संतसाहित्य

Navigation

दशक १८ वा



दशक १७ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥  बहुजिनसी नाम दशक अठरावा  ॥ 

समास पहिला : बहुदेवस्थाननाम

 

॥ श्रीरामसमर्थ ॥

तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।

विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥

तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती ।

तुझें निजरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥

धन्य धन्य चतुरानना । तां केली सृष्टीरचना ।

वेद शास्त्रें भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥

धन्य विष्णु पाळण करिसी । येकांशें सकळ जीवांसी ।

वाढविसी वर्तविसी । जाणजाणों ॥ ४ ॥

धन्य धन्य भूळाशंकर । जयाच्या देण्यास नाहीं पार ।

रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥

धन्य धन्य इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव ।

इंद्रलोकींचें वैभव । काये म्हणौनि सांगावें ॥ ६ ॥

धन्य धन्य येमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म ।

प्राणीमात्राचें वर्म । ठाईं पाडिती ॥ ७ ॥

वेंकटेंसीं महिमा किती । भले उभ्यां अन्न खाती ।

वडे धिरडीं स्वाद घेती । आतळस आपालांचा ॥ ८ ॥

धन्य तूं वो बनशंकरी । उदंड शाखांचिया हारी ।

विवरविवरों भोजन करी । ऐसा कैंचा ॥ ९ ॥

धन्य भीम गोलांगुळा । कोरवड्यांच्या उदंड माळा ।

दहि वडे खातां सकळां । समाधान होये ॥ १० ॥

धन्य तूं खंडेराया । भंडारें होये पिंवळी काया ।

कांदेभरीत रोटगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥

धन्य तुळजाभोवानी । भक्तां प्रसन्न होते जनीं ।

गुणवैभवास गणी । ऐसा कैंचा ॥ १२ ॥

धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।

तानमानें रागरंग । नाना प्रकारीं ॥ १३ ॥

धन्य तूं गा क्षत्रपाळा । उदंड जना लाविला चाळा ।

भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥

रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार ।

उपासनेस बहुत नर । तत्पर जाले ॥ १५ ॥

सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।

भूमंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥

नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरूपें जाला ।

भोक्ता सकळ वैभवाला । तोचि येक ॥ १७ ॥

याचा पाहावा विचार । उदंड लांबला जोजार ।

होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥

कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती ।

सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच घडे ॥ १९ ॥

कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो ।

भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २० ॥

प्राणी साभिमानें भुलले । देह्याकडे पाहात गेले ।

मुख्य अंतरात्म्यास चुकलें । अंतरीं असोनी ॥ २१ ॥

आरे या आत्मयाची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे ।

अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहींयेक ॥ २२ ॥

त्या अनुसंधानासरिसें । जळोनी जाईजे किल्मिषें ।

अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे । विवरोन पाहाती ॥ २३ ॥

अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले ।

बाह्यात्कारें भरंगळले । लोकाचारें ॥ २४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुदेवस्थाननिरूपणनाम समास पहिला ॥

 

 

 

समास दुसरा : सर्वज्ञसंगनिरूपण

 

॥ श्रीरामसमर्थ ॥

नेणपणें जालें तें जालें । जालें तें होऊन गेलें ।

जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥

जाणत्याची संगती धरावी । जाणत्याची सेवा करावी ।

जाणत्याची सद्‍बुद्धि घ्यावी । हळुहळु ॥ २ ॥

जाणत्यापासीं लेहों सिकावें । जाणत्यापासीं वाचूं सिकावें ।

जाणत्यापासीं पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥

जाणत्यास करावा उपकार । जाणत्यास झिजवावें शरीर ।

जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥

जाणत्याचे संगतीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें ।

जाणत्याचे संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥ ५ ॥

जाणत्याचे गावें गाणें । जाणत्यापासीं वाजवणें ।

नाना आळाप सिकणें । जाणत्यापासीं ॥ ६ ॥

जाणत्याचे कासेसी लागावें । जाणत्याचें औषध घ्यावीं ।

जाणतां सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥

जाणत्यापासीं परीक्षा सिकणें । जाणत्यापासीं तालिम करणें ।

जाणत्यापासीं पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥

जाणता बोलेले तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें ।

जाणत्याचें ध्यान घ्यावें । नाना प्रकरीं ॥ ९ ॥

जाणत्याच्या कथा सिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या ।

जाणत्याच्या गोष्टी विवराव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥

जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे ।

जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११ ॥

जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ।

जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्यासावे ॥ १२ ॥

जाणत्याचा साक्षेप घ्यावा । जाणत्याचा तर्क जाणावा ।

जाणत्याचा उल्लेख समजावा । न बोलतांचि ॥ १३ ॥

जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण ।

जाणत्याचें निरूपण । ऐकत जावें ॥ १४ ॥

जाण्त्याची कवित्वें सिकावीं । गद्यें पद्यें वोळखावी ।

माधुर्यवचनें समजावीं । अंतर्यामीं ॥ १५ ॥

जाणत्याचें पाहावे प्रबंद । जाणत्याचे वचनभेद ।

जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥

जाणत्याची तीक्षणता । जाणत्याची सहिष्णता ।

जाणत्याची उदारत । समजोन घ्यावी ॥ १७ ॥

जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घ सूचना ।

जाणत्याची विवंचना । समजोन घ्यावी ॥ १८ ॥

जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अध्यात्मविवेक ।

जाणत्याचे गुण अनेक । आवघेच घ्यावे ॥ १९ ॥

जाणत्याचा भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग ।

जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन घ्यावा ॥ २० ॥

जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचें सिकावें ध्यान ।

जाणत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घावें ॥ २१ ॥

जाणत्याचें अलिप्तपण । जाणत्याचें विदेहलक्षण ।

जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२ ॥

जाणत येक अंतरात्मा । त्याचा काये सांगावा महिमा ।

विद्याकळागुणसीमा । कोणें करावी ॥ २३ ॥

परमेश्वरांचे गुणानुवाद । अखंड करावा संवाद ।

तेणेंकरितां आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥

परमेश्वरें निर्मिलें तें । अखंड दृष्टीस पडतें ।

विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥ २५ ॥

जितुकें कांहीं निर्माण जालें । तितुकें जगदेश्वरें निर्मिलें ।

निर्माण वेगळें केलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥

तो निर्माण करतो जना । परी पाहों जातां दिसेना ।

विवेकबळें अनुमाना । आणीत जावा ॥ २७ ॥

त्याचें अखंड लागतां ध्यान । कृपाळुपणें देतो आशन ।

सर्वकाळ संभाषण । तदांशेंचि करावें ॥ २८ ॥

ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त ।

संसारापासुनी मुक्त । भक्तांस करी ॥ २९ ॥

उपासनेचे सेवटीं । देवां भक्तां अखंड भेटी ।

अवुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सर्वज्ञ्संगनिरूपणनाम समास दुसरा ॥

 

 

 

समास तिसरा : निस्पृहशिकवण

 

॥ श्रीराम ॥

दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करूं नये नास ।

दास म्हणे सावकास । विवेक करावा ॥ १ ॥

न पाहातां उत्तम विवेक । अवघा होतो अविवेक ।

अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥

हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें ।

वाईट संगतीनें बुडविलें । देखत देखतां ॥ ३ ॥

मूर्खपणाचा अभ्यास जाला । बाष्कळपणें घातला घाला ।

काम चांडाळा उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥

मूर्ख आळसी आणि तरुणा । सर्वांविषीं दैन्यवाणा ।

कांहीं मिळेना कोणा । काये म्हणावें ॥ ५ ॥

जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।

उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥

बोलतां येना बैसतां येना । प्रसंग कांहींच कळेना ।

शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥

लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं ।

नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ॥ ८ ॥

आपणांस कांहींच येना । आणी सिकविलेंहि मानेना ।

आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥

अंतरी येक बाहेरी येक । ऐसा जयाचा विवेक ।

परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥

आपला संसार नासला । मनामधें प्रस्तावला ।

तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवेकाचा ॥ ११ ॥

येकाग्र करूंनिया मन । बळेंचि धरावें साधन ।

येत्‍नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥

अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम गुण अभ्यासावे ।

प्रबंद पाठ करीत जावें । जाड अर्थ ॥ १३ ॥

पदप्रबंद श्लोकप्रबंद । नाना धाटी मुद्रा छंद ।

प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥

कोणे प्रसंगीं काये म्हणावें । ऐसें समजोन जाणावें ।

उगेंचि वाउगें सिणावें । कासयासी ॥ १५ ॥

दुसयाचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें ।

जें आठवेल तें गावें । हें मूर्खपण ॥ १६ ॥

जयाची जैसी उपासना । तेंचि गावें चुकावेना ।

रागज्ञाना ताळज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥

साहित संगीत प्रसंग मानें । करावीं कथेंचीं घमशानें ।

अर्थांतर श्रवणमननें । काढीत जावें ॥ १८ ॥

पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें ।

सांगितलें गोष्टीचें असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥

अखंड येकांत सेवावा । ग्रन्थमात्र धांडोळावा ।

प्रचित येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहशिकवणनिरूपणनाम समास तिसरा ॥

 

 

 

समास चौथा : देहदुर्लभनिरूपण

 

॥ श्रीराम ॥

देह्याकरितां गणेशपूजन । देह्याकरितां शारदावंदन ।

देह्याकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १ ॥

देह्याकरितां कवित्वें चालती । देह्याकरितां अधेनें करिती ।

देह्याकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥ २ ॥

देह्याकरितां ग्रंथलेखन । नाना लिपीवोळखण ।

नाना पदार्थशोधन । देह्याकरितां ॥ ३ ॥

देह्याकरितां माहांज्ञानी । सिद्ध सधु ऋषी मुनी ।

देह्याकरितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥ ४ ॥

देह्याकरितां श्रवण घडे । देह्याकरितां मननीं पवाडे ।

देह्याकरितां देहीं आतुडे । मुख्य परमात्मा ॥ ५ ॥

देह्याकरितां कर्ममार्ग । देह्याकरितां उपासनामार्ग ।

देह्याकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥ ६ ॥

योगी वीतरागी तापसी । देह्याकरितां नाना सायासी ॥

देह्याकरितां आत्मयासी । प्रगटणें घडे ॥ ७ ॥

येहलोक आणि परलोक । देह्याकरितां सकळ सार्थक ।

देहेंविण निरार्थक । सकळ कांहीं ॥ ८ ॥

पुरश्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें ।

सीतोष्ण पंचाग्नी साधणें । देह्याकरितां ॥ ९ ॥

देह्याकरितां पुण्यसीळ । देह्याकरितां पापी केवळ ।

देह्याकरितां अनर्गळ । सुचिस्मंत ॥ १० ॥

देह्याकरितां अवतारी । देह्याकरितां वेषधारी ।

नाना बंडें पाषांडें करी । देह्याकरितां ॥ ११ ॥

देह्याकरितां विषयभोग । देह्याकरितां सकळ त्याग ।

होती जाती नाना रोग । देह्याकरितां ॥ १२ ॥

देह्याकरितां नवविधा भक्ती । देह्याकरितां चतुर्विधा मुक्ती ।

देह्याकरितां नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥

देह्याकरितां दानधर्म । देह्याकरितां नाना वर्म ।

देह्याकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥ १४ ॥

देह्याकरितां नाना स्वार्थ । देह्याकरितां नाना अर्थ ।

देह्याकरितां होईजे वेर्थ । आणी धन्य ॥ १५ ॥

देह्याकरितां नाना कळा । देह्याकरितां उणा आगळा ।

देह्याकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥

नाना सन्मार्गसाधनें । देह्याकरितां तुटती बंधनें ।

देह्याकरितां निवेदनें । मोक्ष लाभे ॥ १७ ॥

देहे सकळामधें उत्तमु । देहीं राहिला आत्मारामु ।

सकळां घटीं पुरुषोत्तमु । विवेकी जाणती ॥ १८ ॥

देह्याकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती ।

देह्याकरितां होती जाती । अवतारमाळिका ॥ १९ ॥

देह्याकरितां नाना भ्रम । देह्याकरितां नाना संभ्रम ।

देह्याचेन उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥ २० ॥

देह्याकरितां सकळ कांहीं । देह्याविण कांहीं नाहीं ।

आत्मा विरे ठाईं ठाईं । नव्हताच जैसा ॥ २१ ॥

देहे परलोकींचें तारूं । नाना गुणांचा गुणागरु ।

नाना रत्नांचा विचारु । देह्याचेनी ॥ २२ ॥

देह्याचेन गायेनकळा । देह्याचेन संगीतकळा ।

देह्याचेन अंतर्कळा । ठाईं पडे ॥ २३ ॥

देहे ब्रह्मांडाचें फळ । देहे दुल्लभचि केवळ ।

परी या देह्यास निवळ । उमजवावें ॥ २४ ॥

देह्याकरितां लहनथोर । करिती आपुलाले व्यापार ।

त्याहिमधें लाहानथोर । कितीयेक ॥ २५ ॥

जे जे देहे धरुनी आले । ते ते कांहीं करून गेले ।

हरिभजनें पावन जाले । कितीयेक ॥ २६ ॥

अष्टधा प्रकृतीचें मूळ । संकल्परूपचि केवळ ।

नाना संकल्पें देहेफळ । घेऊन आलें ॥ २७ ॥

हरिसंकल्प मुळीं होता । तोचि फळीं पाहावा आतां ।

नाना देह्यांतरीं तत्वता । शोधितां कळे ॥ २८ ॥

वेलाचे मुळीं बीज । उदकरूप वेली समज ।

पुढें फळामधें बीज । मुळींच्या अंशें ॥ २९ ॥

मुळाकरितां फळ येतें । फळाकरितां मूळ होतें ।

येणेंकरितां होत जातें । भूमंडळ ॥ ३० ॥

असो कांहीं येक करणें । कैसें घडे देह्याविणें ।

देहे सर्थकीं लावणें । म्हणिजे बरें ॥ ३१ ॥

आत्म्याकरितां देहे जाला । देह्याकरितां आत्मा तगला ।

उभययोगें उदंड चालिला । कार्यभाग ॥ ३२ ॥

चोरून गुप्तरूपें करावें । तें आत्मयासी पडे ठावें ।

कर्तुत्व याचेन स्वभावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥

देह्यामधें आत्मा असतो । देहे पूजितां आत्मा तोषतो ।

देहे पीडितां आत्मा क्षोभतो । प्रत्यक्ष आतां ॥ ३४ ॥

देह्यावेग्ळी पूजा पावेना । देह्याविण पूजा फावेना ।

जनीं जनार्दन म्हणोनी जना । संतुष्ट करावें ॥ ३५ ॥

उदंड प्रगटला विचार । धर्मस्थापना तदनंतर ।

तेथेंच पूजेस अधिकार । पुण्यशरीरीं ॥ ३६ ॥

सगट भजन करूं येतें । तरी मूर्खपण आंगीं लागतें ।

गाढवासी पूजितां कळतें । काये त्याला ॥ ३७ ॥

पूज्य पूजेसी अधिकार । उगेचि तोषवावे इतर ।

दुखऊं नये कोणाचें अंतर । म्हणिजे बरें ॥ ३८ ॥

सकळ जगदांतरींचा देव । क्षोभता राहाव्या कोठें ठाव ।

जनावेगळा जनास उपाव । आणीक नाहीं ॥ ३९ ॥

परमेश्वराचे अनंत गुण । मनुष्यें काये सांगावी खूण ।

परंतु अध्यात्मग्रंथश्रवण । होतां उमजे ॥ ४० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहदुर्लभनिरूपणनाम समास चौथा ॥

 

 

 

समास पांचवा : करंटपरीक्षानिरूपण

 

॥ श्रीराम ॥

धान्य उदंड मोजिलें । परी त्या मापें नाहीं भक्षिलें ।

विवरल्यविण तैसें जालें । प्राणीमात्रासी ॥ १ ॥

पाठ म्हणतां आवरेना । पुसतां कांहींच कळेना ।

अनुभव पाहातां अनुमाना- । मधें पडें ॥ २ ॥

शब्दरत्नें परीक्षावीं । प्रत्ययाचीं पाहोन घ्यावीं ।

येर ते अवघीं सांडावीं । येकीकडे ॥ ३ ॥

नावरूप आवघें सांडावें । मग अनुभवास मांडावें ।

सार असार येकचि करावें । हें मूर्खपण ॥ ४ ॥

लेखकें कुळ समजवावें । किंवा उगेंच वाचावें ।

येणें दृष्टांतें समजावें । कोणींतरी ॥ ५ ॥

जेथें नाहीं समजावीस । तेथें आवघी कुसमुस ।

पुसों जातां वसवस । वक्ता करी ॥ ६ ॥

नान शब्द येकवटिले । प्रचीतीवीण उपाव केले ।

परी ते अवघेचि वेर्थ गेले । फडप्रसंगीं ॥ ७ ॥

पसेवरी वैरण घातलें । तांतडीनें जातें वोडिलें ।

तेणें पीठ बारीक आलें । हें तो घडेना ॥ ८ ॥

घांसामागें घांस घातला । आवकाश नाहीं चावायाला ।

अवघा बोकणा भरिला । पुढें कैसें ॥ ९ ॥

ऐका फडनिसीचें लक्षण । विरंग जाऊं नेदी क्षण ।

समस्तांचें अंतःकर्ण । सांभाळीत जावें ॥ १० ॥

सूक्ष्म नामें सुखें घ्यावीं । तितुकीं रूपें वोळखावीं ।

वोळखोन समजवावीं । श्रोतयांसी ॥ ११ ॥

समशा पुरतां सुखी होती । श्रोते अवघे आनंदती ।

अवघे क्षणक्षणा वंदिती । गोसावियांसी ॥ १२ ॥

समशा पुरतां वंदिती । समशा न पुरतां निंदिती ।

गोसांवी चिणचिण करिती । कोण्या हिशेबें ॥ १३ ॥

शुध सोनें पाहोन घ्यावें । कसीं लाउनी तावावें ।

श्रवणमननें जाणावें । प्रत्ययासी ॥ १४ ॥

वैद्याची प्रचित येना । वेथा परती होयेना ।

आणी रागेजावें जना । कोण्या हिशेबें ॥ १५ ॥

खोटें कोठेंचि चालेना । खोटें कोणास मानेना ।

याकारणें अनुमाना । खरें आणावें ॥ १६ ॥

लिहिणें न येतां व्यापार केला । कांहीं येक दिवस चालिला ।

पुसता सुरनीस भेटला । तेव्हां खोटें ॥ १७ ॥

सर्व आवघें हिशेबीं ठावें । प्रत्यय साक्षीनें बोलावें ।

मग सुरनीसें काये करावें । सांगाना ना ॥ १८ ॥

स्वये आपणचि गुंते । समजावीस कैसे होते ।

नेणतां कोणीयेक ते । आपदों लागती ॥ १९ ॥

बळेंविण युद्धास गेला । तो सर्वस्वें नागवला ।

शब्द ठेवावा कोणाला । कोण कैसा ॥ २० ॥

जे प्रचीतीस आलें खरें । तेंचि घ्यावें अत्यादरें ।

अनुभवेंविण जें उत्तरें । तें फलकटें जाणावीं ॥ २१ ॥

सिकऊं जातां राग चढे । परंतु पुढें आदळ घडे ।

खोटा निश्चय तात्काळ उडे । लोकामधें ॥ २२ ॥

खरें सांडुनी खोटें घेणें । भकाधेस काये उणें ।

त्रिभुवनीं नारायणे । न्याय केला ॥ २३ ॥

तो न्याय सांडितां सेवटीं । अवघें जगचि लागे पाठीं ।

जनीं भंडभांडों हिंपुटीं । किती व्हावें ॥ २४ ॥

अन्यायें बहुतांस पुरवलें । हें देखिलें ना ऐकिलें ।

वेडें उगेंचि भरीं भरलें । असत्याचे ॥ २५ ॥

असत्य म्हणिजे तेंचि पाप । सत्य जाणावें स्वरूप ।

दोहींमधें साक्षप । कोणाचा करावा ॥ २६ ॥

मायेमधें बोलणें चालणें साचें । माया नस्तां बोलणें कैंचें ।

याकारणें निशब्दाचें । मूळ शोधावें ॥ २७ ॥

वच्यांश जाणोनि सांडावा । लक्ष्यांश विवरोन घ्यावा ।

याकारणें निशब्द मुळाचा गोवा । आढळेना ॥ २८ ॥

अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष । सांडून अलक्षीं लावावें लक्ष ।

मननसीळ परम दक्ष । तोचि जाणे ॥ २९ ॥

नाना भूस आणि कण । येकचि म्हणणें अप्रमाण ।

रस चोवडिया कोण । शाहाणा सेवी ॥ ३० ॥

पिंडीं नित्यानित्य विवेक । ब्रह्मांडीं सारासार अनेक ।

सकळ शोधूनियां येक । सार घ्यावें ॥ ३१ ॥

मायेकरितां कोणीयेक । अन्वय आणि वीतरेक ।

ते माया नस्तां विवेक । कैसा करावा ॥ ३२ ॥

तत्वें तत्व शोधावें । माहांवाकीं प्रवेशावें ।

आत्मनिवेदनें पावावें । समाधान ॥ ३३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे करंटपरीक्षानिरूपणनाम समास पांचवा ॥

 

 

 

समास सहावा : उत्तमपुरुषनिरूपण

 

॥ श्रीराम ॥

नाना वस्त्रें नाना भूषणें । येणें शरीर श्रृंघारणें ।

विवेकें विचारें राजकरणें । अंतर श्रृंघारिजे ॥ ११ ।

शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केले सज्ज ।

अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ॥ २ ॥

तुंड हेंकाड कठोर वचनी । अखंड तोले साभिमानी ।

न्याय नीति अंतःकर्णीं । घेणार नाहीं ॥ ३ ॥

तर्ह्हे सीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा ।

राजकारण संवादा । मिळोंचि नेणें ॥ ४ ॥

ऐसें लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।

पापी अपस्मार जनीं । राक्षेस जाणावें ॥ ५ ॥

समयासारिखा समयो येना । नेम सहसा चलेना ।

नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ ६ ॥

अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें ।

हटनिग्रहीं न पडावें । विवेकीं पुरुषें ॥ ७ ॥

बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट ।

कोणीयेकाचा सेवट । जाला पाहिजे ॥ ८ ॥

बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजाभोवानी ।

परंतु विचार पाहोनी । कार्ये करणें ॥ ९ ॥

अखंडचि सावधाना । बहुत काये करावी सूचना ।

परंतु कांहीं येक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥ १० ॥

समर्थापासीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान ।

निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ ११ ॥

म्लेच दुर्जन उदंड । बहुतां दिसाचें माजलें बंड ।

याकार्णें अखंड । सावधान असावें ॥ १२ ॥

सकळकर्ता तो ईश्वरु । तेणें केला अंगिकारुं ।

तया पुरुषाचा विचारु । विरुअळा जाणे ॥ १३ ॥

न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंगप्रकार ।

परीक्षिणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ १४ ॥

माहायेत्‍न सावधपणें । समईं धारिष्ट धरणें ।

अद्‍भूतचि कार्य करणें । देणें ईश्वराचें ॥ १५ ॥

येश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणासी नाहीं सीमा ।

नाहीं दुसती उपमा । देणें ईश्वराचें ॥ १६ ॥

देव ब्रह्मण आचार विचार । कितेक जनासी आधार ।

सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ १७ ॥

येहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहाणें ।

बहुत जनाचें साहाणें । देणें ईश्वराचें ॥ १८ ॥

देवाचा कैपक्ष घेणे । ब्रह्माणाची चिंता वाहाणें ।

बहु जनासी पाळणें । देणें ईश्वराचें ॥ १९ ॥

धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।

जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥ २० ॥

उत्तम गुणाचा ग्राहिक । तर्क तीक्षण विवेक ।

धर्मवासना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥ २१ ॥

सकळ गुणांमधें सार । तजविजा विवेक विचार ।

जेणें पाविजे पैलपार । अरत्रपरत्रींचा ॥ २२ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरूपणनाम समास सहावा ॥

 

 

 

समास सातवा : जनस्वभावनिरूपण

 

॥ श्रीराम ॥

जनाचा लालची स्वभाव । आरंभीं म्हणती देव ।

म्हनिजे मला कांहीं देव । ऐसी वासना ॥ १ ॥

कांहींच भक्ती केली नस्तां । आणी इछिती प्रसन्नता ।

जैसें कांहींच सेवा न करिता। स्वामीस मागती ॥ २ ॥

कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं ।

केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥

आळसें काम नसतें । हें तों प्रत्ययास येतें ।

कष्टाकडे चुकावितें । हीन जन ॥ ४ ॥

आधीं कष्टाचें दुःख सोसिति । ते पुढें सुखाचें फळ भोगिती ।

आधीं आळसें सुखावती । त्यासी पुढें दुःख ॥ ५ ॥

येहलोक अथवा परलोक । दोहिंकडे सारिखाच विवेक ।

दीर्घ सूचनेचें कौतुक । कळलें पाहिजे ॥ ६ ॥

मेळविती तितुकें भक्षिती । ते कठीण काळीं मरोन जाती ।

दीर्घ सूचनेनें वर्तती । तेचि भले ॥ ७ ॥

येहलोकींचा संचितार्थ । परलोकींचा परमार्थ ।

संचितेंविण वेर्थ । जीत मेलें ॥ ८ ॥

येकदां मेल्यानें सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना ।

आपणास मारी वांचविना । तो आत्महत्यारा ॥ ९ ॥

प्रतिजन्मीं आत्मघात । कोणें करावें गणीत ।

याकारणें जन्ममृत्य । केवी चुके ॥ १० ॥

देव सकळ कांहीं करितो । ऐसें प्राणीमात्र बोलतो ।

त्याचे भेटीचा लाभ तो । अकस्मात जाला ॥ ११ ॥

विवेकाच लाभ घडे । जेणें परमात्मा ठाईं पडे ।

विवेक पाहातां सांपडे । विवेकीं जनीं ॥ १२ ॥

देव पाहातां आहे येक । परंतु करितो अनेक ।

त्या अनेकास येक । म्हणों नये कीं ॥ १३ ॥

देवाचें कर्तुत्व आणि देव । कळला पाहिजे अभिप्राव ।

कळल्याविण कितेक जीव । उगेच बोलती ॥ १४ ॥

उगेच बोलती मूर्खपणें । शाहाणपण वाढायाकारणें ।

त्रुप्तिलागीं उपाव करणें । ऐसें जालें ॥ १५ ॥

जेहीं उदंड कष्ट केले । ते भाग्य भोगून ठेले ।

येर ते बोलतचि राहिले । करंटे जन ॥ १६ ॥

करंट्याचें करंट लक्षण । समजोन जाती विचक्षण ।

भरल्याचें उत्तम लक्षण । करंट्यास कळेना ॥ १७ ॥

त्याची पैसावली कुबुद्धी । तेथें कैंची असेल शुद्धी ।

कुबुद्धी तेचि सुबुद्धी । ऐसी वाटे ॥ १८ ॥

मनुष्य शुद्धीस सांडावें । त्याचें काये खरें मानावें ।

जेथें विचाराच्या नावें । सुन्याकार ॥ १९ ॥

विचारें येहलोक परलोक । विचारें होतसे सार्थक ।

विचारें नित्यानित्य विवेक । पाहिला पाहिजे ॥ २० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जनस्वभावनिरूपणनाम समास सातवा ॥

 

 

 

समास आठवा : अंतर्देवनिरूपण

 

॥ श्रीराम ॥

ब्रह्म निराकार निश्चळ । आत्म्यास विकार चंचळ ।

तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥

देवाचा ठावचि लागेना । येक देव नेमस्त कळेना ।

बहुत देवीं अनुमानेना । येक देव ॥ २ ॥

म्हणोनी विचार असावा । विचारें देव शोधावा ।

बहुत देवांचा गोवा । पडोंचि नये ॥ ३ ॥

देव क्षत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला ।

पृथ्वीमधें दंडक चालिला । येणें रीतीं ॥ ४ ॥

नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षत्रदेवचि केवळ ।

नाना क्षत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥

क्षत्रदेव पाषाणाचा । विचार पाहातां तयाचा ।

तंत लागला मुळाचा । अवताराकडे ॥ ६ ॥

अवतारी देव संपले । देहे धरुनी वर्तोन गेले ।

त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७ ॥

त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहातां ।

कर्ता भोक्ता तत्वता । प्रतक्ष आहे ॥ ८ ॥

युगानयुगें तिन्ही लोक । येकचि चालवी अनेक ।

हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥

आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर ।

जाणीवरूपें कळिवर । विवेकें वर्तवी ॥ १० ॥

तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती ।

प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥

मग विचारिती अंतःकर्णीं । जेथें तेथें धोंडा पाणी ।

उगेंचि वणवण हिंडोनि । काये होतें ॥ १२ ॥

ऐसा ज्यासी विचार कळला । तेणें सत्संग धरिला ।

सत्संगें देव सांपडला । बहुत जनासी ॥ १३ ॥

ऐसीं हे विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें ।

अविवेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥

अंतरवेधी अंतर जाणे । बाहेरमुद्रा कांहींच नेणें ।

म्हणोन विवेकी शाहणे । अंतर शोधिती ॥ १५ ॥

विवेकेंविण जो भाव । तो भावचि अभाव ।

मुर्खस्य प्रतिमा देव । ऐसें वचन ॥ १६ ॥

पाहात समजत सेवटा गेला । तोचि विवेकी भला ।

तत्वें सांडुनी पावला । निरंजनीं ॥ १७ ॥

आरे जें आकारासी येतें । तें अवघेंच नासोन जतें ।

मग गल्बल्यावेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥

चंचळ देव निश्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम ।

प्रत्ययज्ञानें निभ्रम । होईजेतें ॥ १९ ॥

प्रचीतीविण जें केलें । तें तें अवघें वेर्थ गेलें ।

प्राणी कष्टकष्टोंचि मेलें । कर्मकचाटें ॥ २० ॥

कर्मावेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें ।

विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥

कांहीं अनुमानलें विचारें । देव आहे जगदांतरें ।

सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥

सगुण पाहातां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला ।

संगत्यागें मोकळा जाला । वस्तुरूप ॥ २३ ॥

परमेश्वरीं अनुसंधान । लावितां होईजे पावन ।

मुख्य ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥

ऐसीं हे विवेकाचीं विवर्णें । पाहावीं सुचित अंतःकर्णें ।

नित्यानित्य विवेकश्रवणें । जगदोधार ॥ २५ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अंतर्देवनिरूपणनाम समास आठवा ॥

 

 

 

समास नववा : निद्रानिरूपण

 

॥ श्रीराम ॥

वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विळास ।

निद्रा आलियां सावकास । जाणार नाहीं ॥ १ ॥

निद्रेनें व्यापिली काया । आळस आंग मोडे जांभया ।

तेणेंकरितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥

कडकडां जांभया येती । चटचटां चटक्या वाजती ।

डकडकां डुकल्या देती । सावकास ॥ ३ ॥

येकाचे डोळे झांकती । येकाचे डोळे लागती ।

येक ते वचकोन पाहाती । चहुंकडे ॥ ४ ॥

येक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले ।

हुडकाचे टुकडे जाले । सुधी नाहीं ॥ ५ ॥

येक टेंकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले ।

येक उताणे पसरलें । सावकास ॥ ६ ॥

कोणी मुर्कुंडी घालिती । कोणी कानवडें निजती ।

कोणी चक्रीं फिरती । चहुंकडे ॥ ७ ॥

येक हात हालविती । येक पाये हालविती ।

येक दांत खाती । कर्कराटें ॥ ८ ॥

येकांचीं वस्त्रें निघोनि गेलीं । ते नागवींच लोळों लागलीं ।

येकाचीं मुंडासीं गडबडलीं । चहुंकडे ॥ ९ ॥

येक निजेलीं अव्यावेस्तें । येक दिसती जैसीं प्रेते ।

दांत पसरुनी जैसीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥

येक वोसणतचि उठिले । येक अंधारीं फिरों लागले ।

येक जाऊन निजेले । उकरड्यावरी ॥ ११ ॥

येक मडकीं उतरिती । येक भोई चांचपती ।

येक उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥

येक प्राणी वोसणाती । येक फुंदफुंदों रडती ।

येक खदखदां हासती । सावकास ॥ १३ ॥

येक हाका मारूं लागले । येक बो।म्बलित उठिले ।

येक वचकोन राहिले । आपुले ठाईं ॥ १४ ॥

येक क्षणक्षणा खुरडती । येक डोई खाजविती ।

येक कढों लागती । सावकास ॥ १५ ॥

येकाच्या लाळा गळाल्या । येकाच्या पिका सांडल्या ।

येकीं लघुशंका केल्या । सावकास ॥ १६ ॥

येक राउत सोडिती । येक कर्पट ढेंकर देती ।

येक खांकरुनी थुंकिती । भलतीकडे ॥ १७ ॥

येक हागती येक वोकिती । येक खोंकिती येक सिंकिती ।

येक ते पाणी मागती । निदसुया स्वरें ॥ १८ ॥

येक दुस्वप्नें निर्बुजले । येक सुस्वप्नें संतोषले ।

येक ते गाढमुढी पडिले । सुषुप्तिमधें ॥ १९ ॥

इकडे उजेडाया जालें । कोण्हीं पढणें आरंभिलें ।

कोणीं प्रातस्मरामि मांडिलें । हरिकिर्तन ॥ २० ॥

कोणीं आठविल्या ध्यानमूर्ति । कोणी येकांतीं जप करिती ।

कोणी पाठांतर उजळिती । नाना प्रकारें ॥ २१ ॥

नाना विद्या नाना कळा । आपलाल्या सिकती सकळा ।

तानमानें गायेनकळा । येक गाती ॥ २२ ॥

मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त जाली ।

वेवसाईं बुद्धी आपुली । प्रेरिते जाले ॥ २३ ॥

ज्ञाता तत्वें सांडून पळाला । तुर्येपैलिकडे गेला ।

आत्मनिवेदनें जाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निद्रानिरूपणनाम समास नववा ॥

 

 

 

समास दहावा : श्रोताअवलक्षणनिरूपण

 

॥ श्रीराम ॥

कोणीयेका कार्याचा साक्षप । कांहीं तर्ह्ही घडे विक्षेप ।

काळ साहे तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥

कार्यभाग होत चालिला । तेणें प्राणी शोक जाला ।

विचारहि सुचों लागला । दिवसेंदेवस ॥ २ ॥

कोणीयेक प्राणी जन्मासी येतो । कांहीं तर्ह्ही काळ साहे होतो ।

दुःखाउपरी सुख देतो । देव कृपाळुपणें ॥ ३ ॥

अवघाचि काळ जरी सजे । तरी अवघेचि होती राजे ।

कांहीं सजे कांहीं न सजे । ऐसें आहे ॥ ४ ॥

येकलोक अथवा परलोक । साधतां कोणीयेक विवेक ।

अद्‍भूत होये स्वाभाविक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥

ऐकल्याविण कळलें । शिकल्याविण शहाणपण आलें ।

देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥

सकळ कांहीं ऐकतां कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे ।

नेमस्त मनामधें आकळे । सारासार ॥ ७ ॥

श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें ।

येणें उपायें स्वभावें । त्रयलोक्य चाले ॥ ८ ॥

श्रवणाआड विक्षेप येती । नाना जिनस सांगो किती ।

सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥

श्रवणीं लोक बैसले । बोलतां बोलतां येकाग्र जाले ।

त्याउपरी जे नूतन आले । ते येकाग्र नव्हेती ॥ १० ॥

मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें ।

उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥

प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक थोडे असती ।

श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥

श्रवणीं बैसले ऐकाया । अडों लागलीसें काया ।

येती कडकडां जांभया । निद्राभरें ॥ १३ ॥

बैसले सुचित करूनि मना । परी तें मनचि ऐकेना ।

मागें होतें ऐकिलें नाना । तेंचि धरुनी बैसलें ॥ १४ ॥

तत्पर केलें शरीर । परी मनामधें आणीक विचार ।

कल्पना कल्पी तो विस्तार । किती म्हणौनि सांगावा ॥ १५ ॥

जें जें कांहीं श्रवणीं पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।

तरीच कांहीं सार्थक जालें । निरूपणीं ॥ १६ ॥

मन दिसतें मां धरावें । ज्याचें त्यानें आवरावें ।

आवरून विवेकें धरवें । अर्थांतरीं ॥ १७ ॥

निरूपणीं येऊन बैसला । परी तो उदंड जेऊन आला ।

बैसतांच कासाविस जाला । त्रुषाकांत ॥ १८ ॥

आधीं उदक आणविलें । घळघळां उदंड घेतलें ।

तेणें मळमळूं लागलें । उठोनी गेला ॥ १९ ॥

कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा सरतां मोठी फजिती ।

क्षणक्षणा उठोनी जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥

दिशेनें कासाविस केला । आवघेंचि सांडून धांविला ।

निरूपणप्रसंगीं निघोन गेला । अखंड ऐसा ॥ २१ ॥

दृष्टांती कांहीं अपूर्व आलें । अंतःकर्ण तेथेंचि राहिलें ।

कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥

निरूपणीं येऊन बैसला । तो विंचुवें फणकाविला ।

कैचें निरूपण जाला । कासाविस ॥ २३ ॥

पोटामधें तिडिक उठिली । पाठीमधें करक भरली ।

चालक चिखल्या पुळी जाली । बैसवेना ॥ २४ ॥

पिसोळा चाऊन पळाला । तेणें प्राणी दुश्चीत जाला ।

कोणें नेटें गल्बला केला । तेथेंचि धावें ॥ २५ ॥

विषै लोक श्रवणीं येती । ते बायेकांकडेच पाहाती ।

चोरटे लोक चोरून जाती । पादरक्षा ॥ २६ ॥

होये नव्हे वादवेवाद । तेणें उदंड जाला खेद ।

सिव्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥

कोणी निरूपणीं बैसती । सावकस गोष्टी लाविती ।

हरिदास ते रें रें करिती । पोटासाठीं ॥ २८ ॥

बहुत जाणते मिळाले । येकापुढें येक बोले ।

लोकांचे आशये राहिले । कोण जाणे ॥ २९ ॥

माझें होये तुझें नव्हे । ऐसी अखंड जयास सवे ।

न्याये नीति सांडून धावे । अन्यायाकडे ॥ ३० ॥

आपल्य थोरपणासाठीं । अच्यावाच्या तोंड पिटी ।

न्याये नाहीं ते सेवटीं । परम अन्याई ॥ ३१ ॥

येकेकडे अभिमान उठे । दूसरेकडे उदंड पेटे ।

ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२ ॥

म्हणोन जाणते विचक्षण । तें आधींच धरिती नेणेपण ।

मूर्ख टोणपा आपण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥

आपणाहून देव थोर । ऐसा जयास कळला विचार ।

सकळ कांहीं जगदांतर । तेहिं राखावें ॥ ३४ ॥

सभेमधें कळहो जाला । शब्द येतो जाणत्याला ।

अंतरें राखों नाहीं सिकला । कैसा योगी । ३५ ॥

वैर करितां वैरचि वाढे । आपणास दुःख भोग्णें घडे ।

म्हणोनि शाहाण्याचे कुकडे । कळों आलें ॥ ३६ ॥

अखंड आपणा सांभळिती । क्षुल्लकपण येऊं नेदिती ।

थोर लोकांस क्ष्मा शांति । अगत्य करणें ॥ ३७ ॥

अवगुणापासीं बैसला गुणी । आवगुण कळतो ततक्षणीं ।

विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥ ३८ ॥

उपाये परियाये दीर्घ प्रेत्‍न । विवेकबळें नाना येत्‍न ।

करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥

दुर्जनीं वेवदरून घेतला । बाश्कळ लोकीं घसरिला ।

विवेकापासून चेवला । विवेकी कैसा ॥ ४० ॥

न्याये परियाये उपाये । मूर्खास हें कळे काये ।

मूर्खाकरितां चिवडा होये । मज्यालसीचा ॥ ४१ ॥

मग ते शाहाणे नीट करिती । स्वयें साहोन साहविती ।

स्वयें करून करविती । लोकांकरवीं ॥ ४२ ॥

पृथ्वीमधें उदंड जन । जनामधें असती सज्जन ।

जयांकरितां समाधान । प्राणीमात्रासी ॥ ४३ ॥

तो मनोगतांचीं आंगें जाणे । मान प्रसंग समये जाणे ।

संतप्तालागीं निवऊ जाणे । नाना प्रकारें ॥ ४४ ॥

ऐसा तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक ।

त्यचें करणें कांहिं येक । जनास कळेना ॥ ४५ ॥

बहुत जनस चलवी । नाना मंडळें हालवी ।

ऐसी हे समर्थपदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥

विवेक एकांती करावा । जगदीश धारणेनें धरावा ।

लोक आपला आणी परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥

येकांती विवेक ठाईं पडे । येकांतीं येत्‍न सांपडे ।

येकांतीं तर्क वावडे । ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥

येकांती स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें ।

अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥

जयास येकांत मानला । अवघ्या आधीं कळे त्याला ।

त्यावेगळें वडिलपणाला । ठवचि नाहीं ॥ ५० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोताअवलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥

॥ दशक अठरावा समाप्त ॥

दशक १९ वा -->