संतसाहित्य

Navigation

दशक ६ वा

<-- दशक ५ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥  देवशोधननाम दशक सहावा  ॥

॥ श्रीराम ॥

समास पहिला : देवशोधन

चित्त सुचित करावें । बोलिलें तें जीवीं धरावें ।

सावध होऊन बैसावें । निमिष एक ॥ १॥

कोणी एके ग्रामीं अथवा देशीं । राहणें आहे आपणासी ।

न भेटतां तेथिल्या प्रभूसी । सौख्य कैंचें ॥ २॥

म्हणौनि ज्यास जेथें राहणें । तेणें त्या प्रभूची भेटी घेणें ।

म्हणिजे होय श्लाघ्यवाणें । सर्व कांहीं ॥ ३॥

प्रभूची भेटी न घेतां । तेथें कैंची मान्यता ।

आपुलें महत्व जातां । वेळ नाहीं ॥ ४॥

म्हणौनि रायापासूनि रंक । कोणी एक तरी नायक ।

त्यास भेटणें हा विवेक । विवेकी जाणती ॥ ५॥

त्यास न भेटतां त्याचे नगरीं । राहतां धरितील बेगारी ।

तेथें न करितां चोरी । अंगीं लागे ॥ ६॥

याकारणें जो शहाणा । तेणें प्रभूसी भेटावें जाणा ।

ऐसें न करितां दैन्यवाणा । संसार त्याचा ॥ ७॥

ग्रामीं थोर ग्रामाधिपती । त्याहूनि थोर देशाधिपती ।

देशाधिपतीहूनि नृपती । थोर जाणावा ॥ ८॥

राष्ट्राचा प्रभु तो राजा । बहुराष्ट्र तो महाराजा ।

महाराजांचाही राजा । तो चक्रवर्ती ॥ ९॥

एक नरपती एक गजपती । एक हयपती एक भूपती ।

सकळांमध्ये चक्रवर्ती । थोर राजा ॥ १०॥

असो ऐशिया समस्तां । एक ब्रह्मा निर्माणकर्ता ।

त्या ब्रह्म्यासही निर्मिता । कोण आहे ॥ ११॥

ब्रह्मा विष्णु आणि हर । त्यांसी निर्मिता तोचि थोर ।

तो ओळखावा परमेश्वर । नाना यत्नें ॥ १२॥

तो देव ठायीं पडेना । तरी यमयातना चुकेना ।

ब्रह्माण्डनायका चोजवेना । हें बरें नव्हे ॥ १३॥

जेणें संसारीं घातलें । अवघें ब्रह्माण्ड निर्माण केलें ।

त्यासी नाहीं ओळखिलें । तोचि पतित ॥ १४॥

म्हणोनि देव ओळखावा । जन्म सार्थकचि करावा ।

न कळे तरी सत्संग धरावा । म्हणजे कळे ॥ १५॥

जो जाणेल भगवंत । तया नांव बोलिजे संत ।

जो शाश्वत आणि अशाश्वत । निवाडा करी ॥ १६॥

चळेना ढळेना देव । ऐसा ज्याचा अंतर्भाव ।

तोचि जाणिजे महानुभाव । तोचि साधू ॥ १७॥

जो जनांमध्ये वागे । परी जनांवेगळी गोष्टी सांगे ।

ज्याचे अंतरीं ज्ञान जागे । तोचि साधू ॥ १८॥

जाणिजे परमात्मा निर्गुण । त्यासींच म्हणावें ज्ञान ।

त्यावेगळें तें अज्ञान । सर्व कांहीं ॥ १९॥

पोट भरावयाकारणें । नाना विद्या अभ्यास करणें ।

त्यास ज्ञान म्हणती परी तेणें । सार्थक नव्हे ॥ २०॥

देव ओळखावा एक । तेंचि ज्ञान तें सार्थक ।

येर अवघेंचि निरर्थक । पोटविद्या ॥ २१॥

जन्मवरी पोट भरिलें । देहाचें संरक्षण केलें ।

पुढें अवघेंचि व्यर्थ गेलें । अंतकाळीं ॥ २२॥

एवं पोट भरावयाची विद्या । तियेसी म्हणों नये सद्विद्या ।

सर्वव्यापक वस्तु सद्या । पाविजे तें ज्ञान ॥ २३॥

ऐसें जयापाशीं ज्ञान । तोचि जाणावा सज्जन ।

तयापासीं समाधान । पुशिलें पाहिजे ॥ २४॥

अज्ञानास भेटतां अज्ञान । तेथें कैंचें सांपडेल ज्ञान ।

करंट्यास करंट्याचें दर्शन । होतां भाग्य कैंचें ॥ २५॥

रोग्यापाशीं रोगी गेला । तेथें कैंचें आरोग्य त्याला ।

निर्बळापाशीं निर्बळाला । पाठी कैंची ॥ २६॥

पिशाच्यापाशीं पिशाच गेलें । तेथें कोण सार्थक झालें ।

उन्मत्तास उन्मत्त भेटलें । त्यास उमजवी कवणू ॥ २७॥

भिकायापाशीं मागतां भिक्षा । दीक्षाहीनापाशीं मागतां दीक्षा ।

उजेड पाहतां कृष्णपक्षा । पाविजे कैंचा ॥ २८॥

अबद्धापाशीं गेला अबद्ध । तो कैसेनि होईल सुबद्ध ।

बद्धास भेटतां बद्ध । सिद्ध नव्हे ॥ २९॥

देह्यापाशीं गेला देही । तो कैसेनि होईल विदेही ।

म्हणोनि ज्ञात्यावांचूनि नाहीं । ज्ञानमार्ग ॥ ३०॥

याकारणें ज्ञाता पहावा । त्याचा अनुग्रह घ्यावा ।

सारासारविचारें जीवा । मोक्ष प्राप्त ॥ ३१॥

हरि ॐ तत्सत् । इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके देवशोधननिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १॥

 

 

 

जय जय रघुवीर समर्थ ॥

समास दुसरा : ब्रह्मपावननिरूपण

श्रीराम ॥

ऐका उपदेशाचीं लक्षणें । सायुज्यप्राप्ति होय जेणें ।

नाना मतांचें पेखणें । कामा नये सर्वथा ॥ १॥

ब्रह्मज्ञानावीण उपदेश । तो म्हणों नये विशेष ।

धान्येविण जैसें भूस । खातां नये ॥ २॥

नाना काबाड बडविलें । नातरी तक्रचि घुसळिलें ।

अथवा धुवणचि सेविलें । सावकाश ॥ ३॥

नाना साली भक्षिल्या । अथवा चोइट्या चोखिल्या ।

खोबरें सांडून खादल्या । नरोट्या जैशा ॥ ४॥

तैसें ब्रह्मज्ञानाविण । नाना उपदेशांचा शीण ।

सार सांडून असार कोण । शहाणा सेवी ॥ ५॥

आतां ब्रह्म जें कां निर्गुण । तेंचि केलें निरूपण ।

सुचित करावें अंतःकरण । श्रोतेजनीं ॥ ६॥

सकळ सृष्टीची रचना । तें हें पंचभौतिक जाणा ।

परंतु हें तगेना । सर्वकाळ ॥ ७॥

आदि अंतीं ब्रह्म निर्गुण । तेचि शाश्वताची खूण ।

येर पंचभौतिक सगुण । नाशवंत ॥ ८॥

येरवीं हीं पाहतां भूतें । देव कैसें म्हणावें त्यांतें ।

भूत म्हणतां मनुष्यांतें । विषाद वाटे ॥ ९॥

मा तो जगन्नाथ परमात्मा । त्यासि आणि भूत‍उपमा ।

ज्याचा कळेना महिमा । ब्रह्मादिकांसी ॥ १०॥

भूतां ऐसा जगदीश । म्हणतां उत्पन्न होतो दोष ।

याकारणें महापुरुष । सर्व जाणती ॥ ११॥

पृथ्वी आप तेज वायु आकाश । यां सबाह्य जगदीश ।

पंचभूतांस आहे नाश । आत्मा अविनाशरूपी ॥ १२॥

जें जें रूप आणि नाम । तो तो अवघाच भ्रम ।

नामरूपातीत वर्म । अनुभवें जाणावें ॥ १३॥

पंचभूतें आणि त्रिगुण । ऐशी अष्टधा प्रकृति जाण ।

अष्टधा प्रकृतीस नामाभिधान । दृश्य ऐसें ॥ १४॥

तें हें दृश्य नाशिवंत । ऐसें वेद श्रुति बोलत ।

निर्गुण ब्रह्म शाश्वत । जाणती ज्ञानी ॥ १५॥

जें शस्त्रें तोडितां तुटेना । जें पावकें जाळितां जळेना ।

जें कालवितां कालवेना । आपेंकरूनी ॥ १६॥

जें वायूचेनि उडेना । जें पडेना ना झडेना ।

जें घडेना ना दडेना । परब्रह्म तें ॥ १७॥

ज्यासि वर्णचि नसे । जें सर्वांहूनि अनारिसें ।

परंतु असतचि असे । सर्वकाळ ॥ १८॥

दिसेना तरी काय झालें । परंतु सर्वत्र संचलें ।

सूक्ष्मचि कोंदाटलें । जेथें तेथें ॥ १९॥

दृष्टीस लागली सवे । जें दिसेल तेंचि पहावें ।

परंतु गुज तें जाणावें । गौप्य आहे ॥ २०॥

प्रगट तें जाणावें असार । आणि गुप्त तें जाणावें सार ।

सद्गुरुमुखें हा विचार । उमजों लागे ॥ २१॥

उमजेना तें उमजावें । दिसेना तें पहावें ।

जें कळेना तें जाणावें । विवेकबळें ॥ २२॥

गुप्त तेंचि प्रगटवावें । असाध्य तेंचि साधावें ।

कानडेंचि अभ्यासावें । सावकाश ॥ २३॥

वेद विरंचि आणि शेष । जेथें शिणले निःशेष ।

तेंचि साधावें विशेष । परब्रह्म तें ॥ २४॥

तरी तें कवणें परी साधावें । तेंचि बोलिलें स्वभावें ।

अध्यात्मश्रवणें पावावें । परब्रह्म तें ॥ २५॥

पृथ्वी नव्हे आप नव्हे । तेज नव्हे वायु नव्हे ।

वर्णव्यक्ति ऐसें नव्हे । अव्यक्त तें ॥ २६॥

तयास म्हणावें देव । वरकड लोकांचा स्वभाव ।

जितुके गांव तितुके देव । जनांकारणें ॥ २७॥

ऐसा देवाचा निश्चयो झाला । देव निर्गुण प्रत्यया आला ।

आतां आपणचि आपला । शोध घ्यावा ॥ २८॥

माझें शरीर ऐसें म्हणतो । तरी तो जाण देहावेगळाचि तो ।

मन माझें ऐसें जाणतो । तरी तो मनही नव्हे ॥ २९॥

पाहतां देहाचा विचार । अवघा तत्त्वांचा विस्तार ।

तत्त्वें तत्त्व झाडितां सार । आत्माचि उरे ॥ ३०॥

आपणासि ठावचि नाहीं । तेथें पाहणें नलगे कांहीं ।

तत्त्वें ठायींच्या ठायीं । विभागूनि गेलीं ॥ ३१॥

बांधली आहे तों गांठोडी । जो कोणी विचारें सोडी ।

विचार पाहतां गांठोडी । आढळेना ॥ ३२॥

तत्त्वांचें गांठोडें शरीर । याचा पाहतां विचार ।

एक आत्मा निरंतर । आपण नाहीं ॥ ३३॥

आपणासि ठावचि नाहीं । जन्म मृत्यु कैंचे काई ।

पाहतां वस्तूच्या ठायीं । पाप पुण्य नसे ॥ ३४॥

पाप पुण्य यमयातना । हें निर्गुणीं तों असेना ।

आपण तोचि तरी जन्ममरणा । ठावो कैंचा ॥ ३५॥

देहबुद्धीनें बांधला । तो विवेकें मोकळा केला ।

देहातीत होतां पावला । मोक्षपद ॥ ३६॥

झालें जन्माचें सार्थक । निर्गुण आत्मा आपण एक ।

परंतु हा विवेक । पाहिलाचि पहावा ॥ ३७॥

जागें होतां स्वप्न सरे । विवेक पाहतां दृश्य ओसरे ।

स्वरूपानुसंधानें तरे । प्राणिमात्र ॥ ३८॥

आपणास निवेदावें । आपण विवेकें नुरावें ।

आत्मनिवेदन जाणावें । याचें नांव ॥ ३९॥

आधीं अध्यात्मश्रवण । मग सद्गुरुपादसेवन ।

पुढें आत्मनिवेदन । सद्गुरुप्रसादें ॥ ४०॥

आत्मनिवेदनाउपरी । निखळ वस्तु निरंतरी ।

आपण आत्मा हा अंतरीं । बोध जाहला ॥ ४१॥

त्या ब्रह्मबोधें ब्रह्मचि झाला । संसारखेद तो उडाला ।

देह प्रारब्धीं टाकिला । सावकाश ॥ ४२॥

यासि म्हणिजे आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान ।

परब्रह्मीं अभिन्न । भक्तचि जाहला ॥ ४३॥

आतां होणार तें होईना कां । आणि जाणार तें जाईना कां ।

तुटली मनांतील आशंका । जन्ममृत्यूची ॥ ४४॥

संसारीं पुंडावें चुकलें । देवां भक्तां ऐक्य झालें ।

मुख्य देवासि ओळखिलें । सत्संगेंकरूनी ॥ ४५॥

हरिः ऒं तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके

ब्रह्मप्रतिपादननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २॥

 

 

 

समास तीसरा : मायोद्भवनिरूपण

श्रीराम ॥

निर्गुण आत्मा तो निश्चळ । जैसें आकाश अंतराळ ।

घन दाट निर्मळ निश्चळ । सदोदित ॥ १॥

जें खंडलेंचि नाहीं अखंड । जें उदंडाहूनि उदंड ।

जें गगनाहूनि वाड । अति सूक्ष्म ॥ २॥

जें दिसेना ना भासेना । जें उपजेना ना नासेना ।

जें येईना ना जाईना । परब्रह्म तें ॥ ३॥

जें चळेना ना ढळेना । जें तुटेना ना फुटेना ।

जें रचेना ना खचेना । परब्रह्म तें ॥ ४॥

जें सन्मुखचि सर्वकाळ । जें निष्कलंक आणि निखळ ।

सर्वांतर आकाश पाताळ । व्यापूनि असे ॥ ५॥

अविनाश तें ब्रह्म निर्गुण । नासे तें माया सगुण ।

सगुण आणि निर्गुण । कालवलें ॥ ६॥

या कर्दमाचा विचार । करूं जाणती योगीश्वर ।

जैसें क्षीर आणि नीर । राजहंस निवडिती ॥ ७॥

जड सकळ पंचभौतिक । त्यामध्यें आत्मा व्यापक ।

तो नित्यानित्यविवेक । पाहतां कळे ॥ ८॥

उंसामधील घेईजे रस । येर तें सांडिजे बाकस ।

तैसा जगामध्यें जगदीश । विवेकें ओळखावा ॥ ९॥

रस नाशवंत पातळ । आत्मा शाश्वत निश्चळ ।

रस अपूर्ण आत्मा केवळ । परिपूर्ण जाणावा ॥ १०॥

आत्म्यासारिखें एक असावें । मग तें दृष्टांतासि द्यावें ।

दृष्टांतमिसे समजावें । कैसें तरी ॥ ११॥

ऐशी आत्मस्थिति संचली । तेथें माया कैशी झाली ।

जैशी आकाशीं वाहिली । झुळूक वायूची ॥ १२॥

वायूपासून तेज झालें । तेजापासून आप निपजलें ।

आपापासून आकारलें । भूमंडळ ॥ १३॥

भूमंडळापासून उत्पत्ती । जीव नेणों झाले किती ।

परंतु ब्रह्म आदि अंतीं । व्यापून आहे ॥ १४॥

जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें अवघेंचि नासलें ।

परी मुळीं ब्रह्म तें संचलें । जैसें तैसें ॥ १५॥

घटापूर्वीं आकाश असे । घटामध्येंही आकाश भासे ।

घट फुटतां न नासे । आकाश जैसें ॥ १६॥

तैसें परब्रह्म केवळ । अचळ आणि अढळ ।

मध्यें होत जात सकळ । सचराचर ॥ १७॥

जें जें कांहीं निर्माण झालें । तें तें आधीं ब्रह्में व्यापिलें ।

सर्व नासतां उरलें । अविनाश ब्रह्म ॥ १८॥

ऐसें ब्रह्म अविनाश । तें सेविती ज्ञाते पुरुष ।

तत्त्वनिरसनें आपणास । आपण लाभे ॥ १९॥

तत्त्वें तत्त्व मेळविलें । त्यासि देह ऐसें नाम ठेविलें ।

तें जाणते पुरुषीं शोधिलें । तत्त्वें तत्त्व ॥ २०॥

तत्त्वझाडा निःशेष होतां । तेथें निमाली देहाहंता ।

निर्गुण ब्रह्मीं ऐक्यता । विवेकें जाहली ॥ २१॥

विवेकें देहाकडे पाहिलें । तों तत्त्वें तत्त्व ओसरलें ।

आपण कांहीं नाहीं आलें । प्रत्ययासी ॥ २२॥

आपला आपण शोध घेतां । आपुली तों मायिक वार्ता ।

तत्त्वांतीं उरलें तत्त्वता । निर्गुण ब्रह्म ॥ २३॥

आपणाविण निर्गुण ब्रह्म । हेंचि निवेदनाचें वर्म ।

तत्त्वासरिसा गेला भ्रम । मीतूंपणाचा ॥ २४॥

मीपण पाहतां आढळेना । निर्गुण ब्रह्म तें चळेना ।

आपण तेंचि परी कळेना । सद्गुरूविण ॥ २५॥

सारासार अवघें शोधिलें । तों असार तें निघून गेलें ।

पुढें सार तें उरलें । निर्गुण ब्रह्म ॥ २६॥

आधीं ब्रह्म निरूपिलें । तेंचि सकळामध्यें व्यापिलें ।

सकळ अवघेंचि नासलें । उरलें तें केवळ ब्रह्म ॥ २७॥

होतां विवेकें संहार । तेथें निवडे सारासार ।

आपला आपणासि विचार । ठायीं पडे ॥ २८॥

आपण कल्पिलें मीपण । मीपण शोधितां नुरे जाण ।

मीपण गेलिया निर्गुण । आत्माचि स्वयें ॥ २९॥

झालिया तत्त्वांचें निरसन । निर्गुण आत्माचि आपण ।

कां दाखवावें मीपण । तत्त्वनिरसनाउपरी ॥ ३०॥

तत्त्वांमध्यें मीपण गेलें । तरी निर्गुण सहजचि उरलें ।

सोहंभावें प्रत्यया आलें । आत्मनिवेदन ॥ ३१॥

आत्मनिवेदन होतां । देवभक्तांस ऐक्यता ।

साचार भक्त विभक्तता । सांडूनि जाहला ॥ ३२॥

निर्गुणासि नाहीं जन्ममरण । निर्गुणासि नाहीं पाप पुण्य ।

निर्गुणीं अनन्य होतां आपण । मुक्त जाहला ॥ ३३॥

तत्त्वीं वेंटाळूनि घेतला । प्राणी संशयें गुंडाळला ।

आपणास आपण भुलला । कोहं म्हणे ॥ ३४॥

तत्त्वीं गुंतला म्हणे कोहं । विवेकें पाहतां म्हणे सोहं ।

अनन्य होतां अहं सोहं । मावळलीं ॥ ३५॥

याउपरि उर्वरित । तेंचि स्वरूप संत ।

देहीं असोनि देहातीत । जाणिजे ऐसा ॥ ३६॥

संदेहवृत्ति ते न भंगे । म्हणोनि बोलिलेंच बोलावें लागे ॥

आम्हांसि हें घडलें प्रसंगें । श्रोतीं क्षमा केली पाहिजे ॥ ३७॥

हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे षष्ठदशके

मायोद्भवनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३॥

जय जय रघुवीर समर्थ ॥

 

 

 

समास चवथा : ब्रह्मनिरूपण

श्रीराम ॥

कृतयुग सत्रा लक्ष अठ्ठावीस सहस्र । त्रेतायुग बारा लक्ष शाण्णव सहस्र ।

द्वापरयुग आठ लक्ष चौसष्ट सहस्र । आतां कलियुग ऐका ॥ १॥

कलियुग चार लक्ष बत्तीस सहस्र । चतुर्युगें त्रेचाळीस लक्ष वीस सहस्र ।

ऐशीं चतुर्युगें सहस्र । तो ब्रह्मयाचा एक दिवस ॥ २॥

ऐसे ब्रह्मे सहस्र देखा । तेव्हां विष्णूची एक घटिका ।

विष्णू सहस्र होतां ऐका । पळ एक ईश्वराचें ॥ ३॥

ईश्वर जाय सहस्र वेळ । तैं शक्तीचें अर्ध पळ ।

ऐशी संख्या बोलिली सकळ । शास्त्रांतरीं ॥ ४॥

चतुर्युगसहस्राणि दिनमेकंपितामहम् ।

पितामहसहस्राणि विष्णोर्घटिकमेव च ॥

विष्णोरेकः सहस्राणि पलमेकं महेश्वरम् ।

महेश्वरसहस्राणि शक्तेरर्धं पलं भवेत् ॥

ऐशा अनन्त शक्ती होती । अनंत रचना होती जाती ।

तरी अखंड खंडेना स्थिति । परब्रह्माची ॥ ५॥

परब्रह्मासि कैंची स्थिती । परी ही बोलावयाची रीती ।

वेदश्रुती नेति नेति म्हणती । परब्रह्मीं ॥ ६॥

चार सहस्र सातशें साठी । इतुकी कलियुगाची राहाटी ।

उरल्या कलियुगाची गोष्टी । ऐसी असे ॥ ७॥

चार लक्ष सत्तावीस सहस्र । दोनशें चाळीस संवत्सर ।

पुढें अन्योन्य वर्णसंकर । होणार आहे ॥ ८॥

ऐसें रचलें चराचर । येथें एकाहूनि एक थोर ।

पाहतां येथींचा विचार । अंत न लगे ॥ ९॥

एक म्हणती विष्णु थोर । एक म्हणती रुद्र थोर ।

एक म्हणती शक्ति थोर । सकळांमध्यें ॥ १०॥

ऐसे आपुलालेपरी बोलती । परंतु अवघेंचि नासेल कल्पांतीं ।

यद्दृष्टं तन्नष्टं हें श्रुति । बोलतसे ॥ ११॥

आपुलाली उपासना । अभिमान लागला जनां ।

याचा निश्चयो निवडेना । साधुविण ॥ १२॥

साधु निश्चयो करिती एक । आत्मा सर्वत्र व्यापक ।

येर हें अवघेंचि मायिक । चराचर ॥ १३॥

चित्रीं लिहिली सेना । त्यांत कोण थोर कोण साना ।

हें कां तुम्ही विचाराना । आपुलें ठायीं ॥ १४॥

स्वप्नीं उदंड देखिलें । लहान थोरही कल्पिलें ।

परंतु जागें झालिया झालें । कैसें पहा ॥ १५॥

पाहतां जागृतीचा विचार । कैंचें लहान कैंचें थोर ।

झाला अवघाचि विचार । स्वप्नरचनेचा ॥ १६॥

अवघाचि मायिक विचार । कैंचें लहान कैंचें थोर ।

लहानथोराचा हा निर्धार । जाणती ज्ञानी ॥ १७॥

जो जन्मास प्राणी आला । तो मी थोर म्हणतचि मेला ।

परी याचा विचार पाहिला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ १८॥

जयां झालें आत्मज्ञान । तेचि थोर महाजन ।

वेद शास्त्रें पुराण । साधु संत बोलिले ॥ १९॥

एवं सकळांमध्यें थोर । तो एकचि परमेश्वर ।

तयामध्यें हरिहर । होती जाती ॥ २०॥

तो निर्गुण निराकार । तेथें नाहीं उत्पत्ति स्थिति संहार ।

स्थानमानांचा विचार । ऐलिकडे ॥ २१॥

नांव रूप स्थान मान । हा तों अवघाचि अनुमान ।

तथापि होईल निदान । ब्रह्मप्रळयीं ॥ २२॥

ब्रह्म प्रळयावेगळें । ब्रह्म नामरूपावेगळें ।

ब्रह्म कोणा एक्या काळें । जैसें तैसें ॥ २३॥

करिती ब्रह्मनिरूपण । जाणती ब्रह्म संपूर्ण ।

तेचि जाणावे ब्राह्मण । ब्रह्मविद ॥ २४॥

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके ब्रह्मनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४॥

 

 

 

समास पांचवा : मायाब्रह्मनिरूपण

श्रीराम ॥

श्रोते पुसती ऐसें । मायाब्रह्म तें कैसें ।

श्रोत्या वक्‍त्याचे मिषें । निरूपण ऐका ॥ १॥

ब्रह्म निर्गुण निराकार । माया सगुण साकार ।

ब्रह्मासि नाहीं पारावार । मायेसि आहे ॥ २॥

ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपळ ।

ब्रह्म निरुपाधि केवळ । माया उपाधिरूप ॥ ३॥

माया दिसे ब्रह्म दिसेना । माया भासे ब्रह्म भासेना ।

माया नासे ब्रह्म नासेना । कल्पांतकाळीं ॥ ४॥

माया रचे ब्रह्म रचेना । माया खचे ब्रह्म खचेना ।

माया रुचे ब्रह्म रुचेना । अज्ञानासी ॥ ५॥

माया उपजे ब्रह्म उपजेना । माया मरे ब्रह्म मरेना ।

माया धरे ब्रह्म धरेना । धारणेसी ॥ ६॥

माया फुटे ब्रह्म फुटेना । माया तुटे ब्रह्म तुटेना ।

माया विटे ब्रह्म विटेना । अविट तें ॥ ७॥

माया विकारी ब्रह्म निर्विकारी । माया सर्व करी ब्रह्म कांहींच न करी ।

माया नाना रूपें धरी । ब्रह्म तें अरूप ॥ ८॥

माया पंचभौतिक अनेक । ब्रह्म तें शाश्वत एक ।

मायाब्रह्माचा विवेक । विवेकी जाणती ॥ ९॥

माया लहान ब्रह्म थोर । माया असार ब्रह्म सार ।

माया अर्ति पारावार । ब्रह्मासि नाहीं ॥ १०॥

सकळ माया विस्तारली । ब्रह्मस्थिति आच्छादिली ।

परी ते निवडून घेतली । साधुजनीं ॥ ११॥

गोंडाळ सांडून नीर घेइजे । नीर सांडून क्षीर सेविजे ।

माया सांडून अनुभविजे । परब्रह्म तैसें ॥ १२॥

ब्रह्म आकाशा ऐसें निवळ । माया वसुंधरा डहुळ ।

ब्रह्म सूक्ष्म केवळ । माया स्थूळरूप ॥ १३॥

ब्रह्म तें अप्रत्यक्ष असे । माया ते प्रत्यक्ष दिसे ।

ब्रह्म तें समचि असे । माया ते विषमरूप ॥ १४॥

माया लक्ष्य ब्रह्म अलक्ष्य । माया साक्ष ब्रह्म असाक्ष ।

मायेमध्यें दोन्ही पक्ष । ब्रह्मीं पक्षचि नाहीं ॥ १५॥

माया पूर्वपक्ष ब्रह्म सिद्धांत । माया असत् ब्रह्म सत् ।

ब्रह्मासि नाहीं करणें हित । मायेसि आहे ॥ १६॥

ब्रह्म अखंड घनदाट । माया पंचभौतिक पोंचट ।

ब्रह्म तें निरंतर निघोट । माया ते जुनी जर्जरी ॥ १७॥

माया घडे ब्रह्म घडेना । माया पडे ब्रह्म पडेना ।

माया विघडे ब्रह्म विघडेना । जैसें तैसें ॥ १८॥

ब्रह्म असतचि असे । माया निरसितांच निरसे ।

ब्रह्मास कल्पांत नसे । मायेसि असे ॥ १९॥

माया कठिण ब्रह्म कोमळ । माया अल्प ब्रह्म विशाळ ।

माया नसे सर्वकाळ । ब्रह्मचि असे ॥ २०॥

वस्तु नव्हे बोलिजे ऐशी । माया जैशी बोलिजे तैशी ।

काळ पावेना वस्तूसी । मायेसी झडपी ॥ २१॥

नाना रूप नाना रंग । तितुका मायेचा प्रसंग ।

माया भंगे ब्रह्म अभंग । जैसें तैसें ॥ २२॥

आतां असो हा विस्तार । चालत जातें सचराचर ।

तितुकी माया परमेश्वर । सबाह्य अभ्यंतरीं ॥ २३॥

सकळ उपाधींवेगळा । तो परमात्मा निराळा ।

जळीं असोन नातळे जळा । आकाश जैसें ॥ २४॥

मायाब्रह्मांचें विवरण । करितां चुके जन्ममरण ।

संतांसि गेलिया शरण । मोक्ष लाभे ॥ २५॥

अरे या संतांचा महिमा । बोलावया नाहीं सीमा ।

जयांचेनि जगदात्मा । अंतरींच होय ॥ २६॥

हरिॐतत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके मायाब्रह्मनिरूपणं नाम पंचमः समासः ॥ ५॥

जय जय रघुवीर समर्थ ॥

 

 

 

समास सहावा : सृष्टीकथन

श्रीराम ॥

सृष्टीपूर्वींच ब्रह्म असे । तेथें सृष्टि मुळींच नसे ।

आतां सृष्टि दिसत असे । ते सत्य कीं मिथ्या ॥ १॥

तुम्ही सर्वज्ञ गोसावी । माझी आशंका फेडावी ।

ऐसा श्रोता विनवी । वक्तयासी ॥ २॥

आतां ऐका प्रत्युत्तर । कथेसि व्हावें तत्पर ।

वक्ता सर्वज्ञ उदार । बोलता जाहला ॥ ३॥

जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन ।

येणें वाक्यें सत्यपण । सृष्टीस आलें ॥ ४॥

यद्दृष्टं तन्नष्टं येणें- । वाक्यें सृष्टि मिथ्यापणें ।

सत्य मिथ्या ऐसें कोणें । निवडावें ॥ ५॥

सत्य म्हणों तरी नासे । मिथ्या म्हणों तरी दिसे ।

आतां जैसें आहे तैसें । बोलिजेल ॥ ६॥

सृष्टीमध्यें बहु जन । अज्ञान आणि सज्ञान ।

म्हणोनियां समाधान । होत नाहीं ॥ ७॥

ऐका अज्ञानाचें मत । सृष्टि आहे ते शाश्वत ।

देव धर्म तीर्थ व्रत । सत्यचि आहे ॥ ८॥

बोले सर्वज्ञांचा राजा । मूर्खस्य प्रतिमापूजा ।

ब्रह्मप्रळयाच्या पैजा । घालूं पाहे ॥ ९॥

तंव बोले तो अज्ञान । तरी कां करिसी संध्या स्नान ।

गुरुभजन तीर्थाटन । कासया करावें ॥ १०॥

तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृन्दम् । वृन्दे वृन्दे तत्त्वचिन्तानुवादः ।

वादे वादे जायते तत्त्वबोधः । बोधे बोधे भासते चन्द्रचूडः ॥ १॥

ऐसें चन्द्रचूडाचें वचन । सद्गुरूचें उपासन ।

गुरुगीतानिरूपण । बोलिलें हरें ॥ ११॥

गुरूसि कैसें भजावें । आधीं तयासि ओळखावें ।

त्याचें समाधान घ्यावें । विवेकें स्वयें ॥ १२॥

ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ॥ १॥

गुरुगीतेचें वचन । ऐसें सद्गुरूचें ध्यान ।

तेथें सृष्टि मिथ्या भान । उरेल कैंचें ॥ १३॥

ऐसें सज्ञान बोलिला । सद्गुरु तो ओळखिला ।

सृष्टि मिथ्या ऐसा केला । निश्चितार्थ ॥ १४॥

श्रोता ऐसें न मानी कदा । अधिक उठिला विवादा ।

म्हणे कैसा रे गोविंदा । अज्ञान म्हणतोसी ॥ १५॥

जीवभूतः सनातनः । ऐसें गीतेचें वचन ।

तयासि तूं अज्ञान । म्हणतोसि कैसा ॥ १६॥

ऐसा श्रोता आक्षेप करी । विषाद मानिला अंतरीं ।

याचें प्रत्युत्तर चतुरीं । सावध परिसावें ॥ १७॥

गीतेंत बोलिला गोविंद । त्याचा न कळे तुज भेद ।

म्हणोनियां व्यर्थ खेद । वाहतोसि ॥ १८॥

अश्वत्थः सर्ववृक्षाणां । माझी विभूती पिंपळ । म्हणोनि बोलिला गोपाळ ।

वृक्ष तोडितां तत्काळ । तुटत आहे ॥ १९॥

नैनं छिंदंति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ १॥

शस्त्रांचेनि तुटेना । अग्नीचेनि जळेना ।

उदकामध्यें कालवेना । स्वरूप माझें ॥ २०॥

पिंपळ तुटे शस्त्रानें । पिंपळ जळे पावकानें ।

पिंपळ कालवे उदकानें । नाशवंत ॥ २१॥

तुटे जळे बुडे उडे । आतां ऐक्य कैसें घडे ।

म्हणोनि हें उजेडे । सद्गुरुमुखें ॥ २२॥

इन्द्रियाणां मनश्चास्मि' । कृष्ण म्हणे मन तो मी ।

तरी कां आवरावी ऊर्मी । चंचळ मनाची ॥ २३॥

ऐसें कृष्ण कां बोलिला । साधनमार्ग दाखविला ।

खडे मांडूनि शिकविला । ओनामा जेवीं ॥ २४॥

ऐसा आहे वाक्यभेद । सर्व जाणे तो गोविंद ।

देहबुद्धीचा विवाद । कामा नये ॥ २५॥

वेद शास्त्र श्रुति स्मृती । तेथें वाक्यभेद पडती ।

ते सर्वही निवडती । सद्गुरूचेनि वचनें ॥ २६॥

वेदशास्त्रांचें भांडण । शस्त्रें तोडी ऐसा कोण ।

हें निवडेना साधुविण । कदा कल्पांतीं ॥ २७॥

पूर्वपक्ष आणि सिद्धांत । शास्त्रीं बोलिला संकेत ।

याचा होय निश्चितार्थ । साधुमुखें ॥ २८॥

येर्ह्हवीं वादाचीं उत्तरें । एकाहूनि एक थोरें ।

बोलूं जातां अपारें । वेदशास्त्रें ॥ २९॥

म्हणोनि वादविवाद । सांडूनि कीजे संवाद ।

तेणें होय ब्रह्मानंद । स्वानुभवें ॥ ३०॥

एके कल्पनेचे पोटीं । होती जाती अनंत सृष्टी ।

तया सृष्टीची गोष्टी । साच केवीं ॥ ३१॥

कल्पनेचा केला देव । तेथें झाला दृढ भाव ।

देवालागीं येतां खेव । भक्त दुःखें दुखवला ॥ ३२॥

पाषाणाचा देव केला । एके दिवशीं भंगोनि गेला ।

तेणें भक्त दुखवला । रडे पडे आक्रंदे ॥ ३३॥

देव हारपला घरीं । एक देव नेला चोरीं ।

एक देव दुराचारीं । फोडिला बळें ॥ ३४॥

एक देव जापाणिला । एक देव उदकीं टाकिला ।

एक देव नेऊन घातला । पायांतळीं ॥ ३५॥

काय सांगों तीर्थमहिमा । मोडोनि गेला दुरात्मा ।

थोर सत्व होतें तें मा । काय जाहलें कळेना ॥ ३६॥

देव घडिला सोनारीं । देव ओतिला ओतारीं ।

एक देव घडिला पाथरीं । पाषाणाचा ॥ ३७॥

नर्मदा गंडिकातीरीं । देव पडिले लक्षवरी ।

त्यांची संख्या कोण करी । असंख्यात गोटे ॥ ३८॥

चक्रतीर्थीं चक्रांकित । देव असती असंख्यात ।

नाहीं मनीं निश्चितार्थ । एक देव ॥ ३९॥

बाण तांदळे ताम्रनाणें । स्फटिक देव्हारां पूजणें ।

ऐसे देव कोण जाणे । खरे कीं खोटे ॥ ४०॥

देव रेशिमाचा केला । तोही तुटोनियां गेला ।

आतां नवा नेम धरिला । मृत्तिकेच्या लिंगाचा ॥ ४१॥

आमचा देव बहु सत्य । आम्हांस आकांतीं पावत ।

पूर्ण करी मनोरथ । सर्वकाळ ॥ ४२॥

आतां याचें सत्त्व गेलें । प्राप्त होतें तें झालें ।

प्राक्तन नवचे पालटिलें । ईश्वराचेनि ॥ ४३॥

धातु पाषाण मृत्तिका । चित्रलेप काष्ठ देखा ।

तेथें देव कैंचा मूर्खा । भ्रांति पडिली ॥ ४४॥

हे आपुलाली कल्पना । प्राक्तना-ऐशीं फळें जाणा ।

परी त्या देवाचिया खुणा । वेगळ्याचि ॥ ४५॥

नानाशास्त्रविदो लोका नानादैवतपूजकाः ।

आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥ १॥

म्हणोनि हें माया भ्रमणें । सृष्टि मिथ्या कोटिगुणें ।

वेद शास्त्रें पुराणें । ऐशींच बोलती ॥ ४६॥

साधु संत महानुभाव । त्यांचा ऐसाचि अनुभव ।

पंचभूतातीत देव । सृष्टि मिथ्या ॥ ४७॥

सृष्टीपूर्वीं सृष्टि चालतां । सृष्टि अवघी संहारतां ।

शाश्वत देव तत्त्वतां । आदि अंतीं ॥ ४८॥

ऐसा सर्वांचा निश्चयो । यदर्थीं नाहीं संशयो ।

व्यतिरेक आणि अन्वयो । कल्पनारूप ॥ ४९॥

एके कल्पनेचे पोटीं । बोलिजेती अष्ट सृष्टि ।

तये सृष्टीची गोष्टी । सावध ऐका ॥ ५०॥

एक कल्पनेची सृष्टी । दुसरी शाब्दिक सृष्टी ।

तिसरी प्रत्यक्ष सृष्टी । जाणती सर्व ॥ ५१॥

चौथी चित्रलेप सृष्टी । पांचवी स्वप्नसृष्टी ।

साहावी गंधर्वसृष्टी । ज्वरसृष्टी सातवी ॥ ५२॥

आठवी दृष्टिबंधन । ऐशा अष्ट सृष्टि जाण ।

यांमध्ये श्रेष्ठ कोण । सत्य मानावी ॥ ५३॥

म्हणोन सृष्टी नाशवंत । जाणती संत महंत ।

सगुण भजावा निश्चित । निश्चयालागीं ॥ ५४॥

सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें ।

सारासारविचारें । संतसंगें ॥ ५५॥

आतां असो हें बहुत । संतसंगें केलें नेमस्त ।

येरवीं चित्त दुश्चित । संशयीं पडे ॥ ५६॥

तंव शिष्यें आक्षेपिलें । सृष्टी मिथ्या ऐसें कळलें ।

परी हें दृश्य अवघें नाथिलें । तरी दिसतें कां ॥ ५७॥

दृश्य प्रत्यक्ष दिसतें । म्हणोनि सत्यचि वाटतें ।

यासि काय करावें तें । सांगा स्वामी ॥ ५८॥

याचें प्रत्युत्तर भलें । पुढिले समासीं बोलिलें ।

श्रोतीं श्रवण केलें । पाहिजे पुढें ॥ ५९॥

एवं सृष्टि मिथ्या जाण । जाणोनि रक्षावें सगुण ।

ऐशी हे अनुभवाची खूण । अनुभवी जाणती ॥ ६०॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके सृष्टिकथानिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६॥

 

 

 

समास सातवा : सगुणभजन

श्रीराम ॥

ज्ञानें दृश्य मिथ्या झालें । तरी कां पाहिजे भजन केलें ।

तेणें काय प्राप्त झालें । हें मज निरूपावें ॥ १॥

ज्ञानाहून थोर असेना । तरी कां पाहिजे उपासना ।

उपासनेनें जनां । काय प्राप्त ॥ २॥

मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेचिना सगुण ।

भजन केलियाचा गुण । मज निरूपावा ॥ ३॥

जें प्रत्यक्ष नाशवंत । त्यासि भजावें किंनिमित्त ।

सत्य सांडून असत्य । कोणें भजावें ॥ ४॥

असत्याचा प्रत्ययो आला । तरी मग नेम कां लागला ।

सत्य सांडून गलबला । कासया करावा ॥ ५॥

निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यय येतो ।

सगुण काय देऊं पाहतो । सांगा स्वामी ॥ ६॥

सगुण नाशवंत ऐसें सांगतां । पुनः भजन करावें म्हणतां ।

तरी कासयासाठीं आतां । भजन करूं ॥ ७॥

स्वामीचे भिडेनें बोलवेना । येर्ह्हवीं हें कांहींच मानेना ।

साध्यचि झालिया साधना । कां प्रवर्तावें ॥ ८॥

ऐसें श्रोतयाचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें ।

याचें उत्तर ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९॥

सद्गुरु वचन प्रतिपालन । हेंचि मुख्य परमार्थाचें लक्षण ।

वचनभंग करितां विलक्षण । सहजचि जाहलें ॥ १०॥

म्हणोनि आज्ञेसि वंदावें । सगुण भजन मानावें ।

श्रोता म्हणे हें देवें । कां प्रयोजिलें ॥ ११॥

काय मानिला उपकार । कोण झाला साक्षात्कार ।

किंवा प्रारब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२॥

होणार हें तों पालटेना । भजनें काय करावें जना ।

हें तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३॥

स्वामीची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण ।

परंतु याचा काय गुण । मज निरूपावा ॥ १४॥

वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाची लक्षणें ।

तुज कांहीं लागे करणें । किंवा नाहीं ॥ १५॥

करणें लागे भोजन । करणें लागे उदकप्राशन ।

मळमूत्रत्यागलक्षण । तेंही सुटेना ॥ १६॥

जनाचें समाधान राखावें । आपुलें पारिखें ओळखावें ।

आणि भजनचि मोडावें । हें कोण ज्ञान ॥ १७॥

ज्ञान विवेकें मिथ्या झालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें ।

तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८॥

साहेबास लोटांगणीं जावें । नीचासारिखें व्हावें ।

आणि देवास न मानावें । हें कोण ज्ञान ॥ १९॥

हरि हर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक ।

तूं एक मानवी रंक । भजसि ना तरी काय गेलें ॥ २०॥

आमुचे कुळीं रघुनाथ । रघुनाथ आमुचा परमार्थ ।

जो समर्थाचाही समर्थ । देवां सोडविता ॥ २१॥

त्याचे आम्ही सेवकजन । सेवा करितां झालें ज्ञान ।

तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२॥

सद्गुरु सांगती सारासार । त्यास कैसें म्हणावें असार ।

तुज काय सांगणें विचार । शाहाणे जाणती ॥ २३॥

समर्थाचे मनींचें तुटे । तेंचि जाणावें अदृष्ट खोटें ।

राज्यपदापासून करंटें । चेवलें जैसें ॥ २४॥

मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी ।

विचार पाहतां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५॥

वस्तु भजन करीना । न करीं ऐसेंही म्हणेना ।

तरी जाणावी ती कल्पना । दडोन राहिली ॥ २६॥

ना तें ज्ञान ना तें भजन । उगाचि आला देहाभिमान ।

तेथें नाहीं कीं अनुमान । प्रत्ययो तुझा ॥ २७॥

तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें ।

तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना ऐसें ॥ २८॥

करी दुर्जनांचा संहार । भक्तजनांचा आधार ।

ऐसा हा चमत्कार । रोकडा चाले ॥ २९॥

मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोनि जातें ।

कृपा केलिया रघुनाथें । प्रचीति येते ॥ ३०॥

रघुनाथभजनें ज्ञान झालें । रघुनाथभजनें महत्व वाढलें ।

म्हणोनि तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१॥

हें तों आहे सप्रचीत । आणि तुज वाटेना प्रचित ।

साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥ ३२॥

रघुनाथ स्मरोन कार्य करावें । तें तत्काळचि सिद्धि पावे ।

कर्ता राम हें असावें । अभ्यंतरीं ॥ ३३॥

कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुण निवेदन ।

निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४॥

मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा ।

प्रतीत पाहसी तरी आतां । शीघ्रचि आहे ॥ ३५॥

मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।

राम कर्ता म्हणतां पावसी । यश कीर्ति प्रताप ॥ ३६॥

एके भावनेसाठीं । देवासि पडे तुटी ।

कां ते होय कृपादृष्टी । देव कर्ताभावितां ॥ ३७॥

आपण आहे दों दिवसांचा । आणि देव बहुतां काळांचा ।

आपण थोडे ओळखीचा । देवास त्रैलोक्य जाणे ॥ ३८॥

याकारणें रघुनाथ भजन । त्यासि मानिती बहुत जन ।

ब्रह्मादिक आदिकरून । रामभजनीं तत्पर ॥ ३९॥

ज्ञानबळें उपासना । अम्ही भक्त जरी मानूं ना ।

तरी या दोषाचिया पतना । पावों अभक्तपणें ॥ ४०॥

देव उपेक्षी थोरपणें । तरी मग त्याचें तोचि जाणे ।

अप्रमाण तें श्लाघ्यवाणें । नव्हेचि कीं श्रेष्ठा ॥ ४१॥

देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना ।

ऐशी स्थिति सज्जना । अंतरींची ॥ ४२॥

सकळ मिथ्या होऊन जातें । हें रामभजनें कळों येतें ।

दृश्य ज्ञानियांचें मतें । स्वप्न जैसें ॥ ४३॥

मिथ्या स्वप्नविवंचना । तैशी हे सृष्टिरचना ।

दृश्य मिथ्या साधुजनां । कळों आलें ॥ ४४॥

आक्षेप झाला श्रोतयांसी । मिथ्या तरी दिसतें कां आम्हासीं ।

याचें उत्तर पुढिलें समासीं । बोलिलें असे ॥ ४५॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके सगुणभजननिरूपणं नाम सप्तमः समासः ॥ ७॥

 

 

 

समास आठवा : दृश्यनिरूपण

श्रीराम ॥

मागां श्रोतीं पुसिलें होतें । दृश्य मिथ्या तरी कां दिसतें ।

त्याचें उत्तर बोलिजेल तें । सावधान ऐका ॥ १॥

देखिलें तें सत्यचि मानावें । हें ज्ञात्याचें देखणें नव्हे ।

जड मूढ अज्ञान जीवें । हें सत्य मानिजे ॥ २॥

एका देखिल्यासाठीं । लटिक्या कराव्या ग्रंथकोटी ।

संतमहंतांच्या गोष्टी । त्याही मिथ्या मानाव्या ॥ ३॥

माझें दिसतें हेंचि खरें । तेथें चालेना दुसरें ।

ऐशिया संशयाच्या भरें । भरोंचि नये ॥ ४॥

मृगें देखिलें मृगजळ । तेथें धांवे तें बरळ ।

जळ नव्हे मिथ्या सकळ । त्या पशूसि कोणें म्हणावें ॥ ५॥

रात्रौ स्वप्न देखिलें । बहुत द्रव्य सांपडलें ।

बहुत जनांसि वेव्हारिलें । तें खरें कैसेनि मानावें ॥ ६॥

कुशळ चितारी विचित्र । तेणें निर्माण केलें चित्र ।

देखतां उठे प्रीति मात्र । परंतु तेथें मृत्तिका ॥ ७॥

नाना वनिता हस्ती घोडे । रात्रौ देखतां मन बुडे ।

दिवसा पाहतां कातडें । कंटाळवाणें ॥ ८॥

काष्ठी पाषाणी पुतळ्या । नाना प्रकारें निर्मिल्या ।

परम सुंदर वाटल्या । परंतु तेथें पाषाण ॥ ९॥

नाना गोपुरीं पुतळ्या असती । वक्रांगें वक्रदृष्टीं पाहती ।

लाघव देखता भरे वृत्ती । परंतु तेथें त्रिभाग ॥ १०॥

खेळतां नेटके दशावतारी । तेथें येती सुंदर नारी ।

नेत्र मोडिती कळाकुसरीं । परी ते अवघे धटिंगण ॥ ११॥

सृष्टि बहुरंगी असत्य । बहुरूपाचें हें कृत्य ।

तुज वाटे दृश्य सत्य । परी हे जाण अविद्या ॥ १२॥

मिथ्या साचासारिखें देखिलें । परी तें पाहिजे विचारिलें ।

दृष्टि तरळतां भासलें । तें साच कैसें मानावें ॥ १३॥

वरी पाहतां पालथें आकाश । उदकीं पाहतां उताणें आकाश ।

मध्यें चांदण्याचाही प्रकाश । परी तें अवघें मिथ्या ॥ १४॥

नृपतीनें चितारी आणिले । ज्याचे त्या ऐसे पुतळे केले ।

पाहतां तेचि ऐसे गमले । परी ते अवघे मायिक ॥ १५॥

नेत्रीं कांहीं बाहुली नसे । जेव्हां जें पहावें तेव्हां तें भासे ।

डोळां प्रतिबिंब दिसे । तें साच कैसेनी ॥ १६॥

जितुके बुडबुडे उठती । तितुक्यांमध्यें रूपें दिसती ।

क्षणामध्यें फुटोनि जाती । रूपें मिथ्या ॥ १७॥

लघुदर्पणें दोनी चारी होतीं । तितुकीं मुखें प्रतिबिंबती ।

परी तीं मिथ्या आदिअंतीं । एकचि मुख ॥ १८॥

नदीतीरीं भार जातां । दुसरा भार दिसे पालथा ।

कां पडसादाचा अवचितां । गजर उठे ॥ १९॥

वापी सरोवरांचें नीर । तेथें पशु पक्षी नर वानर ।

नाना पत्रें वृक्ष विस्तार । दिसे दोहीं सवां ॥ २०॥

एक शस्त्र झाडूं जातां । दोन दिसती तत्त्वतां ।

नाना तंतु टणत्कारितां । द्विधा भासती ॥ २१॥

कां ते दर्पणाचे मंदिरीं । बैसली सभा दिसे दुसरी ।

बहुत दीपांचिये हारीं । बहुत छाया दिसती ॥ २२॥

ऐसें हें बहुविध भासे । साचासारिखें दिसे ।

परी हें सत्य म्हणोन कैसें । विश्वासावें ॥ २३॥

माया मिथ्या बाजीगिरी । दिसे साचाचिये परी ।

परी हे जाणत्यानें खरी । मानूंचि नये ॥ २४॥

लटिकें साचा ऐसे भावावें । तरी मग पारखी कासया असावें ।

एवं ये अविद्येचे गोवें । ऐसेचि असती ॥ २५॥

मनुष्यांची बाजीगिरी । बहुत जनां वाटे खरी ।

शेवट पाहतां निर्धारीं । मिथ्या होय ॥ २६॥

तैशीच माव राक्षसांची । देवांसही वाटे साची ।

पंचवटिकेसि मृगाची । पाठी घेतली रामें ॥ २७॥

पूर्वकाया पालटिती । एकाचेचि बहुत होती ।

रक्तबिंदीं जन्मती । रजनीचर ॥ २८॥

नाना पदार्थ फळेंचि झाले । द्वारकेमध्यें प्रवेशले ।

कृष्णें दैत्य किती वधिले । कपटरूपी ॥ २९॥

कैसें कपट रावणाचें । शिर केलें मावेचें ।

काळनेमीच्या आश्रमाचें । अपूर्व कैसें ॥ ३०॥

नाना दैत्य कपटमती । जे देवांसही नाटोपती ।

मग निर्माण होऊन शक्ती । संहार केला ॥ ३१॥

ऐसी राक्षसांची माव । जाणों न शकती देव ।

कपटविद्येचें लाघव । अघटित ज्यांचें ॥ ३२॥

मनुष्यांची बाजीगिरी । राक्षसांची वोडंबरी ।

भगवंताची नानापरी । विचित्र माया ॥ ३३॥

हे साचासारिखीच देइसे । विचारितांचि निरसे ।

मिथ्याच परी आभासे । निरंतर ॥ ३४॥

साच म्हणावी तरी हे नासे । मिथ्या म्हणावी तरी हे दिसे ।

दोहीं पदार्थीं अविश्वासे । सांगतां मन ॥ ३५॥

परंतु हें नव्हे साचार । मायेचा मिथ्या विचार ।

दिसतें हें स्वप्नाकार । जाण बापा ॥ ३६॥

तथापि असो तुजला । भासचि सत्य वाटला ।

तरी तेथें चुका पडिला । ऐक बापा ॥ ३७॥

दृश्यभास अविद्यात्मक । तुझाही देह तदात्मक ।

म्हणोनि हा विवेक । तेथें संचरला ॥ ३८॥

दृष्टीनें दृश्य देखिलें । मन भासावरी बैसलें ।

परी तें लिंगदेह झालें । अविद्यात्मक ॥ ३९॥

अविद्येनें अविद्या देखिली । म्हणोन गोष्टी विश्वासली ।

तुझी काया अवघी संचली । अविद्येची ॥ ४०॥

तेचि काया मी आपण । हें देहबुद्धीचें लक्षण ।

येणेंकरितां झालें प्रमाण । दृश्य अवघें ॥ ४१॥

इकडे सत्य मानिला देह । तिकडे दृश्य सत्य हा निर्वाह ।

दोंहींमध्यें हा संदेह । पैसावला बळें ॥ ४२॥

देहबुद्धी केली बळकट । आणि ब्रह्म पाहों गेला धीट ।

तों दृश्यानें रोधिली वाट । परब्रह्माची ॥ ४३॥

तेथें साच मानिलें दृश्याला । निश्चयचि बाणोनि गेला ।

पहा हो केवढा चुका पडिला । अकस्मात ॥ ४४॥

आतां असो हें बोलणें । ब्रह्म न पाविजे मीपणें ।

देहबुद्धीची लक्षणें । दृश्य भाविती ॥ ४५॥

अस्थींच्या देहीं मांसाचा गोळा । पाहेन म्हणे ब्रह्मींचा सोहळा ।

तो ज्ञाता नव्हे आंधळा । केवळ मूर्ख ॥ ४६॥

दृष्टीस दिसे मनास भासे । तितुकें काळांतरीं नासे ।

म्हणोनि दृश्यातीत असे । परब्रह्म तें ॥ ४७॥

परब्रह्म तें शाश्वत । माया तेचि अशाश्वत ।

ऐसा बोलिला निश्चितार्थ । नानाशास्त्रीं ॥ ४८॥

आतां पुढें निरूपण । देहबुद्धीचें लक्षण ।

चुका पडिला तो कोण । बोलिलें असे ॥ ४९॥

मी कोण हें जाणावें । मीपण त्यागून अनन्य व्हावें ।

मग समाधान तें स्वभावें । अंगीं बाणे ॥ ५०॥

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके दृश्यनिरसनं नाम अष्टमः समासः ॥ ८॥

 

 

श्री रघुवीर समर्थ ॥

समास नववा : सारशोधन

श्रीराम ॥

गुप्त आहे उदंड धन । काय जाणती सेवकजन ।

तयांस आहे तें ज्ञान । बाह्याकाराचें ॥ १॥

गुप्त ठेविले उदंड अर्थ । आणि प्रगट दिसती पदार्थ ।

शहाणे शोधिति स्वार्थ । अंतरीं असे ॥ २॥

तैसें दृश्य हें मायिक । पाहत असती सकळ लोक ।

परी जयांस ठाउका विवेक । ते अंतर जाणती ॥ ३॥

द्रव्य ठेऊन जळ सोडिलें । लोक म्हणती सरोवर भरलें ।

तयाचें अभ्यंतर कळलें । समर्थ जनांसी ॥ ४॥

तैसे ज्ञाते जे समर्थ । तिहीं ओळखिला परमार्थ ।

इतर ते करिती स्वार्थ । दृश्य पदार्थांचा ॥ ५॥

काबाडी वाहती काबाड । श्रेष्ठ भोगिती रत्नें जाड ।

हें जयांचें त्यांस गोड । कर्मयोगें ॥ ६॥

एक काष्ठस्वार्थ करिती । एक शुभा एकवटिती ।

तैसे नव्हेत कीं नृपती । सारभोक्ते ॥ ७॥

जयांस आहे विचार । ते सुखासनीं झाले स्वार ।

इतर ते जवळील भार । वाहतचि मेले ॥ ८॥

एक दिव्यान्नें भक्षिती । एक विष्ठा सावडिती ।

आपण वर्तल्याचा घेती । साभिमान ॥ ९॥

सार सेविजे श्रेष्ठीं । असार घेइजे वृथापुष्टीं ।

सारासाराची गोष्टी । सज्ञान जाणती ॥ १०॥

गुप्त परिस चिंतामणी । प्रगट खडे काचमणी ।

गुप्त हेम रत्नखाणी । प्रगट पाषाण मृत्तिका ॥ ११॥

अव्हाशंख अव्हावेल । गुप्त वनस्पती अमूल्य ।

एरंड धोत्रे बहुसाल । प्रगट शिंपी ॥ १२॥

कोठें दिसेना कल्पतरू । उदंड शेरांचा विस्तारू ।

पाहतां नाहीं मैलागरू । बोरी बाभळी उदंड ॥ १३॥

कामधेनु जाणिजे इंद्रें । सृष्टींत उदंड खिल्लारें ।

महद्भाग्य भोगिजे नृपवरें । इतरां कर्मानुसार ॥ १४॥

नाना व्यापार करिती जन । अवघेच म्हणती सकांचन ।

परंतु कुबेराचें महिमान । कोणासीच न ये ॥ १५॥

तैसा ज्ञानी योगीश्वर । गुप्तार्थलाभाचा ईश्वर ।

इतर ते पोटाचे किंकर । नाना मतें धुंडिती ॥ १६॥

तस्मात् सार तें दिसेना । आणि असार तें दिसे जनां ।

सारासारविवंचना । साधु जाणती ॥ १७॥

दिसेना जें गुप्त धन । तयास करणें लागे अंजन ।

गुप्त परमात्मा सज्जन । संगतीं शोधावा ॥ १९॥

रायाचें सान्निध्य होतां । सहजचि लाभे श्रीमंतता ।

तैसा हा सत्संग धरितां । सद्वस्तु लाभे ॥ २०॥

सद्वस्तूस लाभे सद्वस्तु । अव्यवस्थासि अव्यवस्थु ।

पाहतां प्रशस्तासि प्रशस्तु । विचार लाभे ॥ २१॥

म्हणोनि हें दृश्यजात । अवघें आहे अशाश्वत ।

परमात्मा अच्युत अनंत । तो या दृष्यावेगळा ॥ २२॥

दृश्यावेगळा दृश्याअन्तरीं । सर्वात्मा तो चराचरीं ।

विचार पाहतां अंतरीं । निश्चयो बाणे ॥ २३॥

संसारत्याग न करितां । प्रपंचौपाधि न सांडितां ।

जनांमध्ये सार्थकता । विचारेंचि होय ॥ २४॥

हें प्रचीतीचें बोलणें । विवेकें प्रचीत बाणे ।

प्रचीत पाहतील ते शहाणे । अन्यथा नव्हे ॥ २५॥

प्रचीत आणि अनुमान । उधार आणि रोकडें धन ।

मानसपूजा प्रत्यक्ष दर्शन । यास महदंतर ॥ २६॥

पुढें जन्मांतरीं होणार । हा तो अवघाच उधार ।

तैसें नव्हे सारासार । तत्काळ लभे ॥ २७॥

तत्काळचि लाभ होतो । प्राणी संसारीं सुटतो ।

संशय अवघाचि तुटतो । जन्ममरणांचा ॥ २८॥

याचि जन्में येणेंचि काळें । संसारीं होइजे निराळें ।

मोक्ष पाविजे निश्चळें । स्वरूपाकारें ॥ २९॥

ये गोष्टीस करी अनुमान । तो शीघ्रचि पावेल पतन ।

मिथ्या वदेल त्यास आण । उपासनेची ॥ ३०॥

हें यथार्थचि आहे बोलणें । विवेकें शीघ्रचि मुक्त होणें ।

असोनि कांहींच नसणें । जनांमध्यें ॥ ३१॥

देवपद आहे निर्गुण । देवपदीं अनन्यपण ।

हाचि अर्थ पाहतां पूर्ण । समाधान बाणे ॥ ३२॥

देहींच विदेह होणें । करून कांहींच न करणें ।

जीवन्मुक्तांचीं लक्षणें । जीवन्मुक्त जाणती ॥ ३३॥

येरवीं हें खरें न वाटे । अनुमानेंचि संदेह वाटे ।

संदेहाचें मूळ तुटे । सद्गुरुवचनें ॥ ३४॥

हरि ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके सारशोधननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९॥

 

 

जय जय रघुवीर समर्थ ॥

समास दहावा : अनुर्वाच्यनिरूपण

श्रीराम ॥

समाधान पुसतां कांहीं । म्हणती बोलिजे ऐसें नाहीं ।

तरी तें कैसें आहे सर्वही । मज निरूपावें ॥ १॥

मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला ।

याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥ २॥

अनुभवही पुसों जातां । म्हणती न ये कीं सांगतां ।

तरी कोणापाशीं पुसों आतां । समाधान ॥ ३॥

जे ते अगम्य सांगती । न ये माझिया प्रचीती ।

विचार बैसे माझे चित्तीं । ऐसें करावें ॥ ४॥

ऐसें श्रोतयाचें उत्तर । याचें कैसें प्रत्युत्तर ।

निरूपिजेल तत्पर । होऊन ऐका ॥ ५॥

जें समाधानाचें स्थळ । कीं तो अनुभवचि केवळ ।

तेंचि स्वरूप प्रांजळ । बोलून दाऊं ॥ ६॥

जें बोलास आकळेना । बोलिल्याविणही कळेना ।

जयास कल्पितां कल्पना । हिंपुटी होय ॥ ७॥

तें जाणावें परब्रह्म । जें वेदांचें गुह्य परम ।

धरितां संत समागम । सर्वही कळे ॥ ८॥

तेंचि आतां सांगिजेल । जें समाधान सखोल ।

ऐक अनुभवाचे बोल । अनिर्वाच्य वस्तु ॥ ९॥

सांगतां न ये तें सांगणें । गोडी कळावया गूळ देणें ।

ऐसें हें सद्गुरुविणें । होणार नाहीं ॥ १०॥

सद्गुरुकृपा कळे त्यासी । जो शोधील आपणासी ।

पुढें कळेल अनुभवासी । आपेंआप वस्तु ॥ ११॥

दृढ करूनियां बुद्धि । आधीं घ्यावी आपुली शुद्धी ।

तेणें लागे समाधी । अकस्मात ॥ १२॥

आपुलें मूळ बरें शोधितां । आपुली तों मायिक वार्ता ।

पुढें वस्तूच तत्त्वतां । समाधान ॥ १३॥

आत्मा आहे सर्वसाक्षी । हें बोलिजे पूर्वपक्षीं ।

जो कोणी सिद्धांत लक्षी । तोचि साधु ॥ १४॥

सिद्धांत वस्तु लक्षूं जातां । सर्वसाक्षिणी ते अवस्था ।

आत्मा त्याहून परता । अवस्थातीत ॥ १५॥

पदार्थज्ञान जेव्हां सरे । द्रष्टा द्रष्टेपणें नुरे ।

ते समयीं फुंज उतरे । मीपणाचा ॥ १६॥

जेथें मुरालें मीपण । तेचि अनुभवाची खूण ।

अनिर्वाच्य समाधान । याकारणें बोलिजे ॥ १७॥

अत्यंत विचाराचे बोल । तरी ते मायिकचि फोल ।

शब्द सबाह्य सखोल । अर्थचि अवघा ॥ १८॥

शब्दाकरितां कळे अर्थ । अर्थ पाहतां शब्द व्यर्थ ।

शब्द सांगें तें यथार्थ । परी आपण मिथ्या ॥ १९॥

शब्दाकरितां वस्तु भासे । वस्तु पाहतां शब्द नासे ।

शब्द फोल अर्थ असे । घनदाटपणें ॥ २०॥

भूसाकरितां धान्य निपजे । धान्य घेऊन भूस टाकिजे ।

तैसा भूस शब्द जाणिजे । अर्थ धान्य ॥ २१॥

पोंचटामध्यें घनवट । घनवटीं उडे पोंचट ।

तैसा शब्द हा फलकट । परब्रह्मीं ॥ २२॥

शब्द बोलूनि राहे । अर्थ शब्दापूर्वींच आहे ।

याकारणें न साहे । उपमा तया अर्थासी ॥ २३॥

भूस सांडून कण घ्यावा । तैसा वाच्यांश त्यजावा ।

कण लक्ष्यांश लक्षावा । शुद्ध स्वानुभवें ॥ २४॥

दृश्यावेगळें बोलिजे । त्यास वाच्यांश म्हणिजे ।

त्याचा अर्थ तो जाणिजे । शुद्ध लक्ष्यांश ॥ २५॥

ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश । तोचि जाणावा पूर्वपक्ष ।

स्वानुभव तो अलक्ष्य । लक्षिला न वचे ॥ २६॥

जेथें गाळून सांडिलें नभा । जो अनुभवाचा गाभा ।

ऐसा तोही उभा । कल्पित केला ॥ २७॥

मिथ्या कल्पनेपासून झाला । खरेंपण कैसें असेल त्याला ।

म्हणोनि तेथें अनुभवाला । ठावचि नाहीं ॥ २८॥

दुजेविण अनुभव । हें बोलणेंचि तों वाव ।

याकारणें नाहीं ठाव । अनुभवासी ॥ २९॥

अनुभवें त्रिपुटी उपजे । अद्वैतीं द्वैतचि लाजे ।

म्हणोनियां बोलणें साजे । अनिर्वाच्य ॥ ३०॥

दिवसरजनीचें परिमित । करावया मूळ आदित्य ।

तो आदित्य गेलिया उर्वरित । त्यासि काय म्हणावें ॥ ३१॥

शब्द मौनाचा विचार । व्हावया मूळ ओंकार ।

तो ओंकार गेलिया उच्चार । कैसा करावा ॥ ३२॥

अनुभव आणि अनुभविता । सकळ ये मायेचि करितां ।

ते माया मुळींच नसतां । त्यास काय म्हणावें ॥ ३३॥

वस्तु एक आपण एक । ऐशी असती वेगळीक ।

तरी अनुभवाचा विवेक । बोलों येता मुखें ॥ ३४॥

वेगळेपणाची माता । ते लटिकी वंध्येची सुता ।

म्हणूनियां अभिन्नता । मुळींच आहे ॥ ३५॥

अजन्मा होता निजला । तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला ।

सद्गुरूसी शरण गेला । संसारदुःखें ॥ ३६॥

सद्गुरुकृपेस्तव । झाला संसार वाव ।

ज्ञान झालिया ठाव । पुसे अज्ञानाचा ॥ ३७॥

आहे तितुकें नाहीं झालें । नाहीं नाहींपणें निमालें ।

आहे नाहीं जाऊन उरलें । नसोन कांहीं ॥ ३८॥

शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान । तेणें झालें समाधान ।

ऐक्यरूपें अभिन्न । सहजस्थिति ॥ ३९॥

अद्वैतनिरूपण होतां । निमाली द्वैताची वार्ता ।

ज्ञानचर्चा बोलों जातां । जागृति आली ॥ ४०॥

श्रोतीं व्हावें सावधान । अर्थीं घालावें मन ।

खुणे पावतां समाधान । अंतरीं कळे ॥ ४१॥

तेणें जितुकें ज्ञान कथिलें । तितुकें स्वप्नावारीं गेलें ।

अनिर्वाच्य सुख उरलें । शब्दातीत ॥ ४२॥

तेथें शब्देंविण ऐक्यता । अनुभव ना अनुभविता ।

ऐसा निवांत तो मागुता । जागृती आला ॥ ४३॥

तेणें स्वप्नीं स्वप्न देखिला । जागा होऊन जागृतीस आला ।

तेथें तर्क कुंठित जाहला । अंत न लगे ॥ ४४॥

या निरूपणाचें मूळ । केलेंच करूं प्रांजळ ।

तेणें अंतरीं निवळ । समाधान कळे ॥ ४५॥

तंव शिष्यें विनविलें । जी हें आतां निरूपिलें ।

तरी पाहिजे बोलिलें । मागुतें स्वामी ॥ ४६॥

मज कळाया कारण । केलेंच करावें निरूपण ।

तेथील जे का निजखूण । ते मज अनुभवावी ॥ ४७॥

अजन्मा तो सांगा कवण । तेणें देखिला कैसा स्वप्न ।

येथें कैसें निरूपण । बोलिलें आहे ॥ ४८॥

जाणोनि शिष्याचा आदर । स्वामी देती प्रत्युत्तर ।

तेंचि आतां अति तत्पर । श्रोतीं येथें परिसावें ॥ ४९॥

ऐक शिष्या सावधान । अजन्मा तो तूंचि जण ।

तुवां देखिला स्वप्नीं स्वप्न । तोही आतां सांगतों ॥ ५०॥

स्वप्नीं स्वप्नाचा विचार । तो तूं जाण हा संसार ।

तेथें तुवां सारासार । विचार केला ॥ ५१॥

रिघोनि सद्गुरूसी शरण । काढून शुद्ध निरूपण ।

याची करिसी उणखूण । प्रत्यक्ष आतां ॥ ५२॥

याचाचि घेतां अनुभव । बोलणें तितुकें होतें वाव ।

निवांत विश्रांतीचा ठाव । ते तूं जाण जागृती ॥ ५३॥

ज्ञानगोष्टीचा गलबला । सरोन अर्थ प्रगटला ।

याचा विचार घेतां आला । अंतरीं अनुभव ॥ ५४॥

तुज वाटे हे जागृती । मज झाली अनुभवप्राप्ती ।

या नांव केवळ भ्रांती । फिटलीच नाहीं ॥ ५५॥

अनुभव अनुभवीं विराला । अनुभवेंविण अनुभव आला ।

हाही स्वप्नींचा चेइला । नाहींस बापा ॥ ५६॥

जागा झालिया स्वप्नऊर्मी । स्वप्नीं म्हणसी अजन्मा तो मी ।

जागेपणीं स्वप्नऊर्मी । गेलीच नाहीं ॥ ५७॥

स्वप्नीं वाटे जागेपण । तैशी अनुभवाची खूण ।

आली परी तें सत्य स्वप्न । भ्रमरूप ॥ ५८॥

जागृति यापैलीकडे । तें सांगणें केवीं घडे ।

जेथें धारणाचि मोडे । विवेकाची ॥५९॥

म्हणोनि तें समाधान । बोलतांचि न ये ऐसें जाण ।

निःशब्दाची ऐशी खूण । ओळखावी ॥ ६०॥

ऐसें आहे समाधान । बोलतांच न ये जाण ।

इतुकेनें बाणली खूण । निःशब्दाची ॥ ६१॥

हरिः ॐ तत्सत् इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

षष्ठदशके अनिर्वाच्यनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १०॥

॥ दशक सहावा समाप्त ॥

 

दशक ७ वा  -->