायांचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखोनि पाहिजे । परी त्यजिता कर्म न त्यजे । निभ्रांत मानीं ॥ ५२ ॥ जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥ देखैं विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥ ५४ ॥ सांगै श्रवणीं ऐकावें ठेलें ? । कीं नेत्रींचें तेज गेलें ? । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ? ॥ ५५ ॥ ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मती । कीं क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥ ५६ ॥ हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालों विसरले । हें असो काय निमाले । जन्ममृत्यु ? ॥ ५७ ॥ हें न ठकेचि जरी कांहीं । तरी सांडिलें तें कायी । म्हणौनि कर्मत्यागु नाहीं । प्रकृतिमंता ॥ ५८ ॥ कर्म पराधीनपणें । निपजतसे प्रकृतिगुणें । येरी धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां ॥ ५९ ॥ देखैं रथीं आरूढिजे । मग जरी निश्चळा बैसिजे । तरी चळु होऊनि हिंडिजे । परतंत्रा ॥ ६० ॥ कां उचलिलें वायुवशें । चळे शुष्क पत्र जैसें । निचेष्ट आकाशें । परिभ्रमें ॥ ६१ ॥ तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें । नैष्कर्म्यही व्यापारे । निरंतर ॥ ६२ ॥ म्हणौनि संगू जंव प्रकृतीचा । तंव त्यागु न घडे कर्माचा । ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ॥ ६३ ॥
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् । इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६॥
जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती । परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधुनी ॥ ६४ ॥ तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सांपडे । वरी नटती तें फुडें । दरिद्र जाण ॥ ६५ ॥ ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा । ओळखावे तत्त्वता । भ्रांति नाहीं ॥ ६६ ॥ आतां देईं अवधान । प्रसंगें तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥ ६७ ॥
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन । कर्मैन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७॥
जो अंतरीं दृढ । परमात्मरूपीं गूढ । बाह्य भागु तरी रूढ । लौकिकु जैसा ॥ ६८ ॥ तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म नाव्हेरी । उचित जें जें ॥ ६९ ॥ तो कर्मेंद्रियें कर्मीं । राहटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मीं । झांकोळेना ॥ ७० ॥ तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपें । जैसें जळीं जळें न शिंपे । पद्मपत्र ॥ ७१ ॥ तैसा संसर्गामाजीं असे । सकळांसारिखा दिसे । जैसें तोयसंगें आभासे । भानुबिंब ॥ ७२ ॥ तैसा सामान्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे । येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची ॥ ७३ ॥ ऐशा चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि मुक्तु । आशापाशरहितु । वोळख पां ॥ ७४ ॥ अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं । म्हणौनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूतें ॥ ७५ ॥ तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरीं । मग कर्मेंद्रियें व्यापारीं । वर्ततु सुखें ॥ ७६ ॥
नियतं कुरु कर्म त्वं ज्यायो ह्यकर्मणः । शरीरयात्राऽपि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ८॥
म्हणौनी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे । आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारीं पां ॥ ७७ ॥ म्हणौनि जें जें उचित । आणि अवसरेंकरूनि प्राप्त । तें कर्म हेतुरहित । आचरें तूं ॥ ७८ ॥ पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्ममोचक । आपैसें असे ॥ ७९ ॥ देखैं अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥ ८० ॥
यज्ञाथात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचार ॥ ९॥
स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ ८१॥ हा निजधर्मु जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे । तैंचि बंधु पडे । संसारिक ॥ ८२ ॥ म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन । जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ ८३ ॥ हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भूत झाला । तो नित्य यज्ञातें चुकला । म्हणौनियां ॥ ८४ ॥ आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एक मी कथा । जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनें केली ॥ ८५ ॥
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ १०॥
तैं नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें । परी नेणतीचि तियें यज्ञातें । सूक्ष्म म्हणौनि ॥ ८६ ॥ ते वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा काय आश्रयो एथ आम्हां । तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति ॥ ८७ ॥ तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे । यातें उपासा मग आपैसे । पुरती काम ॥ ८८ ॥ तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें । दुरी केंही न वचावें । तीर्थासी गा ॥ ८९ ॥ योगादिकें साधनें । साकांक्ष आराधनें । मंत्रयंत्रविधानें । झणीं करा ॥ ९० ॥ देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावें । तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें ॥ ९१ ॥ अहेतुकें चित्तें । अनुष्ठा पां ययातें । पतिव्रता पतीतें । जियापरी ॥ ९२ ॥ तैसा स्वधर्मरूपमखु । हाचि सेव्यु तुम्हां एकु । ऐसें सत्यलोकनायकु । बोलता जाहला ॥ ९३ ॥ देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल । मग प्रजाहो न संडील । तुमतें कदा ॥ ९४ ॥
देवांभावयताऽनेन ते देवाभावयन्तु वः । परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११॥
जैं येणेंकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां । मग ते तुम्हां ईप्सिता । अर्थातें देती ॥ ९५ ॥ या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां । योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा ॥ ९६ ॥ तुम्हीं देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ॥ ९७ ॥ तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धि जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ॥ ९८ ॥ वाचासिद्धि पावाल । आज्ञापक होआल । म्हणियें तुमतें मागतील । महाऋद्धि ॥ ९९ ॥ जैसें ऋतुपतीचें द्वार । वनश्री निरंतर । वोळगे फळभार । लावण्येसी ॥ १०० ॥
इष्टांभोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ १२॥
तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठीं ॥ १०१ ॥ ऐसें समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त । जरी स्वधर्मेंनिरत । वर्ताल बापा ॥ १०२ ॥ कां जालिया सकळ संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा । लुब्ध होऊनियां स्वादा । विषयांचिया ॥ १०३ ॥ तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी । तयां स्वधर्मीं सर्वेश्वरीं । न भजेल जो ॥ १०४ ॥ अग्निमुखीं हवन । न करील देवता पूजन । प्राप्तवेळे भोजन । ब्राह्मणाचें ॥ १०५ ॥ विमुख होईल गुरुभक्ती । आदर न करील अतिथी । संतोष नेदील ज्ञाती । आपुलिये ॥ १०६ ॥ ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणें प्रमत्तु । केवळ भोगासक्तु । होईल जो ॥ १०७ ॥ तया मग अपावो थोर आहे । जेणें तें हातींचें सकळ जाये । देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं ॥ १०८ ॥ जैसें गतायुषी शरीरीं । चैतन्य वासु न करी । कां निदैवाच्या घरीं । न राहे लक्ष्मी ॥ १०९ ॥ तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला । जैसा दीपासवें हरपला । प्रकाशु जाय ॥ ११० ॥ तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे । आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे ॥ १११ ॥ म्हणौनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील । चोरु म्हणौनि हरील । सर्वस्व तयाचें ॥ ११२ ॥ मग सकळ दोषु भंवते । गिंवसोनि घेति तयातें । रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैसीं ॥ ११३ ॥ तैसीं त्रिभुवनींचीं दुःखें । आणि नानाविधें पातकें । दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे ॥ ११४ ॥ ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापा रुदतां । कल्पांतींही सर्वथा । प्राणिगणहो ॥ ११५ ॥ म्हणौनि निजवृत्ती हे न संडावी । इंद्रियें बरळों नेदावीं । ऐसें प्रजांतें शिकवी । चतुराननु ॥ ११६ ॥ जैसे जळचरा जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे । हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये ॥ ११७ ॥ म्हणौनि तुम्हीं समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं । निरत व्हावें पुढत पुढती । म्हणिपत असे ॥ ११८ ॥
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् ॥ १३॥
देखा विहित क्रियाविधि । निर्हेतुका बुद्धि । जो असतिये समृद्धि । विनियोगु करी ॥ ११९ ॥ गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं । निमित्तादिकीं यजी । पितरोद्देशें ॥ १२० ॥ या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां । हुतशेष स्वभावतः । उरे जें जें ॥ १२१ ॥ तें सुखें आपुले घरीं । कुटुंबेंसी भोजन करी । कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें ॥ १२२ ॥ तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणौनि सांडिजे तो अघीं । जयापरीं महारोगी । अमृतसिद्धि ॥ १२३ ॥ कीं तत्त्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा । तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥ म्हणौनि स्वधर्में जें अर्जे । तें स्वधर्मेंचि विनियोगिजे । मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं ॥ १२५ ॥ हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा । ऐसी आद्य हे कथा । श्रीमुरारी सांगे ॥ १२६ ॥ जे देहचि आपणपें मानिती । आणि विषयांतें भोग्य म्हणती । यापरतें न स्मरती । आणिक कांहीं ॥ १२७ ॥ हें यज्ञोपकरण सकळ । नेणतसां ते बरळ । अहंबुद्धि केवळ । भोगूं पाहती ॥ १२८ ॥ इंद्रियरुचीसारिखें । करविती पाक निके । ते पापिये पातकें । सेविती जाण ॥ १२९ ॥ संपत्तिजात आघवें । हें हवनद्रव्य मानावें । मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषीं ॥ १३० ॥ हें सांडोनियां मूर्ख । आपणपेंयालागीं देख । निपजविती पाक । नानाविध ॥ १३१ ॥ जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये । तें हें सामान्य अन्न न होये । म्हणौनियां ॥ १३२ ॥ हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण । जें जीवनहेतु कारण । विश्वा यया ॥ १३३ ॥
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः । यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४॥ कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवं । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ॥ १५॥
अन्नास्तव भूतें । प्ररोहो पावती समस्तें । मग पर्जन्यु या अन्नातें । सर्वत्र प्रसवे ॥ १३४ ॥ तया पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञातें प्रगटी कर्म । कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप ॥ १३५ ॥ मग वेदांतें परात्पर । प्रसवतसे अक्षर । म्हणौनि हे चराचर । ब्रह्मबद्ध ॥ १३६ ॥ परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुति । ऐकें सुभद्रापति । अखंड गा ॥ १३७ ॥
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६॥
ऐशी हे आदि परंपरा । संक्षेपें तुज धनुर्धरा । सांगितली या अध्वरा । लागूनियां ॥ १३८ ॥ म्हणौनि समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु । नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये ॥ १३९ ॥ तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी । जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥ तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ । जैसें कां अभ्रपटल । अकाळींचें ॥ १४१ ॥ कां गळां स्तन अजेचे । तैसें जियालें देखैं तयाचें । जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना ॥ १४२ ॥ म्हणौनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणें न संडावा । सर्वभावें भजावा । हाचि एकु ॥ १४३ ॥ हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आलें । मग उचित कां आपुलें । ओसंडावें ? ॥ १४४ ॥ परिस पां सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची । खंती करिती कर्माची । ते गांवढे गा ॥ १४५ ॥
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ १७॥
देखैं असतेनि देहधर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में । जो अखंडित रमे । आपणपांचि ॥ १४६ ॥ जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखैं जाहला । म्हणौनि सहजें सांडवला । कर्मसंगु ॥ १४७ ॥
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ॥ न चास्य सर्वभूतेषु कश्चिदार्थव्यपाश्रयः ॥ १८॥
तृप्ति जालिया जैसीं । साधनें सरती आपैसीं । देखैं आत्मतुष्टीं तैसीं । कर्में नाहीं ॥ १४८ ॥ जंववरी अर्जुना । तो बोधु भेटेना मना । तंवचि यया साधना । भजावें लागे ॥ १४९ ॥
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९॥
म्हणौनि तूं नियतु । सकळ कामरहितु । होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें ॥ १५० ॥ जे स्वधर्में निष्कामता । अनुसरले पार्था । ते कैवल्यपद तत्त्वतां । पातले जगीं ॥ १५१ ॥
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । लोकसङ्ग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ २०॥
देख पां जनकादिक । कर्मजात अशेख । न सांडितां मोक्षसुख । पावते जाहले ॥ १५२ ॥ याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाहि एका अर्था । उपकारैल ॥ १५३ ॥ जे आचरतां आपणपयां । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥ १५४ ॥ देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ १५५ ॥ मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥ १५६ ॥ हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञाना काय उमजे ? । तिहीं कवणे परी जाणिजे । मार्गातें या ? ॥ १५७ ॥
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ॥ स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१॥
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ १५८ ॥ हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । विशेषें आचरावें । लागे संतीं ॥ १५९ ॥
न मे पार्थाऽस्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ॥ नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२॥
आतां आणिकांचिया गोठी । कायशा सांगों किरीटी । देखैं मीच इये राहाटी । वर्तत असें ॥ १६० ॥ काय सांकडें कांहीं मातें । कीं कवणें एकें आर्तें । आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी ॥ १६१ ॥ तरी पुरतेपणालागीं । आणिकु दुसरा नाहीं जगीं । ऐसी सामुग्री माझ्या अंगीं । जाणसी तूं ॥ १६२ ॥ मृत गुरुपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला । तोही मी उगला । कर्मीं वर्तें ॥ १६३ ॥
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । मम वत्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३॥
परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा । तयाचि एका उद्देशा- । लागोनियां ॥ १६४ ॥ जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ । तरी न व्हावें बरळ । म्हणौनियां ॥ १६५ ॥
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् । सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४॥
आम्ही पूर्णकाम हौनी । जरी आत्मस्थिति राहुनी । तरी प्रजा हे कैसेनि । निस्तरेल ? ॥ १६६ ॥ इहीं आमुची वास पाहावी । मग वर्ततीपरी जाणावी । ते लोकस्थिति आघवी । नासिली होईल ॥ १६७ ॥ म्हणौनि समर्थु जो येथें । आथिला सर्वज्ञते । तेणें सविशेषें कर्मातें । त्यजावें ना ॥ १६८ ॥
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत । कुर्याद्विद्वांस्तथाऽसक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम् ॥ २५॥
देखैं फळाचिया आशा । आचरे कामकु जैसा । कर्मीं भरु होआवा तैसा । निराशाही ॥ १६९ ॥ जे पुढतपुढतीं पार्था । हे सकळ लोकसंस्था । रक्षणीय सर्वथा । म्हणौनियां ॥ १७० ॥ मार्गाधारें वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें । अलौकिक नोहावें । लोकांप्रति ॥ १७१ ॥
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् । जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ॥ २६॥
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥ तैशी कर्मीं जयां अयोग्यता । तयांप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरुनी ॥ १७३ ॥ तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनी ॥ १७४ ॥ तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजैल ना ॥ १७५ ॥ जैसी बहुरुपियांचीं रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥ १७६ ॥
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । अहङ्कारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ॥ २७॥
देखैं पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे । तरी सांगैं कां न दटिजे । धनुर्धरा ? ॥ १७७ ॥ तैसीं शुभाशुभें कर्में । जियें निपजती प्रकृतिधर्में । तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे ॥ १७८ ॥ ऐसा अहंकारादिरूढ । एकदेशी मूढ । तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना ॥ १७९ ॥ हें असो प्रस्तुत । सांगिजैल तुज हित । तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारीं पां ॥ १८० ॥
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८॥
जें तत्त्वज्ञानियांच्या ठायीं । प्रकृतिभावो नाहीं । जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे ॥ १८१ ॥ ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनि । साक्षीभूत हौनी । वर्तती देहीं ॥ १८२ ॥ म्हणौनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नातळती । जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना ॥ १८३ ॥
प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दांकृत्स्नविन्न विचालयेत् ॥ २९॥
एथ कर्मीं तोचि लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपे । वर्ततु असे ॥ १८४ ॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥ १८५ ॥
मयि सर्वाणि कर्माणि सन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३०॥
तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥ १८६ ॥ आणि हें कर्म मी कर्ता । कां आचरैन या अर्था । ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगों देसीं ॥ १८७ ॥ तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें । मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥ आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इयें रथीं । देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें ॥ १८९ ॥ जगीं कीर्ति रूढवीं । स्वधर्माचा मानु वाढवीं । इया भारापासोनि सोडवीं । मेदिनी हे ॥ १९० ॥ आतां पार्था निःशंकु होईं । या संग्रामा चित्त देईं । एथ हें वांचूनि कांहीं । बोलों नये ॥ १९१ ॥
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः । श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१॥
हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरें स्वीकारिजे । श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा ॥ १९२ ॥ तेही सकळ कर्मीं वर्ततु । जाण पां कर्मरहितु । म्हणौनि हें निश्चितु । करणीय गा ॥ १९३ ॥
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् । सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२॥
नातरी प्रकृतिमंतु हौनी । इंद्रियां लळा देउनी । जें हें माझें मत अव्हेरुनी । ओसंडिती ॥ १९४ ॥ जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखती । कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें ॥ १९५ ॥ ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले । अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥ १९६ ॥ देखैं शवाच्या हातीं दिधलें । जैसें रत्न कां वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥ १९७ ॥ कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा न वचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥ १९८ ॥ तैसे जे पार्था । विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा । करावेना ॥ १९९ ॥ म्हणौनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगैं पतंगु काय साहती । प्रकाशातें ? ॥ २०० ॥ पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेंवीं विषयाचरण । आत्मघाता ॥ २०१ ॥
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । प्रकृतिं यान्ति भुउतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३॥
म्हणौनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥ २०२ ॥ हां गा सर्पेसीं खेळों येईल ? । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धि जाईल ? । सांगैं हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई ? ॥ २०३ ॥ देखैं खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला । तैसा इंद्रियां लळा दिधला । भला नोहे ॥ २०४ ॥ एर्हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना । कां नाना भोगरचना । मेळवावी ? ॥ २०५ ॥ आपण सायासेंकरुनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें । उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावें कां ? ॥ २०६ ॥ सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें । तेणें स्वधर्मु सांडुनि देहातें । पोखावें का{ई ॥ २०७ ॥ मग हे तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा । ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥ म्हणौनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण । यालागीं एथ अंतःकरण । देयावेंना ॥ २०९ ॥
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ । तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३४॥
एर्हवीं इंद्रियांचिया अर्था । सारिखा विषो पोखितां । संतोषु कीर चित्ता । आपजेल ॥ २१० ॥ परी तो संवचोराचा सांगातु । जैसा नावेक स्वस्थु । जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना ॥ २११ ॥ बापा विषाची मधुरता । झणें आवडी उपजे चित्ता । परी तो परिणामु विचारितां । प्राणु हरी ॥ २१२ ॥ देखैं इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे । जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा ॥ २१३ ॥ परी तयामाजीं गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये । तू जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें ॥ २१४ ॥ तैसें अभिलाषें येणें कीजेल । विषयांची आशा धरिजेल । तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा ॥ २१५ ॥ जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी । आणी मृगातें बुद्धि । साधावया ॥ २१६ ॥ एथ तैसीची परी आहे । म्हणौनि संगु हा तुज नोहे । पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें ॥ २१७ ॥ म्हणौनि हा आश्रोचि न करावा । मनेंहि आठवो न धरावा । एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदी ॥ २१८ ॥
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५॥
अगा स्वधर्मु हा आपुला । जरी कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखैं ॥ २१९ ॥ येरु आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥ २२० ॥ सांन्नें शूद्र घरीं आघवीं । पक्वान्नें आहाति बरवीं । तीं द्वीजें केंवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥ २२१ ॥ हें अनुचित कैसेनि कीजे । अग्राह्य केवीं इच्छिजे । अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां ॥ २२२ ॥ तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें । असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं ? ॥ २२३ ॥ हें असो वनिता आपुली । कुरूप जरी जाहली । तर्ही भोगितां तेचि भली । जियापरी ॥ २२४ ॥ तेवीं आवडे तैसा सांकडु । आचरतां जरी दुवाडु । तर्ही स्वधर्मुचि सुरवाडु । परत्रींचा ॥ २२५ ॥ हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध । परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ? ॥ २२६ ॥ ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते अळुकीची उरेल । जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥ म्हणौनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित । तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥ या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जिविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥ २२९ ॥ ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ शारङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥ हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसिलें । परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥ २३१ ॥
अर्जुन उवाच । अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुउरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६॥
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांही स्थिति भ्रंशे । मार्गु सांडुनी अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥ सर्वज्ञुही जे होती । हेयोपादेयही जाणती । तेही परधर्में व्यभिचरिति । कवणें गुणें ? ॥ २३३ ॥ बीजा आणि भूसा । अंधु निवाडू नेणें जैसा । नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ? ॥ २३४ ॥ जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती । वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥ आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती । परी बळात्कारें सुइजती । तयाचि माजीं ॥ २३६ ॥ जयाची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं । चुकवितां ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥ ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे । हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥
श्रीभगवानुवाच । काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३७॥
तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु । तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥ तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांतें कृपेची सांठवण नाहीं । हें कृतांताच्या ठायीं । मानिजती ॥ २४० ॥ हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरीचे वाघ । भजनमार्गींचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥ हे देहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचें कोंड । यांचें व्यामोहादिक दबड । जगावरी ॥ २४२ ॥ हे रजोगुण मानसींचे । समूळ आसुरियेचे । धालेपण ययांचें । अविद्या केलें ॥ २४३ ॥ हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले । तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥ २४४ ॥ हे मृत्युच्या नगरीं । मानिजती निकियापरि । जे जीविताचे वैरी । म्हणौनियां ॥ २४५ ॥ जयांसि भुकेलिया आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा । कुळवाडियांचिया आशा । चाळीत असे ॥ २४६ ॥ कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटी । तिये भ्रांतिही धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥ जे लोकत्रयाचें भातुकें । खेळतांचि खाय कवतिकें । तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥ हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे । जेणें जग आपुलेनि भोजें । नाचवीत असे ॥ २४९ ॥ जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला । तो दंभु रूढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥ साध्वी शांती नागविली । मग माया मांगी श्रृंगारिली । तियेकरवीं विटाळविलीं । साधुवृंदें ॥ २५१ ॥ इहीं विवेकाची त्र्याय फेडिली । वैराग्याचि खाल काढिली । जितया मान मोडिली । उपशमाची ॥ २५२ ॥ इहीं संतोषवन खांडिलें । धैर्यदुर्ग पाडिले । आनंदरोप सांडिले । उपडूनियां ॥ २५३ ॥ इहीं बोधाचीं रोपें लुंचिलीं । सुखाची लिपी पुसिली । जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची ॥ २५४ ॥ हे आंगा तंव घडले । जीवींची आथी जडले । परी नातुडती गिंवसिले । ब्रह्मादिकां ॥ २५५ ॥ हे चैतन्याचे शेजारीं । वसती ज्ञानाच्या एका हारीं । म्हणौनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥ हे जळेंविण बुडविती । आगीवीण जाळिती । न बोलतां कवळिती । प्राणियांतें ॥ २५७ ॥ हे शस्त्रेंविण साधिती । दोरेंविण बांधिती । ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेउनि ॥ २५८ ॥ हे चिखलेंवीण रोवितीं । पाशिकेंवीण गोंविती । हे कवणाजोगें न होती । आंतौटेपणें ॥ २५९ ॥
धूमेनाऽऽव्रियते वह्निर्यथाऽऽदर्शो मलेन च । यथोल्बेनाऽऽवृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३८॥
जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनि घेपे व्याळीं । नातरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी ॥ २६० ॥ कां प्रभावीण भानु । धूमेवीण हुताशनु । जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे ॥ २६१ ॥ तैसें इहींवीण एकलें । आम्हीं ज्ञान नाहीं देखिलें । जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे ॥ २६२ ॥
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञनिनो नित्यवैरिणा । कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९॥
तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध । म्हणौनि तें अगाध । होऊनि ठेले ॥ २६३ ॥ आधीं यांतें जिणावें । मग तें ज्ञान पावावें । तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां ॥ २६४ ॥ यांतें साधावयालागीं । जें बळ आणिजे आंगीं । तें इंधनें जैसीं आगी । सावावो होय ॥ २६५ ॥
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ४०॥
तैसे उपाय कीजती जे जे । ते ते यांसीचि होती विरजे । म्हणौनि हटियांतें जिणिजे । इहींचि जगीं ॥ २६६ ॥ ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे भला । तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ । पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम् ॥ ४१॥
यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें विये । आधीं निर्दळुनि घाली तियें । सर्वथैव ॥ २६८ ॥
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः । मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ४२॥
मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल । इतुकेन थारा मोडेल । या पापियांचा ॥ २६९ ॥
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना । जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम् ॥ ४३॥ ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम तॄतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
हे अंतरींहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले । जैसें रश्मिवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥ २७० ॥ तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ॥ २७१ ॥ ते गुरुशिष्याचि गोठी । पदपिंडाची गांठी । तेथ स्थिर राहोनि नुठी । कवणे काळीं ॥ २७२ ॥ ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो । राया ऐकें देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥ आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु । सांगैल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील ॥ २७४ ॥ तया बोलाचा हन पाडु । कीं रसवृत्तीचा निवाडु । येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा ॥ २७५ ॥ ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा । मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोगावा बापा ॥ २७६ ॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां तृतीयोऽध्यायः ॥
|