संतसाहित्य

Navigation

दशक १४ वा


दशक १३ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥  अखंडध्याननाम दशक चौदावा  ॥

समास पहिला : निस्पृह लक्षणनाम

 

॥ श्रीराम ॥

ऐका स्पृहाची सिकवण । युक्ति बुद्धि शाहाणपण ।

जेणें राहे समाधान । निरंतर ॥ १ ॥

सोपा मंत्र परी नेमस्त । साधें वोषध गुणवंत ।

साधें बोलणें सप्रचित । तैसें माझें ॥ २ ॥

तत्काळचि अवगुण जाती । उत्तम गुणाची होये प्राप्ती ।

शब्दवोषध तीव्र श्रोतीं । साक्षपें सेवावें ॥ ३ ॥

निस्पृहता धरूं नये । धरिली तरी सोडूं नये ।

सोडिली तरी हिंडों नये । वोळखीमधें ॥ ४ ॥

कांता दृष्टी राखों नये । मनास गोडी चाखऊं नये ।

धारिष्ट चळतां दाखऊं नये । मुख आपुलें ॥ ५ ॥

येकेस्थळीं राहों नये । कानकोंडें साहों नये ।

द्रव्य दारा पाहों नये । आळकेपणें ॥ ६ ॥

आचारभ्रष्ट होऊं नये । दिल्यां द्रव्य घेऊं नये ।

उणा शब्द येऊं नये । आपणावरी ॥ ७ ॥

भिक्षेविषीं लाजों नये । बहुत भिक्षा घेऊं नये ।

पुसतांहि देऊं नये । वोळखी आपली ॥ ८ ॥

धड मळिन नेसों नये । गोड अन्न खाऊं नये ।

दुराग्रह करूं नये । प्रसंगें वर्तावें ॥ ९ ॥

भोगीं मन असों नये । देहदुःखें त्रासों नये ।

पुढें आशा धरूं नये । जीवित्वाची ॥ १० ॥

विरक्ती गळों देऊं नये । धारिष्ट चळों देऊं नये ।

ज्ञान मळिण होऊं नये । विवेकबळें ॥ ११ ॥

करुणाकीर्तन सोडूं नये । अंतर्ध्यान मोडूं नये ॥

प्रेमतंतु तोडूं नये । सगुणमूर्तीचा ॥ १२ ॥

पोटीं चिंता धरूं नये । कष्टें खेद मानूं नये ।

समैं धीर सांडूं नये । कांहीं केल्या ॥ १३ ॥

अपमानितां सिणों नये । निखंदितां कष्टों नये ।

धिःकारितां झुरों नये । कांहीं केल्या ॥ १४ ॥

लोकलाज धरूं नये । लाजवितां लाजों नये ।

खिजवितां खिजों नये । विरक्त पुरुषें ॥ १५ ॥

शुद्ध मार्ग सोडूं नये । दुर्जनासीं तंडों नये ।

समंध पडों देऊं नये । चांडाळासी ॥ १६ ॥

तपीळपण धरूं नये । भांडवितां भांडों नये ।

उडवितां उडऊं नये । निजस्थिती आपुली ॥ १७ ॥

हांसवितां हासों नये । बोलवितां बोलों नये ।

चालवितां चालों नये । क्षणक्ष्णा ॥ १८ ॥

येक वेष धरूं नये । येक साज करूं नये ।

येकदेसी होऊं नये । भ्रमण करावें ॥ १९ ॥

सलगी पडों देऊं नये । प्रतिग्रह घेऊं नये ।

सभेमध्यें बैसों नये । सर्वकाळ ॥ २० ॥

नेम आंगीं लाऊं नये । भरवसा कोणास देऊं नये ।

अंगीकार करूं नये । नेमस्तपणाचा ॥ २१ ॥

नित्यनेम सांडूं नये । अभ्यास बुडों देऊं नये ।

परतंत्र होऊं नये । कांहीं केल्यां ॥ २२ ॥

स्वतंत्रता मोडूं नये । निरापेक्षा तोडूं नये ।

परापेक्षा होऊं नये । क्षणक्ष्णा ॥ २३ ॥

वैभव दृष्टीं पाहों नये । उपाधीसुखें राहों नये ।

येकांत मोडूं देऊं नये । स्वरूपस्थितीचा ॥ २४ ॥

अनर्गळता करूं नये । लोकलाज धरूं नये ।

कोठेंतरी होऊं नये । आसक्त कदां ॥ २५ ॥

परंपरा तोडूं नये । उआपाधी मोडूं देऊं नये ।

ज्ञानमार्गे सोडूं नये । कदाकाळीं ॥ २६ ॥

कर्ममार्ग सांडूं नये । वैराग्य मोडूं देऊं नये ।

साधन भजन खंडूं नये । कदाकाळीं ॥ २७ ॥

अतिवाद करूं नये । अनित्य पोटीं धऊं नये ।

रागें भरीं भरों नये । भलतीकडे ॥२८॥

न मनी त्यास सांगों नये। कंटाळवाणें बोलों नये ।

बहुसाल असो नये । येकें स्थळीं ॥ २९ ॥

कांहीं उपाधी करूं नये । केली तरी धरूं नये ।

धरिली तरी सांपडों नये । उपाधीमध्यें॥ ३० ॥

थोरपणें असो नये । महत्त्व धरून बैसों नये ।

कांहीं मान इछूं नये । कोठेंतरी ॥ ३१ ॥

साधेपण सोडूं नये । सानेपण मोडूं नये ।

बळात्कारें जोडूं नये । अभिमान आंगीं ॥ ३२ ॥

अधिकारेवीण सांगों नये । दाटून उपदेश देऊं नये ।

कानकोंडा करूं नये । परमार्थ कदा ॥ ३३ ॥

कठीण वैराग्य सोडूं नये । कठीण अभ्यास सांडूं नये ।

कठिणता धरूं नये । कोणेकेविशैं ॥ ३४ ॥

कठीण शब्द बोलों नये । कठीण आज्ञा करूं नये ।

कठीण धीरत्व सोडूं नये । कांहीं केल्यां ॥ ३५॥

आपण आसक्त होऊं नये । केल्यावीण सांगों नये ।

बहुसाल मागों नये । शिष्यवर्गांसी ॥ ३६ ॥

उत्धट शब्द बोलों नये । इंद्रियेंस्मरण करूं नये ।

शाक्तमार्गें भरों नये । मुक्तपणें भरीं ॥ ३७ ॥

नीच कृतीं लाजों नये । वैभव होतां माजों नये ।

क्रोधें भरीं भरों नये । जाणपणें ॥ ३८ ॥

थोरपणें चुकों नये । न्याये नीति सांडूं नये ।

अप्रमाण वर्तों नये । कांहीं केल्या ॥ ३९ ॥

कळल्यावीण बोलों नये । अनुमानें निश्चये करूं नये ।

सांगतां दुःख धरूं नये । मूर्खपणें ॥ ४० ॥

सावधपण सोडुं नये । व्यापकपण सांडुं नये ।

कदा सुख मानूं नये । निसुगपणाचें ॥ ४१ ॥

विकल्प पोटीं धरूं नये । स्वार्थआज्ञा करूं नये ।

केली तरी टाकूं नये । आपणास पुढें ॥ ४२ ॥

प्रसंगेंवीण बोलों नये । अन्वयेंवीण गाऊं नये ।

विचारेंवीण जाऊं नये । अविचारपंथें ॥ ४३॥

परोपकार सांडूं नये । परपीडा करूंनये ।

विकल्प पडों देऊं नये । कोणीयेकासी ॥ ४४ ॥

नेणपण सोडूं नये । महंतपण सांडूं नये ।

द्रव्यासाठीं हिंडों नये । कीर्तन करीत ॥ ४५ ॥

संशयात्मक बोलों नये । बहुत निश्चये करूं नये ।

निर्वाहेंवीण धरूं नये । ग्रंथ हातीं ॥ ४६ ॥

जाणपणें पुसों नये । अहंभाव दिसों नये ।

सांगेन ऐसें म्हणों नये । कोणीयेकासी ॥ ४७ ॥

ज्ञानगर्व धरूं नये । सहसा छळणा करूं नये ।

कोठें वाद घालुं नये । कोणीयेकासी ॥ ४८ ॥

स्वार्थबुद्धी जडों नये । कारबारीं पडों नये ।

कार्यकर्ते होऊं नये । राजद्वारीं ॥ ४९ ॥

कोणास भर्वसा देऊं नये । जड भिक्षा मागों नये ।

भिक्षेसाथीं सांगों नये । परंपरा आपुली ॥५० ॥

सोइरिकींत पडों नये । मध्यावर्ति घडों नये ।

प्रपंचाची जडों नये । उपाधी आंगीं ॥ ५१ ॥

प्रपंचप्रस्तीं जाऊं नये । बाष्कळ अन्न खाऊं नये ।

पाहुण्यासरिसें घेऊं नये । आमंत्रणें कदां ॥ ५२ ॥

श्राध पक्ष सटी सामासें । शांती फळशोबन बारसें ।

भोग राहात बहुवसें । नवस व्रतें उद्यापनें ॥ ५३ ॥

तेथें निस्पृहें जाऊं नये । त्याचें अन्न खाऊं नये ।

येळिलवाणें करूं नये । आपणासी ॥ ५४ ॥

लग्नमुहुर्तीं जाऊं नये । पोटासाठीं गाऊं नये ।

मोलें कीर्तन करूं नये । कोठेंतरी ॥ ५५ ॥

आपली भिक्षा सोडूं नये । वारें अन्न खाऊं नये ।

निस्पृहासि घडों नये । मोलयात्रा ॥ ५६ ॥

मोलें सुकृत करूं नये । मोलपुजारी होऊं नये ।

दिल्हा तरी घेऊं नये । इनाम निस्पृहें ॥ ५७ ॥

कोठें मठ करूं नये । केला तरी तो धरूं नये ।

मठपती होऊन बैसों नये । निस्पृह पुरुषें ॥ ५८ ॥

निस्पृहें अवघेंचि करावें । परी आपण तेथें न सांपडावें ।

परस्परें उभारावें । भक्तिमार्गासी ॥ ५९ ॥

प्रेत्नेंविण राहों नये । आळस दृष्टी आणूं नये ।

देह अस्तां पाहों नये । वियोग उपासनेचा ॥ ६० ॥

उपाधीमध्यें पडों नये । उपाधी आंगीं जडों नये ।

भजनमार्ग मोडूं नये । निसंगळपणें ॥ ६१ ॥

बहु उपाधी करूं नये । उपाधीविण कामा नये ।

सगुणभक्ति सोडूं नये । विभक्ति खोटी ॥ ६२ ॥

बहुसाल धांवों नये । बहुसाल साहों नये ।

बहुत कष्ट करूं नये । असुदें खोटें ॥ ६३ ॥

बहुसाल बोलों नये । अबोलणें कामा नये ।

बहुत अन्न खाऊं नये । उपवास खोटा ॥ ६४ ॥

बहुसाल निजों नये । बहुत निद्रा मोडुं नये ।

बहुत नेम धरूं नये । बाश्कळ खोटें ॥ ६५ ॥

बहु जनीं असों नये । बहु आरण्य सेऊं नये ।

बहु देह पाळूं नये । आत्महत्या खोटी ॥ ६६ ॥

बहु संग धरूं नये । संतसंग सांडुं नये ।

कर्मठपण कामा नये । अनाचार खोटा ॥ ६७ ॥

बहु लोकिक सांडुं नये । लोकाधेन होऊं नये ।

बहु प्रीती कामा नये । निष्ठुरता खोटी ॥ ६८ ॥

बहु संशये धरूं नये । मुक्तमार्ग कामा नये ।

बहु साधनीं पडों नये । साधनेंवीण खोटें ॥ ६९ ॥

बहु विषये भोगूं नये । विषयत्याग करितां नये ।

देहलोभ धरूं नये । बहु त्रास खोटा ॥ ७० ॥

वेगळा अनुभव घेऊं नये । अनुभवेंवीण कामा नये ।

आत्मस्थिती बोलों नये । स्तब्धता खोटी ॥ ७१ ॥

मन उरों देऊं नये । मनेंवीण कामा नये ।

अलक्ष वस्तु लक्षा नये । लक्षेंवीण खोटें ॥ ७२ ॥

मनबुद्धिअगोचर । बुद्धीवीण अंधकार ।

जाणीवेचा पडो विसर । नेणीव खोटी ॥ ७३ ॥

ज्ञातेपण धरूं नये । ज्ञानेंवीण कामा नये ।

अतर्क्य वस्तु तर्का न ये । तर्केंवीण खोटें ॥ ७४ ॥

दृश्यस्मरण काम नये । विस्मरण पडों नये ।

कांहीं चर्चा करूं नये । केलियावीण न चले ॥ ७५ ॥

जगीं भेद कामा नये । वर्णसंकर करूं नये ।

आपला धर्म उडऊं नये । अभिमान खोटा ॥ ७६ ॥

आशाबद्धत बोलों नये । विवेकेंवीण चालों नये ।

समाधान हालों नये । कांहीं केल्यां ॥ ७७ ॥

अबद्ध पोथी लेहों नये । पोथीवीण कामा नये ।

अबद्ध वाचूं नये । वाचिल्यावीण खोटें ॥ ७८ ॥

निस्पृहें वगत्रुत्व सांडूं नये । आशंका घेतां भांडों नये ।

श्रोतयांचा मानूं नये । वीट कदा ॥ ७९ ॥

हें सिकवण धरितां चित्तीं । सकळ सुखें वोळगती ।

आंगीं बाणें महंती । अकस्मात ॥ ८० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहलक्षणनाम समास पहिला ॥

 

 

 

समास दुसरा : भिक्षानिरूपण

॥ श्रीराम ॥

ब्रह्माणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा ।

वों भवति या पक्षा । रक्षिलें पाहिजे ॥ १ ॥

भिक्षा मागोन जो जेविला । तो निराहारी बोलिला ।

प्रतिग्रहावेगळा जाला । भिक्षा मागतां ॥ २ ॥

संतासंत जे जन । तेथें कोरान्न मागोन करी भोजन ।

तेनें केलें अमृतप्राशन । प्रतिदिनीं ॥ ३ ॥

॥ श्लोक ॥ भिक्षाहारी निराहारी । भिक्षा नैव प्रतिग्रहः ।

असंतो वापि संतो वा । सोमपानं दिने दिने ॥

ऐसा भिक्षेचा महिमा । भिक्षा माने सर्वोत्तमा ।

ईश्वराचा अगाध महिमा । तोहि भिक्षा मागे ॥ ४ ॥

दत्त गोरक्ष आदिकरुनी । सिद्ध भिक्षा मागती जनीं ।

निस्पृहता भिक्षेपासुनी । प्रगट होये ॥ ५ ॥

वार लाऊन बैसला । तरी तो पराधेन जाला ।

तैसीच नित्यावळीला । स्वतंत्रता कैंची ॥ ६ ॥

आठां दिवसां धान्य मेळविलें । तरी तें कंटाळवाणें जालें ।

प्राणी येकायेकीं चेवलें । नित्यनूतनतेपासुनी ॥ ७ ॥

नित्य नूतन हिंडावें । उदंड देशाटण करावें ।

तरीच भिक्षा मागतां बरवें । श्लाघ्यवाणें ॥ ८ ॥

अखंड भिक्षेच अभ्यास । तयास वाटेना परदेश।

जिकडे तिकडे स्वदेश । भुवनत्रैं ॥ ९ ॥

भिक्षां मागतां किरकों नये । भिक्षा मागतां लाजो नये ।

भिक्षा मागतां भागों नये । परिभ्रमण करावें ॥ १० ॥

भिक्षा आणि चमत्कार । च्चाकाटती लहानथोर ।

कीर्ति वर्णी निरंतर । भगवंताची ॥ ११ ॥

भिक्षा म्हणिजे कामधेनु । सदा फळ नव्हे सामान्यु ।

भिक्षेस करी जो अमान्यु । तो करंटा जोगी ॥ १२ ॥

भिक्षेनें वोळखी होती । भिक्षेनें भरम चुकती ।

सामान्य भिक्षा मान्य करिती । सकळ प्राणी ॥ १३ ॥

भिक्षा म्हणिजे निर्भये स्थिति । भिक्षेनें प्रगटे महंती ।

स्वतंत्रता ईश्वरप्राप्ती । भिक्षागुणें ॥ १४ ॥

भिक्षेस नाहीं आडथळा । भिक्षाहारी तो मोकळा ।

भिक्षेकरितां सार्थक वेअळा । काळ जातो ॥ १५ ॥

भिक्षा म्हणिजे अमरवल्ली । जिकडे तिकडे लगवली ।

अवकाळीं फळदायेनी जाली । निर्ल्लजासी ॥ १६ ॥

पृथ्वीमधें देश नाना । फिरतां उपवासी मरेना ।

कोणे येके ठाईं जना । जड नव्हे ॥ १७ ॥

गोरज्य वाणिज्य कृषी । त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी ।

विसंभों नये झोळीसी । कदाकाळीं ॥ १८ ॥

भिक्षेऐसें नाहीं वैराग्य । वैराग्यापरतें नाहीं भाग्य ।

वैराग्य नस्तां अभाग्य । येकदेसी ॥ १९ ॥

कांहीं भिक्षा आहे म्हणावें । अल्पसंतोषी असावें ।

बहुत आणितां घ्यावें । मुष्टी येक ॥ २० ॥

सुखरूप भिक्षा मागणें । ऐसी निस्पृहतेचीं लक्षणें ।

मृद वागविळास करणें । परम सौख्यकारी ॥ २१ ॥

ऐसी भिक्षेची स्थिती । अल्प बोलिलें येथामती ।

भिक्षा वांचवी विपत्ती । होणार काळीं ॥ २२ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भिक्षानिरूपणनाम समास दुसरा ॥

 

 

 

समास तिसरा : कवित्वकाआ निरूपण

॥ श्रीराम ॥

कवित्व शब्दसुमनमाळा । अर्थ परिमळ आगळा ।

तेणें संतषट्पदकुळा । आनंद होये ॥ १ ॥

ऐसी माळा अंतःकरणीं । गुंफुन पूजा रामचरणीं ।

वोंकारतंत अखंडपणीं । खंडूं च नये ॥ २ ॥

परोपकाराकारणें । कवित्व अगत्य करणें ।

तया कवित्वाचीं लक्षणें । बोलिजेती ॥ ३ ॥

जेणें घडे भगवद्‍भक्ती । जेणें घडे विरक्ती ।

ऐसिया कत्वाची युक्ती । आधीं वाढवावी ॥ ४ ॥

क्रियेवीण शब्दज्ञान । तया न मानिती सज्जन ।

म्हणौनी देव प्रसन्न । अनुतापें करावा ॥ ५ ॥

देवाचेन प्रसन्नपणें । जें जें घडे बोलणें ।

तें तें अत्यंत श्लाघ्यवाणें । या नाव प्रासादिक ॥ ६ ॥

धीट पाठ प्रसादिक । ऐसें बोलती अनेक ।

तरी हा त्रिविध विवेक । बोलिजेल ॥ ७ ॥

धीट म्हणिजे धीटपणें केलें । जें जें आपुल्या मनास आलें ।

बळेंचि कवित्व रचिलें । या नाव धीट बोलिजे ॥ ८ ॥

पाठ म्हणिजे पाठांतर । बहुत पाहिलें ग्रंथांतर ।

तयासरिखा उतार । आपणचि केला ॥ ९ ॥

सीघ्रचि कवित्व जोडिलें । दृष्टि पडिलें तें चि वर्णिलें ।

भक्तिवांचून जें केलें । त्या नाव धीटपाठ ॥ १० ॥

कामिक रसिक श्रृंघारिक । वीर हास्य प्रस्ताविक ।

कौतुक विनोद अनेक । या नाव धीटपाठ ॥ ११ ॥

मन जालें कामाकार । तैसेचि निघती उद्गार ।

धीटपाठें परपार । पाविजेत नाहीं ॥ १२ ॥

व्हावया उदरशांती । करणें लागे नरस्तुती ।

तेथें केली जे वित्पत्ति । त्या नाव धीटपाठ ॥ १३ ॥

कवित्व नसावें धीटपाठ । कवित्व नसावें खटपट ।

कवित्व नसावें उद्धट । पाषांडमत ॥ १४ ॥

कवित्व नसावें वादांग । कवित्व नसावें रसभंग ।

कवित्व नसावें रंगभंग । दृष्टांतहीन ॥ १५ ॥

कवित्व नसावें पाल्हाळ । कवित्व नसावें बाष्कळ ।

कवित्व नसावें कुटीळ । लक्षुनियां ॥ १६ ॥

हीन कवित्व नसावें । बोलिलेंचि न बोलावें ।

छंदभंग न करावें । मुद्राहीन ॥ १७ ॥

वित्पत्तिहीन तर्कहीन । कळाहीन शब्दहीन ।

भक्तिज्ञानवैराग्यहीन । कवित्व नसावें ॥ १८ ॥

भक्तिहीन जें कवित्व । तेंचि जाणावें ठोंबें मत ।

आवडीहीन जें वगत्रृत्व । कंटाळवाणें ॥ १९ ॥

भक्तिविण जो अनुवाद । तोचि जाणावा विनोद ।

प्रीतीविण संवाद । घडे केवी ॥ २० ॥

असो धीट पाठ तें ऐसें । नाथिलें अहंतेचें पिसें ।

आतां प्रसादिक तें कैसें । सांगिजेल ॥ २१ ॥

वैभव कांता कांचन । जयास वाटे हें वमन ।

अंतरीं लागलें ध्यान । सर्वोत्तमाचें ॥ २२ ॥

जयास घडीनें घडी । लागे भगवंतीं आवडी ।

चढती वाढती गोडी । भगद्‍भजनाची ॥ २३ ॥

जो भगवद्‍भजनेंवीण । जाऊं नेदी येक क्षण ।

सर्वकाळ अंतःकरण । भक्तिरंगें रंगलें ॥ २४ ॥

जया अंतरी भगवंत । अचळ राहिला निवांत ।

तो स्वभावें जें बोलत । तें ब्रह्मनिरूपण ॥ २५ ॥

अंतरी बैसला गोविंद । तेणें लागला भक्तिछंद ।

भक्तीविण अनुवाद । आणीक नाहीं ॥ २६ ॥

आवडी लागली अंतरीं । तैसीच वदे वैखरी ।

भावें करुणाकीर्तन करी । प्रेमभरें नाचतु ॥ २७ ॥

भगवंतीं लागलें मन । तेणें नाठवे देहभान ।

शंका लज्या पळोन । दुरी ठेली ॥ २८ ॥

तो प्रेमरंगें रंगला । तो भक्तिमदें मातला ।

तेणें अहंभाव घातला । पायांतळीं ॥ २९ ॥

गात नाचत निशंक । तयास कैचे दिसती लोक ।

दृष्टीं त्रैलोक्यनायेक । वसोन ठेला ॥ ३० ॥

ऐसा भगवंतीं रंगला । आणीक कांहीं नलगे त्याला ।

स्वैछा वर्णूं लागला । ध्यान कीर्ती प्रताप ॥ ३१ ॥

नाना ध्यानें नाना मूर्ती । नाना प्रताप नाना कीर्ती ।

तयापुढें नरस्तुती । त्रुणतुल्य वाटे ॥ ३२ ॥

असो ऐसा भगवद्‍भक्त । जो ये संसारीं विरक्त ।

तयास मानिती मुक्त । साधुजन ॥ ३३ ॥

त्याचे भक्तीचें कौतुक । तयानव प्रसादिक ।

सहज बोलतां विवेक । प्रगट होय ॥ ३४ ॥

ऐका कवित्वलक्षण । केलेंच करूं निरूपण ।

जेणे निवे अंतःकर्ण । श्रोतयांचें ॥ ३५ ॥

कवित्व असावें निर्मळ । कवित्व असावें सरळ ।

कवित्व असावें प्रांजळ । अन्वयाचें ॥ ३६ ॥

कवित्व असावें भक्तिबळें । कवित्व असावें अर्थागळें ।

कवित्व असावें वेगळें । अहंतेसी ॥ ३७ ॥

कवित्व असावें कीर्तिवाड । कवित्व असावें रम्य गोड ।

कवित्व असावें जाड । प्रतापविषीं ॥ ३८ ॥

कवित्व असावें सोपें । कवित्व असावें अल्परूपें ।

कवित्व असावें सुल्लपें । चरणबंद ॥ ३९ ॥

मृदु मंजुळ कोमळ । भव्य अद्‍भुत विशाळ ।

गौल्य माधुर्य रसाळ । भक्तिरसें ॥ ४० ॥

अक्षरबंद पदबंद । नाना चातुर्य प्रबंद ।

नाना कौशल्यता छंदबंद । धाटी मुद्रा अनेक ॥ ४१ ॥

नाना युक्ती नाना बुद्धी । नाना कळा नाना सिद्धी ।

नाना अन्वये साधी । नाना कवित्व ॥ ४२ ॥

नाना साहित्य दृष्टांत । नाना तर्क धात मात ।

नाना संमती सिद्धांत । पूर्वपक्षेंसीं ॥ ४३ ॥

नाना गती नाना वित्पत्ती । नाना मती नाना स्फुर्ति ।

नाना धारणा नाना धृती । या नाव कवित्व ॥ ४४ ॥

शंका आशंका प्रत्योत्तरें । नाना काव्यें शास्त्राधारें ।

तुटे संशये निर्धारें । दिर्धारितां ॥ ४५ ॥

नाना प्रसंग नाना विचार । नाना योग नाना विवर ।

नाना तत्वचर्चासार । या नाव कवित्व ॥ ४६ ॥

नाना साधनें पुरश्चरणें । नाना तपें तीर्थाटणें ।

नाना संदेह फेडणें । या नाव कवित्व ॥ ४७ ॥

जेणें अनुताप उपजें । जेणें लोकिक लाजे ।

जेणें ज्ञान उमजे । या नाव कवित्व ॥ ४८ ॥

जेणें ज्ञान हें प्रबळे । जेणें वृत्ती हे मावळें ।

जेणें भक्तिमार्ग कळे । या नाव कवित्व ॥ ४९ ॥

जेणें सद्‍बुद्धि तुटे । जेणें भवसिंधु आटे ।

जेणें भगवंत प्रगटे । या नाव कवित्व ॥ ५० ॥

जेणें सद्‍बुद्धि लागे । जेणें पाषांड भंगे ।

जेणें विवेक जागे । या नाव कवित्व ॥ ५१ ॥

जेणें सद्वस्तु भासे । जेणें भास हा निरसे ।

जेणें भिन्नत्व नासे । या नाव कवित्व ॥ ५२ ॥

जेणें होये समाधान । जेणें तुटे संसारबंधन ।

जया मानिती सज्जन । तया नाव कवित्व ॥ ५३ ॥

ऐसें कवित्वलक्षण । सांगतां तें असाधारण ।

परंतु कांहींयेक निरूपण । बुझावया केलें ॥ ५४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कवित्वकला निरूपण समास तिसरा ॥

 

 

 

समास चौथा : कीर्तन लक्षण

॥ श्रीराम ॥

कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें ।

कठीण कर्कश कुर्टें सांडावें । येकीकडे ॥ १ ॥

खटखट खुंटून टाकावी । खळखळ खळांसीं न करावी ।

खरें खोटें खवळों नेदावी । वृत्ति आपुली ॥ २ ॥

गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये ।

गोप्य गुज गर्जों नये । गुण गावे ॥ ३ ॥

घष्टणी घिसणी घस्मरपणें । घसर घसरूं घसा खाणें ।

घुमघुमों चि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥

नाना नामे भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाचीं ।

नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्‍भुत करावीं ॥ ५ ॥

चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।

चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥

छळछळ छळणा करूं नये । छळितां छळितां छळों नयें ।

छळणें छळणा करूं नये । कोणीयेकाची ॥ ७ ॥

जि जि जि जि म्हणावेना । जो जो जागे तो तो पावना ।

जपजपों जनींजनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥

झिरपे झरे पझरे जळ । झळके दुरुनी झळाळ ।

झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥

या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाव नलगे ।

या या या या कांहीं च नलगे । सुबुद्धासी ॥ १० ॥

टक टक टक करूं नये । टाळाटाळी टिकों नये ।

टम टम टम टम लाऊं नये । कंटाळवाणी ॥ ११ ॥

ठस ठोंबस ठाकावेना । ठक ठक ठक करावेना ।

ठाकें ठमकें ठसावेना । मूर्तिध्यान ॥ १२ ॥

डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा नये ।

डंडळ डंडळ चुकों नये । हेंकाडपणें ॥ १३ ॥

ढिसाळ ढाला ढळती कुंचे । ढोबळा ढसकण डुले नाचे ।

ढळेचिना ढिगढिगांचे । कंटाळवाणे ॥ १४ ॥

नाना नेटक नागर । नाना नम्र गुणागर ।

नाना नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥

ताळ तुंबरे तानमानें । ताळबद्ध तंतगाणें ।

तूर्त तार्किक तनें मनें । तल्लिन होती ॥ १६ ॥

थर्थरां थरकती रोमांच । थै थै थै स्वरें उंच।

थिरथिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥ १७ ॥

दक्षदाक्षण्य दाटलें । बंदें प्रबंदें कोंदाटलें ।

दमदम दुमदुमों लागलें । जगदंतर ॥ १८ ॥

धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीनें धिंग जाला ।

धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥

नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें ।

नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥

पाप पळोन गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी ।

परतरतो परे अंतरीं । चटक लागे ॥ २१ ॥

फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं ।

फिकें फसकट फोल नाहीं । भकाध्या निंदा ॥ २२ ॥

बरें बरें बरें म्हणती । बाबा बाबा उदंड करिती ।

बळें बळेंचि बळाविती । कथेलागीं ॥ २३ ॥

भला भला भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं ।

भूषण भाविक लोकीं । परोपकारें ॥ २४ ॥

मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेनें ।

मी मी मी मी बहुत जनें । म्हणिजेत आहे ॥ २५ ॥

येकें टोकत येकांपासीं । येऊं येऊं येती झडेसीं ।

या या या या असे तयासी । म्हणावें नलगे ॥ २६ ॥

राग रंग रसाळ सुरंगें । अंतर संगित रागें ।

रत्नपरीक्षा रत्नामागें । धांवती लोक ॥ २७ ॥

लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन।

लपलपों लपती जन । आवडीनें ॥ २८ ॥

वचनें वाउगीं वदेना । वावरेविवरे वसेना ।

वगत्रुत्वें निववी जना । विनित हौनी॥ २९॥

सारासार समस्तांला । सिकऊं सिकऊं जनाला।

साहित संगित सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥

खरेंखोटें खरें वाटलें । खर्खर खुर्खुर खुंटलें ।

खोटें खोटेपणें गेलें। खोटें म्हणोनियां ॥३१ ॥

शाहाणे शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रृती बोधेना ।

शुक शारिकाशमेना । शब्द तयाचा ॥ ३२ ॥

हरुषें हरुषें हासिला । हाहाहोहोनें भुलला ।

हित होईना तयाला । परत्रीचें ॥ ३३ ॥

लक्षावें लक्षितां अलक्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी ।

लंगलें लयेतें अलक्षी । विहिंगममार्गें ॥ ३४॥

क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो । क्षमा क्षमून क्ष्मवितो ।

क्ष्मणें क्षोभणें क्षेत्रज्ञ तो । सर्वां ठाईं ॥ ३५ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तन लक्षण निरूपण समास चौथ्रा ॥

 

 

 

समास पांचवा : हरिकथा लक्षण

॥ श्रीराम ॥

मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रस्न ।

सावध होऊन विचक्षण । परिसोन आतां ॥ १ ॥

हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी ।

जेणें पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥

सोनें आणि परिमळे । युक्षदंडा लागती फळें ।

गौल्य माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥

तैसा हरिदास आणि विरक्त । ज्ञाता आणि प्रेमळ भक्त ।

वित्पन्न आणि वादरहित । तरी हेहि अपूर्वता ॥ ४ ॥

रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी ।

निराभिमानें वर्ते जनीं । तरी हेहि अपूर्वता ॥ ५ ॥

मछर नाहीं जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी ।

चतुरांग जाणें मानसीं । अंतरनिष्ठ ॥ ६ ॥

जयंत्यादिकें नाना पर्वें । तीर्थें क्षेत्रें जें अपूर्वें ।

जेथें वसिजे देवाधिदेवें । सामर्थ्यरूपें ॥ ७ ॥

तया तिर्थातें जे न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती ।

तया पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥

निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें ।

दोहिकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥

पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती ।

प्रतिपादून उछेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥

ऐसी न कीजे हरिकथा । अंतर पडे उभये पंथा ।

परिस लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥

सगुणमूर्तीपुढें भावें । करुणाकीर्तन करावें ।

नानाध्यानें वर्णावें । प्रतापकीर्तीतें । १२ ॥

ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढवे ।

सर्वांतरीं हेलावे । प्रेमसुख ॥ १३ ॥

कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण ।

न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४ ॥

देवाचें वर्णावें वैभाव । नाना प्रकारें महत्त्व ।

सगुणीं ठेउनियां भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥

लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची ।

नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥

नम्र होऊन राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणी ।

करताळिका नृत्य वाणीं । नामघोषें गर्जावें ॥ १७ ॥

येकांची कीर्ति येकापुढें । वर्णितां साहित्य न पडे ।

म्हणोनियां निवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥

मूर्ती नस्तां सगुण । श्रवणीं बैसले साधुजन ।

तरी अद्वैतनिरूपण । अवश्य करावें ॥ १९ ॥

नाहीं मूर्ती नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन ।

तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्य ॥ २० ॥

श्रुंघारिक नवरसिक । यामधें सांडावें येक ।

स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णुं नये कीं ॥ २१ ॥

लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वता ।

धारिष्टापासून श्रोता । चळे तत्काळ ॥ २२ ॥

म्हणऊन तें तजावें । जें बाधक साधकां स्वभावें ।

घेतां अंतरीं ठसावें । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥

लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन ।

कैचें आठवेल ध्यान । ईश्वराचें ॥ २४ ॥

स्त्री वर्णितां सुखावला । लावण्याचे भरीं भरला ।

तो स्वयें जाणावा चेवला । ईश्वरापासुनी ॥ २५ ॥

हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे ।

निमिष्य येक जरी आकळे । ध्यानीं परमात्मा ॥ २६ ॥

ध्यानीं गुंतलें मन । कैचें आठवेल जन ।

निशंक निर्ल्लज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥

रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसीं वित्पन्न ।

अर्थान्वयाचें कीर्तन । करूं जाणे ॥ २८ ॥

छपन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा ।

परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥

भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणें अन्न ।

कळावंतांचें जें मन । तें कळाकार जालें ॥ ३० ॥

श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणावी अवकळा ।

देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥

सर्पीं वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी ।

नाना कळा देवासी । आड तैस्या ॥ ३२ ॥

सांडून देव सर्वज्ञ । नादामध्यें व्हावें मग्न ।

तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥

येक मन गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी ।

बळेंचि धरुनियां चोरीं । शुश्रृषा घेतली ॥ ३४ ॥

करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान ।

तेणें धरुनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥

भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी ।

कळावंतां तैसी परी । कळेनें केली ॥ ३६ ॥

मन ठेऊन ईश्वरीं । जो कोणी हरिकथा करी ।

तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥

जयास हरिकथेची गोडी । उठे नीच नवी आवडी ।

तयास जोडली जोडी । सर्वोत्तमाची ॥ ३८ ॥

हरिकथा मांडली जेथें । सर्व सांडून धावे तेथें ।

आलस्य निद्रा दवडून स्वार्थें । हरिकथेसि सादर ॥ ३९ ॥

हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगिकारी ।

साहेभूत सर्वांपरीं । साक्षपें होये ॥ ४० ॥

या नावाचा हरिदास । जयासि नामीं विश्वास ।

येथून हा समास । संपूर्ण जाला ॥ ४१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे हरिकथालक्षणनिरूपण समास पांचवा ॥

 

 

 

समास सहावा : चातुर्य लक्षण

॥ श्रीराम ॥

रूप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।

कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ १ ॥

काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्‍न चालेना ।

मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण ॥ २ ॥

आंधळें डोळस होयेना । बधिर तें ऐकेना ।

पांगुळ पाये घेइना । हा सहजगुण ॥ ३ ॥

कुरूपतेचीं लक्षणें । किती म्हणोनि सांगणें ।

रूप लावण्य याकारणें । पालटेना ॥ ४ ॥

अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभासितां येती ।

कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ॥ ५ ॥

मूर्खपण सांडितां जातें । शाहाणपण सिकतां येतें ।

कारबार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥

मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी ।

चातुर्येंविण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥

ऐसी प्रचीत येते मना । तरी कां स्वहित कराना ।

सन्मार्गें चालतां जनां । सज्जना माने ॥ ८ ॥

देहे नेटकें श्रुंघारिलें । परी चातुर्येंविण नासलें ।

गुणेंविण साजिरें केलें । बष्कळ जैसें ॥ ९ ॥

अंतर्कळा श्रृंघारावी । नानापरी उमजवावी ।

संपदा मेळऊन भोगावी । सावकास ॥ १० ॥

प्रेत्न करीना सिकेना । शरीर तेंहि कष्टविना ।

उत्तम गुण घेईना । सदाकोपी ॥ ११ ॥

आपण दुसयास करावें । तें उसिणें सवेंचि घ्यावें ।

जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ॥ १२ ॥

न्यायें वर्तेल तो शहाणा । अन्याइ तो दैन्यवाणा ।

नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥

जें बहुतांस मानलें । तें बहुतीं मान्य केलें ।

येर तें वेर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥

लोक आपणासि वोळावे । किंवा आवघेच कोंसळावे ।

आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५ ॥

समाधानें समाधान वाढे । मित्रिनें मित्रि जोडे ।

मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥

अहो कांहो अरे काअंरे । जनीं ऐकिजेतें किं ते ।

कळत असतांच कां रे । निकामीपन ॥ १७ ॥

चातुर्यें श्रुंघारे अंतर । वस्त्रें श्रुंघारे शरीर ।

दोहिमधें कोण थोर । बरें पाहा ॥ १८ ॥

बाह्याकार श्रुंगारिलें । तेणें लोकांच्या हातासि काये आलें ।

चातुर्यें बहुतांसी रक्षिलें । नाना प्रकारें ॥ १९ ॥

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।

समस्तीं बरें म्हणावें । ऐसी वासना ॥ २० ॥

तनें मनें झिजावें । तेणें भले म्हणोन घ्यावें ।

उगें चि कल्पितां सिणावें । लागेल पुढें ॥ २१ ॥

लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे ।

लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥ २२ ॥

म्हणोन दुरयास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें ।

दुसयास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥

हें तों प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा नये ।

समजणें हा उपाये । प्राणीमात्रासी ॥ २४ ॥

समजले आणि वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ।

यावेगळे उरले । तें करंटे पुरुष ॥ २५ ॥

जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव ।

समजले पाहिजे उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥

आळसें कार्येभाग नासतो । साक्षेप होत होत होतो ।

दिसते गोष्टी कळेना तो । शाहाणा कैसा ॥ २७ ॥

मित्रि करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्यु ।

बोलिलें हें सत्य किं असत्य । वोळखावें ॥ २८ ॥

आपणास शाहाणें करूं नेणें । आपलें हित आपण नेणें ।

जनीं मैत्रि राखों नेणे । वैर करी ॥ २९ ॥

ऐसे प्रकारीचे जन । त्यास म्हणावें अज्ञान ।

तयापासीं समाधान । कोण पावे ॥ ३० ॥

आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालिला ।

बहुतांमध्यें येकल्याला । येश कैचें ॥ ३१ ॥

बहुतांचे मुखी उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें ।

उत्तम गुणीं विवरावें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥

शाहाणे करावे जन । पतित करावे पावन ।

सृष्टिमधें भगवद्‍भजन । वाढवावें ॥ ३३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्येलक्षणनिरूपण समास सहावा ॥

 

 

 

समास सातवा : युगधर्म निरूपण

॥ श्रीराम ॥

नाना वेश नाना आश्रम । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम ।

जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥

देव ऋषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी ।

पितृआदिकरून विभागी । अतीत अभ्यागत ॥ २ ॥

गृहस्थाश्रमीं निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले ।

परंतु गृहस्थागृहीं हिंडों लागले । कीर्तिरूपें ॥ ३ ॥

याकारणें गृहस्थाश्रम । सकळामधें उत्तमोत्तम ।

परंतु पाहिजे स्वधर्म । आणी भूतदया ॥ ४ ॥

जेथें शडकर्में चालती । विध्योक्त क्रिया आचरती ।

वाग्माधुर्यें बोलती । प्राणीमात्रासी ॥ ५ ॥

सर्वप्रकारें नेमक । शास्त्रोक्त करणें कांहींयेक ।

त्याहिमध्यें अलोलिक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥

पुरश्चरणी कायाक्लेसी । दृढव्रती परम सायासी ।

जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥

काया वाचा जीवें प्राणें । कष्टे भगवंताकारणें ।

मनें घेतलें धरणें । भजनमार्गीं ॥ ८ ॥

ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त ।

संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणें ॥ ९ ॥

अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्‍भाग्य ।

लोलंगतेयेवढें अभाग्य । आणीक नाहीं ॥ १० ॥

राजे राज्य सांडून गेले । भगवंताकारणें हिंडलें ।

कीर्तिरूपें पावन जाले । भूमंडळीं ॥ ११ ॥

ऐसा जो कां योगेश्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार ।

उकलूं जाणे अंतर । प्राणीमात्रांचें । १२ ॥

ऐसी वृत्ति उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान ।

दर्शनमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥

बहुतांसी करी उपाये । तो जनाच्या वाट्या न ये ।

अखंड जयाचे हृदये । भगवद्‍रूप ॥ १४ ॥

जनास दिसे हा दुश्चित । परी तो आहे सावचित ।

अखंड जयाचें चित्त । परमेश्वरीं ॥ १५ ॥

उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं ।

नाहिं तरी श्रवणमननीं । निरंतर ॥ १६ ॥

पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रह असिल्या गांठीं ।

तरीच ऐसीयाची भेटी । होये जनासी ॥ १७ ॥

प्रचीतिविण जें ज्ञान । तो आवघाचि अनुमान ।

तेथें कैंचें परत्रसाधन । प्राणीयासी ॥ १८ ॥

याकारणें मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण काम नये ।

उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ १९ ॥

वेडें संसार सांडून गेलें । तरी तें कष्टकष्टोंचि मेलें ।

दोहिकडे अंतरलें । इहलोक परत्र ॥ २० ॥

रागें रागें निघोन गेला । तरी तो भांडभांडोंचि मेला ।

बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥

निघोन गेला परी अज्ञान । त्याचे संगती लागले जन ।

गुरु शिष्य दोघे समान । अज्ञानरूपें ॥ २२ ॥

आशावादी अनाचारी । निघोनि गेला देशांतरीं ।

तरी तो अनाचारचि करी । जनामध्यें ॥ २३ ॥

गृहीं पोटेविण कष्टती । कष्टी होऊन निघोन जाती ।

त्यास ठाईं ठाईं मारिती । चोरी भरतां ॥ २४ ॥

संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला ।

तेणें जन पावन केला । आपणाऐसा ॥ २५ ॥

येके संगतीनें तरती । येके संगतीनें बुडती ।

याकारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥

जेथें नाहीं विवेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा ।

घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि मिळेना ॥ २७ ॥

जो दुसयाचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे ।

तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥

नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला ।

वेदशास्त्रब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥

ब्रह्मज्ञानाचा विचारू । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू ।

वर्णानां ब्रह्मणो गुरुः । ऐसें वचन ॥ ३० ॥

ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।

गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥ ३१ ॥

कित्येक दावलमलकास जाती। कित्येक पीरास भजती ।

कित्येक तुरुक होती । आपले इछेनें ॥ ३२ ॥

ऐसा कलयुगींचा आचार । कोठें राहिला विचार ।

पुढें पुढें वर्णसंकर । होणार आहे ॥ ३३ ॥

गुरुत्व आले नीचयाती । कांहींयेक वाढली महंती ।

शुद्र आचार बुडविती । ब्रह्मणाचा ॥ ३४ ॥

हें ब्रह्मणास कळेना । त्याची वृत्तिच वळेना ।

मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥

राज्य नेलें म्लेंचिं क्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।

आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ३६ ॥

ब्रह्मणास ग्रामणीनें बुडविलें। विष्णूनें श्रीवत्स मिरविलें ।

त्याच विष्णूनें श्रापिलें । फरशरामें ॥ ३७ ॥

आम्हीहि तेचि ब्रह्मण । दुःखें बोलिलें हें वचन ।

वडिल गेले ग्रामणी करून । आम्हां भोवतें ॥ ३८ ॥

अतांचे ब्रह्मणीं काये केलें । अन्न मिळेना ऐसें जालें ।

तुम्हा बहुतांचे प्रचितीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥

बरें वडिलांस काये म्हणावें । ब्रह्मणाचें अदृष्ट जाणावें ।

प्रस्ंगें बोलिलें स्वभावें । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ४०॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे युगधर्म निरूपण समास सातवा ॥

 

 

 

समास आठवा : अखंड ध्यान निरूपण

॥ श्रीराम ॥

बरें ऐसा प्रसंग जाला । जाला तो होऊन गेला।

आतां तरी ब्राह्मणीं आपणाला । शाहाणे करावें ॥ १ ॥

देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं ।

मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ॥ २ ॥

आधीं देवासवोळखावें । मग अनन्यभावें भजावें ।

अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥

सर्वांमधें जो उत्तम । तया नाव सर्वोत्तम ।

आत्मानात्मविवेकवर्म । ठाईं पाडावें ॥ ४ ॥

जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी ।

पदार्थमात्रास परीक्षी । जाणपणें ॥ ५ ॥

तो सकळ देहामधें वर्ततो। इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।

प्रचितीनें प्रत्यये येतो । प्राणीमात्रीं ॥ ६ ॥

प्राणीमात्रीं जगदांतरें । म्हणोनि राखावीं अंतरें ।

दाता भोक्ता परस्परें । सकळ कांहीं ॥ ७ ॥

देव वर्ततो जगदांतरी । तोचि आपुलें अंतरीं ।

त्रैलोकींचे प्राणीमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥

मुळीं पाहाणार तो येकला । सकळां ठाईं विभागला ।

देहप्रकृतीनें जाला । भिन्न भिन्न ॥ ९ ॥

भिन्न भासें देहाकारें । प्रस्तुता येकचि अंतरें ।

बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच घडे ॥ १० ॥

आपुले पारिखे सकळ लोक । पक्षी स्वापद पश्वादिक ।

किडा मुंगी देहधारक । सकळ प्राणी ॥ ११ ॥

खेचर भूचर वनचर । नाना प्रकारें जळचर ।

चत्वार खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२॥

समस्त जाणीवेनें वर्तती । रोकडी पाहवी प्रचिती ।

त्याची आपुली संगती । अखंड आहे ॥ १३॥

जगदांतरें वोळला धणी । किती येकवटील प्राणी ।

परी ते वोळायाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥

हें आपणाकडेंच येतें । राजी राखिजे समस्तें ।

देहासि बरें करावें तें । आत्मयास पावे ॥ १५ ॥

दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव ।

रागास आला जरी राव । तरी तंडों नये कीं ॥ १६ ॥

प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें ।

विवेक सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥

आत्मत्वीं दिसतो भेद । हा अवघाचि देहसमंध ।

येका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥

गरळ आणि अमृत जालें । परी आपपण नाहीं गेलें ।

साक्षत्वें आत्मयास पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥

अंतरिनिष्ठ जो पुरुष । तो अंतरनिष्ठेनें विशेष ।

जगामधें जो जगदीश । तो तयास वोळखे ॥ २० ॥

नयनेंचि पाहावा नयेन । मनें शोधावें मन ।

तैसाचि हा भगवान । सकळां घटीं ॥ २१ ॥

तेणेंविण कार्यभाग आडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे ।

प्राणी विवेकें पडावे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥

जागृतीस व्यापार घडतो । समंध तयासीच पडतो ।

स्वप्नामधें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥

अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण ।

याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥

सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष ।

आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥

परी तें धरितांहि धरेना । ध्यानीं येती वेक्ति ना ।

उगेंचि कष्टती मना । कासाविस करूनी ॥ २६ ॥

मूर्तिध्यान करिता। सायासें । तेथें येकाचें येकचि दिसे ।

भासों नये तेंचि भासे । विलक्षण ॥ २७ ॥

ध्यान देवाचें करावें । किंवा देवाल्याचें करावें ।

हेंचि बरें विवरावें । आपले ठाईं ॥ २८ ॥

देह देउळ आत्मा देव । कोठें धरूं पाहातां भाव ।

देव वोळखोन जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥

अंतरनिष्ठा ध्यान ऐसें । दंडकध्यान अनारिसें ।

प्रत्ययेविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥

अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां सवेंचि मोडे ।

उगेचि कष्टती बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥

देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती ।

भोगणें त्यागणें विपत्ति । देहयोगें ॥ ३२ ॥

ऐसें मनी आठवतें । विचारितां भलतेंचि होतें ।

दिसों नये तें दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥

दिसतें तें सांगतां न ये । बळें भावर्थ धरितां नये ।

साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥

सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन ।

मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥

फुटक मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें ।

तेथें कोण सार्थक जालें । पाहाना कां ॥ ३६ ॥

अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित ।

हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥

ध्यान धरितें तें कोण । ध्यानीं आठवतें तें कोण ।

दोनीमधें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥

अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे ।

ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥

ऐसीं हे प्रत्ययाची कामें । प्रत्ययेंविण बाधिजे भ्रमें ।

लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥

दंडकध्यानाचें लक्षण । धरून बैसलें अवलक्षण ।

प्रमाण आअणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥

मिथ्या समाचार उठविती । बाउग्याच बोंबा घालिती ।

मनांस आणितां अंतीं । आवघेंचि मिथ्या ॥ ४२ ॥

कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणीयेक सिकवी त्याला ।

मुकुट काढूनि माळ घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥

मनाचेथें काये दुष्काळ । जे आखुड कल्पिती माळ ।

सांगते ऐकते केवळ । मूर्ख जाणावे ॥ ४४ ॥

प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती । दोरे फुलें गुंफावी न लगती ।

कल्पनेची माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥

बुधीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ ।

तया मुर्खासीं खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥

जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला ।

साता पांचाचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥

प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून ।

तेथें अवघाची अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥

सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा ।

माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अखंडध्याननिरूपणनाम समास आठवा ॥

 

 

 

समास नववा : शाश्वत निरूपण

॥ श्रीराम ॥

पिंडाचें पाहिलें कौतुक । शोधिला आत्मानात्मा विवेक ।

पिंड अनात्मा आत्मा येक । सकळ कर्ता ॥ १ ॥

आत्म्यास अनन्यता बोलिली । ते विवेकें प्रत्यया आली ।

आतां पाहिजे समजली । ब्रह्मांडरचना ॥ २ ॥

आत्मानात्माविवेक पिंडी । सारासारविचार ब्रह्मांडी।

विवरविवरों हे गोडी । घेतली पाहिजे ॥ ३ ॥

पिंड कार्य ब्रह्मांड कारण । याचें करावें विवरण ।

हेंचि पुढें निरूपण । बोलिलें असे ॥ ४ ॥

असार म्हणिजे नासिवंत । सार म्हणिजे तें शाश्वत ।

जयास होईल कल्पांत । तें सार नव्हे ॥ ५ ॥

पृथ्वी जळापासून जाली । पुढें ते जळीं मिळाली ।

जळाची उत्पत्ति वाढली । तेजापासुनी ॥ ६ ॥

ते जळ तेजें शोषिलें । महत्तेजें आटोन गेलें ।

पुढें तेजचि उरलें । सावकाश ॥ ७ ॥

तेज जालें वायोपासुनी । वायो झडपी तयालागुनी ।

तेज जाउनी दाटणी । वायोचीच जाली ॥ ८ ॥

वायो गगनापासुनी जाला । मागुतां तेथेंचि विराला ।

ऐसा हा कल्पांत बोलिला । वेदांतशास्त्रीं ॥ ९ ॥

गुणमाया मूळमाया । परब्रह्मीं पावती लया ।

तें परब्रह्म विवराया । विवेक पाहिजे ॥ १० ॥

सर्व उपाधींचा सेवट । तेथें नाहीं दृश्य खटपट ।

निर्गुण ब्रह्म घनदाट । सकळां ठाईं ॥ ११ ॥

उदंड कल्पांत जाला । तरी नाश नाहीं तयाला ।

मायात्यागें शाश्वताला । वोळखावें ॥ १२ ॥

देव अंतरात्मा सगुण । सगुणें पाविजे निर्गुण ।

निर्गुणज्ञानें विज्ञान । होत असे ॥ १३ ॥

कल्पनेतीत जें निर्मळ । तेथें नाहीं मायामळ ।

मिथ्यत्वें दृश्य सकळ । होत जातें ॥ १४ ॥

जें होते आणि सवेंचि जातें । तें तें प्रत्ययास येतें ।

जेथें होणें जाणें नाहीं तें । विवेकें वोळखावे ॥ १५ ॥

येक ज्ञान येक अज्ञान । येक जाणावें विपरीत ज्ञान ।

हे त्रिपुटी होये क्षीण । तेंचि विज्ञान ॥ १६ ॥

वेदांत सिधांत धादांत । याची पाहावी प्रचित ।

निर्विकार सदोदित । जेथें तेथें ॥ १७ ॥

तें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोन अनन्य राहावें

मुख्य आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ १८ ॥

दृश्यास दिसते दृश्य । मनास भासतो भास ।

दृश्यभासातीत अविनाश । परब्रह्म तें ॥ १९ ॥

पाहों जातां दुरीच्या दुरी । परब्रह्म सबाहेअंतरीं ।

अंतचि नाहीं अनंत सरी । कोणास द्यावी ॥ २० ॥

चंचळ तें स्थिरावेना । निश्चळ तें कदापी चळेना ।

आभाळ येतें जातें गगना । चळण नाहीं ॥ २१ ॥

जें विकारें वाढें मोडे । तेथें शाश्वतता कैंची घडे ।

कल्पांत होताच विघडे । सकळ कांहीं ॥ २२ ॥

जे अंतरींच भ्रमलें । मायासंभ्रमें संभ्रमलें ।

तयास हें कैसें उकले । आव्हाट चक्र ॥ २३ ॥

भिडेनें वेव्हार निवडेना । भिडेनें सिधांत कळेना ।

भिडेनें देव आकळेना । आंतर्यामीं ॥ २४ ॥

वैद्याची प्रचित येईना । आणी भीडहि उलंघेना ।

तरी मग रोगी वांचेना । ऐसें जाणावें ॥ २५ ॥

 

जेणें राजा वोळखिला । तो राव म्हणेना भलत्याला ।

जेणें देव वोळखिला । तो देवरूपी ॥ २६ ॥

जयास माईकाची भीड । तें काये बोलेल द्वाड ।

विचार पाहातां उघड । सकळ कांहीं ॥ २७ ॥

भीड मायेऐलिकडे । परब्रह्म तें पैलीकडे ।

पैलीकडे ऐलीकडे । सदोदित ॥ २८ ॥

लटिक्याची भीड धरणें । भ्रमें भलतेंचि करणें ।

ऐसी नव्हेंतीलक्षणें । विवेकाचीं ॥ २९ ॥

खोटें आवघेंचि सांडावें । खरें प्रत्ययें वोळखावें ।

मायात्यागें समजावें । परब्रह्म ॥ ३० ॥

तें मायेचें जें लक्षण । तेंचि पुढें निरूपण ।

सुचितपणें विवरण । केलें पाहिजे ॥ ३१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शाश्वतनिरूपणनाम समास नववा ॥

 

 

 

समास दहावा : मायानिरूपण

॥ श्रीराम ॥

माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे ।

माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥

करंटा पडोनि उताणा । करी नानापरी कल्पना ।

परी तें कांहींच घडेना । तैसी माया ॥ २ ॥

द्रव्यदारेचें स्वप्नवैभव । नाना विळासें हावभाव ।

क्षणीक वाटे परी भाव । तैसी माया ॥ ३ ॥

गगनीं गंधर्वनगरें । दिसताती नाना प्रकारें ।

नाना रूपें नाना विकारें । तैसी माया ॥ ४ ॥

लक्षुमी रायेविनोदाची । बोलतां वाटे साची ।

मिथ्या प्रचित तेथीची । तैसी माया ॥ ५ ॥

दसयाचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे ।

परी सर्वत्र राहाटे । तैसी माया ॥ ६ ॥

मेल्याचा मोहोछाव करणें । सतीचें वैभव वाढविणें ।

मसणीं जाउनी रुदन करणें । तैसी माया ॥ ७ ॥

राखेसी म्हणती लक्षुमी । दुसरी भरदोरी लक्षुमी ।

तिसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया ॥ ८ ॥

मुळीं बाळविधवा नारी । तिचें नांव जन्मसावित्री ।

कुबेर हिंडे घरोघरी । तैसी माया ॥ ९ ॥

दशावतारांतील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा ।

नदी नामें पीयुष्णा । तैसी माया ॥ १० ॥

बहुरूपांतील रामदेवराव । ग्रामस्तांपुढे दाखवी हावभाव ।

कां माहांराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥

देव्हारां असे अन्नपूर्णा । आणी गृहीं अन्नचि मिळेना ।

नामें सरस्वती सिकेना । शुभावळु ॥ १२ ॥

सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रास इंद्रनामें पाचारिलें ।

कुरूप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥

मूर्ख नामें सकळकळा । राशभी नामें कोकिळा ।

नातरी डोळसेचा डोळा । फुटला जैसा ॥ १४ ॥

मातांगीचें नाम तुळसी । चर्मिकीचें नाम कासी ।

बोलती अतिशूद्रिणीसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥

साउली आणी अंधकार । येक होतां तेथीचा विचार ।

उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥

श्रवण बोटें संधी करतळ । रविरश्में दिसती इंगळ ।

रम्य आरक्तकल्होळ । तैसी माया ॥ १७ ॥

भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्नचि लागला ।

विवंचितां प्रत्ये आला । तैसी माया ॥ १८ ॥

जळीं चरणकरांगुळें । आखुड लांबें जिरकोळें ।

विपरीत काणें दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥

भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी जाली ।

सन्यपातस्थां अनुभवली । तैसी माया ॥ २० ॥

कोणीयेक पदार्थविकार । उगाचि दिसे भासमात्र ।

अनन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायानिरूपणनाम समास दहावा ॥

 

॥ दशक चौदावा समाप्त ॥

दशक १५ वा -->