॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद् भगवद्गीता ॥ । अथ द्वितीयोऽध्यायः - अध्याय दुसरा । । साङ्ख्ययोगः ।
संजय उवाच । तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम् । विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥
मग संजयो म्हणे रायातें । आईके तो पार्थु तेथें । शोकाकुल रुदनातें । करितु असे ॥ १ ॥ तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत । तेणें द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥ जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले । तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥ म्हणौनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला । जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥ तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु । देखोनि श्रीशारङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
श्रीभगवानुवाच । कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् । अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २॥
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं । तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥ तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें । करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥ तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कहीं न संडिसी । तुझेनि नामें अपयशी । दिशा लंघिजे ॥ ८ ॥ तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो । तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥ तुवां संग्रामीं हरु जिंकिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । पवाडा तुवां केला । गंधर्वांसीं ॥ १० ॥ पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें । ऐसें पुरुषत्व चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥ तो तूं कीं आजि एथें । सांडूनियां वीरवृत्तीतें । अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥ विचारी तूं अर्जुनु । कीं कारुण्यें किजसी दीनु । सांग पां अंधकारें भानु । ग्रासिला आथी ? ॥ १३ ॥ ना तरी पवनु मेघासी बिहे ? । कीं अमृतासी मरण आहे ? । पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ? ॥ १४ ॥ कीं लवणेंचि जळ विरे ? । संसर्गें काळकूट मरे ? । सांग पां महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ? ॥ १५ ॥ सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथि कें जाहला ? । परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥ म्हणौनि अझुनी अर्जुना । झणें चित्त देसी या हीना । वेगीं धीर करूनियां मना । सावधु होई ॥ १७ ॥ सांडीं हें मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण । संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ? ॥ १८ ॥ हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां । सांगें झुंजावेळे सदयता । उचित कायी ? ॥ १९ ॥ हे असतीये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु । म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते । क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३॥
म्हणौनि शोकु न करी । तूं पुरता धीरु धरीं । हें शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥ तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत । तूं अझुनी वरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥ येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळूपण नुपकरे । हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ? ॥ २३ ॥ तूं आधींचि काय नेणसी ? । कीं हे गोत्रज नोळखसी ? । वायांचि काय करिसी । अतिशो आतां ? ॥ २४ ॥ आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ? । हें परस्परें तुम्हां व्याज । सदांचि आथी ॥ २५ ॥ तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनलें । हें नेणिजे परी कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥ मोहो धरिलीया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल । आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥ हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण । हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥ ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु । हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥
अर्जुन उवाच । कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रति योत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं । आधीं तूंचि विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥ हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु । हा उघड लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥ देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोषु पावविजती । तिये पाठीं केवीं वधिजती । आपुलिया हातीं ॥ ३२ ॥ देवा संतवृंद नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे । हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ? ॥ ३३ ॥ तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे । मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥ जयांलागीं मनें विरूं । आम्ही स्वप्नींही न शकों धरूं । तयां प्रत्यक्ष केवीं करूं । घातु देवा ? ॥ ३५ ॥ वरी जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहले । जे यांच्या वधीं अभ्यासिले । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥ मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला । तेणें उपकारें काय आभारैला । वधी तयातें ? ॥ ३७ ॥ जेथींचिया कृपा लाहिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु । तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
गुरुनहत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके । हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्रुधिरप्रदिग्धान् ॥ ५॥
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वरि तोहि आहाच देखिजे । परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥ हें अपार जें गगन । वरी तयाही होईल मान । परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥ वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्रही फुटे । परी मनोधर्मु न लोटे । विकरविलाही ॥ ४१ ॥ स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये । परी कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥ हा कारुण्याची आदि । सकल गुणांचा निधि । विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥ हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागीं कृपावंतु । आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥ ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें । तें मना न ये आघवें । जीवितेसीं ॥ ४५ ॥ हें येणें मानें दुर्धर । जे याहीहुनी भोग सधर । ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥ ना तरी देशत्यागें जाइजे । कां गिरिकंदर सेविजे । परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥ देवा नवनिशतीं शरीं । वावरोनी यांच्या जिव्हारीं । भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥ ते काढूनि काय किजती ? । लिप्त केवी सेविजती ? । मज नये हे उपपत्ती । याचिलागीं ॥ ४९ ॥ ऐसें अर्जुन तिये अवसरी । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं । परी तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥ हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला । म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः । यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६॥
येर्हवीं माझ्या चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परी निकें काय यापरौतें । तें तुम्हीं जाणा ॥ ५२ ॥ पैं वीरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥ आतां ऐसियांतें वधावें । कीं अव्हेरूनियां निघावें । या दोहींमाजीं बरवें । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः । यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ । जें मोहें येणें चित्त । व्याकुळ माझें ॥ ५५ ॥ तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे । मग पासींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥ देवा तैसें मज जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें । आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥ तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें । जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥ तूं गुरु बंधु पिता । तूं आमुची इष्ट देवता । तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥ जैसा शिष्यांतें गुरु । सर्वथा नेणें अव्हेरु । कीं सरितांतें सागरु । त्यजीं केवी ॥ ६० ॥ नातरी अपत्यांतें माये । सांडूनि जरी जाये । तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥ तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी । आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥ तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा । तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् । अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपनलासे मनीं । तो तुझिया वाक्यावांचुनी । न जाय आणिकें ॥ ६४ ॥ एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल । परी मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥ जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं जर्ही पेरिलीं । तरी न विरूढती सिंचिलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥ ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं नोहे । एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥ तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीव बुद्धि । एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥ ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मी तेणें ॥ ६९ ॥ कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥ सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेच्या भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचिना ? ॥ ७१ ॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवेंचि विष फेडी । तो धांवया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥ तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा । तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥ म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु । म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥ मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु । जैसा घनपटळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥ तयापरी तो धनुर्धरु । जाहलासे दुःखें जर्जरु । जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥ म्हणोनि सहजें सुनीळु । कृपामृतें सजळु । तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥ तेथ सुदशनांची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती । गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥ आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । मग नवी विरूढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥ ते कथा आइका । मनाचिया आराणुका । ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥
संजय उवाच । एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतप । न योत्स्य इति गोविंमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९॥
ऐसें संजयो असे सांगतु । म्हणे राया तो पार्थु । पुनरपि शोकाकुळितु । काय बोले ॥ ८१ ॥ आइके सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें । मी सर्वथा न झुंजें एथें । भरंवसेनी ॥ ८२ ॥ ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरूनि ठेला । तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयातें ॥ ८३ ॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत । सेनयोरूभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ १०॥
मग आपुलां चित्तीं म्हणे । एथ हें कायी आदरिलें येणें । अर्जुन सर्वथा कांहीं नेणें । काय कीजे ॥ ८४ ॥ हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरू स्वीकारी । जैसा ग्रहातें पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥ ना तरी असाध्य देखोनि व्याधि । अमृतासम दिव्य औषधि । वैद्य सूचि निरवधि । निदानीची ॥ ८६ ॥ तैसे विवरीतु असे श्रीअनंतु । तया दोन्ही सैन्याआंतु । जयापरी पार्थु । भ्रांती सांडी ॥ ८७ ॥ तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिलें । जैसे मातेच्या कोपीं थोकुलें । स्नेह आथी ॥ ८८ ॥ कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणीं । ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥ तैसीं वरिवरी पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें । तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥
श्रीभगवानुवाच । अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ ११॥
मग अर्जुनातें म्हणितलें । आम्हीं आजि हें नवल देखिलें । जें तुवां एथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥ तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणिवेतें न संडिसी । आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥ जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें । तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥ तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांतें शोचूं पहासी । हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥ तरी सांग पां अर्जुना । तुजपासूनि स्थिति या त्रिभुवना ? । हे अनादि विश्वरचना । तें लटके कायी ? ॥ ९५ ॥ एथ समर्थु एक आथी । तयापासूनि भूतें होती । तरी हें वायांचि काय बोलती । जगामाजीं ? ॥ ९६ ॥ हो कां सांप्रत ऐसें जाहलें । जे हे जन्ममृत्यु तुवां सृजिलें । आणि नाशु पावे नाशिलें । तुझेनि कायी ॥ ९७ ॥ तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसि घातु न धरिसी चित्तीं । तरी सांगें कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥ कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता । ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवों देसी ॥ ९९ ॥ अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें । तरी तुवां कां शोचावें । सांगें मज ॥ १०० ॥ परी मूर्खपणें नेणसी । न चिंतावें तें चिंतीसी । आणि तूंचि नीति सांगसी । आम्हांप्रति ॥ १०१ ॥ देखैं विवेकी जे होती । ते दोहीतेंहीं न शोचिती । जे होय जाय हे भ्रांती । म्हणौनियां ॥ १०२ ॥
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२॥
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख । आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥ नित्यता ऐसेचि असोनी । ना तरी निश्चित क्षया जाउनी । हे भ्रांति वेगळी करुनी । दोन्ही नाहीं ॥ १०४ ॥ हे उपजे आणि नाशे । तें मायावशें दिसे । एर्हवीं तत्त्वता वस्तु जें असे । तें अविनाशचि ॥ १०५ ॥ जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें । तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ? ॥ १०६ ॥ तेंचि वायूचें स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाट जाहलें । तरी आतां काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥
देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा । तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ १३॥
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक । हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥ एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥ तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा । आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४॥
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे । परी देहचि हा न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥ तैसीं चैतन्याच्या ठायीं । इयें शरीरांतरें होती जाती पाहीं । ऐसें जाणे तया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥ एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियां आधीनपण । तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥ इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोक उपजती । ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥ जयां विषयांच्या ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं । तेथ दुःख आणि कांहीं । सुखही दिसे ॥ ११३ ॥ देखें शब्दाचि व्याप्ति । निंदा आणि स्तुति । तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥ मृदु आणि कठीण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण । जे वपूचेनि संगें कारण । संतोषखेदां ॥ ११५ ॥ भ्यासुर आणि सुरेख । हें रूपाचें स्वरूप देख । जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ ११६ ॥ सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु । जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ११७ ॥ तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीति त्रासु । म्हणौनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥ देखें इंद्रियां आधीन होईजे । तैं शीतोष्णांतें पाविजे । आणि सुखदुःखीं आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥ या विषयांवांचूनि कांहीं । आणीक सर्वथा रम्य नाहीं । ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥ हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें । कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥ देखैं अनित्य तियापरी । म्हणौनि तूं अव्हेरीं । हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ । समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५॥
हे विषय जयातें नाकळिती । तया सुखदुःखें दोनी न पवती । आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥ तो नित्यरूप पार्था । वोळखावा सर्वथा । जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः । उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ १६॥
आतां अर्जुना कांहीं एक । सांगेन मी आईक । जे विचारपर लोक । वोळखिती ॥ १२५ ॥ या उपाधिमाजीं गुप्त । चैतन्य असे सर्वगत । तें तत्त्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥ सलिलीं पय जैसें । एक होऊनि मीनलें असे । परी निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥ कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ । निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥ ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी । मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥ कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ॥ १३० ॥ तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ॥ १३१ ॥ म्हणौनि अनित्याच्या ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं । निष्कर्षु दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् । विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ १७॥
देखें सारासार विचारितां । भ्रांति ते पाहीं असारता । तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥ हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु । तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाहीं ॥ १३४ ॥ जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु । तया केलियाहि घातु । कदा नोहे ॥ १३५ ॥
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः । अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत ॥ १८॥
आणि शरीरजात आघवें । हें नाशिवंत स्वभावें । म्हणौनि तुवां झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९॥
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि शरीरातें । मी मारिता हे मरते । म्हणतु आहासी ॥ १३७ ॥ तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्त्वता विचारिसी । तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥
न जायते म्र्यिते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २०॥ वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् । कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१॥
जैसें स्वप्नामाजीं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे । मग चेऊनियां पाहिजे । तंव कांहीं नाहीं ॥ १३९ ॥ तैसी हे जाण माया । तूं भ्रमतु आहासी वायां । शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगीं न रुपे ॥ १४० ॥ कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला । परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥ ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरलें असे । तो भंगलिया आपैसें । स्वरूपचि ॥ १४२ ॥ तैसें शरीराच्या लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं । म्हणौनि तू हें नारोपी । भ्रांति बापा ॥ १४३ ॥
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २२॥
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसें देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥ अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४॥
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणौनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥ हा प्रळयोदकें नाप्लवे । अग्निदाहो न संभवे । एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥ अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु । सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥१४७ ॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५॥
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरीटी । ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥ हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना । निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥ हा गुणत्रयरहितु । अनादि अविकृतु । व्यक्तीसी अतीतु । सर्वरूप ॥ १५० ॥ अर्जुना ऐसा हा जाणावा । सकळात्मकु देखावा । मग सहजें शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् । तथापि त्वं महाबाहो नैवं शौचितुमर्हसि ॥ २६॥
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि मानिसी । तर्ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥ जो आदि स्थिति अंतु । हा निरंतर असे नित्यु । जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥ तें आदि नाहीं खंडलें । समुद्रीं तरी असे मीनलें । आणि जातचि मध्यें उरलें । दिसे जैसें ॥ १५४ ॥ इयें तिन्ही तयापरी । सरसींच सदा अवधारीं । भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥ म्हणौनि हें आघवें । एथ तुज नलगे शोचावें । जे स्थितीचि हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥ ना तरी हें अर्जुना । नयेचि तुझिया मना । जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥ तरी एथ कांहीं । तुज शोकासि कारण नाहीं । हे जन्ममृत्यु पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च । तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७॥
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र जैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥ ना तरी उदो अस्तु आपैसें । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥ महाप्रळयावसरें । हें त्रैलोक्यहि संहरे । म्हणौनि हा न परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥ तूं जरी हें ऐसें मानिसी । तरी खेदु कां करिसी ? । काय जाणतुचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥ एथ आणीकही एक पार्था । तुज बहुतीं परी पहातां । दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत । अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८॥
जियें समस्तें इयें भूतें । जन्माआदि अमूर्तें । मग पातली व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥ तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आनें नव्हती । देखें पूर्वस्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥ येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें । तैसा आकारु हा मायवशें । तत्स्वरूपीं ॥ १६६ ॥ ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार । कां परापेक्षां अळंकार । व्यक्ती कनकीं ॥ १६७ ॥ तैसे सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित । जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥ तैसें आदीचि जें नाहीं । तयालागीं तूं रुदसी कायी । तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥ जयाचि आर्तीचि भोगित । विषयीं त्यजिले संत । जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥ दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें । मुनीश्वर तपातें । आचरताती ॥ १७१ ॥
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः । आश्चर्यवच्चैनमन्यः श्रुणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९॥
एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥ एकां गुणानुवादु करितां । उपरति होऊन चित्ता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावी सांडिले । एक अनुभवें पातले । तद्रूपता ॥ १७४ ॥ जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजीं मिळत । परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥ तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळवणीसवें एकवटती । परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत । तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३०॥
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं । तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥ जयाचेनि स्वभावें । हें होत जात आघवें । तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥ एर्हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता । परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि । धर्माद्धि युद्धाच्छेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१॥
तूं अझुनी कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी । स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥ या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांहीं पातलें । कीं युगचि हें बुडालें । जर्ही एथ ॥ १८१ ॥ तरी स्वधर्मु एकु आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे । मग तरिजेल काय पाहें । कृपाळूपणें ॥ १८२ ॥ अर्जुना तुझें चित्त । जर्ही जाहलें द्रवीभूत । तर्ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥ अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाहीं म्हणितलें । ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥ तैसें आनी आन करितां । नाशु होईल हिता । म्हणौनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥ वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणें काळीं ॥ १८६ ॥ जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥ तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥ १८८ ॥ म्हणौनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांहीं । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥ निष्कपटा होआवें । उसिणा घाई झुंजावें । हें असो काय सांगावें । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् । सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ ३२॥
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो कां जें दैव तुमचें । कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटलें असे ॥ १९१ ॥ हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें । मूर्त कां प्रतापें । उदो केला ॥ १९२ ॥ ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तीचेनि पडिभरें । हें कीर्तीचि स्वयंवरें । आली तुज ॥ १९३ ॥ क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तैं झुंज ऐसें लाहिजे । जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणि ॥ १९४ ॥ ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख । तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि । ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ ३३॥
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिलें शोचूं बैसिजे । तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥ पूर्वजांचें जोडलें । आपणचि होय धाडिलें । जरी आजि शस्त्र सांडिलें । रणीं इये ॥ १९७ ॥ असती कीर्ति जाईल । जगचि अभिशापु देईल । आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥ जैसीं भातारेंहीन वनिता । उपहती पावे सर्वथा । तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥ ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरी गिधीं विदारिजे । तैसें स्वधर्महीना अभिभविजे । महादोषीं ॥ २०० ॥
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् । संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४॥
म्हणौनि स्वधर्मु हा सांडसील । पापा वरपडा होसील । आणि अपेश तें न वचेल । कल्पांतवरी ॥ २०१ ॥ जाणतेनि तंवचि जियावें । जंव अपकीर्ति आंगा न पवे । आणि सांग पां केवीं निगावें । एथोनियां ? ॥ २०२ ॥ तू निर्मत्सर सदयता । येथूनि निघसील कीर माघौता । परी ते गती समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥ हे चहूंकडूनि वेढितील । बाणवरी घेतील । तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणें ॥ २०४ ॥ ऐसेनिहि प्राणसंकटें । जरी विपायें पां निघणें घटे । तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥
भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथाः । येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५॥
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमें झुंजों आलासी । आणि सकणवपणें निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥ तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां । कां प्रत्यया येईल मना । सांगैं मज ॥ २०७ ॥
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः । निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६॥
हे म्हणती गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला । हा सांगैं बोलु उरला । निका कायी ? ॥ २०८ ॥ लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुलीं जीवितें । परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥ ते तुज अनायासें । अनकळित जोडिली असे । हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥ तैसी कीर्ती निःसीम । तुझ्या ठायीं निरुपम । तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११ ॥ दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती । जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥ ऐसी महिमा घनवट । गंगा जैसी चोखट । जया देखीं जगीं सुभट । वाट जाहली ॥ २१३ ॥ तें पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त । जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥ जैसा सिंहाचिया हाकां । युगांतु होय मदमुखा । तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ॥ २१५ ॥ जैसे पर्वत वज्रातें । ना तरी सर्प गरुडातें । तैसे अर्जुना हे तूतें । मानिती सदा ॥ २१६ ॥ तें अगाधपण जाईल । मग हीणावो अंगा येईल । जरी मागुता निघसील । न झुंजतुचि ॥ २१७ ॥ आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनिं अवकळा करिती । न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥ मग ते वेळीं हियें फुटावें । आतां लाठेपणें कां न झुजावें ? । हे जिंतलें तरी भोगावें । महीतळ ॥ २१९ ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७॥
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२०॥ म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २१॥ ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित । तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥ म्हणौनि ये गोठी । विचारु न करी किरीटी । आतां धनुष्य घेऊनि उठीं । झुंजैं वेगीं ॥ २२१ ॥ देखैं स्वधर्मु हा आचरतां । दोषु नाशे असता । तुज भ्रांति हे कवण चित्ता । पातकाची ॥ २२२ ॥ सांगैं प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे । परी विपायें चालों नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥ अमृतें तरीच मरिजे । जरी विखेंसि सेविजे । तैसा स्वधर्मीं दोषु पाविजे । हेतुकपणें ॥ २२४ ॥ म्हणौनियां पार्था । हेतू सांडोनि सर्वथा । तुज क्षात्रवृत्ति झुंजतां । पाप नाहीं ॥ २२५ ॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८॥
सुखीं संतोषां न यावें । दुःखीं विषादा न भजावें । आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥ एथ विजयपण होईल । कीं सर्वथा देह जाईल । हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥ आपणयां उचिता । स्वधर्में राहाटतां । जें पावे तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥ ऐसियां मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें । म्हणौनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥
एषा तेऽभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां श्रृणु । बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ ३९॥
हे सांख्यस्थिति मुकुळित । सांगितली तुज येथ । आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥ जया बुद्धियुक्ता । जाहलिया पार्था। कर्मबंधु सर्वथा । बाधूं न पवे ॥ २३१ ॥ जैसें वज्रकवच लेइजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे । परी जैतेसीं उरिजे । अचुंबित ॥ २३२ ॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते । स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४०॥
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे । जेथ पूर्वानुक्रमु दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥ कर्माधारें राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे । जैसा मंत्रज्ञु न बंधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥ तियापरी जे सुबुद्धि । आपुलालिया निरवधि । हा असतांचि उपाधि । आकळूं न सके ॥ २३५ ॥ जेथ न संचरे पुण्यपाप । जें सूक्ष्म अति निष्कंप । गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥ अर्जुना तें पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे । तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन । बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम् ॥ ४१॥
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रकटी । तैसी सद्बुद्धी हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥ पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरीं । जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥ आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु । कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥ तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि । जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥ तैसें ईश्वरावाचुंनी कांहीं । जिये आणीक लाणी नाहीं । ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥ येर ते दुर्मति । जे बहुधा असे विकरति । तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥ म्हणौनि तयां पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था । आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः । वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२॥ कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् । क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३॥ भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् । व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४॥
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती । परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥ म्हणती संसारीं जन्मिजे । यज्ञादिक कर्म कीजे । मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥ येथ हें वांचूनि कांहीं । आणिक सर्वथा सुखचि नाहीं । ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥ देखैं कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत । ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥ क्रियाविशेषें बहुतें । न लोपिती विधीतें । निपुण होऊन धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥ परी एकचि कुडें करितीं । जे स्वर्गकामु मनीं धरिती । यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥ जैसा कर्पूराचा राशी कीजे । मग अग्नि लाऊन दीजे । कां मिष्टान्नीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥ दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला । तैसा नासिती धर्मु निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥ सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु कां अपेक्षिजे ? । परी नेणती ते काय कीजे । अप्राप्य देखें ॥ २५३ ॥ जैसी रांधवणी रससोय निकी । करूनियां मोलें विकी । तैसा भोगासाठीं अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥ म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा । तया वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन । निर्द्वंद्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५॥
तिन्हीं गुणीं आवृत । हे वेद जाणैं निभ्रांत । म्हणौनि उपनिषदादि समस्त । सात्विक तें ॥ २५६ ॥ येर रजतमात्मक । जेथ निरूपिजे कर्मादिक । जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥ म्हणौनि तूं जाण । हे सुखदुःखांसीच कारण । एथ झणें अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥ तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं । एक आत्मसुख अंतरीं । विसंब झणीं ॥ २५९ ॥
यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके । तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥
जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । तर्ही आपण हित आपुलें । तेंचि घेपें ॥ २६० ॥ जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती । तरी तेतुलेहि काय चालिजती । सांगैं मज ॥ २६१ ॥ कां उदकमय सकळ । जर्ही जाहले असें महीतळ । तरी आपण घेपें केवळ । आर्तीचिजोगें ॥ २६२ ॥ तैसें ज्ञानीये जे होती । ते वेदार्थातें विवरिती । मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥
म्हणोनि आइकें पार्था । याचिपरी पाहतां । तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥ आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेचि हें मना आलें । जें न सांडिजे तुवां आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥ परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मीं संगति न व्हावी । हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गंत्यक्त्वा धनंजय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८॥
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संगु टाकुनी । मग अर्जुना चित्त देउनी । करीं कर्में ॥ २६७ ॥ परी आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे । तरी विशेषें तेथ तोषावें । हेंही नको ॥ २६८ ॥ कीं निमित्तें कोणें एकें । तें सिद्धी न वचतां ठाके । तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥ आचरतां सिद्धी गेलें । तरी काजाची कीर आलें । परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥ देखैं जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे । तरी परिपूर्ण सहजें । जहालें जाणैं ॥ २७१ ॥ देखैं संतासंतकर्मीं । हें जें सरिसेंपण मनोधर्मीं । तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय । बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ ४९॥ बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ ५०॥
अर्जुना समत्व चित्ताचें । तेंचि सार जाणैं योगाचें । जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥ तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था । दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥ परी तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे । जें कर्मशेष सहजें । योगस्थिति ॥ २७५ ॥ म्हणौनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु । मनें करीं अव्हेरु । फलहेतूचा ॥ २७६ ॥ जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले । इहीं उभयबंधीं सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः । जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१॥
ते कर्मीं तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती । आणि यातायाति न लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥ मग निरामयभरित । पावती पद अच्युत । ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति । तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२॥
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें यया सांडिसी । आणि वैराग्य मानसीं । संचरैल ॥ २८० ॥ मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान । तेणें निचाडें होईल मन । अपैसें तुझें ॥ २८१ ॥ तेथ आणिक कांहीं जाणावें । कां मागिलातें स्मरावें । हें अर्जुना आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३॥
इंद्रियांचिया संगति । जिये पसरु होतसे मति । ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥ समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ । तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥
अर्जुन उवाच । स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव । स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ ५४॥
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा । मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधी ॥ २८५ ॥ मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें । तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥ या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें । काय म्हणिपें स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥ आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसिया चिन्हीं जाणिजे । जो समाधिसुख भुंजे । अखंडित ॥ २८८ ॥ तो कवणें स्थिती असे । कैसेनि रूपीं विलसे । देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥ तंव परब्रह्म अवतरणु । जो षडगुणाधिकरणु । तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥
श्रीभगवानुवाच । प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५॥
म्हणे अर्जुना परियेसीं । जो हा अभिलाषु प्रौढ मानसीं । तो अंतराय स्वसुखेंसीं । करीतु असे ॥ २९१ ॥ जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरण भरितु । परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥ २९२ ॥ तो कामु सर्वथा जाये । जयाचें आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥ २९३ ॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः । वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ ५६॥
नाना दुःखीं प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥ अर्जुना तयाच्या ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्णु तो ॥ २९५ ॥ ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् । नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७॥
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा- । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥ ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणें वेळे ॥ २९८ ॥ गोमटें कांहीं पावे । तरी संतोषें तेणें नाभिभवे । जो वोखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥ ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु । तो जाण पां प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः । इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८॥
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥ तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिति । पातली असे ॥ ३०२ ॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः । रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९॥
अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक । या विषयांतें साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥ श्रेत्रादि इंद्रियें आवरिती । परि रसने नियमु न करिती । ते सहस्त्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४ ॥ जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे । तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥ तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवेनि आंगें फांके । तैसा मानसीं विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥ येरां इंद्रियां विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें । जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥ मग अर्जुना स्वभावें । ऐसियाही नियमातें पावे । जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाइजे ॥ ३०८ ॥ तैं शरीरभाव नासती । इंद्रियें विषय विसरती । जैं सोहंभाव प्रतीति । प्रगट होय ॥ ३०९ ॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६०॥
येर्हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना । जे राहटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥ जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी । जे मनातें सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥ तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी । जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥ देखैं विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धिचेनि मिषें । मग आकळिती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥ तिये संधीं मन जाये । मग अभ्यासीं ठोठावलें ठाये । ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचें ॥ ३१४ ॥
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः । वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१॥
म्हणौनि आइकें पार्था । यांतें निर्दळी जो सर्वथा । सर्व विषयीं आस्था । सांडूनियां ॥ ३१५ ॥ तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण । जयाचे विषयसुखें अंतःकरण । झकवेना ॥ ३१६ ॥ जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु । जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥ येर्हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांहीं । तरी साद्यंतुचि पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥ जैसा कां विषाचा लेशु । घेतलियां होय बहुवसु । मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥ तैसी विषयाची शंका । मनीं वसती देखा । घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते । सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६२॥ क्रोधाद्भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३॥
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती । संगें प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥ जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला । क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणें ॥ ३२२ ॥ संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति । चडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥ कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्य तेजातें ग्रासी । तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥ मग अज्ञानांध केवळ । तेणें आप्लविजे सकळ । तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥ जैसें जात्यंधा पळणीं पावे । मग ते काकुळती सैरा धांवे । तैसें बुद्धीसि होती भंवे । धनुर्धरा ॥ ३२६ ॥ ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे । तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥ चैतन्याच्या भ्रंशीं । शरीरा दशा जैशी । तैसें पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखैं ॥ ३२८ ॥ म्हणौनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुलिंग लागे इंधना । मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥ तैसें विषयांचें ध्यान । जरी विपायें वाहे मन । तरी येसणें हें पतन । गिंवसित पावे ॥ ३३० ॥
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४॥
म्हणौनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे । मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥ पार्था आणिकही एक । जरी नाशले रागद्वेष । तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाहीं ॥ ३३२ ॥ जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरें जगातें स्पर्शतु । तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिचेनि ॥ ३३३ ॥ तैसा इंद्रियार्थीं उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न । जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥ तरी विषयां तयां कांहीं । आपणपेंवांचूनि नाहीं । मग विषय कवण कायी । बाधितील कवणा ॥ ३३५ ॥ जरी उदकीं उदक बुडिजे । कां अग्नि आगी पोळिजे । तरी विषयसंगे आप्लविजे । परिपूर्णु तो ॥ ३३६ ॥ ऐसा आपणचि केवळु । होऊनि असे निखळु । तयाचि प्रज्ञा अचळु । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते । प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५॥
देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता । तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥ जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु । तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥ तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? । तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥ जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु । तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥
नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना । न चाभावयतः शांतिरशान्तस्य कुतः सुखम् ॥ ६६॥
ये युक्तीची कडसणी । नाहीं जयाच्या अंतःकरणीं । तो आकळिला जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥ तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा । आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥ निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखैं मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥ जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥ देखैं अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरूढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥ म्हणौनि अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७॥
इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥ जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥ तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला जाण दुःखें । संसारिकें ॥ ३५० ॥
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः । इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८॥
म्हणौनि आपुलीं आपणपेया । जरी इंद्रियें येती आया । तरी अधिक कांहीं धनंजया । सार्थक असे ? ॥ ३५१ ॥ देखैं कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी । ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥ तैसीं इंद्रियें आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती । तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥ आतां आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह । अर्जुना तुज सांगैन । परिस पां ॥ ३५४ ॥
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९॥
देखैं भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें । आणि जीव जेथ चेइलें । तेथ निद्रितु जो ॥ ३५५ ॥ तोचि तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि । तोचि जाणें निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६ ॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् । तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी ॥ ७०॥
पार्था आणीकही परी । तो जाणों येईल अवधारीं । जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥ जर्ही सरितावोघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत । तर्ही अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥ ३५८ ॥ ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाती समस्ता । परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥ तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धीं । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी । आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥ सांगैं सूर्याच्या घरीं । प्रकाशु काय वातीवेरी । कां न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥ देखैं ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी । तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥ जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे । तो केवीं रंजे पालिवणें । भिल्लांचेनि ? ॥ ३६३ ॥ जो अमृतासी ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी । तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥ पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं । तेथ ऋद्धिसिद्धी कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः । निर्ममो निरहंकारः स शांतिमधिगच्छति ॥ ७१॥
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला । तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥ ३६६ ॥ तो अहंकारातें दंडुनी । सकळ कामु सांडोनी । विचरे विश्व होऊनी । विश्वामाजीं ॥ ३६७ ॥
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति । स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२॥ ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे सांख्ययोगोनाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥
हे ब्रह्मस्थिति निःसीम । जे अनुभवितां निष्काम । ते पावले परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥ जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीचि व्याकुळता । आड ठाकों न सके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥ तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति । सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥ ऐसें कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुनें मनीं म्हणितलें । आतां आमुचियाचि काजा कीर आलें । उपपत्ति इया ॥ ३७१ ॥ जें कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें । तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणौनियां ॥ ३७२ ॥ ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवाइला । आतां प्रश्नु करील भला । आशंकोनी ॥ ३७३ ॥ तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासी आगरु । कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥ जो आपण सर्वज्ञनाथु । निरूपिता होईल श्रीअनंतु । ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तिदासु ॥ ३७५ ॥ इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः ॥
|