संतसाहित्य

Navigation

दशक १२ वा



दशक ११ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥  विवेकवैराग्यनाम दशक बारावा  ॥ 

समास पहिला : विमळ लक्षण

 

॥ श्रीराम ॥

आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।

येथें आळस करूं नका । विवेकी हो ॥ १ ॥

प्रपंच सांडून परमार्थ कराल । तेणें तुम्ही कष्टी व्हाल ।

प्रपंच परमार्थ चालवाल । तरी तुम्ही विवेकी ॥ २ ॥

प्रपंच सांडून परमार्थ केला । तरी अन्न मिळेना खायाला ।

मग तया करंट्याला । परमार्थ कैंचा ॥ ३ ॥

परमार्थ सांडून प्रपंच करिसी । तरी तूं येमयातना भोगिसी ।

अंतीं परम कष्टी होसी । येमयातना भोगितां ॥ ४ ॥

साहेबकामास नाहीं गेला । गृहींच सुरवडोन बैसला ।

तरी साहेब कुटील तयाला । पाहाती लोक ॥ ५ ॥

तेव्हां महत्वचि गेलें । दुर्जनाचें हासें जालें ।

दुःख उदंड भोगिलें । आपुल्या जीवें ॥ ६ ॥

तैसेचि होणार अंतीं । म्हणोन भजावें भगवंतीं ।

परमार्थाची प्रचिती । रोकडी घ्यावी ॥ ७ ॥

संसारीं असतां मुक्त । तोचि जाणावा संयुक्त ।

अखंड पाहे युक्तायुक्त । विचारणा हे ॥ ८ ॥

प्रपंची तो सावधान । तो परमार्थ करील जाण ।

प्रपंचीं जो अप्रमाण । तो परमार्थीं खोटा ॥ ९ ॥

म्हणौन सावधपणें । प्रपंच परमार्थ चालवणें ।

ऐसें न करिता भोगणें । नाना दुःखें ॥ १० ॥

पर्णाळि पाहोन उचले । जीवसृष्टि विवेकें चाले ।

आणि पुरुष होऊन भ्रमले । यासी काय म्हणावें ॥ ११ ॥

म्हणौन असावी दीर्घ सूचना । अखंड करावी चाळणा ।

पुढील होणार अनुमाना । आणून सोडावें ॥ १२ ॥

सुखी असतो खबर्दार । दुःखी होतो बेखबर ।

ऐसा हा लोकिक विचार । दिसतचि आहे ॥ १३ ॥

म्हणौन सर्वसावधान । धन्य तयाचें महिमान ।

जनीं राखे समाधान । तोचि येक ॥ १४ ॥

चाळणेचा आळस केला । तरी अवचिता पडेल घाला ।

ते वेळे सावरायाला । अवकाश कैंचा ॥ १५ ॥

म्हणौन दीर्घसूचनेचे लोक । त्यांचा पाहावा विवेक ।

लोकांकरिता लोक । शाहाणे होती ॥ १६ ॥

परी ते शाहाणे वोळखावे । गुणवंताचे गुण घ्यावे ।

अवगुण देखोन सांडावे । जनामधें ॥ १७ ॥

मनुष्य पारखूं राहेना । आणि कोणाचें मन तोडीना ।

मनुष्यमात्र अनुमाना । आणून पाहे ॥ १८ ॥

दिसे सकळांस सारिखा । पाहातां विवेकी नेटका ।

कामी निकामी लोकां । बरें पाहे ॥ १९ ॥

जाणोन पाहिजेत सर्व । हेंचि तयाचें अपूर्व ।

ज्याचे त्यापरी गौरव । राखों जाणे ॥ २० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विमळलक्षणनाम समास पहिला ॥

 

 

समास दुसरा : प्रत्ययनिरूपण

॥ श्रीराम ॥

ऐका संसारासी आले हो । स्त्री पुरुष निस्पृह हो ।

सुचितपणें पाहो । अर्थांतर ॥ १ ॥

काये म्हणते वासना । काये कल्पिते कल्पना ।

अंतरींचे तरंग नाना । प्रकारें उठती ॥ २ ॥

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।

मनासारिखें असावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥

ऐसें आहे मनोगत । तरी तें कांहींच न होत ।

बरें करितां अकस्मात । वाईट होतें ॥ ४ ॥

येक सुखी येक दुःखी । प्रत्यक्ष वर्ततें लोकीं ।

कष्टी होऊनियां सेखीं । प्रारब्धावरी घालिती ॥ ५ ॥

अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।

आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ॥ ६ ॥

जो आपला आपण नेणे । तो दुसयाचें काये जाणे ।

न्याये सांडितां दैन्यवाणे । होती लोक ॥ ७ ॥

लोकांचे मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्तवेना ।

मूर्खपणें लोकीं नाना । कळह उठती ॥ ८ ॥

मग ते कळो वाढती । परस्परें कष्टी होती ।

प्रेत्न राहातां अंतीं । श्रमचि होयें ॥ ९ ॥

ऐसी नव्हे वर्तणुक । परिक्षावे नाना लोक ।

समजलें पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥ १० ॥

शब्द परीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं येक कळे दक्षा ।

मनोगत नतद्रक्षा । काय कळे ॥ ११ ॥

दुसयास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें ।

पाहों जातां लोकिक लक्षणें । बहुतेक ऐसीं ॥ १२ ॥

लोकीं बरें म्हणायाकारणें । भल्यास लागतें सोसणें ।

न सोसितां भंडवाणें । सहजचि होये ॥ १३ ॥

आपणास जें मानेना । तेथें कदापि राहावेना ।

उरी तोडून जावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥

बोलतो खरें चालतो खरें । त्यास मानिती लहानथोरें ।

न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥ १५ ॥

लोकांस कळेना तंवरी । विवेकें क्ष्मा जो न करी ।

तेणेंकरितां बराबरी । होत जाते ॥ १६ ॥

जंवरी चंदन झिजेना । तंव तो सुगंध कळेना ।

चंदन आणि वृक्ष नाना । सगट होती ॥ १७ ॥

जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।

उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥ १८ ॥

जगदांतर निवळत गेलें । जगदांतरी सख्य जालें ।

मग जाणावें वोळले । विश्वजन ॥ १९ ॥

जनींजनार्दन वोळला । तरी काये उणें तयाला ।

राजी राखावें सकळांला । कठीण आहे ॥ २० ॥

पेरिलें तें उगवतें । उसिणें द्यावें घ्यावें लागतें ।

वर्म काढितां भंगतें । परांतर ॥ २१ ॥

लोकीकीं बरेपण केलें । तेणें सौख्य वाढलें ।

उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥ २२ ॥

हें आवघें आपणांपासीं । येथें बोल नाहीं जनासी ।

सिकवावें आपल्या मनासी । क्षणक्षणा ॥ २३ ॥

खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला ।

तरी मोनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥ २४ ॥

लोक नाना परीक्षा जाणती । अंतरपरीक्षा नेणती ।

तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥ २५ ॥

आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।

कठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥ २६ ॥

थोर लाहान समान । आपले पारिखे सकळ जन ।

चढतें वाढतें सनेधान । करितां बरें ॥ २७ ॥

बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास येतें ।

आतां पुढें सांगावें तें । कोणास काये ॥ २८ ॥

हरिकथानिरूपण । बरेपणें राजकारण ।

प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥ २९ ॥

विद्या उदंडचि सिकला । प्रसंगमान चुकतचि गेला ।

तरी मग तये विद्येला । कोण पुसे ॥ ३० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे प्रत्ययनिरूपणनाम समास दुसरा ॥

 

 

समास तिसरा : भक्तनिरूपण

॥ श्रीराम ॥

पृथ्वीमधें बहुत लोक । तेंहि पाहावा विवेक ।

इहलोक आणि परलोक । बरा पाहावा॥ १ ॥

इहलोक साधायाकारणें । जाणत्याची संगती धरणें ।

परलोक साधायाकारणें । सद्‍गुरु पाहिजे ॥ २ ॥

सद्‍गुरुसी पाय पुसावें । हेंहि कळेना स्वभावें ।

अनन्यभावें येकभावें । दोनी गोष्टी पुसाव्या ॥ ३ ॥

दोनी गोष्टी त्या कोण । देव कोण आपण कोण ।

या गोष्टींचे विवरण । केलेंचि करावें ॥ ४ ॥

आधीं मुख्य देव तो कोण । मग आपण भक्त तो कोण ।

पंचीकर्ण माहावाक्यविवरण । केलेंचि करावें ॥ ५ ॥

सकळ केलियाचें फळ । शाश्वत वोळखावें निश्चळ ।

आपण कोण का केवळ । शोध घ्यावा ॥ ६ ॥

सारासार विचार घेतां । पदास नाहीं शाश्वतता ।

आधी कारण भगवंता । वोळखिलें पाहिजे ॥ ७ ॥

निश्चळ चंचळ आणि जड । अवघा मायेचा पवाड ।

यामधें वस्तु जाड । जाणार नाहीं ॥ ८ ॥

तें परब्रह्म धुंडावें । विवेकें त्रैलोक्य हिंडावें ।

माईक विचार खंडावें । परीक्षवंतीं ॥ ९ ॥

खोटें सांडून खरें घ्यावें । परीक्षवंतीं परीक्षावें ।

मायेचें अवघेचि जाणावें । रूप माईक ॥ १० ॥

पंचभूतिक हे माया । माईक जाये विलया ।

पिंडब्रह्मांड अष्टकाया । नसिवंत ॥ ११ ॥

दिसेल तितुकें नासेल । उपजेल तितुकें मरेल ।

रचेल तितुकें खचेल । रूप मायेचें ॥ १२ ॥

वाढेल तितुकें मोडेल । येईल तितुलें जाईल ।

भूतांस भूत खाईल । कल्पांतकाळीं ॥ १३ ॥

देहधारक तितुके नासती । हे तों रोकडी प्रचिती ।

मनुष्येंविण उत्पत्ति । रेत कैंचें ॥ १४ ॥

अन्न नस्तां रेत कैंचें । वोषधी नस्तां अन्न कैंचें ।

वोषधीस जिणें कैंचें । पृथ्वी नस्तां ॥ १५ ॥

आप नस्तां पृथ्वी नाहीं । तेज नस्तां आप नाहीं ।

वायो नस्तां तेज नाहीं । ऐसें जाणावें ॥ १६ ॥

अंतरात्मा नस्तां वायो कैंचा । विकार नस्तां अंतरात्मा कैंचा ।

निर्विकारीं विकार कैंचा । बरें पाहा ॥ १७ ॥

पृथ्वी नाहीं आप नाहीं । तेज नाहीं वायो नाहीं ।

अंतरात्मा विकार नाहीं । निर्विकारीं ॥ १८ ॥

निर्विकार जें निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।

अष्टधा प्रकृति संपूर्ण । नासिवंत ॥ १९ ॥

नासिवंत समजोन पाहिलें । तों तें अस्तांचि नस्तें जालें ।

सारासारें कळों आलें । समाधान ॥ २० ॥

विवेकें पाहिला विचार । मनास आलें सारासार ।

येणेंकरितां विचार । सदृढ जाला ॥ २१ ॥

शाश्वत देव तो निर्गुण । ऐसीं अंतरीं बाणली खूण ।

देव कळला मी कोण । कळलें पाहिजे ॥ २२ ॥

मी कोण पाहिजे कळलें । देहतत्व तितुकें शोधिलें ।

मनोवृत्तीचा ठाईं आलें । मीतूंपण ॥ २३ ॥

सकळ देहाचा शोध घेतां । मीपण दिसेना पाहातां ।

मीतूंपण हें तत्वता । तत्वीं मावळलें ॥ २४ ॥

दृश्य पदार्थचि वोसरे । तत्वें तत्व तेव्हां सरे ।

मीतूंपण हें कैंचें उरे । तत्वता वस्तु ॥ २५ ॥

पंचीकर्ण तत्वविवर्ण । माहावाक्यें वस्तु आपण ।

निसंगपणें निवेदन । केले पाहिजे ॥ २६ ॥

देवाभक्तांचे मूळ । शोधून पाहातां सकळ ।

उपाधिवेगला केवळ । निरोपाधी आत्मा ॥ २७ ॥

मीपण तें बुडालें । विवेकें वेगळेपण गेलें ।

निवृत्तिपदास प्राप्त जालें । उन्मनीपद ॥ २८ ॥

विज्ञानीं राहिलें ज्ञान । ध्येये राहिलें ध्यान ।

सकळ कांहीं कार्याकारण । पाहोन सांडिलें ॥ २९ ॥

जन्ममरणाचें चुकलें । पाप अवघेंचि बुडालें ।

येमयातनेचें जालें । निसंतान ॥ ३० ॥

निर्बंद अवघाचि तुटला । विचारें मोक्ष प्राप्त जाला ।

जन्म सार्थकचि वाटला । सकळ कांहीं ॥ ३१ ॥

नाना किंत निवारले । धोके अवघेचि तुटले ।

ज्ञानविवेकें पावन जालें । बहुत लोक ॥ ३२ ॥

पतितपावनाचे दास । तेहि पावन करिती जगास ।

ऐसी हे प्रचित मनास । बहुतांच्या आली ॥ ३३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे भक्तनिरूपणनाम समास तिसरा ॥

 

 

समास चौथा : विवेकवैराग्यनिरूपण

॥ श्रीराम ॥

महद्‍भाग्य हातासी आलें । परी भोगूं नाहीं जाणितलें ।

तैसें वैराग्य उत्पन्न जालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥

आदळतें आफळतें । कष्टी होतें दुःखी होतें ।

ऐकतें देखते येतें । वैराग्य तेणें ॥ २ ॥

नाना प्रपंचाच्या वोढी ॥ नाना संकटें सांकडीं ।

संसार सांडुनी देशधडी । होये तेणें ॥ ३ ॥

तो चिंतेपासून सुटला । पराधेनतेपासुनि पळाला ।

दुःखत्यागें मोकळा जाला । रोगी जैसा ॥ ४ ॥

परी तो होऊं नये मोकाट । नष्ट भ्रष्ट आणि चाट ।

सीमाच नाहीं सैराट । गुरूं जैंसें ॥ ५ ॥

विवेकेंविण वैराग्ये केलें । तरी अविवेकें अनर्थीं घातलें ।

अवघें वेर्थचि गेलें । दोहिंकडे ॥ ६ ॥

ना प्रपंच ना परमार्थ । अवघें जिणेंचि जालें वेर्थ ।

अविवेकें अनर्थ । ऐसा केला ॥ ७ ॥

का।म् वेर्थचि ज्ञान बडबडिला । परी वैराग्ययोग नाहीं घडला ।

जैसा कारागृहीं अडकला । पुरुषार्थ सांगे ॥ ८ ॥

वैराग्येंविण ज्ञान । तो वेर्थचि साभिमान ।

लोभदंभें घोळसून । कासाविस केला ॥ ९ ॥

स्वान बांधलें तरी भुंके । तैसा स्वार्थमुळें थिंकें

पराधीक देखों न सके । साभिमानें ॥ १० ॥

हें येकेंविण येक । तेणें उगाच वाढे शोक ।

आतां वैराग्य आणि विवेक । योग ऐका ॥ ११ ॥

विवेकें अंतरीं सुटला । वैराग्यें प्रपंच तुटला ।

अंतर्बाह्य मोकळा जाला । निःसंग योगी ॥ १२ ॥

जैसें मुखें ज्ञान बोले । तैसीच सवें क्रिया चाले ।

दीक्षा देखोनी चक्कित जाले । सुचिस्मंत ॥ १३ ॥

आस्था नाहीं त्रिलोक्याची । स्थिती बाणली वैराग्याची ।

येत्नविवेकधारणेची । सीमा नाहीं ॥ १४ ॥

संगीत रसाळ हरिकीर्तन । तालबद्ध तानमान ।

प्रेमळ आवडीचें भजन । अंतरापासुनी ॥ १५ ॥

तत्काळचि सन्मार्ग लागे । ऐसा अंतरीं विवेक जागे ।

वगत्रृत्व करितां न भंगे । साहित्य प्रत्ययाचें ॥ १६ ॥

सन्मार्गें जगास मिळाला । म्हणिजे जगदीश वोळला ।

प्रसंग पाहिजे कळला । कोणीयेक ॥ १७ ॥

प्रखर वैराग्य उदासीन । प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान ।

स्नानसंध्या भगवद्‍भजन । पुण्यमार्ग ॥ १८ ॥

विवेकवैराग्य तें ऐसें । नुस्तें वैराग्य हेंकाडपिसें ।

शब्दज्ञान येळिलसें । आपणचि वाटे ॥ १९ ॥

म्हणौन विवेक आणि वैराग्य । तेंचि जाणिजे महद्‍भाग्य ।

रामदास म्हणे योग्य । साधु जाणती ॥ २० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विवेकवैराग्यनिरूपणनाम समास चौथा ॥

 

 

समास पांचवा : आत्मनिवेदन

॥ श्रीराम ॥

रेखेचें गुंडाळें केलें । मात्रुकाक्षरीं शब्द जाले ।

शब्द मेळऊन चाले । श्लोक गद्य प्रबंद ॥ १ ॥

वेदशास्त्रें पुराणें । नाना काव्यें निरूपणें ।

ग्रंथभेद अनुवादणें । किती म्हणोनि ॥ २ ॥

नाना ऋषी नाना मतें । पाहों जातां असंख्यातें ।

भाषा लिपी जेथ तेथें । काये उणें ॥ ३ ॥

वर्ग ऋचा श्रुति स्मृति । अधे स्वर्ग स्तबक जाती ।

प्रसंग मानें समास पोथी । बहुधा नामें ॥ ४ ॥

नाना पदें नाना श्लोक । नाना बीर नाना कडक ।

नाना साख्या दोहडे अनेक । नामाभिधानें ॥ ५ ॥

डफगाणें माचिगाणें । दंडिगाणें कथागाणें ।

नाना मानें नाना जसनें । नाना खेळ ॥ ६ ॥

ध्वनि घोष नाद रेखा । चहुं वाचामध्यें देखा ।

वाचारूपेंहि ऐका । नाना भेद ॥ ७ ॥

उन्मेष परा ध्वनि पश्यंति । नाद मध्यमा शब्द चौथी ।

वैखरीपासून उमटती । नाना शब्दरत्नें ॥ ८ ॥

अकार उकार मकार । अर्धमात्राचें अंतर ।

औटमात्रा तदनंतर । बावन मात्रुका ॥ ९ ॥

नाना भेद रागज्ञान । नृत्यभेद तानमान ।

अर्थभेद तत्वज्ञान । विवंचना ॥ १० ॥

तत्वांमध्यें मुख्य तत्व । तें जाणावें शुद्धसत्व ।

अर्धमात्रा महत्तत्व । मूळमाया ॥ ११ ॥

नाना तत्वें लाहानथोरे । मिळोन अष्टहि शरीरें ।

अष्टधा प्रकृतीचें वारें । निघोन जातें ॥ १२ ॥

वारें नस्तां जें गगन । तैसें परब्रह्म सघन ।

अष्ट देहाचें निर्शन । करून पाहावें ॥ १३ ॥

 

ब्रह्मांडपिंडौभार । पिंडब्रह्मांडसंव्हार ।

दोहिवेगळें सारासार । विमळब्रह्म ॥ १४ ॥

पदार्थ जड आत्मा चंचळ । विमळब्रह्म तें निश्चळ ।

विवरोन विरे तत्काळ । तद्रूप होये ॥ १५ ॥

पदार्थ मनें काया वाचा । मी हा अवघाचि देवाचा ।

जड आत्मनिवेदनाचा । विचार ऐसा ॥ १६ ॥

चंचळकर्ता तो जगदीश । प्राणीमात्र तो त्याचा अंश ।

त्याचा तोचि आपणास । ठाव नाहीं ॥ १७ ॥

चंचळ आत्मनिवेदन । याचें सांगितलें लक्षण ।

कर्ता देव तो आपण । कोठेंचि नाहीं ॥ ८ ॥

चंचळ चळे स्वप्नाकार । निश्चळ देव तो निराकार ।

आत्मनिवेदनाचा प्रकार । जाणिजे ऐसा ॥ १९ ॥

ठावचि नाईं चंचळाचा । तेथें आधीं आपण कैंचा ।

निश्चळ आत्मनिवेदनाचा । विवेक ऐसा ॥ २० ॥

तिहिं प्रकारें आपण । नाहीं नाहीं दुजेपण ।

आपण नस्तां मीपण । नाहींच कोठें ॥ २१ ॥

पाहातां पाहातां अनुमानलें । कळतां कळतां कळों आलें ।

पाहातां अवघेंचि निवांत जालें । बोलणें आतां ॥ २२ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदननाम समास पांचवा ॥

 

 

समास सहावा : सृष्टिक्रमनिरूपण

॥ श्रीराम ॥

ब्रह्म निर्मळ निश्चळ । शाश्वत सार अमळ विमळ ।

अवकाश घन पोकळ । गगनाऐसें ॥ १ ॥

तयास करणें ना धरणें । तयास जन्म ना मरणें ।

तेथें जाणणें ना नेणणें । सुन्यातीत ॥ २ ॥

तें रचेना ना खचेना । तें होयेना ना जायेना ।

मायातीत निरंजना पारचि नाहीं ॥ ३ ॥

पुढें संकल्प उठिला । षडगुणेश्वर बोलिजे त्याला ।

अर्धरारीनटेश्वराला । बोलिजेतें ॥ ४ ॥

सर्वेश्वर सर्वज्ञ । साक्षी द्रष्टा ज्ञानघन ।

परेश परमात्मा जगजीवन । मूळपुरुष ॥ ५ ॥

ते मूळमाया बहुगुणी । अधोमुखें गुणक्षोभिणी ।

गुणत्रये तिजपासूनि । निर्माण जाले ॥ ६ ॥

पुढें विष्णु जाला निर्माण । जाणतीकळा सत्वगुण ।

जो करिताहे पाळण । त्रैलोक्याचें ॥ ७ ॥

पुढें जाणीवनेणीवमिश्रित । ब्रह्मा जाणावा नेमस्त ।

त्याच्या गुणें उत्पत्ति होत । भुवनत्रैं ॥ ८ ॥

पुढें रुद्र तमोगुण । सकळ संव्हाराचें कारण ।

सकळ कांहीं कर्तेपण । तेथेंचि आलें ॥ ९ ॥

तेथून पुढें पंचभूतें । पावलीं पष्ट दशेतें ।

अष्टधा प्रकृतीचें स्वरूप तें । मुळींच आहे ॥ १० ॥

निश्चळीं जालें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।

पंचभूतें आणि त्रिगुण । सूक्ष्म अष्टधा ॥ ११ ॥

आकाश म्हणिजे अंतरात्मा । प्रत्ययें पाहवा महिमा ।

त्या आकाशापासून जन्मा । वायो आला ॥ १२ ॥

तया वायोच्या दोनी झुळुका । उष्ण सीतळ ऐका ।

सीतळापासून तारा मयंका । जन्म जाला ॥ १३ ॥

उष्णापासून रवि वन्ही । विद्युल्यता आदिकरूनि ।

सीतळ उष्ण मिळोनि । तेज जाणावें ॥ १४ ॥

तया तेजापासून जालें आप । आप आळोन पृथ्वीचें रूप ।

पुढें औषधी अमूप । निर्माण जाल्यां ॥ १५ ॥

औषधीपासून नाना रस । नाना बीज अन्नरस ।

चौयासि लक्ष योनीच वास । भूमंडळीं ॥ १६ ॥

ऐसी जाली सृष्टीरचना । विचार आणिला पाहिजे मना ।

प्रत्ययेंविण अनुमाना । पात्र होईजे ॥ १७ ॥

ऐसा जाला आकार । येणेंचि न्यायें संव्हार ।

सारासारविचार । यास बोलिजे ॥ १८ ॥

जें जें जेथून निर्माण जालें । तें तें तेथेंचि निमालें ।

येणेंचि न्यायें संव्हारलें । माहाप्रळईं ॥ १९ ॥

आद्य मध्य अवसान । जें शाश्वत निरंजन ।

तेथें लावावें अनुसंधान । जाणते पुरुषीं ॥ २० ॥

होत जाते नाना रचना । परी ते कांहींच तगेना ।

सारासार विचारणा । याकारणें ॥ २१ ॥

द्रष्टा साक्षी अंतरात्मा । सर्वत्र बोलती महिमा ।

परी हे सर्वसाक्षिणी अवस्ता मां । प्रत्ययें पाहवी ॥ २२ ॥

मुळापासून सेवटवरी । अवघी मायेची भरोवरी ।

नाना विद्या कळाकुंसरी । तयेमधें ॥ २३ ॥

जो उपाधीचा सेवट पावेल । त्यास भ्रम ऐसें वाटेल ।

जो उपाधीमध्यें आडकेल । त्यास काढिता कवण ॥ २४ ॥

विवेक प्रत्ययाचीं कामें । कैसीं घडतील अनुमानभ्रमें ।

सारासारविचाराचेन संभ्रमें । पाविजे ब्रह्म ॥ २५ ॥

ब्रह्मांडींचे माहाकारण । ते मुळमाया जाण ।

अपूर्णास म्हणती ब्रह्म पूर्ण । विवेकहीन ॥ २६ ॥

सृष्टीमधें बहुजन । येक भोगिती नृपासन ।

येक विष्ठा टाकिती जाण । प्रत्येक्ष आतां ॥ २७ ॥

ऐसे उदंड लोक असती । आपणास थोर म्हणती ।

परी ते विवेकी जाणती । सकळ कांहीं ॥ २८ ॥

ऐसा आहे समाचार । कारण पाहिजे विचार ।

बहुतांच्या बोलें हा संसर । नासूं नये ॥ २९ ॥

पुस्तकज्ञानें निश्चये धरणें । तरी गुरु कासया करणें ।

याकारणें विवरणें । आपुल्या प्रत्ययें ॥ ३० ॥

जो बहुतांच्या बोलें लागला । तो नेमस्त जाणावा बुडाला ।

येक साहेब नस्तां कोणाला । मुश्यारा मगावा ॥ ३१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सृष्टिक्रमनिरूपणनाम समास सहावा ॥

 

 

समास सातवा : विषयत्याग

॥ श्रीराम ॥

न्यायें निष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।

मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥

बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले ।

विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥

बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक ।

येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥

विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं ।

ऐसें बोलणें ठाईं ठाईं । बरें पाहा ॥ ४ ॥

प्रपंची खाती जेविती । परमार्थी काये उपवास करिती ।

उभयता सारिखे दिसती । विषयाविषईं ॥ ५ ॥

देह चालतां विषय त्यागी । ऐसा कोण आहे जगीं ।

याचा निर्वाह मजलागीं । देवें निरोपावा ॥ ६ ॥

विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा ।

ऐसें पाहातां गोवा । दिसतो किं ॥ ७ ॥

ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता जाला ।

सावध होऊन मन घाला । येतद्विषईं ॥ ८ ॥

वैरग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग ।

प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥

मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहिं बहुत कष्ट केले ।

तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ॥ १० ॥

येर मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न म्हणतां मेलीं ।

कित्येक भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥

वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं ।

सुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचें ॥ १२ ॥

ऐसे प्रकारीचे जन । आपणास म्हणती सज्जन ।

पाहों जातां अनुमान । अवघाच दिसे ॥ १३ ॥

जयास नाहीं अनुताप । हेंचि येक पूर्वपाप ।

क्षणक्ष्णा विक्षेप । पराधीकपणें ॥ १४ ॥

मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जना ।

खात्यास नखातें देखों सकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥

भाग्यपुरुष थोर थोर । त्यास निंदिती डीवाळखोर ।

सावास देखतां चोर । चर्फडी जैसा ॥ १६ ॥

वैराग्यपरतें नाहीं भग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य ।

वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥

प्रत्ययेज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी ।

तो जाणीजे माहांयोगी । ईश्वरी पुरुष ॥ १८ ॥

अष्टमा सिद्धीची उपेक्षा । करून घेतली योगदीक्षा ।

घरोघरीं मागे भिक्षा । माहादेव ॥ १९ ॥

ईश्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी ।

म्हणोनियां सगट सरी । होत नाहीं ॥ २० ॥

उदास आणि विवेक । त्यास शोधिती सकळ लोक ।

जैसें लालची मूर्ख रंक । तें दैन्यवाणें ॥ २१ ॥

जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्ठले ।

विवेक करूं विसरले । विषयलोभीं ॥ २२ ॥

भजन तरी आवडेना । पुरश्चर्ण कदापि घडेना ।

भल्यांस त्यांस पडेना । येतन्निमित्य ॥ २३ ॥

वैराग्यें करून भ्रष्टेना । ज्ञान भजन सांडिना ।

वित्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥

कष्ट करितां सेत पिके । उंच वस्त तत्काळ विके ।

जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥ २५ ॥

येर ते अवघेचि मंदले । दुराशेनें खोटे जाले ।

कानकोंडें ज्ञान केलें । भ्रष्टाकारें ॥ २६ ॥

सबळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें ।

विषयत्यागाचीं लक्षणें । वोळखा ऐसीं ॥ २७ ॥

सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव ।

विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती ॥ २८ ॥

शूरत्वविषईं खडतर । त्यास मानिती लाहानथोर ।

कामगार आणि आंगचोर । येक कैसा ॥ २९ ॥

त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे ।

पिंडब्रह्मांड सकळ जाणे । येथायोग्य ॥ ३० ॥

ऐसा जो सर्वजाणता । उत्तमलक्षणी पुरुता ।

तयाचेनि सार्थकता । सहजचि होये ॥ ३१ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विषयत्यागनिरूपणनाम समास सातवा ॥

 

 

समास आठवा : काळरूपनिरूपण

॥ श्रीराम ॥

मूळमाया जगदेश्वर । पुढें अष्टधेचा विस्तार ।

सृष्टिक्रमें आकार । आकारला ॥ १ ॥

हें अवघेंच नस्तां निर्मळ । जैसें गगन अंतराळ ।

निराकारीं काळवेळ । कांहींच नाहीं ॥ २ ॥

उपाधीचा विस्तार जाला । तेथें काळ दिसोन आला ।

येरवीं पाहातां काळाला । ठावचि नाही ॥ ३ ॥

येक चंचळ येक निश्चल । यावेगळा कोठें काळ ।

चंचळ आहे तावत्काळ । काळ म्हणावें ॥ ४ ॥

आकाश म्हणिजे अवकाश । अवकाश बोलिजे विलंबास ।

त्या विलंबरूप काळास । जाणोनि घ्यावें ॥ ५ ॥

सूर्याकरितां विलंब कळे । गणना सकळांची आकळे ।

पळापासून निवळे । युगपरियंत ॥ ६ ॥

पळ घटिका प्रहर दिवस । अहोरात्र पक्ष मास ।

शड्मास वरि युगास । ठाव जाला ॥ ७ ॥

क्रेत त्रेत द्वापार कळी । संख्या चालिली भूमंडळी ।

देवांचीं आयुष्यें आगळीं । शास्त्रीं निरोपिलीं ॥ ८ ॥

ते देवत्रयाची खटपट । सूक्ष्मरूपें विलगट ।

दंडक सांडितां चटपट । लोकांस होते ॥ ९ ॥

मिश्रित त्रिगुण निवडेना । तेणें आद्यंत सृष्टिरचना ।

कोण थोर कोण साना । कैसा म्हणावा ॥ १० ॥

असो हीं जाणत्याचीं कामें । नेणता उगाच गुंते भ्रमें ।

प्रत्यये जाणजाणों वर्में । ठाईं पाडावीं ॥ ११ ॥

उत्पन्नकाळ सृष्टिकाळ । स्थितिकाळ संव्हारकाळ ।

आद्यंत अवघा काळ । विलंबरूपी ॥ १२ ॥

जें जें जये प्रसंगीं जालें । तेथें काळाचें नांव पडिलें ।

बरें नसेल अनुमानलें । तरी पुढें ऐका ॥ १३ ॥

प्रजन्यकाळ शीतकाळ । उष्णकाळ संतोषकाळ ।

सुखदुःखआनंदकाळ । प्रत्यये येतो ॥ १४ ॥

प्रातःकाळ माध्यानकाळ । सायंकाळ वसंतकाळ ।

पर्वकाळ कठिणकाळ । जाणिजे लोकीं ॥ १५ ॥

जन्मकाळ बाळत्वकाळ । तारुण्यकाळ वृधाप्यकाळ ।

अंतकाळ विषमकाळ । वेळरूपें ॥ १६ ॥

सुकाळ आणि दुष्काळ । प्रदोषकाळ पुण्यकाळ ।

सकळ वेळा मिळोन काळ । तयास म्हणावें ॥ १७ ॥

असतें येक वाटतें येक । त्याचें नांव हीन विवेक ।

नाना प्रवृत्तीचे लोक । प्रवृत्ति जाणती ॥ १८ ॥

प्रवृत्ति चाले अधोमुखें । निवृत्ति धावे ऊर्धमुखें ।

ऊर्धमुखें नाना सुखें । विवेकी जाणती ॥ १९ ॥

ब्रह्मांडरचना जेथून जाली । तेथें विवेकी दृष्टि घाली ।

विवरतां विवरतां लाधली । पूर्वापर स्थिति ॥ २० ॥

प्रपंची असोन परमार्थ पाहे । तोहि ये स्थितीतें लाहे ।

प्रारब्धयोगें करून राहे । लोकांमधें ॥ २१ ॥

सकळांचे येकचि मूळ । येक जाणते येक बाष्कळ ।

विवेकें करून तत्काळ । परलोक साधावा ॥ २२ ॥

तरीच जन्माचें सार्थक । भले पाहाती उभये लोक ।

कारण मुळींचा विवेक । पाहिला पाहिजे ॥ २३ ॥

विवेकहीन जे जन । ते जाणावे पशुसमान ।

त्यांचे ऐकतां भाषण । परलोक कैंचा ॥ २४ ॥

बरें आमचें काये गेलें । जें केलें तें फळास आलें ।

पेरिलें तें उगवलें । भोगिती आतां ॥ २५ ॥

पुढेंहि करी तो पावे । भक्तियोगें भगवंत फावे ।

देव भक्त मिळतां दुणावें । समाधान ॥ २६ ॥

कीर्ति करून नाहीं मेले । उगेच आले आणि गेले ।

शाहाणे होऊन भुलले । काये सांगवें ॥ २७ ॥

येथील येथें अवघेंचि राहातें । ऐसें प्रत्ययास हेतें ।

कोण काये घेऊन जातें । सांगाना कां ॥ २८ ॥

पदार्थीं असावें उदास । विवेक पाहावा सावकास ।

येणेंकरितां जगदीश । अलभ्य लाभे ॥ २९ ॥

जगदीशापरता लाभ नाहीं । कार्याकारण सर्व कांहीं ।

संसार करित असतांहि । समाधान ॥ ३० ॥

मागां होते जनकादिक । राज्य करितांहि अनेक ।

तैसेचि आतां पुण्यश्लोक । कित्येक असती ॥ ३१ ॥

राजा असतां मृत्यु आला । लक्ष कोटी कबुल जाला ।

तरि सोडिना तयाला । मृत्य कांहीं ॥ ३२ ॥

ऐसें हें पराधेन जिणें । यामधें दुखणें बाहाणें ।

नाना उद्वेग चिंता करणें । किती म्हणोनि ॥ ३३ ॥

हाट भरला संसाराचा । नफा पाहावा देवाचा ।

तरीच या कष्टाचा । परियाये होतो ॥ ३४ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे काळरूपनिरूपणनाम समास आठवा ॥

 

 

समास नववा : यत्‍नशिकवण

॥ श्रीराम ॥

दुर्बल नाचारी वोडगस्त । आळसी खादाड रिणगस्त ।

मूर्खपणें अवघें वेस्त । कांहींच नाहीं ॥ १ ॥

खाया नाहीं जेवाया नाहीं । लेया नाहीं नेसाया नाहीं ।

अंथराया नाहीं पांघराया नाहीं । कोंपट नाहीं अभागी ॥ २ ॥

सोएयेरे नाहीं धायेरे नाहीं । इष्ट नाहीं मित्र नाहीं ।

पाहातां कोठें वोळखी नाहीं । आश्रयेंविण परदेसी ॥ ३ ॥

तेणें कैसें करावें । काये जीवेंसीं धरावें ।

वाचावें किं मरावें । कोण्या प्रकारें ॥ ४ ॥

ऐसें कोणीयेकें पुसिलें । कोणीयेकें उत्तर दिधलें ।

श्रोतीं सावध ऐकिलें । पाहिजे आतां । ५ ॥

लाहान थोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं ।

करंट्या सावध पाहीं । सदेव होसी ॥ ६ ॥

अंतरीं नाहीं सावधानता । येत्न ठाकेना पुरता ।

सुखसंतोषाची वार्ता । तेथें कैंची ॥ ७ ॥

म्हणोन आळस सोडावा । येत्‍न साक्षेपें जोडावा ।

दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ८ ॥

प्रातःकाळीं उठत जावें । प्रातःस्मरामि करावें ।

नित्य नेमें स्मरावें । पाठांतर ॥ ९ ॥

मागील उजळणी पुढें पाठ । नेम धरावा निकट ।

बाष्कळपणाची वटवट । करूंच नये ॥ १० ॥

दिशेकडे दुरी जावें । सुचिस्मंत होऊन यावें ।

येतां कांहीं तरी आणावें । रितें खोटें ॥ ११ ॥

धूतवस्त्रें घालावीं पिळून । करावें चरणक्षाळण ।

देवदर्शन देवार्चन । येथासांग ॥ १२ ॥

कांहीं फळाहार घ्यावा । पुढें वेवसाये करावा ।

लोक आपला परावा । म्हणत जावा ॥ १३ ॥

सुंदर अक्षर ल्याहावें । पष्ट नेमस्त वाचावें ।

विवरविवरों जाणावें । अर्थांतर ॥ १४ ॥

नेमस्त नेटकें पुसावें । विशद करून सांगावें ।

प्रत्ययेंविण बोलावें । तेंचि पाप ॥ १५ ॥

सावधानता असावी । नीतिमर्याद राखावी ।

जनास माने ऐसी करावी । क्रियासिद्धि ॥ १६ ॥

आलियाचें समाधान । हरिकथा निरूपण ।

सर्वदा प्रसंग पाहोन । वर्तत जावें ॥ १७ ॥

ताळ धाटी मुद्रा शुद्ध । अर्थ प्रमये अन्वये शुद्ध ।

गद्यपद्यें दृष्टांत शुद्ध । अन्वयाचे ॥ १८ ॥

गाणें वाजवणें नाचणें । हस्तन्यास दाखवणें ।

सभारंजकें वचनें । आडकथा छंदबंद ॥ १९ ॥

बहुतांचें समाधान राखावें । बहुतांस मानेल तें बोलावें ।

विलग पडों नेदावें । कथेमधें ॥ २० ॥

लोकांस उदंड वाजी आणूं नये । लोकांचे उकलावें हृदये ।

तरी मग स्वभावें होये । नामघोष ॥ २१ ॥

भक्ति ज्ञान वैराग्य योग । नाना साधनाचे प्रयोग ।

जेणें तुटे भवरोग । मननमात्रें ॥ २२ ॥

जैसें बोलणें बोलावें । तैसेंचि चालणें चालावें ।

मग महंतलीळा स्वभावें । आंगीं बाणे ॥ २३ ॥

युक्तिवीण साजिरा योग । तो दुराशेचा रोग ।

संगतीच्या लोकांचा भोग । उभा ठेला ॥ २४ ॥

ऐसें न करावें सर्वथा । जनास पावऊं नये वेथा ।

हृदईं चिंतावें समर्थ । रघुनाथजीसी ॥ २५ ॥

उदासवृत्तिस मानवे जन । विशेष कथानिरूपण ।

रामकथा ब्रह्मांड भेदून । पैलाड न्यावी ॥ २६ ॥

सांग महंती संगीत गाणें । तेथें वैभवास काय उणें ।

नभामाजी तारांगणें । तैसे लोक ॥ २७ ॥

आकलबंद नाहीं जेथें । अवघेंचि विश्कळित तेथें ।

येकें आकलेविण तें । काये आहे ॥ २८ ॥

घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड ।

तेथें कैचें आणिले द्वाड । करंटपण ॥ २९ ॥

येथें आशंका फिटली । बुद्धि येत्‍नीं प्रवेशली ।

कांहींयेक आशा वाढली । अंतःकर्णी ॥ ३० ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे यत्‍नशिकवणनाम समास नववा ॥

 

 

समास दहावा : उत्तमपुरुषह्निरूपण

॥ श्रीराम ॥

आपण येथेष्ट जेवणें । उरलें तें अन्न वाटणें ।

परंतु वाया दवडणें । हा धर्म नव्हे ॥ १ ॥

तैसें ज्ञानें तृप्त व्हावें। तेंचि ज्ञान जनास सांगावें ।

तरतेन बुडों नेदावें । बुडतयासी ॥ २ ॥

उत्तम गुण स्वयें घ्यावे । ते बहुतांस सांगावे ।

वर्तल्याविण बोलावे । ते शब्द मिथ्या ॥ ३ ॥

स्नान संध्या देवार्चन । येकाग्र करावें जपध्यान ।

हरिकथा निरूपण । केलें पाहिजे ॥ ४ ॥

शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें ।

उणें पडों नेदावें । कोणियेकाचें ॥ ५ ॥

आडले जाकसलें जाणावें । यथानशक्ति कामास यावें ।

मृदवचनें बोलत जावें । कोणीयेकासी ॥ ६ ॥

दुसयाच्या दुःखें दुःखवावें । परसंतोषें सुखी व्हावें ।

प्राणीमात्रास मेळऊन घ्यावें । बया शब्दें ॥ ७ ॥

बहुतांचे अन्याये क्ष्मावे । बहुतांचे कार्यभाग करावे ।

आपल्यापरीस व्हावे । पारखे जन ॥८ ॥

दुसयाचें अंतरजाणावें । तदनुसारचि वर्तावें।

लोकांस परीक्षित जावें । नाना प्रकारें ॥ ९ ॥

नेमकचि बोलावें । तत्काळचि प्रतिवचन द्यावें ।

कदापी रागास न यावें । क्ष्मारूपें ॥ १० ॥

आलस्य अवघाच दवडावा । येत्‍न उदंडचि करावा ।

शब्दमत्सर न करावा । कोणीयेकाचा ॥ ११ ॥

उत्तम पदार्थ दुसयास द्यावा । शब्द निवडून बोलावा ।

सावधपणें करीत जावा । संसार आपला ॥ १२ ॥

मरणाचें स्मरण असावें । हरिभक्तीस सादर व्हावें ।

मरोन कीर्तीस उरवावें । येणें प्रकारें ॥ १३ ॥

नेमकपणें वर्तों लागला । तो बहुतांस कळों आला ।

सर्व आर्जवी तयाला । काये उणें ॥१४ ॥

ऐसा उत्तम गुणी विशेष । तयास म्हणावें पुरुष ।

जयाच्या भजनें जगदीश । तृप्त होये ॥ १५ ॥

उदंड धिःकारून बोलती । तरी चळों नेदावी शांति ।

दुर्जनास मिळोन जाती । धन्य ते साधु ॥ १६ ॥

उत्तम गुणीं श्रृंघारला । ज्ञानवैराग्यें शोभला ।

तोची येक जाणावा भला । भूमंडळीं ॥ १७ ॥

स्वयें आपण कष्टावें । बहुतांचें सोसित जावें ।

झिजोन कीर्तीस उरवावें । नाना प्रकारें ॥ १८ ॥

कीर्ती पाहों जातां सुख नाहीं । सुख पाहातां कीर्ती नाहीं ।

विचारेंविण कोठेंचि नाहीं । सामाधान ॥ १९ ॥

परांतरास न लावावा ढका । कदापि पडों नेदावा चुका ।

स्मासीळ तयाच्या तुका । हानी नाहीं ॥ २० ॥

आपलें अथवा परावें । कार्य अवघेंच करावें ।

प्रसंगीं कामास चुकवावें । हें विहित नव्हे ॥ २१ ॥

बरें बोलतां सुख वाटतें । हें तों प्रत्यक्ष कळतें ।

आत्मवत परावें तें । मानीत जावें ॥ २२ ॥

कठिण शब्दें वाईट वाटतें । तें तों प्रत्ययास येतें ।

तरी मग वाईट बोलावें तें । काये निमित्य ॥ २३ ॥

आपणास चिमोट घेतला । तेणें कासाविस जाला ।

आपणावरून दुसयाला । राखत जावें ॥ २४ ॥

जे दुसयास दुःख करी । ते अपवित्र वैखरी ।

आपणास घात करी । कोणियेके प्रसंगीं ॥ २५ ॥

पेरिलें ते उगवतें । बोलण्यासारिखें उत्तर येतें ।

तरी मग कर्कश बोलावें तें । काये निमित्य ॥ २६ ॥

आपल्या पुरुषार्थवैभवें । बहुतांस सुखी करावें ।

परंतु कष्टी करावें । हे राक्षेसी क्रिया ॥ २७ ॥

दंभ दर्प अभिमान । क्रोध आणी कठिण वचन ।

हें अज्ञानाचें लक्षण । भगवद्‍गीतेंत बोलिलें ॥ २८ ॥

जो उत्तम गुणें शोभला । तोचि पुरुष माहा भला ।

कित्येक लोक तयाला । शोधीत फिरती ॥ २९ ॥

क्रियेविण शब्दज्ञान । तेंचि स्वानाचें वमन ।

भले तेथें अवलोकन । कदापी न करिती ॥ ३० ॥

मनापासून भक्ति करणें । उत्तम गुण अगत्य धरणें ।

तया माहांपुरुषाकारणें । धुंडीत येती ॥ ३१ ॥

ऐसा जो माहानुभाव। तेणें करावा समुदाव ।

भक्तियोगें देवाधिदेव । आपुला करावा ॥ ३२ ॥

आपण आवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें ।

याकारणें भजनास लावावे । बहुत लोक ॥ ३३ ॥

आमची प्रतिज्ञा ऐसी । कांहीं न मागावें शिष्यासी ।

आपणामागें जगदीशासी । भजत जावें ॥ ३४ ॥

याकारणें समुदाव । जाला पाहिजे मोहोछाव ।

हातोहातीं देवाधिदेव । वोळेसा करावा ॥ ३५ ॥

आता समुदायाकारणें । पाहिजेती दोनी लक्षणें ।

श्रोतीं येथें सावधपणें । मन घालावें ॥ ३६ ॥

जेणें बहुतांस घडे भक्ति । ते हे रोकडी प्रबोधशक्ति ।

बहुतांचें मनोगत हातीं । घेतलें पाहिजे ॥ ३७ ॥

मागा बोलिले उत्तम गुण । तयास मानिती प्रमाण ।

प्रबोधशक्तीचें लक्षण । पुढें चाले ॥ ३८ ॥

बोलण्यासारिखें चालणें । स्वयें करून बोलणें ।

तयाचीं वचनें प्रमाणें । मानिती जनीं ॥ ३९ ॥

जें जें जनास मानेना । तें तें जनहि मानीना ।

आपण येकला जन नाना । सृष्टिमधें ॥ ४० ॥

म्हणोन सांगाती असावे । मानत मानत शिकवावे ।

हळु हळु सेवटा न्यावे । विवेकानें ॥ ४१ ॥

परंतु हे विवेकाचीं कामें । विवेकी करील नेमें ।

इतर ते बापुडे भ्रमें । भांडोंच लागले ॥ ४२ ॥

बहुतांसीं भांडतां येकला । शैन्यावांचून पुरवला ।

याकारणें बहुतांला । राजी राखावें ॥ ४३ ॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरूपणनाम समास दहावा ॥

॥ दशक बारावा समाप्त ॥

दशक १३ वा -->