संतसाहित्य

Navigation

दशक ७ वा


दशक ६ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥  चौदा ब्रह्मांचा दशक सातवा  ॥ 

 

॥ सप्तम दशक ॥

समास पहिला : मंगलाचरण

॥ श्रीराम ॥

विद्यावंतांचा पूर्वजू । गजानन एकद्विजू ।

त्रिनयन चतुर्भुजू । परशुपाणि ॥ १॥

कुबेरापासून अर्थ । वेदांपासून परमार्थ ।

लक्ष्मीपासून समर्थ । भाग्यासी आले ॥ २॥

तैशी मंगळमूर्ती आद्या । तियेपासून झाल्या सकळ विद्या ।

तेणें कवि लाघवगद्या । सत्पात्रें जाहलीं ॥ ३॥

जैशीं समर्थाचीं लेकुरें । नाना अलंकारीं सुंदरें ।

मूळपुरुषाचेनि द्वारें । तैसे कवी ॥ ४॥

नमूं ऐशिया गणेंद्रा । विद्याप्रकाशपूर्णचंद्रा ।

जयाचेनि बोधसमुद्रा । भरतें दाटे बळें ॥ ५॥

जो कर्तृत्वास आरंभ । मूळपुरुष मूळारंभ ।

जो परात्पर स्वयंभ । आदि अंतीं ॥ ६॥

तयापासून प्रमदा । इच्छाकुमारी शारदा ।

आदित्यापासून गोदा । मृगजळ वाहे ॥ ७॥

जे मिथ्या म्हणतांच गोंवी । मायिकपणें लाघवी ।

वक्तयास वेढा लावी । वेगळेपणें ॥ ८॥

जे द्वैताची जननी । कीं ते अद्वैताची खाणी ।

मूळमाया गवसणी । अनंत ब्रह्मांडांची ॥ ९॥

कीं ते अवडंबरी वल्ली । अनंत ब्रह्मांडें लगडली ।

मूळपुरुषाची माउली । दुहितारूपें ॥ १० ।

वंदूं ऐशी वेदमाता । आदिपुरुषाची जे सत्ता ।

आतां आठवीन समर्था । सद्गुरूसी ॥ ११॥

जयाचेनि कृपादृष्टी । होय आनंदाची वृष्टी ।

तेणें गुणें सर्व सृष्टी । आनंदमय ॥ १२॥

कीं तो आनंदाचा जनक । सायुज्यमुक्तीचा नायक ।

कैवल्यपददायक । अनाथबन्धू ॥ १३॥

मुमुक्षचातकीं सुस्वर । करुणां पाहिजे अंबर ।

वोळे कृपेचा जलधर । साधकांवरी ॥ १४॥

कीं तें भवार्णवींचें तारूं । बोधें पाववी पैलपारू ।

महाआवर्तीं आधारू । भाविकांसी ॥ १५॥

कीं तो काळाचा नियंता । नाना संकटीं सोडविता ।

कीं ते भाविकाची माता । परम स्नेहाळ ॥ १६॥

कीं तो परत्रींचा आधारू । कीं तो विश्रांतीचा थारू ।

नातरी सुखाचें माहेरू । सुखरूप ॥ १७॥

ऐसा सद्गुरु पूर्णपणीं । तुटे भेदाची कडसणी ।

देहेंविण लोटांगणीं । तया प्रभूसी ॥ १८॥

साधु संत आणि सज्जन । वंदूनियां श्रोतेजन ।

आतां कथानुसंधान । सावध ऐका ॥ १९॥

संसार हाचि दीर्घ स्वप्न । लोभें वोसणती जन ।

माझी कांता माझें धन । कन्या पुत्र माझे ॥ २०॥

ज्ञानसूर्य मावळला । तेणें प्रकाश लोपला ।

अंधकारें पूर्ण झाला । ब्रह्मगोळ अवघा ॥ २१॥

नाहीं सत्वाचें चांदणें । कांहीं मार्ग दिसे जेणें ।

सर्व भ्रांतीचेनि गुणें । आपेंआप न दिसे ॥ २२॥

देहबुद्धि‍अहंकारे । निजले घोरती घोरे ।

दुःखें आक्रंदती थोरे । विषयसुखाकारणें ॥ २३॥

निजले असतांचि मेले । पुनः उपजतांच निजले ।

ऐसे आले आणि गेले । बहुत लोक ॥ २४॥

निदसुरेपणेंचि सैरावैरा । बहुतीं केल्या येरझारा ।

नेणोनियां परमेश्वरा । भोगिले कष्ट ॥ २५॥

त्या कष्टांचें निरसन । व्हावया पाहिजे आत्मज्ञान ।

म्हणोनि हें निरूपण । अध्यात्मग्रंथीं ॥ २६॥

सकळ विद्यामध्यें सार । अध्यात्मविद्येचा विचार ।

दशमाध्यायीं शार्ङ्गधर । भगवद्गीतेंत बोलिला ॥ २७॥

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥

याकारणें अद्वैतग्रंथ । अध्यात्मविद्येचा परमार्थ ।

पावावया तोचि समर्थ । जो सर्वांगें श्रोता ॥ २८॥

जयाचें चंचळ हृदय । तेणें ग्रंथ सोडूंचि नये ।

सोडितां अलभ्य होय । अर्थ येथींचा ॥ २९॥

जयास जोडला परमार्थ । तेणें पहावा हा ग्रंथ ।

अर्थ शोधितां परमार्थ । निश्चयो बाणे ॥ ३०॥

जयास नाहीं परमार्थ । तयास न कळे येथींचा अर्थ ।

नेत्रेंविण निधानस्वार्थ । अंधास न कळे ॥ ३१॥

एक म्हणती मराठें काये । हें तों भल्यानें ऐकों नये ।

तीं मूर्खें नेणती सोयें । अर्थान्वयांची ॥ ३२॥

लोहाची मांदूस केली । नाना रत्नें सांठविलीं ।

तीं अभाग्यानें त्यागिलीं । लोखंड म्हणोनि ॥ ३३॥

तैशी भाषा प्राकृत । अर्थ वेदांत आणि सिद्धांत ।

नेणोनि त्यागिती भ्रांत । मंदबुद्धीस्तव ॥ ३४॥

अहाच सांपडतां धन । त्याग करणें मूर्खपण ।

द्रव्य घ्यावें सांठवण । पाहोंचि नये ॥ ३५॥

परिस देखिला अंगणीं । मार्गीं सांपडला चिंतामणी ।

अव्हा वेल महागुणी । कूपामध्यें ॥ ३६॥

तैसें प्राकृतीं अद्वैत । सुगम आणि सप्रचीत ।

अध्यात्म लाभे अकस्मात । तरी अवश्य घ्यावें ॥ ३७॥

न करितां व्युत्पत्तीचा श्रम । सकळ शास्त्रार्थ होय सुगम ।

सत्समागमाचें वर्म । तें हें ऐसें असे ॥ ३८॥

जें व्युत्पत्तीनें न कळे । तें सत्समागमें कळे ।

सकळ शास्त्रार्थ आकळे । स्वानुभवासी ॥ ३९॥

म्हणोनि कारण सत्समागम । तेथें नलगे व्युत्पत्तिश्रम ।

जन्मसार्थकाचें वर्म । वेगळेंचि असे ॥ ४०॥

भाषाभेदाश्च वर्तन्ते अर्थ एको न संशयः ।

पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते ॥ १॥

भाषापालटें कांहीं । अर्थ वाया जात नाहीं ।

कार्यसिद्धि ते सर्वही । अर्थाचपासीं ॥ ४१॥

तथापि प्राकृताकरितां । संस्कृताची सार्थकता ।

येर्ह्हव्हीं त्या गुप्तार्था । कोण जाणे ॥ ४२॥

आतां असो हें बोलणें । भाषा त्यागून अर्थ घेणें ।

उत्तम घेऊन त्याग करणें । सालीटरफलांचा ॥ ४३॥

अर्थ सार भाषा पोंचट । अभिमानें करवी खटपट ।

नाना अहंतेनें वाट । रोधिली मोक्षाची ॥ ४४॥

शोध घेतां लक्ष्यांशाचा । तेथें आधीं वाच्यांश कैंचा ।

अगाध महिमा भगवंताचा । कळला पाहिजे ॥ ४५॥

मुकेपणाचें बोलणें । हें जयाचें तोचि जाणें ।

स्वानुभवाचिये खुणें । स्वानुभवी पाहिजे ॥ ४६॥

अर्थ जाणे अध्यात्माचा । ऐसा श्रोता मिळेल कैंचा ।

जयासि बोलतां वाचेचा । हव्यासचि पुरे ॥ ४७॥

परीक्षावंतापुढें रत्न । ठेवितां होय समाधान ।

तैसें ज्ञानियापुढें ज्ञान । बोलावें वाटे ॥ ४८॥

मायाजाळें दुश्चित होय । तें निरूपणें कामा नये ।

संसारिका कळे काय । अर्थ येथींचा ॥ ४९॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन ।

बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो । अव्यवसायिनाम् ॥ १॥

व्यवसायी जो मळिण । त्यासि न कळे निरूपण ।

येथें पाहिजे सावधपण । अतिशयेंसीं ॥ ५०॥

नाना रत्नें नाना नाणीं । दुश्चितपणें घेतां हानी ।

परीक्षा नेणतां प्राणी । ठकला तेथें ॥ ५१॥

तैसें निरूपणीं जाणा । आहाच पाहतां कळेना ।

मराठेंचि उमजेना । कांहीं केल्या ॥ ५२॥

जेथें निरूपणाचे बोल । आणि अनुभवाची ओल ।

ते संस्कृतापरी सखोल । अध्यात्मश्रवण ॥ ५३॥

माया ब्रह्म वोळखावें । तयास अध्यात्म म्हणावें ।

तरी तें मायेचें जाणावें । स्वरूप आधीं ॥ ५४॥

माया सगुण साकार । माया सर्व विकार ।

माया जाणिजे विस्तार । पंचभूतांचा ॥ ५५॥

माया दृश्य दृष्टीस दिसे । मायाभास मनास भासे ।

माया क्षणभंगुर नासे । विवेकें पाहतां ॥ ५६॥

माया अनेक विश्वरूप । माया विष्णूचें स्वरूप ।

मायेची सीमा अमूप । बोलिजे तितुकी थोडी ॥ ५७॥

माया बहुरूप बहुरंग । माया ईश्वराचा संग ।

माया पाहतां अभंग । अखिल वाटे ॥ ५८॥

माया सृष्टीची रचना । माया आपली कल्पना ।

माया तोडितां तुटेना । ज्ञानेंविण ॥ ५९॥

ऐशी माया निरूपिली । स्वल्प संकेतें बोलिली ।

पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ६०॥

पुढें ब्रह्मनिरूपण । निरूपिलें ब्रह्मज्ञान ।

जेणें तुटे मायाभान । एकसरें ॥ ६१॥

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके मंगलाचरणनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥

 

 

 

जय जय रघुवीर समर्थ ॥

समास दुसरा : ब्रह्मनिरूपण

श्रीराम ॥

ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निराकार ।

ब्रह्मास नाहीं पारावार । बोलती साधू ॥ १॥

ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं एक ।

ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ २॥

ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत ।

ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३॥

ब्रह्म दृश्यावेगळें । ब्रह्म शून्यत्वानिराळें ।

ब्रह्म इन्द्रियांच्या मेळें । चोजवेना ॥ ४॥

ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खास असेना ।

ब्रह्म सद्गुरुविण येइना । अनुभवासी ॥ ५॥

ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्मा ऐसें नाहीं सार ।

ब्रह्म सूक्ष्म अगोचर । ब्रह्मादिकांसी ॥ ६॥

ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें । बोलिजे त्याहूनि अनारिसें ।

परी तें श्रवण‍अभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७॥

ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत ।

ब्रह्मास हे दृष्टांत । देतां न शोभती ॥ ८॥

ब्रह्मासारिखें दुसरें । पाहतां काय आहे खरें ।

ब्रह्मीं दृष्टांत‍उत्तरें । कदा न साहती ॥ ९॥

यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥

जेथें वाचा निवर्तती । मनास नाहीं ब्रह्मप्राप्ती ।

ऐसें बोलिती श्रुती । सिद्धांतवचन ॥ १०॥

कल्पनारूप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं ।

म्हणोनि हें वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११॥

आतां मनासि जें अप्राप्त । तें कैसेनि होईल प्राप्त ।

ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥ १२॥

भांडारगृहें भरलीं । परी असती आडकलीं ।

हातास न येतां किल्ली । सर्वही अप्राप्त ॥ १३॥

तरी ते किल्ली कवण । मज करावी निरूपण ।

ऐसी श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४॥

सद्गुरुकृपा तेचि किल्ली । जेणें बुद्धी प्रकाशली ।

द्वैतकपाटें उघडलीं । एकसरां ॥ १५॥

तेथें सुख असे वाड । नाहीं मनासी पवाड ।

मनेंविण कैवाड । साधनांचा ॥ १६॥

त्याची मनाविण प्राप्ती । कीं वासनेविण तृप्ती ।

तेथें न चले व्युत्पत्ती । कल्पनेची ॥ १७॥

तें परेहुनी पर । मनबुद्धि‍अगोचर ।

संग सोडितां सत्वर । पाविजे तें ॥ १८॥

संग सोडावा आपुला । मग पहावें तयाला ।

अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ १९॥

आपण म्हणजे मीपण । मीपण म्हणजे जीवपण ।

जीवपण म्हणजे अज्ञान । संग जडला ॥ २०॥

सोडितां तया संगासी । ऐक्य होय निःसंगासी ।

कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१॥

मी कोण ऐसें नेणिजे । तया नांव अज्ञान बोलिजे ।

अज्ञान गेलिया पाविजे । परब्रह्म तें ॥ २२॥

देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं न चले जाण ।

तेथें होतसे निर्वाण । अहंभावासी ॥ २३॥

ऊंच नीच नाहीं परी । रायारंका एकच सरी ।

झाला पुरुष अथवा नारी । तरी एकचि पद ॥ २४॥

ब्राह्मणांचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें ओंवळें ।

ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५॥

ऊंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी ।

ऐसा भेद तयापाशीं । मुळींच नाहीं ॥ २६॥

सकळांस मिळोन ब्रह्म एक । तेथें नाहीं अनेक ।

रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥ २७॥

स्वर्ग मृत्यु आणि पाताळ । तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ ।

सकळांसि मिळोनि एकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८॥

गुरुशिष्यां एकचि पद । तेथें नाहीं भेदाभेद ।

परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९॥

देहबुद्धीच्या अंतीं । सकळांसि एकचि प्राप्ती ।

एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतीचें वचन ॥ ३०॥

साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले ।

अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ३१ ।

ब्रह्म नाहीं नवें जुनें । ब्रह्म नाहीं अधिक उणें ।

उणें भावील तें सुणें । देहबुद्धीचें ॥ ३२॥

देहबुद्धीचा संशयो । करी समाधानाचा क्षयो ।

चुके समाधानसमयो । देहबुद्धियोगें ॥ ३३॥

देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण ।

मिथ्या जाणोन विचक्षण । निंदिती देह ॥ ३४॥

देह पावे जंवरी मरण । तंवरी धरी देहाभिमान ।

पुन्हा दाखवी पुनरागमन । देहबुद्धि मागुती ॥ ३५॥

देहाचेनि थोरपणें । समाधानासि आणिलें उणें ।

देह पडेल कोण्या गुणें । हेंही कळेना ॥ ३६॥

हित आहे देहातीत । म्हणोनि निरूपिती संत ।

देहबुद्धीनें अनहित । हो)ऊंचि लागे ॥ ३७॥

सामर्थ्यबळें देहबुद्धि । योगियांस तेही बाधी ।

देहबुद्धीची उपाधी । पैसावों लागे ॥ ३८॥

म्हणोनि देहबुद्धि झडे । तरीच परमार्थ घडे ।

देहबुद्धीनें बिघडे । ऐक्यता ब्रह्मींची ॥ ३९॥

विवेक वस्तूकडे ओढी । देहबुद्धि तेथूनि पाडी ।

अहंता लावूनि निवडी । वेगळेपणें ॥ ४०॥

विचक्षणें याकारणें । देहबुद्धि त्यजावी श्रवणें ।

सत्य ब्रह्मीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१॥

सत्य ब्रह्म तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न ।

प्रत्युत्तर दे आपण । वक्ता श्रोतयासी ॥ ४२॥

म्हणे ब्रह्म एकचि असे । परी तें बहुविध भासे ।

अनुभव देहीं अनारिसे । नाना मतीं ॥ ४३॥

जें जें जया अनुभवलें । तेंचि तयासी मानलें ।

तेथेंचि त्याचें विश्वासलें । अंतःकरण ॥ ४४॥

ब्रह्म नामरूपातीत । असोनि नामें बहुत ।

निर्मळ निश्चळ निवांत । निजानन्द ॥ ४५॥

अरूप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपरंपार ।

अदृश्य अतर्क्य अपार । ऐशीं नामें ॥ ४६॥

नादरूप ज्योतिरूप । चैतन्यरूप सत्तारूप ।

स्वस्वरूप साक्षरूप । ऐशीं नामें ॥ ४७॥

शून्य आणि सनातन । सर्वेश्वर आणि सर्वज्ञ ।

सर्वात्मा जगज्जीवन । ऐशीं नामें ॥ ४८॥

सहज आणि सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत ।

शाश्वत आणि शब्दातीत । ऐशीं नामें ॥ ४९॥

विशाळ विस्तीर्ण विश्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार ।

आत्मा परमात्मा परमेश्वर । ऐशीं नामें ॥ ५०॥

परमात्मा ज्ञानघन । एकरूप पुरातन ।

चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्याचीं ॥ ५१॥

ऐशीं नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत ।

त्याचा करावया निश्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२॥

तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम ।

तें एकचि परब्रह्म । दुसरें नाहीं ॥ ५३॥

तेंचि कळावयाकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें ।

सांगिजेती तेणें श्रवणें । निश्चयो बाणे ॥ ५४॥

खोटें निवडितां एकसरें । उरलें तें जाणिजे खरें ।

चौदा ब्रह्में शास्त्राधारें । बोलिजेती ॥ ५५॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके ब्रह्मनिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥

 

 

समास तीसरा : चतुर्दश ब्रह्मनिरूपण

श्रीराम ॥

श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों ब्रह्मज्ञान ।

जेणें होये समाधान । साधकांचें ॥ १॥

रत्नें साधाया कारणें । मृत्तिका लागे एकवटणें ।

चौदा ब्रह्मांचीं लक्षणें । जाणिजे तैसीं ॥ २॥

पदार्थेंविण संकेत । द्वैतावेगळा दृष्टांत ।

पूर्वपक्षेंविण सिद्धांत । बोलतांचि नये ॥ ३॥

आधीं मिथ्या उभारावें । मग तें ओळखोन सांडावें ।

पुढें सत्य तें स्वभावें । अंतरीं बाणे ॥ ४॥

म्हणोन चौदा ब्रह्मांचा संकेत । बोलिला कळावया सिद्धांत ।

येथें श्रोतीं सावचित्त । क्षण एक असावें ॥ ५॥

पहिलें तें शब्दब्रह्म । दुजें ओमित्येकाक्षरं ब्रह्म ।

तिसरें खंब्रह्म । बोलिली श्रुती ॥ ६॥

चौथें जाण सर्वब्रह्म । पांचवें चैतन्यब्रह्म ।

सहावें सत्ताब्रह्म । साक्षिब्रह्म सातवें ॥ ७॥

आठवें सगुणब्रह्म । नववें निर्गुण ब्रह्म ।

दहावें वाच्यब्रह्म । जाणावें पैं ॥ ८॥

अनुभव तें अकरावें । आनंदब्रह्म तें बारावें ।

तदाकार तें तेरावें । चौदावें अनिर्वाच्य ॥ ९॥

ऐशीं हीं चौदा ब्रह्में । यांचीं निरूपिलीं नामें ।

आतां स्वरूपांचीं वर्में । संकेतें दावूं ॥ १०॥

अनुभवेंविण भ्रम । या नां शब्दब्रह्म ।

आतां ओमित्येकाक्षरं ब्रह्म । तें एकाक्षर ॥ ११॥

खं शब्दें आकाशब्रह्म । महदाकाश व्यापक ब्रह्म ।

आतां बोलिजेल सूक्ष्म ब्रह्म । सर्वब्रह्म ॥ १२॥

पंचभूतांचें कुवाडें । जें जें तत्त्व दृष्टीस पडे ।

तें तें ब्रह्मचि रोकडें । बोलिजेत आहे ॥ १३॥

या नांव सर्वब्रह्म । श्रुतिआश्रयाचें वर्म ।

आतां चैतन्यब्रह्म । बोलिजेल ॥ १४॥

पंचभूतादि मायेतें । चैतन्यचि चेतवितें ।

म्हणोनियां चैतन्यातें । चैतन्यब्रह्म बोलिजे ॥ १६॥

चैतन्यास ज्याची सत्ता । तें सत्ताब्रह्म तत्त्वतां ।

तये सत्तेस जाणता । या नांव साक्षिब्रह्म ॥ १७॥

साक्षित्व जयापासूनी । तेंहीं आकळिलें गुणीं ।

सगुणब्रह्म हे वाणी । तयासि वदे ॥ १८॥

जेथें नाहीं गुणवार्ता । तें निर्गुणब्रह्म तत्त्वतां ।

वाच्यब्रह्म तेंही आतां । बोलिजेल ॥ १९॥

या नांव अनुभवब्रह्म । आनंदवृत्तीचा धर्म ।

परंतु याचेंही वर्म । बोलवेना ॥ २०॥

ऐसें हें ब्रह्म आनंद । तदाकार तें अभेद ।

अनिर्वाच्य संवाद । तुटोनि गेला ॥ २१॥

ऐशीं हीं चौदा ब्रह्में । निरूपिलीं अनुक्रमें ।

साधकें पाहतां भ्रमें । बाधिजेना ॥ २२॥

ब्रह्म जाणावें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।

चौदा ब्रह्मांचा सिद्धांत । होईल आतां ॥ २३॥

शब्दब्रह्म तें शाब्दिक । अनुभवेंविण मायिक ।

शाश्वताचा विवेक । तेथें नाहीं ॥ २४॥

जेथें क्षर ना अक्षर । तेथें कैंचें ओमित्येकाक्षर ।

शाश्वताचा विचार । तेथें न दिसे ॥ २५॥

खंब्रह्म ऐसें वचन । तरी शून्यातें नाशी ज्ञान ।

शाश्वताचें अधिष्ठान । तेथें न दिसे ॥ २६॥

सर्वत्रांस होतो अंत । हें तों प्रगटचि दिसत ।

प्रळय बोलिला निश्चित । वेदांतशास्त्रीं ॥ २७॥

ब्रह्मप्रळय मांडेल जेथें । भूतान्वय कैंचा तेथें ।

म्हणोनिअ सर्वब्रह्मातें । नाश आहे ॥ २८॥

अचळासी आणी चळण । निर्गुणास लावितां गुण ।

आकारास विचक्षण । मानीतना ॥ २९॥

जें निर्माण पंचभूत । तें प्रत्यक्ष नाशवंत ।

सर्वब्रह्म हे मात । घडे केंवीं ॥ ३०॥

असो आतां हें बहुत । सर्वब्रह्म नाशवंत ।

वेगळेपणास अंत । पाहणें कैंचें ॥ ३१॥

आतां जयास चेतवावें । तेंचि मायिक स्वभावें ।

तेथें चैतन्याच्या नांवें । नाश आला ॥ ३२॥

परिवारेंविण सत्ता । ते सत्ता नव्हे तत्त्वतां ।

पदार्थेंविण साक्षता । तेही मिथ्या ॥ ३३॥

सगुणास नाश आहे । प्रत्यक्षास प्रमाण काये ।

सगुणब्रह्म निश्चयें । नाशवंत ॥ ३४॥

निर्गुण ऐसें जें नांव । त्या नांवास कैंचा ठाव ।

गुणेंवीण गौरव । येईल कैंचें ॥ ३५॥

माया जैसें मृगजळ । ऐसें बोलती सकळ ।

कां तें कल्पनेचें आभाळ । नाथिलेंचि ॥ ३६॥

ग्रामो नास्ति कुतः सीमा । जन्मेंविण जीवात्मा ।

अद्वैतासी उपमा । द्वैताची असे ॥ ३७॥

मायेविरहित सत्ता । पदार्थाविण जाणता ।

अविद्येविण चैतन्यता । कोणास आली ॥ ३८॥

सत्ता चैतन्यता साक्षी । सर्वही गुणांचिये पाशीं ।

ठायींचें निर्गुण त्यासीं । गुण कैंचें ॥ ३९॥

ऐसें जें गुणरहित । तेथें नामाचा संकेत ।

तोचि जाणावा अशाश्वत । निश्चयेंसीं ॥ ४०॥

निर्गुण ब्रह्मासी संकेतें । नामें ठेविलीं बहुतें ।

तें वाच्यब्रह्म त्यातें । नाश आहे ॥ ४१॥

आनंदाचा अनुभव । हाही वृत्तीचाच भाव ।

तदाकारीं ठाव । वृत्तीस नाहीं ॥ ४२॥

अनिर्वाच्य याकारणें । संकेतवृत्तीच्या गुणें ।

तया संकेतास उणें । निवृत्तीनें आणिलें ॥ ४३॥

अनिर्वाच्य ते निवृत्ती । तेचि उन्मनीची स्थिती ।

निरुपाधि विश्रांती । योगियांची ॥ ४४॥

वस्तु जे कां निरुपाधी । तेचि सहज समाधी ।

जेणें तुटे आधिव्याधी । भवदुःखाची ॥ ४५॥

जो उपाधीचा अंत । तोचि जाणावा सिद्धांत ।

सिद्धांत आणि वेदांत । धादांत आत्मा ॥ ४६॥

असो ऐसें जें शाश्वत ब्रह्म । जेथें नाहीं मायाभ्रम ।

अनुभवी जाणे वर्म । स्वानुभवें ॥ ४७॥

आपुलेनि अनुभवें । कल्पनेसि मोडावें ।

मग सुकाळीं पडावें । अनुभवाचे ॥ ४८॥

निर्विकल्पासि कल्पावें । कल्पना मोडे स्वभावें ।

मग नसोनि असावें । कल्पकोटी ॥ ४९॥

कल्पनेचें एक बरें । मोहरितांच मोहरे ।

स्वरूपीं घालितां भरे । निर्विकल्पीं ॥ ५०॥

निर्विकल्पास कल्पितां । कल्पनेचि नुरे वार्ता ।

निःसंगास भेटों जातां । निःसंग होइजे ॥ ५१॥

पदार्था ऐसें ब्रह्म नव्हे । मा तें हातीं धरूनि द्यावें ।

असो हें अनुभवावें । सद्‍गुरुमुखें ॥ ५२॥

पुढें कथेच्या अन्वयें । केलाचि करूं निश्चये ।

जेणें अनुभवास ये । केवळ ब्रह्म ॥ ५३॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके चतुर्दशब्रह्मनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥

 

 

 

समास चवथा : विमलब्रह्मनिरूपण

श्रीराम ॥

ब्रह्म नभाहूनि निर्मळ । पाहतां तैसेंचि पोकळ ।

अरूप आणि विशाळ । मर्यादेवेगळें ॥ १॥

एकवीस स्वर्गें सप्त पाताळ । मिळोन एक ब्रह्मगोळ ।

ऐसें अनंत तें निर्मळ । व्यापून असे ॥ २॥

अनंत ब्रह्मांडांखालतें । अनंत ब्रह्मांडांवरुतें ।

तेणेंविण स्थळ रितें । अणुमात्र नाहीं ॥ ३॥

जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं । ऐशी वदे लोकवाणी ।

तेणेंविण रिता प्राणी । एकही नाहीं ॥ ४॥

जळचरां जैसें जळ । बाह्य अभ्यंतरीं निखळ ।

तैसें ब्रह्म हें केवळ । जीवमात्रासी ॥ ५॥

जळावेगळा ठाव आहे । ब्रह्माबाहेरी जातां न ये ।

म्हणोनि उपमा न साहे । जळाची तया ॥ ६॥

आकाशाबाहेरी पळों जातां । पुढें आकाशचि तत्त्वतां ।

तैसा तया अनंता । अंतचि नाहीं ॥ ७॥

परी जें अखंड भेटलें । सर्वांगास लिगडिलें ।

अति निकट परी चोरलें । सकळांसि जें ॥ ८॥

तयामध्येंचि असिजे । परी तयासी नेणिजे ।

उपजे भास नुपजे । परब्रह्म तें ॥ ९॥

आकाशामध्यें आभाळ । तेणें आकाश वाटे डहुळ ।

परी तें मिथ्या निवळ । आकाशचि असे ॥ १०॥

नेहार देतां आकाशीं । चक्रें दिसती डोळ्यांसी ।

तैसें दृश्य ज्ञानियांसी । मिथ्यारूप ॥ ११॥

मिथ्याचि परी आभासे । निद्रितांसी स्वप्न जैसें ।

जागा झालिया आपैसें । बुझों लागे ॥ १२॥

तैसें आपुलेनि अनुभवें । ज्ञानें जागृतीस यावें ।

मग मायिक स्वभावें । कळों लागे ॥ १३॥

आतां असो हें कुवाडें । जें ब्रह्मांडापैलीकडे ।

तेंचि आतां निवाडें । उमजोन दावूं ॥ १४॥

ब्रह्म ब्रह्मांडीं कालवलें । पदार्थमात्रासि व्यापून ठेलें ।

सर्वांमध्यें विस्तारलें । अंशमात्रें ॥ १५॥

ब्रह्मामध्यें सृष्टी भासे । सृष्टीमध्यें ब्रह्म असे ।

अनुभव घेतां आभासे । अंशमात्रें ॥ १६॥

अंशमात्रें सृष्टीभीतरीं । बाहेरी मर्यादा कोण करी ।

सगळें ब्रह्म ब्रह्मांडोदरीं । मा‍ईल कैसें ॥ १७॥

अमृतीमध्यें आकाश । सगळें सांठवतां प्रयास ।

म्हणोन तयाचा अंश । बोलिजे तो ॥ १८॥

ब्रह्म तैसें कालवलें । परी तें नाहीं हालवलें ।

सर्वांत परी संचलें । संचलेपणें ॥ १९॥

पंचभूतीं असे मिश्रित । परंतु तें पंचभूतातीत ।

पंकीं आकाशीं अलिप्त । असोनि जैसें ॥ २०॥

ब्रह्मास दृष्टांत न घडे । बुझावया देणें घडे ।

परी दृष्टांतीं साहित्य पडे । विचारितां आकाश ॥ २१॥

खंब्रह्म ऐशी श्रुती । गगनसदृशं हे स्मृती ।

म्हणोन ब्रह्मास दृष्टांतीं । आकाश घडे ॥ २२॥

काळिमा नसतां पितळ । मग तें सोनेंचि केवळ ।

शून्यत्व नसतां निर्मळ । आकाश ब्रह्म ॥ २३॥

म्हणोन ब्रह्म जैसें गगन । आणि माया जैसा पवन ।

आढळे परी दर्शन । नव्हे त्याचें ॥ २४॥

शब्दसृष्टीची रचना । होत जात क्षणक्षणां ।

परंतु ते स्थिरावेना । वायूच ऐसी ॥ २५॥

असो ऐशी माया मायिक । शाश्वत तें ब्रह्म एक ।

पाहों जातां अनेक । व्यापून असे ॥ २६॥

पृथ्वीसि भेदूनि आहे । परी तें ब्रह्म कठिण नव्हे ।

दुजी उपमा न साहे । तया मृदुत्वासी ॥ २७॥

पृथ्वीहूनि मृदु जळ । जळाहूनि तो अनळ ।

अनळाहूनि कोमळ । वायु जाणावा ॥ २८॥

वायूहूनि तें गगन । अत्यंतचि मृदु जाण ।

गगनाहूनि मृदु पूर्ण । ब्रह्म जाणावें ॥ २९॥

वज्रास असे भेदिलें । परी मृदुत्व नाहीं गेलें ।

उपमेरहित संचलें । कठिण ना मृदु ॥ ३०॥

पृथ्वीमध्यें व्यापूनि असे । पृथ्वी नासे तें न नासे ।

जळ शोषे तें न शोषे । जळीं असोनी ॥ ३१॥

तेजीं असे परी जळेना । पवनीं असे तरी चळेना ।

गगनीं असे परी कळेना । परब्रह्म तें ॥ ३२॥

शरीरीं अवघें व्यापलें । परी तें नाहीं आढळलें ।

जवळीच दुरावलें । नवल कैसें ॥ ३३॥

सन्मुखचि चहूंकडे । तयामध्यें पाहणें घडे ।

बाह्याभ्यंतरीं रोकडें । सिद्धचि आहे ॥ ३४॥

तयांमध्येंचि आपण । आपणां सबाह्य तें जाण ।

दृश्या वेगळी खूण । गगनासारिखी ॥ ३५॥

कांहीं नाहींसें वाटलें । तेथेंचि तें कोंदाटलें ।

जैसें न दिसें आपुलें । आपणासि धन ॥ ३६॥

जो जो पदार्थ दृष्टीस पडे । तें त्या पदार्था पैलीकडे ।

अनुभवे हें कुवाडें । उकलावें ॥ ३७॥

मागें पुढें आकाश । पदार्थेंविण जो पैस ।

पृथ्वीविण भकाश । एकरूप ॥ ३८॥

जें जें रूप आणि नाम । तो तो नाथिलाचि भ्रम ।

नामरूपातीत वर्म । अनुभवी जाणती ॥ ३९॥

नभीं धूम्राचे डोंगर । उचलती थोर थोर ।

तैसें दावी वोडंबर । मायादेवी ॥ ४०॥

ऐशी माया अशाश्वत । ब्रह्म जाणावें शाश्वत ।

सर्वांठायीं सदोदित । भरलें असे ॥ ४१॥

पोथी वाचूं जातां पाहे । मातृकामध्यें भरलें आहे ।

नेत्रीं रिघोनियां राहे । मृदुपणें ॥ ४२॥

श्रवणें शब्द ऐकतां । मनें विचार पाहतां ।

मना सबाह्य तत्त्वतां । परब्रह्म तें ॥ ४३॥

चरणीं चालतां मार्गीं । जें आडळे सर्वांगीं ।

करें घेतां वस्तुलागीं । आडवें ब्रह्म ॥ ४४॥

असो इंद्रियसमुदाव । तयामध्यें वर्ते सर्व ।

जाणों जातां मोडे हांव । इंद्रियांची ॥ ४५॥

जें जवळीच असे । पांहों जातां न दिसे ।

न दिसोन वसे । कांहीं एक ॥ ४६॥

जें अनुभवेंचि जाणावें । सृष्टीचेनि अभावें ।

आपुलेनि स्वानुभवें । पाविजे ब्रह्म ॥ ४७॥

ज्ञानदृष्टीचें देखणें । चर्मदृष्टी पाहों नेणे ।

अंतरवृत्तीचिये खुणे । अंतरवृत्ति साक्ष ॥ ४८॥

जाणे ब्रह्म जाणे माया । जाणे अनुभवाच्या ठाया ।

ते येक जाणावी तुर्या । सर्वसाक्षिणी ॥ ४९॥

साक्षत्व वृत्तीचें कारण । उन्मनी ते निवृत्ति जाण ।

जेथें विरे जाणपण । विज्ञान तें ॥ ५०॥

जेथें अज्ञान सरे । ज्ञान तेंही नुरे ।

विज्ञानवृत्ति मुरे । परब्रह्मीं ॥ ५१॥

ऐसें ब्रह्म शाश्वत । जेथें कल्पनेसी अंत ।

योगिजना एकांत । अनुभवें जाणावा ॥ ५२॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके विमलब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥

 

 

 

समास पांचवा : द्वैतकल्पनानिरसन

श्रीराम ॥

केवळब्रह्म जें बोलिलें । तें अनुभवास आलें ।

आणि मायेचेंहि लागलें । अनुसंधान ॥ १॥

ब्रह्म अंतरीं प्रकाशे । आणि मायाही प्रत्यक्ष दिसे ।

आतां हें द्वैत निरसे । कवणेपरी ॥ २॥

तरी आतां सावधान । एकाग्र करूनियां मन ।

मायाब्रह्म हें कवण । जाणताहे ॥ ३॥

सत्य ब्रह्माचा संकल्प । मिथ्या मायेचा विकल्प ।

ऐशिया द्वैताचा जल्प । मनचि करी ॥ ४॥

जाणे ब्रह्म जाणे माया । ते येक जाणावी तुर्या ।

सर्व जाणे म्हणोनियां । सर्वसाक्षिणी ॥ ५॥

ऐक तुर्येचें लक्षण । जेथें सर्व जाणपण ।

सर्वचि नाहीं कवण । जाणेल गा ॥ ६॥

संकल्पविकल्पाची सृष्टी । जाली मनाचियें पोटीं ।

तें मनचि मिथ्या शेवटीं । साक्षी कवणु ॥ ७॥

साक्षत्व चैतन्यत्वसत्ता । हे गुण ब्रह्माचिया माथां ।

आरोपले जाण वृथा । मायागुणें ॥ ८॥

घटामठाचेनि गुणें । त्रिविधा आकाश हें बोलणें ।

मायेचेनि खरेंपणें । गुण ब्रह्मीं ॥ ९॥

जंव खरेपण मायेसी । तंवचि साक्षित्व ब्रह्मासी ।

माये‍अविद्येचे निरासीं । द्वैत कैंचें ॥ १०॥

म्हणोनि सर्वसाक्षी मन । तेंचि जालिया उन्मन ।

मग तुर्यारूप ज्ञान । तें मावळोन गेलें ॥ ११॥

जयास द्वैत भासलें । तें मन उन्मन झालें ।

द्वैता‍अद्वैतांचें तुटलें । अनुसंधान ॥ १२॥

एवं द्वैत आणि अद्वैत । होये वृत्तीचा संकेत ।

वृत्ति झालिया निर्वृत्त । द्वैत कैंचें ॥ १३॥

वृत्तिरहित जें ज्ञान । तेंचि पूर्ण समाधान ।

जेथें तुटे अनुसंधान । मायाब्रह्मींचें ॥ १४॥

मायाब्रह्म ऐसा हेत । मनें कल्पिला संकेत ।

ब्रह्म कल्पनेरहित । जाणती ज्ञानी ॥ १५॥

जें मनबुद्धि‍अगोचर । जें कल्पनेहून पर ।

तें अनुभवितां साचार । द्वैत कैंचें ॥ १६॥

द्वैत पाहतां ब्रह्म नसे । ब्रह्म पाहतां द्वैत नासे ।

द्वैताद्वैत भासे । कल्पनेसी ॥ १७॥

कल्पना माया निवारी । कल्पना ब्रह्म थावरी ।

संशय धरी आणि वारी । तेही कल्पना ॥ १८॥

कल्पना करी बंधन । कल्पना दे समाधान ।

ब्रह्मीं लावी अनुसंधान । तेही कल्पना ॥ १९॥

कल्पना द्वैताची माता । कल्पनाचि ज्ञप्ति तत्त्वता ।

बद्धता आणि मुक्तता । कल्पनागुणें ॥ २०॥

कल्पना अंतरीं सबळ । नसते दावी ब्रह्मगोळ ।

क्षण एक ते निर्मळ । स्वरूप कल्पी ॥ २१॥

क्षण एक धोका वाहे । क्षण एक स्थिर राहे ।

क्षण एक पाहे । विस्मित हौनी ॥ २२॥

क्षण एकांत उमजे । क्षण एक निर्बुजे ।

नाना विकार करिजे । ते कल्पना जाणावी ॥ २३॥

कल्पना जन्माचें मूळ । कल्पना भक्तीचें फळ ।

कल्पना तेचि केवळ । मोक्षदात्री ॥ २४॥

असो ऐशी हे कल्पना । साधनें दे समाधाना ।

येर्ह्हवीं हे पतना । मूळच कीं ॥ २५॥

म्हणोनि सर्वांचें मूळ । ते हे कल्पनाचि केवळ ।

इचें केलिया निर्मूळ । ब्रह्मप्राप्ती ॥ २६॥

श्रवण आणि मनन । निजध्यासें समाधान ।

मिथ्या कल्पनेचें भान । उडोनि जाय ॥ २७॥

शुद्ध ब्रह्माचा निश्चय । करी कल्पनेचा जय ।

निश्चितार्थें संशय । तुटोनि जाय ॥ २८॥

मिथ्या कल्पनेचें कोडें । कैसें राहे साचापुढें ।

जैसें सूर्याचेनि उजेडें । नासे तम ॥ २९॥

तैसें ज्ञानाचेनि प्रकाशें । मिथ्या कल्पना हे नासे ।

मग हें तुटे आपैसें । द्वैतानुसंधान ॥ ३०॥

कल्पनेनें कल्पना उडे । जैसा मृगें मृग सांपडे ।

कां शरें शर आतुडे । आकाशमार्गीं ॥ ३१॥

शुद्ध कल्पनेचें बळ । झालिया नासे शबल ।

हेंचि वचन प्रंजळ । सावध ऐका ॥ ३२॥

शुद्ध कल्पनेची खूण । स्वयें कल्पिजे निर्गुण ।

स्वस्वरूपीं विस्मरण । पडोंचि नेदी ॥ ३३॥

सदा स्वरूपानुसंधान । करी द्वैताचें निरसन ।

अद्वैतनिश्चयाचें ज्ञान । तेचि शुद्ध कल्पना ॥ ३४॥

अद्वैत कल्पी ते शुद्ध । द्वैत कल्पी ते अशुद्ध ।

अशुद्ध तेंचि प्रसिद्ध । शबल जाणावें ॥ ३५॥

शुद्ध कल्पनेचा अर्थ । अद्वैताचा निश्चितार्थ ।

आणि शबल ते व्यर्थ । द्वैत कल्पी ॥ ३६॥

अद्वैतकल्पना प्रकाशे । तेच क्षणीं द्वैत नासे ।

द्वैतासरिसी निरसे । शबलकल्पना ॥ ३७॥

कल्पनेनें कल्पना सरे । ऐसें जाणावें चतुरें ।

शबल गेलियानंतरें । उरली ती शुद्ध ॥ ३८॥

शुद्ध कल्पनेचें रूप । तेंचि कल्पी स्वरूप ।

स्वरूप कल्पितां तद्रूप । होय आपण ॥ ३९॥

कल्पनेसी मिथ्यत्व आलें । सहजचि तद्रूप झालें ।

आत्मनिश्चयें नाशिलें । कल्पनेसी ॥ ४०॥

जेचि क्षणीं निश्चय चळे । तेचि क्षणीं द्वैत उफाळे ।

जैसा अस्तमानीं प्रबळे । अंधकार ॥ ४१॥

तैसें ज्ञान होतां मलिन । अज्ञान प्रबळे जाण ।

याकारणें श्रवण । अखंड असावें ॥ ४२॥

आतां असो हें बोलणें जालें । आशंका फेडूं येका बोलें ।

जयास द्वैत भासलें । तें तूं नव्हेसी सर्वथा ॥ ४३॥

मागील आशंका फिटली । इतुकेन ही कथा संपली ।

पुढें वृत्ति सावध केली । पाहिजे श्रोतीं ॥ ४४॥

हरिॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके द्वैतकल्पनानिरसननिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥

 

 

 

समास सहावा : बद्धमुक्‍तनिरूपण

श्रीराम ॥

अद्वैतब्रह्म निरूपिलें । जें कल्पनेरहित संचलें ।

क्षणएक तदाकार केलें । मज या निरूपणें ॥ १॥

परी म्यां तदाकार व्हावें । ब्रह्मचि होऊन असावें ।

पुनः संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २॥

कल्पनारहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख ।

म्हणोनि तेंचि एक । होऊन असावें ॥ ३॥

ब्रह्मचि होइजे श्रवणें । पुन्हां वृत्तिवरी लागे येणें ।

ऐसें सदा येणें जाणें । चुकेना कीं ॥ ४॥

मनें अंतरिक्षीं जावें । क्षणएक ब्रह्मचि व्हावें ।

पुन्हां तेथून कोसळावें । वृत्तिवरी मागुती ॥ ५॥

प्रत्यावृत्ति सैरावैरा । किती करूं येरज़ारा ।

पायीं लावूनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६॥

उपदेशकाळीं तदाकार । होतां पडे हें शरीर ।

अथवा नेणें आपपर । ऐसें झालें पाहिजे ॥ ७॥

ऐसें नसतां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें ।

ब्रह्म होऊन संसार करणें । हेंही विपरीत दिसे ॥ ८॥

जो स्वयें ब्रह्मचि झाला । तो मागुता कैसा आला ।

ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वाटे ॥ ९॥

ब्रह्मचि होऊन जावें । कां तें संसारीच असावें ।

दोहींकडे भरंगळावें । किती म्हणोनि ॥ १०॥

निरूपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे ।

मागुता काम क्रोध खवळे । ब्रह्मरूपासी ॥ ११॥

ऐसा कैसा ब्रह्म झाला । दोहींकडे अंतरला ।

वोडगस्तपणेंचि गेला । संसार त्याचा ॥ १२॥

घेतां ब्रह्मसुखाची गोडी । संसारिक मागें वोढी ।

संसार करितां आवडी । ब्रह्मीं उपजे मागुती ॥ १३॥

ब्रह्मसुख नेलें संसारें । संसार गेला ज्ञानद्वारें ।

दोहीं अपुरीं पुरें । एकही नाहीं ॥ १४॥

याकारणें माझें चित्त । चंचळ झालें दुश्चित ।

काय करणें निश्चितार्थ । एकही नाहीं ॥ १५॥

ऐसा श्रोता करी विनंती । आतां रहावें कोणे रीतीं ।

म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६॥

आतां याचें प्रत्युत्तर । वक्ता देईल सुंदर ।

श्रोतीं व्हावें निरुत्तर । क्षण एक आतां ॥ १७॥

ब्रह्मचि होऊन जे पडले । तेचि मुक्तिपदास गेले ।

येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८॥

श्रोता विनंती करी पुढती । शुक मुक्तो वामदेवो वा हे श्रुती ।

दोघेचि मुक्त आदिअंतीं । बोलत असे ॥ १९॥

वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव ।

वेदवचनीं अभाव । कैसा धरावा ॥ २०॥

ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्युत्तरें ।

दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१॥

वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृष्टीवरी ।

ऐसें बोलतां उरी । कोणास आहे ॥ २२॥

बहु ऋषि बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी ।

झाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३॥

प्रर्ह्हादनारदपराशरपुंडरीक-

व्यासांबरीषशुकशौनकभीष्मदाल्भ्यान् ।

रुक्मांगदार्जुनवसिष्ठविभीषणादीन्

पुण्यानिमान्परमभागवतान्स्मरामि ॥ १॥

कविर्हरिरंतरिक्षः प्रबुद्धः पिप्पलायनः ।

आविर्होत्रो । अथ द्रुमिलश्चमसः करभाजनः ॥ २॥

यांहीवेगळे थोर थोर । ब्रह्मा विष्णु महेश्वर ।

आदिकरून दिगंबर । विदेहादिक ॥ २४॥

शुक वामदेव मुक्त झाले । येर हे अवघेच बुडाले ।

या वचनें विश्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५॥

तरी वेद कैसा बोलिला । तो काय तुम्हीं मिथ्या केला ।

ऐकोन वक्ता देता झाला । प्रत्युत्तर ॥ २६॥

वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष ।

साधु आणि व्युत्पन्न दक्ष । त्यांस हें न माने ॥ २७॥

तथापि हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें ।

वेदाचेनि उद्धरिलें । न वचे कोणा ॥ २८॥

वेदाअंगीं सामर्थ्य नसे । तरी या वेदासि कोण पुसे ।

म्हणोनि वेदीं सामर्थ्य असे । जन उद्धरावया ॥ २९॥

वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यराशी ।

म्हणोनि वेदीं सामर्थ्यासी । काय उणें ॥ ३०॥

वेद शास्त्र पुराण । भाग्यें झालिया श्रवण ।

तेणें होइजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१॥

श्लोक अथवा श्लोकार्ध । नाहीं तरी श्लोकपाद ।

श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२॥

वेद शास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्यांच्या आयणी ।

अगाध महिमा व्यासवाणी । वदोनि गेली ॥ ३३॥

एकाक्षर होतां श्रवण । तात्काळचि होइजे पावन ।

ऐसें ग्रंथाचें महिमान । ठायीं ठायीं बोलिलें ॥ ३४॥

दोहींवेगळा तिजा नुद्धरे । तरी महिमा कैंचा उरे ।

असो हें जाणिजे चतुरें । येरां गाथागोवी ॥ ३५॥

वेद शास्त्रें पुराणें । कैशीं होती अप्रमाणें ।

दोघावांचूनि तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६॥

म्हणसी काष्ठ होऊनि पडिला । तोचि एक मुक्त झाला ।

शुक तोही अनुवादला । नाना निरूपणें ॥ ३७॥

शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण ।

परी तो नव्हता अचेतन । ब्रह्माकार ॥ ३८॥

अचेतन ब्रह्माकार । असता शुक योगीश्वर ।

तरी सारासार विचार । बोलणें न घडे ॥ ३९॥

जो ब्रह्माकार झाला । तो काष्ठ होऊन पडिला ।

शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४०॥

निरूपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार ।

धांडोळावें चराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१॥

क्षण एक ब्रह्मचि व्हावें । क्षण एक दृश्य धांडोळावें ।

नाना दृष्टांतीं संपादावें । वक्तृत्वासी ॥ ४२॥

असो भागवतनिरूपण । शुक बोलिला आपण ।

तया अंगीं बद्धपण । लावूं नये कीं ॥ ४३॥

म्हणोनि बोलतां चालतां । निचेष्टित पडिलें नसतां ।

मुक्ति लाभे सायुज्यता । सद्‍गुरुबोधें ॥ ४४॥

येक मुक्त एक नित्यमुक्त । एक जाणावे जीवन्मुक्त ।

येक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५॥

सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त ।

दोहीवेगळे नित्यमुक्त । योगेश्वर जाणावे ॥ ४६॥

स्वरूपबोधें स्तब्धता । ते जाणावी तटस्थता ।

तटस्थता आणि स्तब्धता । हा देहसंबंध ॥ ४७॥

येथें अनुभवासीच कारण । येर सर्व निष्कारण ।

तृप्ति पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८॥

कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला ।

तेणें शब्दें जाजावला । हें तों घडेना ॥ ४९॥

स्वरूपीं नाहीं देह । तेथें कायसा संदेह ।

बद्ध मुक्त ऐसा भाव । विदेहाचकडे ॥ ५०॥

देहबुद्धी धरून चिंतीं । मुक्त ब्रह्मादिक नव्हेती ।

तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१॥

मुक्तपण हेंचि बद्ध । मुक्त बद्ध हें अबद्ध ।

स्वस्वरूप स्वतःसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२॥

मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाइजे पाताळा ।

देहबुद्धीची अर्गळा । स्वरूपीं न संटे ॥ ५३॥

मीपणापासून सुटला । तोचि एक मुक्त जाहला ।

मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४॥

जयास बांधावें तें वाव । तेथें कैंचा मुक्तभाव ।

पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५॥

बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो न मे वस्तुतः ।

गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥ १॥

तत्त्वज्ञाता परमशुद्ध । तयासि नाहीं मुक्त बद्ध ।

मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६॥

जेथें नाम रूप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे ।

मुक्त बद्ध हें विसरे । विसरपणेंशीं ॥ ५७॥

बद्ध मुक्त झाला कोण । ऐसा श्रोता करी प्रश्न ।

बाधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८॥

एवं हा अवघा श्रम । अहंतेचा जाण भ्रम ।

मायातीत जो विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९॥

असो बद्धता आणि मुक्तता । आली कल्पनेच्या माथां ।

ते कल्पना तरी तत्त्वतां । साच आहे ॥ ६०॥

म्हणोनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ ।

स्वप्न मिथ्या तात्काळ । जागृतीस होय ॥ ६१॥

स्वप्नीं बद्ध मुक्त झाला । तो जागृतीस नाहीं आला ।

कैंचा कोण काय झाला । कांहीं कळेना ॥ ६२॥

म्हणोन मुक्त विश्वजन । जयांस झालें आत्मज्ञान ।

शुद्धज्ञानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३॥

बद्ध मुक्त हा संदेह । धरी कल्पनेचा देह ।

साधु सदा निःसंदेह । देहातीत वस्तु ॥ ६४॥

आतां असो हें पुढती । पुढें रहावें कोणें रीतीं ।

तेंचि निरूपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके बद्धमुक्तनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६॥

 

 

 

जय जय रघुवीर समर्थ ॥

समास सातवा : साधनप्रतिष्ठानिरूपण

श्रीराम ॥

वस्तूसि जरी कल्पावें । तरी ते निर्विकल्प स्वभावें ।

तेथें कल्पनेच्या नावें । शून्याकार ॥ १॥

तथापि कल्पूं जातां । न ये कल्पनेच्या हाता ।

ओळखी ठायीं न पडे चित्ता । भ्रंश पडे ॥ २॥

कांहीं दृष्टीस न दिसे । मनास तेही न भासे ।

न भासे न दिसे । कैंसें ओळखावें ॥ ३॥

पाहों जातां निराकार । मनासि पडे शून्याकार ।

कल्पूं जातां अंधकार । भरला वाटे ॥ ४॥

कल्पूं जातां वाटे काळें । परी ते काळें ना पिंवळें ।

आरक्त निळें ना ढवळें । वर्णरहित ॥ ५॥

जयास वर्णव्यक्ति नसे । भासाहूनि अनारिसें ।

रूपचि नाहीं कैसें । ओळखावें ॥ ६॥

न दिसतां ओळखण । किती धरावी आपण ।

हें तों श्रमासीच कारण । होत असे ॥ ७॥

जो निर्गुण गुणातीत । जो अदृश्य अव्यक्त ।

जो अचिंत्य चिंतनातीत । परमपुरुष ॥ ८॥

अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने ।

समस्तजगदाधारमूर्तये ब्रह्मणे नमः ॥ १॥

अचिंत्य तें चिंतावें । अव्यक्तास आठवावें ।

निर्गुणास ओळखावें । कोणेपरी ॥ ९॥

जें दृष्टीसचि न पडे । जें मनासही नातुडे ।

तया कैसें पाहणें घडे । निर्गुणासी ॥ १०॥

असंगाचा संग धरणें । निरवलंबीं वास करणें ।

निःशब्दासी अनुवादणें । कोणेपरी ॥ ११॥

अचिंत्यासि चिंतूं जातां । निर्विकल्पासि कल्पितां ।

अद्वैताचें ध्यान करितां । द्वैतचि उठे ॥ १२॥

आतां ध्यानचि सांडावें । अनुसंधान तें मोडावें ।

तरी मागुतें पडावें । महासंशयीं ॥ १३॥

द्वैताच्या भेणें अंतरीं । वस्तु न पाहिजे तरी ।

तेणें समाधाना उरी । कदा असेचिना ॥ १४॥

सवे लावितां सवे पडे । सवे पडतां वस्तु आतुडे ।

नित्यानित्यविचारें घडे । समाधान ॥ १५॥

वस्तु चिंतितां द्वैत उपजे । सोडी करितां कांहींच नुमजे ।

शून्यत्वें संदेहीं पडिजे । विवेकेंविण ॥ १६॥

म्हणोनि विवेक धरावा । ज्ञानें प्रपंच सारावा ।

अहंभाव ओसरावा । परी तो ओसरेना ॥ १७॥

परब्रह्म तें अद्वैत । कल्पितांच उठे द्वैत ।

तेथें हेतु आणि दृष्टांत । कांहींच न चले ॥ १८॥

तें आठवितां विसरिजे । कां तें विसरोन आठविजे ।

जाणोनियां नेणिजे । परब्रह्म तें ॥ १९॥

त्यास न भेटतां होय भेटी । भेटों जातां पडे तुटी ।

ऐसी हे नवल गोष्टी । मुकेपणाची ॥ २०॥

तें साधूं जातां साधवेना । नातरी सोडितां सुटेना ।

लागला संबंध तुटेना । निरंतर ॥ २१॥

तें असतचि सदा असे । नातरी पाहतां दुराशे ।

न पाहतां प्रकाशे । जेथें तेथें ॥ २२॥

जेथें अपाय तेथें उपाय । आणि उपाय तोचि अपाय ।

हें अनुभवेंविण काय । उमजों जाणे ॥ २३॥

तें नुमजतांचि उमजे । उमजोन कांहींच नुमजे ।

तें वृत्तिविण पाविजे । निवृत्तिपद ॥ २४॥

तें ध्यानीं धरितां नये । चिंतनीं चिंतावें तें काये ।

मनामध्यें न समाये । परब्रह्म तें ॥ २५॥

त्यास उपमे द्यावें जळ । तरी तें निर्मळ निश्चळ ।

विश्व बुडालें सकळ । परी तें कोरडेंचि असे ॥ २६॥

नव्हे प्रकाशासारिखें । अथवा नव्हे काळोखें ।

आतां तें कासयासारिखें । सांगावें हो ॥ २७॥

ऐसें ब्रह्म निरंजन । कदा नव्हे दृश्यमान ।

लावावें तें अनुसंधान । कोणे परी ॥ २८॥

अनुसंधान लावूं जातां । कांहीं नाहीं वाटे आतां ।

नेणे मनाचिये माथां । संदेह वाजे ॥ २९॥

लटिकेंचि काय पहावें । कोठें जाऊन रहावें ।

अभाव घेतला जीवें । सत्यस्वरूपाचा ॥ ३०॥

अभावचि म्हणों सत्य । तरी वेद शास्त्रें कैसें मिथ्य ।

आणि व्यासादिकांचें कृत्य । वाउगें नव्हे ॥ ३१॥

म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । बहुत ज्ञानाचे उपाय ।

बहुतीं निर्मिलीं तें काय । मिथ्या म्हणावें ॥ ३२॥

अद्वैतज्ञानाचा उपदेश । गुरुगीता तो महेश ।

सांगतां होय पार्वतीस । महाज्ञान ॥ ३३॥

अवधूत गीता केली । गोरक्षास निरूपिली ।

ते अवधूतगीता बोलिली । ज्ञानमार्ग ॥ ३४॥

विष्णु होऊन राजहंस । विधीस केला उपदेश ।

ते हंसगीता जगदीश । बोलिला स्वमुखें ॥ ३५॥

ब्रह्मा नारदातें उपदेशित । चतुःश्लोकी भागवत ।

पुढें व्यासमुखें बहुत । विस्तारलें ॥ ३६॥

वासिष्ठसार वसिष्ठ ऋषी । सांगता झाला रघुनाथासी ।

कृष्ण सांगे अर्जुनासी । सप्तश्लोकी गीता ॥ ३७॥

ऐसें सांगावें तें किती । बहुत ऋषि बोलिले बहुतीं ।

अद्वैतज्ञान आदि अंतीं । सत्यचि असे ॥ ३८॥

म्हणोन मिथ्या आत्मज्ञान । म्हणतां पाविजे पतन ।

प्रज्ञेरहित ते जन । तयांस हें कळेना ॥ ३९॥

जेथें शेषाची प्रज्ञा मंदली । श्रुतीस मौनमुद्रा पडिली ।

जाणपणें न वचे वदली । स्वरूपस्थिती ॥ ४०॥

आपणास नुमजे बरवें । म्हणोनि मिथ्या कैसें करावें ।

नातरी सुदृढ धरावें । सद्गुरुमुखें ॥ ४१॥

मिथ्या तेंचि सत्य झालें । सत्य असोनि मिथ्या केलें ।

संदेहसागरीं बुडालें । अकस्मात मन ॥ ४२॥

मनास कल्पायाची सवे । मनें कल्पिलें तें नव्हे ।

तेणें गुणें संदेह धांवे । मीपणाचेनि पंथें ॥ ४३॥

तरी तो पंथचि मोडावा । मग परमात्मा जोडावा ।

समूळ संदेह तोडावा । साधूचेनि संगतीं ॥ ४४॥

मीपण शस्त्रें तुटेना । मीपण फोडितां फुटेना ।

मीपण सोडितां सुटेना । कांहीं केल्या ॥ ४५॥

मीपणें वस्तु नाकळे । मीपणें भक्ति मावळे ।

मीपणें शक्ति गळे । वैराग्याची ॥ ४६॥

मीपणें प्रपंच न घडे । मीपणें परमार्थ बुडे ।

मीपणें सकळही उडे । यश कीर्ति प्रताप ॥ ४७॥

मीपणें मैत्री तुटे । मीपणें प्रीति आटे ।

मीपणें लिगटे । अभिमान अंगीं ॥ ४८॥

मीपणें विकल्प उठे । मीपणें कलह सुटे ।

मीपणें संमोह फुटे । ऐक्यतेचा ॥ ४९॥

मीपण कोणासीच न साहे । तें भगवंतीं कैसेनि साहे ।

म्हणून मीपण सांडून राहे । तोचि समाधानी ॥ ५०॥

मीपण कैसे । म् त्यागावें । ब्रह्म कैसें अनुभवावें ।

समाधान कैसें पावावें । निःसंगपणें ॥ ५१॥

आणिक एक समाधान । मीपणेंविण साधन ।

करूं जाणे तोचि धन्य । समाधानी ॥ ५२॥

मी ब्रह्मचि झालों स्वतां । साधन करील कोण आतां ।

ऐसें मनीं कल्पूं जातां । कल्पनाचि उठे ॥ ५३॥

ब्रह्मीं कल्पना न साहे । तेचि तेथें उभी राहे ।

तयेसी शोधूनि पाहे । तोचि साधु ॥ ५५॥

निर्विकल्पासि कल्पावें । परी कल्पिलें तें आपण न व्हावें ।

मीपणास त्यागावें । येणें रीतीं ॥ ५६॥

ब्रह्मविद्येच्या लपणीं । कांहींच न व्हावें असोनी ।

दक्ष आणि समाधानी । तोचि हें जाणें ॥ ५७॥

जयास आपण कल्पावें । तेंचि आपण स्वभावें ।

येथें कल्पनेच्या नांवें । शून्य आलें ॥ ५८॥

पदींहून चळों नये । करावे साधन‍उपाये ।

तरीच सांपडे सोये । अलिप्तपणाची ॥ ५९॥

राजा राजपदीं असतां । उगीच चाले सर्व सत्ता ।

साध्यचि होऊन तत्त्वतां । साधन करावें ॥ ६०॥

साधन आलें देहाच्या माथां । आपण देह नव्हे सर्वथा ।

ऐसा करून अकर्ता । सहजचि आहे ॥ ६१॥

देह आपण ऐसें कल्पावें । तरीच साधन त्यागावें ।

देहातीत असतां स्वभावें । देह कैंचा ॥ ६२॥

ना तें साधन ना तें देह । आपण आपला निःसंदेह ।

देहींच असोन विदेह । स्थिति ऐशी ॥ ६३॥

साधनेंविण ब्रह्म होतां । लागों पाहे देहममता ।

आळस प्रबळे तत्त्वतां । ब्रह्मज्ञानमिसें ॥ ६४॥

परमार्थमिसें अर्थ जागे । ध्यानमिसें निद्रा लागे ।

मुक्तिमिसें दोष भोगे । अनर्गळता ॥ ६५॥

निरूपणमिसें निंदा घडे । संवादमिसें विवाद पडे ।

उपाधिमिसें येऊन जडे । अभिमान अंगीं ॥ ६६॥

तैसा ब्रह्मज्ञानमिसें । आळस अंतरीं प्रवेशे ।

म्हणे साधनाचें पिसें । काय करावें ॥ ६७॥

किं करोमि क्व गच्छामि किं गृह्णामि त्यजामि किम् ।

आत्मना पूरितं सर्वं महाकल्पांबुना यथा ॥ १॥

वचन आधारीं लाविलें । जैसें शस्त्र फिरविलें ।

स्वतां हाणोनि घेतलें । जयापरी ॥ ६८॥

तैसा उपायाचा अपाय । विपरीतपणें स्वहित जाय ।

साधन सोडितां होय । मुक्तपणें बद्ध ॥ ६९॥

साधन करितांच सिद्धपण । हातींचें जाईल निघोन ।

तेणेंगुणें साधन । करूंच नावडे ॥ ७०॥

लोक म्हणती हा साधक । हेचि लज्जा वाटे एक ।

साधन करिती ब्रह्मादिक । हें ठाउकें नाहीं ॥ ७१॥

आतां असो हे अविद्या । अभ्याससारिणी विद्या ।

अभ्यासें पाविजे आद्या । पूर्ण ब्रह्म ॥ ७२॥

अभ्यास करावा कवण । ऐसा श्रोता करी प्रश्न ।

परमार्थाचें साधन । बोलिलें पाहिजे ॥ ७३॥

याचें उत्तर श्रोतयासी । दिधलें पुढियलें समासीं ।

निरूपिलें साधनासी । परमार्थाच्या ॥ ७४॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके साधनप्रतिष्ठानिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥

 

 

 

समास आठवा : श्रवणनिरूपण

श्रीराम ॥

ऐक परमार्थाचें साधन । जेणें होय समाधान ।

तें तूं जाण गा श्रवण । निश्चयेंसीं ॥ १॥

श्रवणें आतुडे भक्ती । श्रवणें उद्भवे विरक्ती ।

श्रवणें तुटे आसक्ती । विषयांची ॥ २॥

श्रवणें घडे चित्तशुद्धी । श्रवणें होय दृढ बुद्धी ।

श्रवणें तुटे उपाधी । अभिमानाची ॥ ३॥

श्रवणें निश्चयो घडे । श्रवणें ममता मोडे ।

श्रवणें अंतरीं जोडे । समाधान ॥ ४॥

श्रवणें आशंका फिटे । श्रवणें संशयो तुटे ।

श्रवण होतां पालटे । पूर्वगुण आपुला ॥ ५॥

श्रवणें आवरे मन । श्रवणें घडे समाधान ।

श्रवणें तुटे बंधन । देहबुद्धीचें ॥ ६॥

श्रवणें मीपण जाय । श्रवणें धोका न ये ।

श्रवणें नाना अपाय । भस्म होती ॥ ७॥

श्रवणें होय कार्यसिद्धि । श्रवणें लागे समाधी ।

श्रवणें घडे सर्वसिद्धी । समाधानाची ॥ ८॥

सत्संगावरी श्रवण । तेणें कळे निरूपण ।

श्रवणें हो)इजे आपण । तदाकार ॥ ९॥

श्रवणें प्रबोध वाढे । श्रवणें प्रज्ञा चढे ।

श्रवणें विषयांचे ओढे । तुटोनि जाती ॥ १०॥

श्रवणें विचार कळे । श्रवणें ज्ञान हें प्रबळे ।

श्रवणें वस्तु निवळे । साधकांसी ॥ ११॥

श्रवणें सद्बुद्धि लागे । श्रवणें विवेक जागे ।

श्रवणें मन हें मागे । भगवंतासी ॥ १२॥

श्रवणें कुसंग तुटे । श्रवणें काम ओहटे ।

श्रवणें धोका आटे । एकसरां ॥ १३॥

श्रवणें मोह नासे । श्रवणें स्फूर्ति प्रकाशे ।

श्रवणें सद्वस्तु भासे । निश्चयात्मक ॥ १४॥

श्रवणें होय उत्तम गती । श्रवणें आतुडे शांती ।

श्रवणें पाविजे निवृत्ती । अचळपद ॥ १५॥

श्रवणा-ऐसें सार नाहीं । श्रवणें घडे सर्व कांहीं ।

भवनदीच्या प्रवाहीं । तरणोपाय श्रवणें ॥ १६॥

श्रवण भजनाचा आरंभ । श्रवण सर्वीं सर्वारंभ ।

श्रवणें होय स्वयंभ । सर्व कांहीं ॥ १७॥

प्रवृत्ति अथवा निवृत्ति । श्रवणेंविण न घडे प्राप्ती ।

हे तों सकळांस प्रचीती । प्रत्यक्ष आहे ॥ १८॥

ऐकिल्याविण कळेना । हें ठाउकें आहे जनां ।

त्याकारणें मूळ प्रयत्ना । श्रवण आधीं ॥ १९॥

जें जन्मीं ऐकिलेंचि नाहीं । तेथें पडिजे संदेहीं ।

म्हणोनिया दुजें कांहीं । साम्यता न घडे ॥ २०॥

बहुत साधनें पाहतां । श्रवणास न घडे साम्यता ।

श्रवणेंविण तत्त्वता । कार्य न चले ॥ २१॥

न देखतां दिनकर । पडे अवघा अंधकार ।

श्रवणेंविण प्रकार । तैसा होय ॥ २२॥

कैशी नवविधा भक्ती । कैशी चतुर्विधा मुक्ती ।

कैशी आहे सहजस्थिती । हें श्रवणेंविण न कळे ॥ २३॥

न कळे षट्कर्माचरण । न कळे कैसें पुरश्चरण ।

न कळे कैसें उपासन । विधियुक्त ॥ २४॥

नाना व्रतें नाना दानें । नाना तपें नाना साधनें ।

नाना योग तीर्थाटणें । श्रवणेंविण न कळती ॥ २५॥

नाना विद्या पिंडज्ञान । नाना तत्त्वांचें शोधन ।

नाना कळा ब्रह्मज्ञान । श्रवणेंविण न कळे ॥ २६॥

अठरा भार वनस्पती । एक्या जळें प्रबळती ।

एक्या रसें उत्पत्ती । सकळ जीवांची ॥ २७॥

सकळ जीवांस एक पृथ्वी । सकळ जीवांस एक रवी ।

सकळ जीवांस वर्तवी । एक वायु ॥ २८॥

सकळ जीवांस एक पैस । जयास बोलिजे आकाश ।

सकळ जीवांचा वास । एक परब्रह्मीं ॥ २९॥

तैसें सकळ जीवांस मिळोन । सार एकचि साधन ।

तें हें जाण श्रवण । प्राणिमात्रांसीं ॥ ३०॥

नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें ।

सर्वांस श्रवणापरतें । साधनचि नाहीं ॥३१॥

श्रवणें घडे उपरती । बद्धाचे मुमुक्षु होती ।

मुमुक्षूचे साधक अती । नेमेंसिं चालती ॥ ३२॥

साधकांचे होति सिद्ध । अंगीं बाणतां प्रबोध ।

हें तों आहे प्रसिद्ध । सकळांस ठाउकें ॥ ३३॥

ठायींचे खळ चांडाळ । तेचि होती पुण्यशीळ ।

ऐसा गुण तात्काळ । श्रवणाचा ॥ ३४॥

जो दुर्बुद्धि दुरात्मा । तोचि होय पुण्यात्मा ।

अगाध श्रवणाचा महिमा । बोलिला न वचे ॥ ३५॥

तीर्थव्रतांची फळश्रुती । पुढें होणार सांगती ।

तैसें नव्हे हातींच्या हातीं । सप्रचीत श्रवणें ॥ ३६॥

नाना रोग नाना व्याधी । तत्काळ तोडिजे औषधी ।

तैशी आहे श्रवणसिद्धी । अनुभवी जाणती ॥ ३७॥

श्रवणाचा विचार कळे । तरीच भाग्यश्री प्रबळे ।

मुख्य परमात्मा आकळे । स्वानुभवासी ॥ ३८॥

या नांव जाणावें मनन । अर्थालागीं सावधान ।

निदिध्यासें समाधान । होत असे ॥ ३९॥

बोलिल्याचा अर्थ कळे । तरीच समाधान निवळे ।

अकस्मात अंतरीं वोळे । निःसंदेह ॥ ४०॥

संदेह जन्माचें मूळ । तें श्रवणें होय निर्मूळ ।

पुढें सहजचि प्रांजळ । समाधान ॥ ४१॥

जेथें नाहीं श्रवण मनन । तेथें कैंचें समाधान ।

मुक्तपणाचें बंधन । जडलें पायीं ॥ ४२॥

मुमुक्षु साधक अथवा सिद्ध । श्रवणेंविण तो बद्ध ।

श्रवणमननें शुद्ध । चित्तवृत्ति होय ॥ ४३॥

जेथें नाहीं नित्य श्रवण । तें जाणावें विलक्षण ।

तेथें साधकें एक क्षण । क्रमूं नये सर्वथा ॥ ४४॥

जेथें नाहीं श्रवणस्वार्थ । तेथें कैंचा हो परमार्थ ।

मागें केलें तितुकें व्यर्थ । श्रवणेंविण होय ॥ ४५॥

तस्मात् श्रवण करावें । साधन मनीं धरावें ।

नित्य नेमें तरावें । संसारसागरीं ॥ ४६॥

सेविलेंचि सेवावें अन्न । घेतलेंचि घ्यावें जीवन ।

तैसें श्रवण मनन । केलेंचि करावें ॥ ४७॥

श्रवणाचा अनादर । आळस करी जो नर ।

त्याचा होय अपहार । स्वहिताविषयीं ॥ ४८॥

आळसाचें संरक्षण । परमार्थाची बुडवण ।

याकारणें नित्य श्रवण । केलेंचि पाहिजे ॥ ४९॥

आतां श्रवण कैसें करावें । कोण्या ग्रंथास पाहावें ।

पुढिलिये समासीं आघवें । सांगिजेल ॥ ५०॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८॥

 

 

 

समास नववा : श्रवणनिरूपण

श्रीराम ॥

आतां श्रवण कैसें करावें । तेंही सांगिजेल स्वभावें ।

श्रोतीं अवधान द्यावें । एकचित्तें ॥ १॥

एक वक्तृत्व श्रवणीं पडे । तेणें झालें समाधान मोडे ।

केला निश्चयो विघडे । अकस्मात ॥ २॥

तें वक्तृत्व त्यागावें । जें मायिक स्वभावें ।

तेथें निश्चयाच्या नांवें । शून्याकार ॥ ३॥

एक्या ग्रंथें निश्चयो केला । तो दुजयानें उडविला ।

तेणें संशयचि वाढला । जन्मवरी ॥ ४॥

जेथें संशय तुटती । होय आशंकानिवृत्ती ।

अद्वैतग्रंथ परमार्थीं । श्रवण करावे ॥ ५॥

जो मोक्षाचा अधिकारी । तो परमार्थपंथ धरी ।

प्रीति लागली अंतरीं । अद्वैतग्रंथाची ॥ ६॥

जेणें सांडिला इहलोक । जो परलोकींचा साधक ।

तेणें पाहावा विवेक । अद्वैतशास्त्रीं ॥ ७॥

जयास पाहिजे अद्वैत । तयापुढें ठेवितां द्वैत ।

तेणें क्षोभलें उठे चित्त । तया श्रोतयांचें ॥ ८॥

आवडीसारिखें मिळे । तेणें सुखचि उचंबळे ।

नाहीं तरी कंटाळे । मानस ऐकतां ॥ ९॥

ज्याची उपासना जैसी । त्यासि प्रीति वाढे तैसी ।

तेथें वर्णितां दुजयासी । प्रशस्त न वाटे ॥ १०॥

प्रीतीचें लक्षण ऐसें । अंतरीं उठे अनायासें ।

पाणी पाणवाटें जैसें । आपणचि धांवे ॥ ११॥

तैसा जो आत्मज्ञानी नर । तयास नावडे इतर ।

तेथें पाहिजे सारासार- । विचारणा ते ॥ १२॥

जेथें कुळदेवी भगवती । तेथें पाहिजे सप्तशती ।

इतर देवांची स्तुती । कामा न ये सर्वथा ॥ १३॥

घेतां अनंताच्या व्रता । तेथें नलगे भगवद्गीता ।

साधुजनांसि वार्ता । फळाशेचि नाहीं ॥ १४॥

वीरकंकण घालितां नाकीं । परी तें शोभा पावेना कीं ।

जेथील तेथें आणिकीं । कामा न ये सर्वथा ॥ १५॥

नाना माहात्म्यें बोलिलीं । जेथील तेथें वंद्य झालीं ।

विपरीत करून वाचिलीं । तरी तें विलक्षण ॥ १६॥

मल्हारीमाहात्म्य द्वारकेसी । द्वारकामाहात्म्य नेलें काशीसी ।

काशीमाहात्म्य व्यंकटेशीं । शोभा न पावे ॥ १७॥

ऐसें सांगतां असे वाड । परी जेथील तेथेंचि गोड ।

तैसी ज्ञानियांस चाड । अद्वैतग्रंथाची ॥ १८॥

योगियांपुढे राहाण । परीक्षावंतापुढें पाषाण ।

पंडितापुढें डफगाण । शोभा न पावे ॥ १९॥

वेदज्ञापुढें जती । निस्पृहापुढें फळश्रुति ।

ज्ञानियापुढें पोथी । कोकशास्त्राच्ची ॥ २०॥

ब्रह्मचर्यापुढें नाचणी । रासक्रीडा निरूपणीं ।

राजहंसापुढें पाणी । ठेविलें जैसें ॥ २१॥

तैसें अंतर्निष्ठापुढें । ठेविलें शृंगारी टीपडें ।

तेणें त्याचें कैसें घडे । समाधान । २२॥

रायास रंकाची आशा । तक्र सांगणें पीयूषा ।

संन्याशास वोवसा । उच्छिष्टचांडाळीचा ॥ २३॥

कर्मनिष्ठा वशीकरण । पंचाक्षरीया निरूपण ।

तेथें भंगे अंतःकरण । सहजचि त्याचें ॥ २४॥

तैसे पारमार्थिक जन । तयांस नसतां आत्मज्ञान ।

ग्रंथ वाचितां समाधान । होणार नाहीं ॥ २५॥

आतां असो हें बोलणें । जयास स्वहित करणें ।

तेणें सदा विवरणें । अद्वैतग्रंथीं ॥ २६॥

आत्मज्ञानी एकचित्त । तेणें पाहणें अद्वैत ।

एकांत स्थळीं निवांत । समाधान ॥ २७॥

बहुत प्रकारें पाहतां । ग्रंथ नाहीं अद्वैतापरता ।

परमार्थास तत्वतां । तारूंच कीं ॥ २८॥

इतर जे प्रापंचिक । हास्य विनोद नवरसिक ।

हित नव्हे तें पुस्तक । परमार्थासी ॥ २९॥

जेणें परमार्थ वाढे । अंगीं अनुताप चढे ।

भक्तिसाधन आवडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३०॥

जो ऐकतांच गर्व गळे । कां ते भ्रांतीच मावळे ।

नातरी एकसरी वोळे । मन भगवंतीं ॥ ३१॥

जेणें होय उपरती । अवगुण अवघे पालटती ।

जेणें चुके अधोगती । त्या नांव ग्रंथ ॥ ३२॥

जेणें धारिष्ट चढे । जेणें परोपकार घडे ।

जेणें विषयवासना मोडे । त्या नांव ग्रंथ ॥ ३३॥

जेणें ग्रंथ परत्र साधन । जेणें ग्रंथें होय ज्ञान ।

जेणें होइजे पावन । त्या नांव ग्रंथ ॥ ३४॥

ग्रंथ बहुत असती । नाना विधानें फळश्रुती ।

जेथें नुपजे विरक्ती भक्ति । तो ग्रंथचि नव्हे ॥ ३५॥

मोक्षेंविण फळश्रुती । ते दुराशेची पोथी ।

ऐकतां ऐकतां पुढती । दुराशाच वाढे ॥ ३६॥

श्रवणीं लोभ उपजेल जेथें । विवेक कैंचा असेल तेथें ।

बैसलीं दुराशेचीं भूतें । तयां अधोगती ॥ ३७॥

ऐकोनीच फळश्रुती । पुढें तरी पावों म्हणती ।

तयां जन्म अधोगती । सहजचि जाहली ॥ ३८॥

नाना फळें पक्षी खाती । तेणेंचि तयां होय तृप्ती ।

परी त्या चकोराचे चित्तीं । अमृत वसे ॥ ३९॥

तैसें संसारी मनुष्य । पाहे संसाराची वास ।

परी जे भगवंताचे अंश । ते भगवंत इच्छिती ॥ ४०॥

ज्ञानियास पाहिजे ज्ञन । भजकास पाहिजे भजन ।

साधकास पाहिजे साधन । इच्छेसारिखें ॥ ४१॥

परमार्थ्यास पाहिजे परमार्थ । स्वार्थ्यास पाहिजे स्वार्थ ।

कृपणास पाहिजे अर्थ । मनापासूनी ॥ ४२॥

योगियास पाहिजे योग । भोगियास पाहिजे भोग ।

रोगियास पाहिजे रोग- । हरती मात्रा ॥ ४३॥

कवीस पाहिजे प्रबंध । तार्किकास पाहिजे तर्कवाद ।

भाविकास संवाद । गोड वाटे ॥ ४४॥

पंडितास पाहिजे व्युत्पत्ती । विद्वानास अध्ययनप्रीती ।

कलावंतास आवडती । नाना कळा ॥ ४५॥

हरिदासांस आवडे कीर्तन । शुचिर्भूतांस संध्यास्नान ।

कर्मनिष्ठांस विधिविधान । पाहिजे तें ॥ ४६॥

प्रेमळास पाहिजे करुणा । दक्षता पाहिजे विचक्षणा ।

चातुर्य पाहे शहाणा । आदरेंसीं ॥ ४७॥

भक्त पाहे मूर्तिध्यान । संगीत पाहे तालज्ञान ।

रागज्ञानी तानमान । मूर्च्छना पाहे ॥ ४८॥

योगाभ्यासी पिंडज्ञान । तत्त्वज्ञानी तत्त्वज्ञान ।

नाडीज्ञानी मात्राज्ञान । पाहतसे ॥ ४९॥

कामिक पाहे कोकशास्त्र । चेटकी पाहे चेटकीमंत्र ।

यंत्री पाहे नाना यंत्र । आदरेंसी ॥ ५०॥

टवाळासि आवडे विनोद । उन्मतास नाना छंद ।

तामसास प्रमाद । गोड वाटे ॥ ५१॥

मूर्ख होय नादलुब्धी । निंदक पाहे उणी संधी ।

पापी पाहे पापबुद्धी । लावून अंगीं ॥ ५२॥

एकां पाहिजे रसाळ । एकां पाहिजे पाल्हाळ ।

एकां पाहिजे केवळ । साबडी भक्ती ॥ ५३॥

आगमी पाहे आगम । शूर पाहे संग्राम ।

एक पाहती नाना धर्म । इच्छेसारिखे ॥ ५४॥

मुक्त पाहे मुक्तलीला । सर्वज्ञ पाहे सर्वज्ञकळा ।

ज्योतिषी भविष्य पिंगळा । वर्णूं पाहे ॥ ५५॥

ऐसें सांगावें तें किती । आवडीसारिखें ऐकती ।

नाना पुस्तकें वाचिती । सर्वकाळ ॥ ५६॥

परी परत्रसाधनेंविण । म्हणों नये तें श्रवण ।

जेथें नाहीं आत्मज्ञान । तया नांव करमणूक ॥ ५७॥

गोडीविण गोडपण । नाकेंविण सुलक्षण ।

ज्ञानेंविण निरूपण । बोलोंचि नये ॥ ५८॥

आतां असो हें बहुत । ऐकावा परमार्थ ग्रंथ ।

परमार्थग्रंथेंविण व्यर्थ । गाथागोवी ॥ ५९॥

म्हणोनि नित्यानित्यविचार । जेथें बोलिला सारासार ।

तोचि ग्रंथ पैलपार । पाववी विवेकें ॥ ६०॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके श्रवणनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥

 

 

 

समास दहावा : देहान्तनिरूपण

श्रीराम ॥

मिथ्या तेंचि झालें सत्य । सत्य तेंचि झालें असत्य ।

मायाविभ्रमाचें कृत्य । ऐसें असे पाहतां ॥ १॥

सत्य कळावयाकारणें । बोलिलीं नाना निरूपणें ।

तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ २॥

असत्य अंतरीं बिंबलें । न सांगतां तें दृढ झालें ।

सत्य असोन हरपलें । जेथील तेथें ॥ ३॥

वेद शास्त्रें पुराणें सांगती । सत्याचा निश्चयो करिती ।

तरि न ये आत्मप्रचीती । सत्य स्वरूप ॥ ४॥

सत्य असोन आच्छादलें । मिथ्या असोन सत्य झालें ।

ऐसें विपरीत वर्तलें । देखतदेखतां ॥ ५॥

ऐसी मायेची करणी । कळों आली तत्क्षणीं ।

संतसंगें निरूपणीं । विचार घेतां ॥ ६॥

मागां झालें निरूपण । देखिलें आपणासि आपण ।

तेणें बाणली खूण । परमार्थाची ॥ ७॥

तेणें समाधान झालें । चित्त चैतन्यीं मिळालें ।

निजस्वरूपें ओळखिलें । निजवस्तूसी ॥ ८॥

प्रारब्धें टाकिला देहो । बोधें फिटला संदेहो ।

आतांचि पडो अथवा राहो । मिथ्या कलेवर ॥ ९॥

ज्ञानियांचें जें शरीर । तें मिथ्यत्वें निर्विकार ।

जेथें पडे तेचि सार । पुण्यभूमी ॥ १०॥

साधुदर्शनें पावन तीर्थ । पुरती त्यांचे मनोरथ ।

साधू न येतां जिणें व्यर्थ । तया पुण्यक्षेत्रांचें ॥ ११॥

पुण्यनदीचें जें तीर । तेथें पडावें हें शरीर ।

हा इतर जनांचा विचार । साधु तोंचि नित्यमुक्त ॥ १२॥

उत्तरायण तें उत्तम । दक्षिणायन तें अधम ।

हा संदेहीं वसे भ्रम । साधु तो निःसंदेही ॥ १३॥

शुक्लपक्ष उत्तरायण । गृहीं दीप दिवामरण ।

अंतीं रहावें स्मरण । गतीकारणें ॥ १४॥

इतुकें नलगे योगियासी । तो जितचि मुक्त पुण्यराशी ।

तिलांजली पापपुण्यासी । दिधली तेणें ॥ १५॥

देहाचा अंत बरा झाला । देह सुखरूप गेला ।

त्यास म्हणती धन्य झाला । अज्ञान जन ॥ १६॥

जनांचें विपरीत मत । अंतीं भेटतो भगवंत ।

ऐसें कल्पून घात । करिती आपुला स्वयें ॥ १७॥

जितां सार्थक नाहीं केलें । व्यर्थ आयुष्य निघोन गेलें ।

मुळीं धान्यचि नाहीं पेरिलें । तें उगवेल कैंचें ॥ १८॥

जरी केलें ईश्वरभजन । तरी तो होइजे पावन ।

जैसें वेव्हारितां धन । राशी माथां लाभे ॥ १९॥

दिधल्याविण पाविजेना । पेरिल्याविण उगवेना ।

ऐसें हें वाक्य जनां । ठाउकेंचि आहे ॥ २०॥

न करितां सेवेच्या व्यापारा । स्वामीस म्हणे कोठें मुशारा ।

तैसें अंतीं अभक्त नरा । स्वहित न घडे ॥ २१॥

जितां नाहीं भगवद्भक्ती । मेल्या कैंची होईल मुक्ती ।

असो जे जे ऐसें करिती । ते ते पावती तैसेंचि ॥ २२॥

एवं न करितां भगवद्भजन । अंतीं न होइजे पावन ।

जरी आलें बरवें मरण । तरी भक्तिविण अधोगती ॥ २३॥

म्हणोन साअधूनें आपुलें । जीत असतांच सार्थक केलें ।

शरीर कारणीं लागलें । धन्य त्याचें ॥ २४॥

जे कां जीवन्मुक्त ज्ञानी । त्यांचें शरीर पडो रानीं ।

अथवा पडो स्मशानीं । तरी ते धन्य झाले ॥ २५॥

साधूंचा देह खितपला । अथवा श्वानादिकीं भक्षिला ।

हें प्रशस्त न वाटे जनांला । मंदबुद्धीस्तव ॥ २६॥

अंत बरा नव्हेचि म्हणोन । कष्टी होती इतर जन ।

परी ते बापुडे अज्ञान । नेणती वर्म ॥ २७॥

जो जन्मलाचि नाहीं ठायींचा । त्यास मृत्यु येईल कैंचा ।

विवेकबळें जन्ममृत्यूचा । घोट भरिला जेणें ॥ २८॥

स्वरूपानुसंधानबळें । सगळीच माया नाडळे ।

तयाचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ २९॥

तो जित असतांचि मेला । मरणास मारून जियाला ।

जन्म मृत्यु न स्मरे त्याला । विवेकबळें ॥ ३०॥

तो जनीं दिसतो परी वेगळा । वर्ततां भासे निराळा ।

दृश्य पदार्थ त्या निर्मळा । स्पर्शलाचि नाहीं ॥ ३१॥

असो ऐसे साधु जन । त्यांचें घडलिया भजन ।

तेणें भजनें पावन । इतर जन होती ॥ ३२॥

सद्गुरूचा जो अंकित साधक । तेणें केलाच करावा विवेक ।

विवेक केलिया तर्क । फुटे निरूपणीं ॥ ३३॥

हेंचि साधकासी निरवणें । अद्वैत प्रांजळ निरूपणें ।

तुमचेंहि समाधान बाणे । साधूच ऐसें ॥ ३४॥

जो संतांसी शरण गेला । तो संतचि होऊन ठेला ।

इतर जनां उपयोगा आला । कृपाळुपणें ॥ ३५॥

ऐसें संतांचें महिमान । संतसंगें होतें ज्ञान ।

सत्संगापरतें साधन । आणिक नाहीं ॥ ३६॥

गुरुभजनाचेनि आधारें । निरूपणाचेनि विचारें ।

क्रियाशुद्ध निर्धारें । पाविजे पद ॥ ३७॥

परमार्थाचें जन्मस्थान । तेंचि सद्गुरूचें भजन ।

सद्गुरुभजनें समाधान । अकस्मात बाणे ॥ ३८॥

देह मिथ्या जाणोनि जीवें । याचें सार्थकचि करावें ।

भजनभावें तोषवावें । चित्त सद्गुरूचें ॥ ३९॥

शरणागताची वाहे चिंता । तो एक सद्गुरु दाता ।

जैसें बाळका वाढवी माता । नाना यत्नेंकरूनी ॥ ४०॥

यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ ॥

म्हणोनि सद्गुरूचें भजन । जयास घडे तोचि धन्य ।

सद्गुरुवीण समाधान । आणिक नाहीं ॥ ४१॥

सरली शब्दाची खटपट । आला ग्रंथाचा शेवट ।

येथें सांगितलें स्पष्ट । सद्गुरुभजन ॥ ४२॥

सद्गुरुभजनापरतें कांहीं । मोक्षदायक दुसरें नाहीं ।

जयांस न मने तिहीं । अवलोकावी गुरुगीता ॥ ४३॥

तेथें निरूपिलें बरवें । पार्वतीप्रति सदाशिवें ।

याकारणें सद्भावें । सद्गुरुचरण सेवावे ॥ ४४॥

जो ये ग्रंथींचा विवेक । विवंचून पाहे साधक ।

तयास सांपडे एक । निश्चयो ज्ञानाचा ॥ ४५॥

ज्या ग्रंथीं बोलिलें अद्वैत । तो म्हणूं नये प्राकृत ।

सत्य जाणावा वेदांत । अर्थाविषयीं ॥ ४६॥

प्राकृतें वेदांत कळे । सकळ शास्त्रीं पाहतां मिळे ।

आणि समाधान निवळे । अंतर्यामीं ॥ ४७॥

तें प्राकृत म्हणों नये । जेथें ज्ञानाचा उपाय ।

मूर्खासि हें कळे काय । मर्कटा नारिकेळ जैसें ॥ ४८॥

आतां असो हें बोलणें । अधिकारपरत्वें घेणें ।

शिंपीमधील मुक्त उणें । म्हणों नये ॥ ४९॥

जेथें नेति नेति म्हणती श्रुती । तेथें न चले भाषाव्युत्पत्ती ।

परब्रह्म आदि अंतीं । अनिर्वाच्य ॥ ५०॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सप्तमदशके देहातीतनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥

॥ दशक सातवा समाप्त ॥

 

दशक ८ वा  -->