संतसाहित्य

Navigation

दशक ५ वा


दशक ४ था

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥ मंत्रांचा पंचम दशक ॥ ५॥

समास पहिला : गुरुनिश्चय

॥ श्रीराम ॥

जय जज जी सद्‍गुरु पूर्णकामा । परमपुरुषा आत्मयारामा ।

अनुर्वाच्य तुमचा महिमा । वर्णिला न वचे ॥ १॥

जें वेदांस सांकडें । जें शब्दासि कानडें ।

तें सत्शिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २॥

जें योगियांचें निजवर्म । जें शंकराचें निजधाम ।

जें विश्रांतीचें निजविश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३॥

तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणचि हो‍ईजे आंगें ।

दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेना सर्वथा ॥ ४॥

आतां स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें ।

सांगिजेती तेणें प्रमाणें - । मुमुक्षें शरण जावें ॥ ५॥

गुरु तों सकळांसी ब्राह्मण । जर्ह्हीं तो जाला क्रियाहीन ।

तरी तयासीच शरण । अनन्यभावें असावें ॥ ६॥

अहो या ब्राह्मणाकारणें । अवतार घेतला नारायेणें ।

विष्णूनें श्रीवत्स मिरविणें । तेथें इतर ते किती ॥ ७॥

ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्रांचे ब्राह्मण ।

धातुपाषाणीं देवपण । ब्राह्मणचेनि मंत्रें ॥ ८॥

मुंजीबंधनेंविरहित । तो शूद्रचि निभ्रांत ।

द्विजन्मी म्हणोनि सतंत । द्विज ऐसें नाम त्याचें ॥ ९॥

सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण ।

वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १०॥

ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें ।

कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११॥

ब्राह्मण वेद मूर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत ।

पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरूनी ॥ १२॥

ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती- । हो‍ऊन, जडे भगवंतीं ।

ब्राह्मणतीर्थे उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३॥

लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण ।

परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४॥

असो ब्राह्मणा सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती ।

जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥

अंत्येज शब्दज्ञाता बरवा । परी तो ने‍ऊन कायी करावा ।

ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तों न घडे कीं ॥ १६॥

जें जनावेगळें केलें । तें वेदें अव्हेरिलें ।

म्हणोनि तयासि नाम ठेविलें । पाषांडमत ॥ १७॥

असो जे हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विस्वास ।

ब्राह्मणभजनें बहुतांस । पावन केलें ॥ १८॥

ब्राह्मणें पाविजे देवाधिदेवा । तरी किमर्थ सद्‍गुरु करावा ।

ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्‍गुरुविण नाहीं ॥ १९॥

स्वधर्मकर्मी । म् पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्‍गुरुविण ।

ब्रह्मज्ञान नस्तां सीण । जन्ममृत्य चुकेना ॥ २०॥

सद्‍गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।

अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहातचि गेले ॥ २१॥

ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ जालें ।

म्हणौनि सद्‍गुरूचीं पा‍ऊलें । सुधृढ धरावीं ॥ २२॥

जयास वाटे देव पाहावा । तेणें सत्संग धरावा ।

सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥ २३॥

नाना साधनें बापुडीं । सद्‍गुरुविण करिती वेडीं ।

गुरुकृपेविण कुडकुडीं । वेर्थचि होती ॥ २४॥

कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।

गोरांजनें धूम्रपानें । साधिती पंचाग्नी ॥ २५॥

हरिकथा पुराणश्रवण । आदरें करिती निरूपण ।

सर्व तीर्थें परम कठिण । फिरती प्राणी ॥ २६॥

झळफळित देवतार्चनें । स्नानें संध्या दर्भासनें ।

टिळे माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७॥

अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें । मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें ।

नाना प्रकारीचीं उपकर्णें । साहित्यशोभा ॥ २८॥

घंटा घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती ।

आसनें मुद्रा ध्यानें करिती । प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९॥

पंचायेत्न पूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें लाखोली ।

बेलें नारिकेळें भरिली । संपूर्ण सांग पूजा ॥ ३०॥

उपोषणें निष्ठा नेम । परम सायासीं केलें कर्म ।

फळचि पावती, वर्म- । चुकले प्राणी ॥ ३१॥

येज्ञादिकें कर्में केलीं । हृदईं फळाशा कल्पिली ।

आपले इछेनें घेतली । सूति जन्मांची ॥ ३२॥

करूनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास ।

रिद्धि सिद्धि सावकास । वोळल्या जरी ॥ ३३॥

तरी सद्‍गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित ।

येमेपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ ३४॥

जंव नाहीं ज्ञानप्राप्ती । तंव चुकेना यातायाती ।

गुरुकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५॥

ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ती भाव आणी भजन ।

सकळहि फोल ब्रह्मज्ञान - । जंव तें प्राप्त नाहीं ॥ ३६॥

सद्‍गुरुकृपा न जोडे । आणी भलतीचकडे वावडे ।

जैसें आंधळें चाचरोन पडे । गारीं आणी गडधरां ॥ ३७॥

जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान ।

तैसें सद्‍गुरुवचनें ज्ञान- । प्रकाश होये ॥ ३८॥

सद्‍गुरुविण जन्म निर्फळ । सद्‍गुरुविण दुःख सकळ ।

सद्‍गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९॥

सद्‍गुरुचेनि अभयंकरें । प्रगट हो‍ईजे ईश्वरें ।

संसारदुःखें अपारें । नासोन जाती ॥ ४०॥

मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्वर ।

तयांसहि ज्ञानविज्ञानविचार । सद्‍गुरुचेनी ॥ ४१॥

श्रीरामकृष्ण आदिकरूनी । अतितत्पर गुरुभजनीं ।

सिद्ध साधु आणी संतजनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२॥

सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रह्मादिक ।

तेहि सद्‍गुपदीं रंक । महत्वा न चढेती ॥ ४३॥

असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सद्‍गुरु करावा ।

सद्‍गुरुविण मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ ४४॥

आतां सद्‍गुरु ते कैसे । नव्हेति इतरां गुरु ऐसे ।

जयांचे कृपेनें प्रकाशे । शुद्ध ज्ञान ॥ ४५॥

त्या सद्‍गुरूची वोळखण । पुढिले समासीं निरूपण ।

बोलिलें असे श्रोतीं श्रवण । अनुक्रमें करावें ॥ ४६॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्चयेनाम

समास पहिला ॥ १॥

 

 

समास दुसरा : गुरुलक्षण

॥ श्रीराम् ॥

जे करामती दाखविती । तेहि गुरु म्हणिजेती ।

परंतु सद्‍गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १॥

सभामोहन भुररीं चेटकें । साबरमंत्र कौटालें अनेकें ।

नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २॥

सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ।

दृष्टिबंधनें लागवेग । अभिळाषाचा ॥ ३॥

साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान ।

नाना वाद्यें सिकविती जन । तेहि येक गुरु ॥ ४॥

विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी ।

कां पोट भरे जयावरी । ते विद्या सिकविती ॥ ५॥

जो यातीचा जो व्यापार । सिकविती भरावया उदर ।

तेहि गुरु परी साचार- । सद्‍गुरु नव्हेती ॥ ६॥

आपली माता आणी पिता । तेहि गुरुचि तत्वतां ।

परी पैलापार पावविता । तो सद्‍गुरु वेगळा ॥ ७॥

गाईत्रीमंत्राचा इचारू । सांगे तो साचार कुळगुरु ।

परी ज्ञानेंविण पैलपारु । पाविजेत नाहीं ॥ ८॥

जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानांधारें निरसी ।

जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९॥

विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत ।

तया देवभक्तां येकांत- । करी, तो सद्‍गुरु ॥ १०॥

भवव्याघ्रें घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी ।

केली, देखोनि सीघ्र सोडी । तो सद्‍गुरु जाणावा ॥ ११॥

प्राणी मायाजाळीं पडिलें । संसारदुःखें दुःखवलें ।

ऐसें जेणें मुक्त केलें । तो सद्‍गुरु जाणावा ॥ १२॥

वासनानदीमाहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी ।

तेथें उडी घालूनि तारी । तो सद्‍गुरु जाणावा ॥ १३॥

गर्भवास अति सांकडी । इछाबंधनाची बेडी ।

ज्ञान दे‍ऊन सीघ्र सोडी । तो सद्‍गुरु स्वामी ॥ १४॥

फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार ।

तोचि गुरु माहेर । अनाथांचें ॥ १५॥

जीव येकदेसी बापुडें । तयास ब्रह्मचि करी रोकडें ।

फेडी संसारसांकडे । वचनमात्रें ॥ १६॥

जें वेदांचे अभ्यांतरीं । तें काढून अपत्यापरी ।

शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्‍गारवचनें ॥ १७॥

वेद शास्त्र माहानुभाव । पाहातां येकचि अनुभव ।

तोचि येक गुरुराव । ऐक्यरूपें ॥ १८॥

संदेह निःशेष जाळी ॥ स्वधर्म आदरें प्रतिपाळी ।

वेदविरहित टवाळी । करूंच नेणे ॥ १९॥

जें जें मन अंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी ।

तो गुरु नव्हे, भिकारी- । झडे आला ॥ २०॥

शिष्यास न लविती साधन । न करविती इंद्रियेंदमन ।

ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २१॥

जो कोणी ज्ञान बोधी । समूळ अविद्या छेदी ।

इंद्रियेंदमन प्रतिपादी । तो सद्‍गुरु जाणावा ॥ २२॥

येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले ।

अतिदुराशेनें केले । दीनरूप ॥ २३॥

जें जें रुचे शिष्यामनीं । तैसीच करी मनधरणी ।

ऐसी कामना पापिणी । पडली गळां । २४॥

जो गुरु भीडसारु । तो अद्धमाहून अद्धम थोरु ।

चोरटा मंद पामरु । द्रव्यभोंदु ॥ २५॥

जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी ।

आणी सेखीं भीड करी । घातघेणा ॥ २६॥

तैसा गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा ।

भीड करूनियां, गोवा- । घाली बंधनाचा ॥ २७॥

जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणी स्थूळ क्रियेचें साधन ।

तोचि सद्‍गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८॥

देखणें दाखविती आदरें । मंत्र फु । म्किती कर्णद्वारें ।

इतुकेंच ज्ञान, तें पामरें- । अंतरलीं भगवंता ॥ २९॥

बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण ।

तेथेंचि रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षें ॥ ३०॥

अद्वैतनिरूपणीं अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता ।

ऐसिया गुरूचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१॥

जैसा निरूपणसमयो । तैसेंचि मनहि करी वायो ।

कृतबुद्धीचा जयो । जालाच नाहीं ॥ ३२॥

निरूपणीं सामर्थ्य सिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी ।

नाना चमत्कारें बुद्धी । दंडळूं लागे ॥ ३३॥

पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत ।

आणी सामर्थ्यहि अद्‍भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४॥

ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ ।

ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५॥

निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे ।

दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥ ३६॥

बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं ।

कामना इच्छितांच मेलीं । बापुडीं मूर्खें ॥ ३७॥

निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत ।

अवघ्यांवेगळें मत । अक्षै ज्याचें ॥ ३८॥

अक्षै ठेवा सकळांचा । परी पांगडा फिटेना शरीराचा ।

तेणें मार्ग ईश्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९॥

सिद्धि आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्यें देहास महत्त्व आलें ।

तेणें वेंचाड वळकावलें । देहबुद्धीचें ॥ ४०॥

सांडूनि अक्षै सुख । सामर्थ्य इछिती ते मूर्ख ।

कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नाहीं ॥ ४१॥

ईश्वरेंविण जे कामना । तेणींचि गुणें नाना यातना ।

पावती, होती पतना- । वरपडे प्राणी ॥ ४२॥

होतां शरीरासी अंत । सामर्थ्यहि निघोन जात ।

सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३॥

म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु ।

तोचि सद्‍गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४॥

मुख्य सद्‍गुरूचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।

निश्चयाचें समाधान । स्वरूपस्थिती ॥ ४५॥

याहीवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।

विशेष आचारें निर्मळ । स्वधर्मविषईं ॥ ४६॥

याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरूपण ।

जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७॥

जेथें सारासारविचार । तेथें होये जगोद्धार ।

नवविधा भक्तीचा आधार । बहुता जनासी ॥ ४८॥

म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठलें साधन ।

हें सद्‍गुरूचें लक्षण । श्रोतीं वोळखावें ॥ ४९॥

अंतरीं शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन ।

तेथें बहु भक्त जन । विश्रांति पावती ॥ ५०॥

नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार ।

कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१॥

म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन ।

कथा निरूपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२॥

यामधें येक उणें असे । तेणें तें विलक्षण दिसे ।

म्हणौन सर्वहि विलसे । सद्‍गुरुपासीं ॥ ५३॥

तो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता ।

नाना साधनें समर्था । सद्‍गुरुपासीं ॥ ५४॥

साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे । तो मागुतां सवेंच भ्रष्टे ।

याकारणे दुरीद्रष्टे । माहानुभाव ॥ ५५॥

आचार उपासना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती ।

जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ ५६॥

कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाधेसि जाला ठाव ।

तो कानकोंडा समुदाव । प्रपंची हांसती ॥ ५७॥

नीच यातीचा गुरु । तोही कानकोंड विचारु ।

ब्रह्मसभेस जैसा चोरू । तैसा दडे ॥ ५८॥

ब्रह्मसभे देखतां । त्याचें तीर्थ नये घेतां ।

अथवा प्रसाद सेवितां । प्राश्चित पडे ॥ ५९॥

तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली ।

गुरुभक्ति ते सटवली । येकायेकी ॥ ६०॥

गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्वतां ।

तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१॥

ऐसीं सांकडीं दोहींकडे । तेथें प्रस्तावा घडे ।

नीच यातीस गुरुत्व न घडे । याकारणें ॥ ६२॥

तथापि आवडी घेतली जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें ।

बहुत जनांसी भ्रष्टवावें । हें तों दूषणचि कीं ॥ ६३॥

आतां असो हा विचारू । स्वयातीचा पाहिजे गुरु ।

नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्त घडे ॥ ६४॥

जे जे कांहीं उत्तम गुण ॥ तें तें सद्‍गुरूचें लक्षण ।

तथापि संगों वोळखण । होये जेणें ॥ ६५॥

येक गुरु येक मंत्रगुरु । येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु ।

येक वस्तादगुरु येक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६॥

येक कुळगुरु येक मानिला गुरु । येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु ।

येक असद्‍गुरु येक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७॥

येक मातागुरु येक पितागुरु । येक राजागुरु येक देवगुरु ।

येक बोलिजे जगद्‍गुरु । सकळकळा ॥ ६८॥

ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणीक गुरु ।

ऐक तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९॥

येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । येक म्हणती प्रतिमागुरु ।

येक म्हणती स्वयें गुरु । आपला आपण ॥ ७०॥

जे जे यातीचा जो व्यापारु । ते ते त्याचे तितुके गुरु ।

याचा पाहातां विचारु । उदंड आहे ॥ ७१॥

असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु ।

परी जो मोक्षदाता सद्‍गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२॥

नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण ।

हें सद्‍गुरूचें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुलक्षणनाम

समास दुसरा ॥ २॥

 

 

समास तिसरा : शिष्यलक्षण

॥ श्रीराम् ॥

माअगां सद्‍गुरूचें लक्षण । विशद केलें निरूपण ।

आतां सच्छिष्याची वोळखण । सावध ऐका ॥ १॥

सद्‍गुरुविण सच्छिष्य । तो वायां जाय निशेष ।

कां सच्छिष्येंविण विशेष । सद्‍गुरु सिणे ॥ २॥

उत्तमभूमि शोधिली शुद्ध । तेथें बीज पेरिलें किडखाद ।

कां तें उत्तम बीज परी समंध । खडकेंसि पडिला ॥ ३॥

तैसा सच्छिष्य तें सत्पात्र । परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र ।

तेथें अरत्र ना परत्र । कांहिंच नाहीं ॥ ४॥

अथवा गुरु पूर्ण कृपा करी । परी शिष्य अनाधिकारी ।

भाअग्यपुरुषाचा भिकारी । पुत्र जैसा ॥ ५॥

तैसें येकाविण येक । होत असे निरार्थक ।

परलोकींचें सार्थक । तें दुर्ह्हावे ॥ ६॥

म्हणौनि सद्‍गुरु आणी सच्छिष्य । तेथें न लगती सायास ।

त्यां उभयतांचा हव्यास । पुरे येकसरा ॥ ७॥

सुभूमि आणी उत्तम कण । उगवेना प्रजन्येंविण ।

तैसें अध्यात्मनिरूपण । नस्तां होये ॥ ८॥

सेत पेरिलें आणी उगवलें । परंतु निगेविण गेलें ।

साधनेंविण तैसें जालें । साधकांसी ॥ ९॥

जंवरी पीक आपणास भोगे । तंवरी अवघेंचि करणें लागे ।

पीक आलियांहि, उगें- । राहोंचि नये ॥ १०॥

तैसें आत्मज्ञान जालें । परी साधन पाहिजे केलें ।

येक वेळ उदंड जेविलें । तर्ह्हीं सामग्री पाहिजे ॥ ११॥

म्हणौन साधन अभ्यास आणी सद्‍गुगु । सच्छिष्य आणी सच्छास्त्रविचारु ।

सत्कर्म सद्वासना, पारु- । पाववी भवाचा ॥ १२॥

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणी स्वधर्म ।

सत्संग आणी नित्य नेम । निरंतर ॥ १३॥

ऐसें हें अवघेंचि मिळे । तरीच विमळ ज्ञान निवळे ।

नाहीं तरी पाषांड संचरे बळें । समुदा‍ईं ॥ १४॥

येथें शब्द नाहीं शिष्यासी । हें अवघें सद्‍गुरुपासीं ।

सद्‍गुरु पालटी अवगुणासी । नाना येत्नें करूनी ॥ १५॥

सद्‍गुरुचेनि असच्छिष्य पालटे । परंतु सच्छिष्यें असद्‍गुरु न पालटे ।

कां जें थोरपण तुटे । म्हणौनिया ॥ १६॥

याकरणें सद्‍गुरु पाहिजे । तरीच सन्मार्ग लाहिजे ।

नाहिं तरी हो‍ईजे । पाषांडा वरपडे ॥ १७॥

येथें सद्‍गुरुचि कारण । येर सर्व निःकारण ।

तथापि सांगो वोळखण । सच्छिष्याची ॥ १८॥

मुख्य सच्छिष्याचें लक्षण । सद्‍गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।

अनन्यभावें शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ १९॥

शिष्य पाहिजे निर्मळ । शिष्य पाहिजे आचारसीळ ।

शिष्य पाहिजे केवळ । विरक्त अनुतापी ॥ २०॥

शिष्य पाहिजे निष्ठावंत । शिष्य पाहिजे सुचिष्मंत ।

शिष्य पाहिजे नेमस्त । सर्वप्रकारीं ॥ २१॥

शिष्य पाहिजे साक्षपी विशेष । शिष्य पाहिजे परम दक्ष ।

शिष्य पाहिजे अलक्ष । लक्षी ऐसा ॥ २२॥

शिष्य पाहिजे अति धीर । शिष्य पाहिजे अति उदार ।

शिष्य पाहिजे अति तत्पर । परमार्थविषईं ॥ २३॥

शिष्य पाहिजे परोपकारी । शिष्य पाहिजे निर्मत्सरी ।

शिष्य पाहिजे अर्थांतरीं । प्रवेशकर्ता ॥ २४॥

शिष्य पाहिजे परम शुद्ध । शिष्य पाहिजे परम सावध ।

शिष्य पाहिजे अगाध । उत्तम गुणांचा ॥ २५॥

शिष्य पाहिजे प्रज्ञावंत । शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त ।

शिष्य पाहिजे नीतिवंत । मर्यादेचा ॥ २६॥

शिष्य पाहिजे युक्तिवंत । शिष्य पाहिजे बुद्धिवंत ।

शिष्य पाहिजे संतासंत । विचार घेता ॥ २७॥

शिष्य पाहिजे धारिष्टाचा । शिष्य पाहिजे दृढ व्रताचा ।

शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा । पुण्यसीळ ॥ २८॥

शिष्य असावा सात्विक । शिष्य असावा भजक ।

शिष्य असावा साधक । साधनकर्ता ॥ २९॥

शिष्य असावा विश्वासी । शिष्य असावा कायाक्लेशी ।

शिष्य असावा परमार्थासी । वाढऊं जाणे ॥ ३०॥

शिष्य असावा स्वतंत्र । शिष्य असावा जगमित्र ।

शिष्य असावा सत्पात्र । सर्व गुणें ॥ ३१॥

शिष्य असावा सद्विद्येचा । शिष्य असावा सद्भावाचा ।

शिष्य असावा अंतरींचा । परमशुद्ध ॥ ३२॥

शिष्य नसावा अविवेकी । शिष्य नसावा गर्भसुखी ।

शिष्य असावा संसारदुःखी । संतप्त देही ॥ ३३॥

जो संसारदुःखें दुःखवला । जो त्रिविधतापें पोळला ।

तोचि अधिकारी जाला । परमार्थविषीं ॥ ३४॥

बहु दुःख भोगिलें जेणें । तयासीच परमार्थ बाणे ।

संसारदुःखाचेनि गुणें । वैराग्य उपजे ॥ ३५॥

जया संसाराचा त्रास । तयासीच उपजे विस्वास ।

विस्वासबळें दृढ कास । धरिली सद्‍गुरूची ॥ ३६॥

अविस्वासें कास सोडिली । ऐसीं बहुतेक भवीं बुडालीं ।

नाना जळचरीं तोडिलीं । मध्येंचि सुखदुःखें ॥ ३७॥

याकारणें दृढ विस्वास । तोचि जाणावा सच्छिष्य ।

मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु ॥ ३८॥

जो सद्‍गुरुवचनें निवाला । तो सयोज्यतेचा आंखिला ।

सांसारसंगे पांगिला । न वचे कदा ॥ ३९॥

सद्‍गुरुहून देव मोठा । जयास वाटे तो करंटा ।

सुटला वैभवाचा फांटा । सामरथ्यपिसें ॥ ४०॥

सद्‍गुरुस्वरूप तें संत । आणी देवांस मांडेल कल्पांत ।

तेथें कैचें उरेल सामर्थ्य । हरिहरांचें ॥ ४१॥

म्हणौन सद्‍गुरुसामर्थ्य आधीक । जेथें आटती ब्रह्मादिक ।

अल्पबुद्धी मानवी रंक । तयांसि हें कळेना ॥ ४२॥

गुरुदेवांस बराबरी- । करी तो शिष्य दुराचारी ।

भ्रांति बैसली अभ्यांतरीं । सिद्धांत नेणवे ॥ ४३॥

देव मनिषीं भाविला । मंत्रीं देवपणासि आला ।

सद्‍गुरु न वचे कल्पिला । ईश्वराचेनि ॥ ४४॥

म्हणौनि सद्‍गुरु पूर्णपणें । देवाहून आधीक कोटिगुणें ।

जयासि वर्णितां भांडणें । वेदशास्त्रीं लागलीं ॥ ४५॥

असो सद्‍गुरुपदापुढें । दुजें कांहींच न चढे ।

देवसामर्थ्य तें केवढें । मायाजनित ॥ ४६॥

अहो सद्‍गुरुकृपा जयासी । सामर्थ्य न चले तयापासीं ।

ज्ञानबळें वैभवासी । तृणतुछ केलें ॥ ४७ ॥

अहो सद्‍गुरुकृपेचेनि बळें । अपरोक्षज्ञानाचेनि उसाळें ।

मायेसहित ब्रह्मांड सगळें । दृष्टीस न यें ॥ ४८॥

ऐसें सच्छिष्याचें वैभव । सद्‍गुरुवचनीं दृढ भाव ।

तेणें गुणें देवराव । स्वयेंचि होती ॥ ४९॥

अंतरीं अनुतापें तापले । तेणें अंतर शुद्ध जालें ।

पुढें सद्‍गुरुवचनें निवाले । सच्छिष्य ऐसे ॥ ५०॥

लागतां सद्‍गुरुवचनपंथें । जालें ब्रह्मांड पालथें ।

तरी जयाच्या शुद्ध भावार्थें । पालट न धरिजे ॥ ५१॥

शरण सद्‍गुरूस गेले । सच्छिष्य ऐसे निवडले ।

क्रियापालटें जाले । पावन ईश्वरीं ॥ ५२॥

ऐसा सद्भाव अंतरीं । तेचि मुक्तीचे वाटेकरी ।

येर माईक वेषधारी । असच्छिष्य ॥ ५३॥

वाटे विषयांचे सुख । परमार्थ संपादणे लौकिक ।

देखोवेखीं पढतमूर्ख । शरण गेले ॥ ५४॥

जाली विष‍ईं वृत्ति अनावर । दृढ धरिला संसार ।

परमार्थचर्चेचा विचार । मळिण झाला ॥ ५५॥

मोड घेतला परमार्थाचा । हव्यास धरिला प्रपंचाचा ।

भार वाहिला कुटुंबाचा । काबाडी जाला ॥ ५६॥

मानिला प्रपंचीं आनंद । केला परमार्थी विनोद ।

भ्रांत मूढ मतिमंद । लोधला कामीं ॥ ५७॥

सूकर पूजिलें विलेपनें । म्हैसा मर्दिला चंदनें ।

तैसा विष‍ई ब्रह्मज्ञानें । विवेकें बोधिला ॥ ५८॥

रासभ उकिरडां लोळे । तयासि परिमळसोहळे ।

उलूक अंधारीं पळे । तया केवी हंसपंगती ॥ ५९॥

तैसा विषयदारींचा बराडी । घाली अधःपतनीं उडी ।

तयास भगवंत आवडी । सत्संग कैंचा ॥ ६०॥

वर्ती करून दांताळीं । स्वानपुत्र हाडें चगळी ।

तैसा विष‍ई तळमळी । विषयसुखाकारणे । ॥ ६१॥

तया स्वानमुखीं परमान्न । कीं मर्कटास सिंहासन ।

तैसें विषयशक्तां ज्ञान । जिरेल कैंचें ॥ ६२॥

रासभें राखतां जन्म गेला । तो पंडितांमध्यें प्रतिष्ठला ।

न वचे, तैसा आअशक्ताला । परमार्थ नाहीं ॥ ६३॥

मिळाला राजहंसांचा मेळा । तेथें आला डोंबकावळा ।

लक्षून विष्ठेचा गोळा । हंस म्हणवी ॥ ६४॥

तैसे सज्जनाचे संगती । विष‍ई सज्जन म्हणविती ।

विषय आमेद्य चित्तीं । गोळा लक्षिला ॥ ६५॥

काखे घे‍ऊनियां दारा । म्हणे मज संन्यासी करा ।

तैसा विष‍ई सैरावैरा । ज्ञान बडबडी ॥ ६६॥

असो ऐसे पढतमूर्ख । ते काय जाणती अद्वैतसुख ।

नारकी प्राणी नर्क । भोगिती स्वैच्छा ॥ ६७॥

वैषेची करील सेवा । तो कैसा मंत्री म्हणावा ।

तैसा विषयदास मानावा । भक्तराज केवी ॥ ६८॥

तैसे विष‍ई बापुडे । त्यांस ज्ञान कोणीकडे ।

वाचाळ शाब्दिक बडबडे । वरपडे जाले ॥ ६९॥

ऐसे शिष्य परम नष्ट । कनिष्ठांमधें कनिष्ठ ।

हीन अविवेकी आणी दृष्ट । खळ खोटे दुर्जन ॥ ७०॥

ऐसे जे पापरूप । दीर्घदोषी वज्रलेप ।

तयांस प्राश्चीत, अनुताप- । उद्भवतां ॥ ७१॥

तेंहि पुन्हां शरण जावें । सद्‍गुरूस संतोषवावें ।

कृपादृष्टी जालियां व्हावें । पुन्हां शुद्ध ॥ ७२॥

स्वामीद्रोह जया घडे । तो यावश्चंद्र नरकीं पडे ।

तयास उपावचि न घडे । स्वामी तुष्टल्यावांचुनी ॥ ७३॥

स्मशानवैराग्य आलें । म्हणोन लोटांगण घातलें ।

तेणें गुणें उपतिष्ठले- । नाहीं ज्ञान । ७४॥

भाव आणिला जायाचा । मंत्र घेतला गुरूचा ।

शिष्य जाला दो दिसांचा । मंत्राकारणें ॥ ७५॥

ऐसे केले गुरु उदंड । शब्द सिकला पाषांड ।

जाला तोंडाळ तर्मुंड । माहापाषांडी ॥ ७६॥

घडी येक रडे आणी पडे । घडी येक वैराग्य चढे ।

घडी येक अहंभाव जडे । ज्ञातेपणाचा ॥ ७७॥

घडी येक विस्वास धरी । सवेंच घडि येक गुर्गुरी ।

ऐसे नाना छंद करी । पिसाट जैसा ॥ ७८॥

काम क्रोध मद मत्सर । लोभ मोह नाना विकार ।

अभिमान कापट्य तिरस्कार । हृद‍ईं नांदती ॥ ७९॥

अहंकार आणी देहपांग । अनाचार आणी विषयसंग ।

संसार प्रपंच उद्वेग । अंतरीं वसे ॥ ८०॥

दीर्घसूत्री कृतघ्न पापी । कुकर्मी कुतर्की विकल्पी ।

अभक्त अभाव सीघ्रकोपी । निष्ठुर परघातक ॥ ८१॥

हृदयेंसुन्य आणी आळसी । अविवेकी आणि अविस्वासी ।

अधीर अविचार, संदेहासी- । दृढ धर्ता ॥ ८२॥

आशा ममता तृष्णा कल्पना । कुबुद्धी दुर्वृत्ति दुर्वासना ।

अल्पबुद्धि विषयकामना । हृद‍ईं वसे ॥ ८३॥

ईषणा असूया तिरस्कारें । निंदेसि प्रवर्ते आदरें ।

देहाभिमानें हुंबरे । जाणपणें ॥ ८४॥

क्षुधा तृष्णा आवरेना । निद्रा सहसा धरेना ।

कुटुंबचिंता वोसरेना । भ्रांति पडिली ॥ ८५॥

शाब्दिक बोले उदंड वाचा । लेश नाहीं वैराग्याचा ।

अनुताप धारिष्ट साधनाचा । मार्ग न धरी ॥ ८६॥

भक्ति विरक्ति ना शांती । सद्‍वृत्ति लीनता ना दांती ।

कृपा दया ना तृप्ती । सुबुद्धि असेच ना ॥ ८७॥

कायाक्लेसीं शेरीरहीन । धर्मविष‍ईं परम कृपण ।

क्रिया पालटेना कठिण । हृदये जयाचें ॥ ८८॥

आर्जव नाहीं जनासी । जो अप्रिये सज्जनासी ।

जयाचे जिवीं आहिर्णेसीं । परन्यून वसे ॥ ८९॥

सदा सर्वकाळ लटिका । बोले मा‍ईक लापणिका ।

क्रिया विचार पाहतां, येका । वचनीं सत्य नाहीं ॥ ९०॥

परपीडेविष‍ईं तत्पर । जैसे विंचु आणि विखार ।

तैसा कुशब्दें जिव्हार । भेदी सकळांचें ॥ ९१॥

आपले झांकी अवगुण । पुढिलांस बोले कठिण ।

मिथ्या गुणदोषेंविण । गुणदोष लावी ॥ ९२॥

स्वयें पापात्मा अंतरीं । पुढिलांचि कणव न करी ।

जैसा हिंसक दुराचारी । परदुःखें शिणेना ॥ ९३॥

दुःख पराव्याचें नेणती । दुर्जन गांजिले चि गांजिती ।

श्रम पावतां आनंदती । आपुले मनीं ॥ ९४॥

स्वदुःखें झुरे अंतरीं । आणी परदुःखें हास्य करी ।

तयास प्राप्त येमपुरी । राजदूत ताडिती ॥ ९५॥

असो ऐसें मदांध बापुडें । तयांसि भगवंत कैंचा जोडे ।

जयांस सुबुद्धि नावडे । पूर्वपातकेंकरूनी ॥ ९६॥

तयास देहाचा अंतीं । गात्रें क्षीणता पावती ।

जिवलगें वोसंडिती । जाणवेल तेव्हां ॥ ९७॥

असो ऐसे गुणावेगळे । ते सच्छिष्य आगळे ।

दृढभावार्थें सोहळे । भोगिती स्वानंदाचे ॥ ९८॥

जये स्थळीं विकल्प जागे । कुळाभिमान पाठीं लागे ।

ते प्राणी प्रपंचसंगें । हिंपुटी होती ॥ ९९॥

जेणेंकरितां दुःख जालें । तेंचि मनीं दृढ धरिलें ।

तेणें गुणें प्राप्त जालें । पुन्हां दुःख ॥ १००॥

संसारसंगें सुख जालें । ऐसें देखिलें ना ऐकिलें ।

ऐसें जाणोन अनहित केलें । ते दुःखी होती स्वयें ॥ १०१॥

संसारीं सुख मानिती । ते प्राणी मूढमती ।

जाणोन डोळे झांकिती । पढतमूर्ख ॥ १०२॥

प्रपंच सुखें करावा । परी कांहीं परमार्थ वाढवावा ।

परमार्थ अवघाचि बुडवावा । हें विहित नव्हे ॥ १०३॥

मागां जालें निरूपण । गुरुशिष्यांची वोळखण ।

आतां उपदेशाचें लक्षण । सांगिजेल ॥ १०४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिष्यलक्षणनाम

समास तिसरा ॥ ३॥

 

 

समास चवथा : उपदेशलक्षण

॥ श्रीराम् ॥

ऐका उपदेशाचीं लक्षणें । बहुविधें कोण कोणें ।

सांगतां तें असाधारणें । परी कांहीं येक सांगों ॥ १॥

बहुत मंत्र उपदेशिती । कोणी नाम मात्र सांगती ।

येक ते जप करविती । वोंकाराचा ॥ २॥

शिवमंत्र भवानीमंत्र । विष्णुमंत्र माहाल्क्ष्मीमंत्र ।

अवधूतमंत्र गणेशमंत्र । मार्तंडमंत्र सांगती ॥ ३॥

मछकूर्मवर्ह्हावमंत्र । नृसिंहमंत्र वामनमंत्र ।

भार्गवमंत्र रघुनाथमंत्र । कृष्णमंत्र सांगती ॥ ४॥

भैरवमंत्र मल्लारिमंत्र । हनुमंतमंत्र येक्षिणीमंत्र ।

नारायेणमंत्र पांडुरंगमंत्र । अघोरमंत्र सांगती ॥ ५॥

शेषमंत्र गरुडमंत्र । वायोमन्त्र वेताळमंत्र ।

झोटिंगमंत्र बहुधा मंत्र । किती म्हणौनि सांगावे ॥ ६॥

बाळामंत्र बगुळामंत्र । काळिमंत्र कंकाळिमंत्र ।

बटुकमंत्र नाना मंत्र । नाना शक्तींचे ॥ ७॥

पृथकाकारें स्वतंत्र । जितुके देव तितुके मंत्र ।

सोपे अवघड विचित्र । खेचर दारुण बीजाचे ॥ ८॥

पाहों जातां पृथ्वीवरी । देवांची गणना कोण करी ।

तितुके मंत्र वैखरी । किती म्हणौनि वदवावी ॥ ९॥

असंख्यात मंत्रमाळा । येकाहूनि येक आगळा ।

विचित्र मायेची कळा । कोण जाणे ॥ १०॥

कित्येक मंत्रीं भूतें जाती । कित्येक मंत्रीं वेथा नासती ।

कित्येक मंत्रीं उतरती । सितें विंचू विखार ॥ ११॥

ऐसे नाना परीचे मंत्री । उपदेशिती कर्णपात्रीं ।

जप ध्यान पूजा यंत्री । विधानयुक्त सांगती ॥ १२॥

येक शिव शिव सांगती । । येक हरि हरि म्हणविती ।

येक उपदेशिती । विठल विठल म्हणोनी ॥ १३ ॥

येक सांगती कृष्ण कृष्ण । येक सांगती विष्ण विष्ण ।

येक नारायण नारायण । म्हणौन उपदेशिती ॥ १४॥

येक म्हणती अच्युत अच्युत । येक म्हणती अनंत अनंत ।

येक सांगती दत्त दत्त । म्हणत जावें ॥ १५॥

येक सांगती राम राम । येक सांगती ऒं ऒं म ।

येक म्हणती मेघशाम । बहुतां नामीं स्मरावा ॥ १६॥

येक सांगती गुरु गुरु । येक म्हणती परमेश्वरु ।

येक म्हणती विघ्नहरु । चिंतीत जावा ॥ १७॥

येक सांगती शामराज । येक सांगती गरुडध्वज ।

येक सांगती अधोक्षज । म्हणत जावें ॥ १८॥

येक सांगती देव देव । येक म्हणती केशव केशव ।

येक म्हणती भार्गव भार्गव । म्हणत जावें ॥ १९॥

येक विश्वनाथ म्हणविती । येक मल्लारि सांगती ।

येक ते जप करविती । तुका‍ई तुका‍ई म्हणौनी ॥ २०॥

हें म्हणौनी सांगावें । शिवशक्तीचीं अनंत नांवें ।

इछेसारिखीं स्वभावें । उपदेशिती ॥ २१॥

येक सांगती मुद्रा च्यारी । खेचरी भूचरी चाचरी अगोचरी ।

येक आसनें परोपरी । उपदेशिती ॥ २२॥

येक दाखविती देखणी । येक अनुहातध्वनी ।

येक गुरु पिंडज्ञानी । पिंडज्ञान सांगती ॥ २३॥

येक संगती कर्ममार्ग । येक उपासनामार्ग ।

येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें ॥ २४॥

येक तपें सांगती । येक अजपाअ निरोपिती ।

येक तत्वें विस्तारिती , तत्वज्ञानी ॥ २५॥

येक सांगती सगुण । येक निरोपिती निर्गुण ।

येक उपदेशिती तीर्थाटण । फिरावें म्हणूनी ॥ २६॥

येक माहावाक्यें सांगती । त्यांचा जप करावा म्हणती ।

येक उपदेश करिती । सर्व ब्रह्म म्हणोनी ॥ २७॥

येक शाक्तमार्ग सांगती । येक मुक्तमार्ग प्रतिष्ठिती ।

येक इंद्रियें पूजन करविती । येका भावें ॥ २८॥

येक सांगती वशीकर्ण । स्तंबन मोहन उच्चाटण ।

नाना चेटकें आपण । स्वयें निरोपिती ॥ २९॥

ऐसी उपदेशांची स्थिती । पुरे आतां सांगों किती ।

ऐसे हे उपदेश असती । असंख्यात । ३०॥

ऐसे उपदेश अनेक । परी ज्ञानेविण निरार्थक ।

येविष‍ईं असे येक । भगवद्वचन ॥ ३१॥

श्लोक ॥ नानाशास्त्रं पठेल्लोको नाना दैवतपूजनम् ।

आत्मज्ञानं विना पार्थ सर्वकर्म निरर्थकम् ॥

शैवशाक्तागमाद्या ये अन्ये च बहवो मताः ।

अपभ्रंशसमास्ते । अपि जीवानां भ्रांतचेतसाम् ॥

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिदमुत्तमम् ॥

याकारणें ज्ञानासमान । पवित्र उत्तम न दिसे अन्न ।

म्हणौन आधीं आत्मज्ञान । साधिलें पाहिजे ॥ ३२॥

सकळ उपदेशीं विशेष । आत्मज्ञानाचा उपदेश ।

येविष‍ईं जगदीश । बहुतां ठा‍ईं बोलिला ॥ ३३॥

श्लोक ॥ यस्य कस्य च वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठितम् ।

तस्य दासस्य दासोहं भवे जन्मनि जन्मनि ॥

आत्मज्ञानाचा महिमा । नेणे चतुर्मुख ब्रह्मा ।

प्राणी बापुडा जीवात्मा । काये जाणे ॥ ३४॥

सकळ तीर्थांची संगती । स्नानदानाची फळश्रुती ।

त्याहूनि ज्ञानाची स्थिती । विशेष कोटिगुणें ॥ ३५॥

श्लोक: ॥ पृथिव्यां यानि तीर्थानि स्नानदानेषु यत्फलम् ।

तत्फलं कोटिगुणितं ब्रह्मज्ञानसमोपमम् ॥

म्हणौनि जें आत्मज्ञान । तें गहनाहूनि गहन ।

ऐक तयाचें लक्षण । सांगिजेल ॥ ३६॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उपदेशनाम

समास चवथा ॥ ४॥

 

 

समास पाचवा : बहुधाज्ञान निरूपण

॥ श्रीराम् ॥

जंव तें ज्ञान नाहीं प्रांजळ । तंव सर्व कांहीं निर्फळ ।

ज्ञानरहित तळमळ । जाणार नाहीं ॥ १॥

ज्ञान म्हणतां वाटे भस्म । काये रे बा असेल वर्म ।

म्हणौनि हा अनुक्रम । सांगिजेल आतां ॥ २॥

भूत भविष्य वर्तमान । ठा‍ऊकें आहे परिछिन्न ।

यासीहि म्हणिजेत ज्ञान । परी तें ज्ञान नव्हे ॥ ३॥

बहुत केलें विद्यापठण । संगीतशास्त्र रागज्ञान ।

वैदिक शास्त्र वेदाधेन । हेंहि ज्ञान नव्हे ॥ ४॥

नाना वेवसायाचें ज्ञान । नाना दिक्षेचें ज्ञान ।

नाना परीक्षेचें ज्ञान । हें ज्ञान नव्हे ॥ ५॥

नाना वनितांची परीक्षा । नाना मनुष्यांची परीक्षा ।

नाना नरांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ६॥

नाना अश्वांची परीक्षा । नाना गजांची परीक्षा ।

नाना स्वापदांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ७॥

नाना पशूंची परीक्षा । नाना पक्षांची परीक्षा ।

नाना भूतांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ८॥

नाना यानांची परीक्षा । नाना वस्त्रांची परीक्षा ।

नाना शस्त्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ९॥

नाना धातूंची परीक्षा । नाना नाण्यांची परीक्षा ।

नाना रत्नांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १०॥

नाना पाषाण परीक्षा । नाना काष्ठांची परीक्षा ।

नाना वाद्यांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ ११॥

नाना भूमींची परीक्षा । नाना जळांची परीक्षा ।

नाना सतेज परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १२॥

नाना रसांची परीक्षा । नाना बीजांची परीक्षा ।

नाना अंकुर परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १३॥

नाना पुष्पांची परीक्षा । नाना फळांची परीक्षा ।

नाना वल्लींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १४॥

नाना दुःखांची परीक्षा । नाना रोगांची परीक्षा ।

नाना चिन्हांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १५॥

नाना मंत्रांची परीक्षा । नाना यंत्रांची परीक्षा ।

नाना मूर्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १६॥

नाना क्षत्रांची परीक्षा । नाना गृहांची परीक्षा ।

नाना पात्रांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १७॥

नाना होणार परीक्षा । नाना समयांची परीक्षा ।

नाना तर्कांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १८॥

नाना अनुमान परीक्षा । नाना नेमस्त परीक्षा ।

नाना प्रकार परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ १९॥

नाना विद्येची परीक्षा । नाना कळेची परीक्षा ।

नाना चातुर्य परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २०॥

नाना शब्दांची परीक्षा । नाना अर्थांची परीक्षा ।

नाना भाषांची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २१॥

नाना स्वरांची परीक्षा । नाना वर्णांची परीक्षा ।

नाना लेक्षनपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २२॥

नाना मतांची परीक्षा । नाना ज्ञानांची परीक्षा ।

नाना वृत्तींची परीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २३॥

नाना रूपांची परीक्षा । नाना रसनेची परीक्षा ।

नाना सुगंधपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २४॥

नाना सृष्टींची परीक्षा । नाना विस्तारपरीक्षा ।

नाना पदार्थपरीक्षा । हें ज्ञान नव्हे ॥ २५॥

नेमकेचि बोलणें । तत्काळचि प्रतिवचन देणें ।

सीघ्रचि कवित्व करणें । हें ज्ञान नव्हे ॥ २६॥

नेत्रपालवी नादकळा । करपालवी भेदकळा ।

स्वरपालवी संकेतकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २७॥

काव्यकुशळ संगीतकळा । गीत प्रबंद नृत्यकळा ।

सभाच्यातुर्य शब्दकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २८॥

वग्विळास मोहनकळा । रम्य रसाळ गायनकळा ।

हास्य विनोद कामकळा । हें ज्ञान नव्हे ॥ २९॥

नाना लाघवें चित्रकळा । नाना वाद्यें संगीतकळा ।

नाना प्रकारें विचित्र कळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३०॥

आदिकरूनि चौसष्टि कळा । याहि वेगळ्या नाना कळा ।

चौदा विद्या सिद्धि सकळा । हें ज्ञान नव्हे ॥ ३१॥

असो सकळ कळाप्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण ।

तरी ते कौशल्यता, परी ज्ञान- । म्हणोंचि नये ॥३२॥

हें ज्ञान होयेसें भासे । परंतु मुख्य ज्ञान तें अनारिसें ।

जेथें प्रकृतीचें पिसें । समूळ वाव ॥ ३३॥

जाणावें दुसर्याचें जीवीचें । हे ज्ञान वाटे साचें ।

परंतु हें आत्मज्ञानाचें । लक्षण नव्हे ॥ ३४॥

माहानुभाव माहाभला । मानसपूजा करितां चुकला ।

कोणी येकें पाचारिला । ऐसें नव्हे म्हणोनी ॥ ३५॥

ऐसी जाणे अंतरस्थिती । तयासि परम ज्ञाता म्हणती ।

परंतु जेणें मोक्षप्राप्ती । तें हें ज्ञान नव्हे ॥ ३६॥

बहुत प्रकारींची ज्ञानें । सांगों जातां असाधारणें ।

सायोज्यप्राप्ती होये जेणें । तें ज्ञान वेगळें ॥ ३७॥

तरी तें कैसें आहे ज्ञान । समाधानाचें लक्षण ।

ऐसें हें विशद करून । मज निरोपावें ॥ ३८ ॥

ऐसें शुद्ध ज्ञान पुसिलें । तें पुढिले समासीं निरोपिलें ।

श्रोतां अवधान दिधलें । पाहिजे पुढें ॥ ३९॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बहुधाज्ञाननाम

समास पंचवा ॥ ५॥

 

 

समास सहावा : शुद्धज्ञान निरूपण

॥ श्रीराम् ॥

ऐक ज्ञानाचें लक्षण । ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान ।

पाहावें आपणासि आपण । या नांव ज्ञान ॥ १॥

मुख्य देवास जाणावें । सत्य स्वरूप वोळखावें ।

नित्यानित्य विचारावें । या नांव ज्ञान ॥ २॥

जेथें दृश्य प्रकृति सरे । पंचभूतिक वोसरे ।

समूळ द्वैत निवारे । या नांव ज्ञान ॥ ३॥

मनबुद्धि अगोचर । न चले तर्काचा विचार ।

उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान ॥ ४॥

जेथें नाहीं दृश्यभान । जेथें जाणीव हें अज्ञान ।

विमळ शुद्ध स्वरूपज्ञान । यासि बोलिजे ॥ ५॥

सर्वसाक्षी अवस्ता तुर्या । ज्ञान ऐसें म्हणती तया ।

परी तें जाणिजे वायां । पदार्थज्ञान ॥ ६॥

दृश्य पदार्थ जाणिजे । त्यास पदार्थज्ञान बोलिजे ।

शुद्ध स्वरूप जाणिजे । या नांव स्वरूपज्ञान ॥ ७॥

जेथें सर्वचि नाहीं ठा‍ईंचें । तेथें सर्वसाक्षत्व कैंचें ।

म्हणौनि शुद्ध ज्ञान तुर्येचें । मानूंचि नये ॥ ८॥

ज्ञान म्हणिजे अद्वैत । तुर्या प्रत्यक्ष द्वैत ।

म्हणौनि शुद्ध ज्ञान सतंत । वेगळेंचि असे ॥ ९॥

ऐक शुद्ध ज्ञानाचें लक्षण । शुद्ध स्वरूपचि आपण ।

या नांव शुद्ध स्वरूपज्ञान । जाणिजे श्रोतीं ॥ १०॥

माहावाक्यौपदेश भला । परी त्याचा जप नाहीं बोलिला ।

तेथीचा तो विचारचि केला । पाहिजे साधकें ॥ ११॥

माहावाक्य उपदेशसार । परी घेतला पाहिजे विचार ।

त्याच्या जपें, अंधकार- । न फिटे भ्रांतीचा ॥ १२॥

माहावाक्याचा अर्थ घेतां । आपण वस्तुचि तत्वतां ।

त्याचा जप करितां वृथा । सीणचि होये ॥ १३॥

माहावाक्याशें विवरण । हें मुख्य ज्ञानाचें लक्षण ।

शुद्ध लक्ष्यांचें आपण । वस्तुच आहे ॥ १४॥

आपला आपणासि लाभ । हें ज्ञान परम दुल्लभ ।

जें आदि‍अंतीं स्वयंभ । स्वरूपचि स्वयें ॥ १५॥

जेथून हें सर्व ही प्रगटे । आणि सकळही जेथें आटे ।

तें ज्ञान जालियां फिटे । भ्रांति बंधनाची ॥ १६॥

मतें आणी मतांतरें । जेथें होती निर्विकारें ।

अतिसूक्ष्म विचारें । पाहातां ऐक्य ॥ १७॥

जे या चराचराचें मूळ । शुद्ध स्वरूप निर्मळ ।

या नांव ज्ञान केवळ । वेदांतमतें ॥ १८॥

शोधितां आपलें मूळ स्थान । सहजचि उडे अज्ञान ।

या नांव म्हणिजे ब्रह्मज्ञान । मोक्षदायेक ॥ १९॥

आपणासि वोळखों जातां । आंगीं बाणे सर्वज्ञता ।

तेणें येकदेसी वार्ता । निशेष उडे ॥ २०॥

मी कोण ऐसा हेत- । धरून, पाहातां देहातीत ।

आवलोकितां नेमस्त । स्वरूपचि होये ॥ २१॥

असो पूर्वीं थोर थोर । जेणें ज्ञानें पैलपार- ।

पावले, ते साचार । ऐक आतां ॥ २२॥

व्यास वसिष्ठ माहामुनी । शुक नारद समाधानी ।

जनकादिक माहाज्ञानी । येणेंचि ज्ञानें ॥ २३॥

वामदेवादिक योगेश्वर । वाल्मीक अत्रि ऋषेश्वर ।

शोनिकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४॥

सनकादिक मुख्यकरूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी ।

आणीक बोलतां वचनी । अगाध असती ॥ २५॥

सिद्ध मुनी माहानुभाव । सकळांचा जो अंतर्भाव ।

जेणें सुखें माहादेव । डुल्लत सदा ॥ २६॥

जें वेदशास्त्रांचें सार । सिद्धांत धादांत विचार ।

ज्याची प्राप्ती भाग्यानुसार । भाविकांस होये ॥ २७॥

साधु संत आणी सज्जन । भूत भविष्य वर्तमान ।

सर्वत्रांचें गुह्य ज्ञान । तें संगिजेल आतां ॥ २८॥

तीर्थें व्रतें तपें दानें । जें न जोडे धूम्रपानें ।

पंचाग्नी गोरांजनें । जें प्राप्त नव्हे ॥ २९॥

सकळ साधनाचें फळ । ज्ञानाची सिगचि केवळ ।

जेणें संशयाचें मूळ । निशेष तुटे ॥ ३०॥

छपन्न भाषा तितुके ग्रंथ । आदिकरून वेदांत ।

या इतुकियांचा गहनार्थ । येकचि आहे ॥ ३१॥

जें नेणवे पुराणीं । जेथें सिणल्या वेदवाणी ।

तेंचि आतां येचि क्षणीं । बोधीन गुरुकृपें ॥ ३२॥

पाहिलें नस्तां संस्कृतीं । रीग नाहीं मर्ह्हाष्ट ग्रंथीं ।

हृद‍ईं वसल्या कृपामुर्ती । सद्‍गुरु स्वामी ॥ ३३॥

आतां नलगे संस्कृत । अथवा ग्रंथ प्राकृत ।

माझा स्वामी कृपेसहित । हृद‍ईं वसे ॥ ३४॥

न करितां वेदाभ्यास । अथवा श्रवणसायास ।

प्रेत्नेंविण सौरस । सद्‍गुरुकृपा ॥ ३५॥

ग्रंथ मात्र मर्ह्हाष्ट । त्याहून संस्कृत श्रेष्ठ ।

त्या संस्कृतामधें पष्ट । थोर तो वेदांत ॥ ३६॥

त्या वेदांतापरतें कांहीं । सर्वथा श्रेष्ठ नाहीं ।

जेथें वेदगर्भ सर्वही । प्रगटजाला ॥ ३७॥

असो ऐसा जो वेदांत । त्या वेदांताचाहि मथितार्थ ।

अतिगहन जो परमार्थ । तो तूं ऐक आतां ॥ ३८॥

अरे गहनाचेंही गहन । तें तूं जाण सद्‍गुरुवचन ।

सद्‍गुरुवचनें समाधान । नेमस्त आहे ॥ ३९॥

सद्‍गुरुवचन तोचि वेदांत । सद्‍गुरुवचन तोचि सिद्धांत ।

सद्‍गुरुवचन तोचि धादांत । सप्रचीत आतां ॥ ४०॥

जें अत्यंत गहन । माझ्या स्वामीचें वचन ।

जेणें माझे समाधान । अत्यंत जालें ॥ ४१॥

तें हें माझें जीवीचें गुज । मी सांगैन म्हणतों तुज ।

जरी अवधान देसी मज ॥ तरी आतां येच क्षणीं ॥ ४२॥

शिष्य म्लान्वदनें बोले । धरिले सदृढ पाउले ।

मग बोलों आरंभिलें । गुरुदेवें ॥ ४३॥

अहं ब्रह्मास्मि माहांवाक्य । येथीचा अर्थ अतर्क्ये ।

तोही सांगतों, ऐक्य- । गुरुशिष्य जेथें ॥ ४४॥

ऐक शिष्या येथीचें वर्म । स्वयें तूंचि आहेसि ब्रह्म ।

ये विष‍ईं संदेह भ्रम । धरूंचि नको ॥ ४५॥

नवविधा प्रकारें भजन । त्यांत मुख्य तें आत्मनिवेदन ।

तें समग्र प्रकारें कथन । कीजेल आतां ॥ ४६॥

निर्माण पंचभूतें यीयें । कल्पांतीं नासतीं येथान्वयें ।

प्रकृति पुरुष जीयें । तेही ब्रह्म होती ॥ ४७॥

दृश्य पदार्थ आटतां । आपणहि नुरे तत्वतां ।

ऐक्यरूपें ऐक्यता । मुळींच आहे ॥ ४८॥

सृष्टीची नाहीं वार्ता । तेथें मुळींच ऐक्यता ।

पिंड ब्रह्मांड पाहों जातां । दिसेल कोठें ॥ ४९॥

ज्ञानवन्ही प्रगटे । तेणें दृश्य केर आटे ।

तदाकारें मूळ तुटे । भिन्नत्वाचें ॥ ५०॥

मिथ्यत्वें वृत्ति फिरे । तों दृश्य असतांच वोसरे ।

सहजचि येणें प्रकारें । जालें आत्मनिवेदन ॥ ५१॥

असो गुरूचे ठा‍ईं अनन्यता । तरी तुज कायेसी रे चिंता ।

वेगळेंपणें अभक्ता । उरोंचि नको ॥ ५२॥

आतां हेंचि दृढीकर्ण- । व्हावया, करीं सद्‍गुरुभजन ।

सद्‍गुरुभजनें समाधान । नेमस्त आहे ॥ ५३॥

या नांव शिष्या आत्मज्ञान । येणें पाविजे समाधान ।

भवभयाचें बंधन । समूळ मिथ्या ॥ ५४॥

देह मी वाटे ज्या नरा । तो जाणावा आत्महत्यारा ।

देहाभिनानें येरझारा । भोगिल्याच भोगी ॥ ५५॥

असो चहूं देहावेगळा । जन्मकर्मासी निराळा ।

सकळ आबाळगोबळा । सबाह्य तूं ॥ ५६॥

कोणासीच नाहीं बंधन । भ्रांतिस्तव भुलले जन ।

दृढ घेतला देहाभिमान । म्हणौनियां ॥ ५७॥

शिष्या येकांतीं बैसावें । स्वरूपीं विश्रांतीस जावें ।

तेणें गुणें दृढावे । परमार्थ हा ॥ ५८॥

अखंड घडे श्रवणमनन । तरीच पाविजे समाधान ।

पूर्ण जालियां ब्रह्मज्ञान । वैराग्य भरे आंगीं ॥ ५९॥

शिष्या मुक्तपणें अनर्गळ । करिसीं इंद्रियें बाष्कळ ।

तेणें तुझी तळमळ । जाणार नाहीं ॥ ६०॥

विष‍ईं वैराग्य उपजलें । तयासीच पूर्ण ज्ञान जालें ।

मणी टाकितांचि लाधलें । राज्य जेवीं ॥ ६१॥

मणी होतां सीगटाचा । लोभ धरूनिया तयाचा ।

मूर्खपणें राज्याचा । अव्हेर केला ॥ ६२॥

ऐक शिष्या सावधान । आतां भविष्य मी सांगेन ।

जया पुरुषास जें ध्यान । तयासि तेंचि प्राप्त ॥ ६३॥

म्हणोनि जे अविद्या । सांडून धरावी सुविद्या ।

तेणें गुणें जगद्वंद्या । पाविजे सीघ्र ॥ ६४॥

सन्यपाताचेनि दुःखें । भयानक दृष्टीस देखे ।

औषध घेतांचि सुखें । आनंद पावे ॥ ६५॥

तैसें अज्ञानसन्यपातें । मिथ्या दृष्टीस दिसतें ।

ज्ञानाउषध घेतां तें । मुळींच नाहीं ॥ ६६॥

मिथ्या स्वप्नें वोसणाला । तो जागृतीस आणिला ।

तेणें पूर्वदशा पावला । निर्भय जे ॥ ६७॥

मिथ्याच परी सत्य वाटलें । तेणें गुणें दुःख जालें ।

मिथ्या आणी निरसलें । हें तों घडेना ॥ ६८॥

मिथ्या आहे जागृतासी । परी वेढा लाविलें निद्रिस्तांसी ।

जागा जालियां तयासी । भयेंचि नाहीं॥ ६९॥

परी अविद्याझोंप येते भरें । भरे सर्वांगी काविरें ।

पूर्ण जागृती श्रवणद्वारें- । मननें करावी ॥ ७०॥

जागृतीची वोळखण । ऐक तयाचें लक्षण ।

जो विष‍ईं विरक्त पूर्ण । अंतरापासुनी ॥ ७१॥

जेणें विरक्तीस न यावें । तो साधक ऐसें जाणावें ।

तेणें साधन करावें । थोरीव सांडुनी ॥ ७२॥

साधन न मने जयाला । तो सिद्धपणे बद्ध जाला ।

त्याहूनि मुमुक्ष भला । ज्ञानाधिकारी ॥ ७३॥

तंव शिष्यें केला प्रश्न । कैसें बद्धमुमुक्षाचें लक्षण ।

साधक सिद्ध वोळखण । कैसी जाणावी ॥ ७४॥

याचें उत्तर श्रोतयांसी । दिधलें पुढिलीये समासीं ।

सावध श्रोतीं कथेसी । अवधान द्यावें ॥ ७५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शुद्धज्ञाननिरूपणनाम

समास सहावा ॥ ६॥

 

 

समास सातवा : बद्धलक्षण

॥ श्रीराम् ॥

सृष्टी जे कां चराचर । जीव दाटले अपार ।

परी ते अवघे चत्वार । बोलिजेती ॥ १॥

ऐक तयांचें लक्षण । चत्वार ते कोण कोण ।

बद्ध मुमुक्ष साधक जाण । चौथा सिद्ध ॥ २॥

यां चौघांविरहित कांहीं । सचराचरीं पांचवा नाहीं ।

आतां असो हें सर्वही । विशद करूं ॥ ३॥

बद्ध म्हणिजे तो कोण । कैसें मुमुक्षाचें लक्षण ।

साधकसिद्धवोळखण । कैसी जाणावी ॥ ४॥

श्रोतीं व्हावें सावध । प्रस्तुत ऐका बद्ध ।

मुमुक्ष साधक आणि सिद्ध । पुढें निरोपिले ॥ ५॥

आतां बद्ध तो जाणिजे ऐसा । अंधारींचा अंध जैसा ।

चक्षुविण दाही दिशा । सुन्याकार ॥ ६॥

भक्त ज्ञाते तापसी । योगी वीतरागी संन्यासी ।

पुढें देखतां दृष्टीसी । येणार नाहीं ॥ ७॥

न दिसे नेणे कर्माकर्म । न दिसे नेणे धर्माधर्म ।

न दिसे नेणे सुगम । परमार्थपंथ ॥ ८॥

तयास न दिसे सच्छास्त्र । सत्संगति सत्पात्र ।

सन्मार्ग जो कां पवित्र । तो ही न दिसे ॥ ९॥

न कळे सारासार विचार । न कळे स्वधर्म आचार ।

न कळे कैसा परोपकार । दानपुण्य ॥ १०॥

नाहीं पोटीं भूतदया । नाहीं सुचिष्मंत काया ।

नाहीं जनासि निववावया । वचन मृद ॥ ११॥

न कळे भक्ति न कळे ज्ञान । न कळे वैराग्य न कळे ध्यान ।

न कळे मोक्ष न कळे साधन । या नांव बद्ध ॥ १२॥

न कळे देव निश्चयात्मक । न कळे संतांचा विवेक ।

न कळे मायेचें कौतुक । या नांव बद्ध ॥ १३॥

न कळे परमार्थाची खूण । न कळे अध्यात्मनिरूपण ।

न कळे आपणासि आपण । या नांव बद्ध ॥ १४॥

न कळे जीवाचें जन्ममूळ । न कळे साधनाचें फळ ।

न कळे तत्वतां केवळ । या नांव बद्ध ॥ १५॥

न कळे कैसें तें बंधन । न कळे मुक्तीचें लक्षण ।

न कळे वस्तु विलक्षण । या नांव बद्ध ॥ १६॥

न कळे शास्त्रार्थ बोलिला । न कळे निजस्वार्थ आपुला ।

न कळे संकल्पें बांधला । या नांव बद्ध ॥ १७॥

जयासि नाहीं आत्मज्ञान । हें मुख्य बद्धाचें लक्षण ।

तीर्थ व्रत दान पुण्य । कांहींच नाहीं ॥ १८॥

दया नाहीं करुणा नाहीं । आर्जव नाहीं मित्रि नाहीं ।

शांति नाहीं क्ष्मा नाहीं । या नांव बद्ध ॥ १९॥

जें ज्ञानविशिं उणें । तेथें कैचीं ज्ञानाचीं लक्षणें ।

बहुसाल कुलक्षणें । या नांव बद्ध ॥ २०॥

नाना प्रकारीचे दोष- । करितां, वाटे परम संतोष ।

बाष्कळपणाचा हव्यास । या नांव बद्ध ॥ २१॥

बहु काम बहु क्रोध । बहु गर्व बहु मद ।

बहु द्वंद बहु खेद । या नांव बद्ध ॥ २२॥

बहु दर्प बहु दंभ । बहु विषये बहु लोभ ।

बहु कर्कश बहु अशुभ । या नांव बद्ध ॥ २३॥

बहु ग्रामणी बहु मत्सर । बहु असूया तिरस्कार ।

बहु पापी बहु विकार । या नांव बद्ध ॥ २४॥

बहु अभिमान बहु ताठा । बहु अहंकार बहु फांटा ।

बहु कुकर्माचा सांठा । या नांव बद्ध ॥ २५॥

बहु कापट्य वादवेवाद । बहु कुतर्क भेदाभेद ।

बहु क्रूइर कृपामंद । या नांव बद्ध ॥ २६॥

बहु निंदा बहु द्वेष । बहु अधर्म बहु अभिळाष ।

बहु प्रकारीचे दोष । या नांव बद्ध ॥ २७॥

बहु भ्रष्ट अनाचार । बहु नष्ट येकंकार ।

बहु आनित्य अविचार । या नांव बद्ध ॥ २८॥

बहु निष्ठुर बहु घातकी । बहु हत्यारा बहु पातकी ।

तपीळ कुविद्या अनेकी । या नांव बद्ध ॥ २९॥

बहु दुराशा बहु स्वार्थी । बहु कळह बहु अनर्थी ।

बहु डा‍ईक दुर्मती । या नांव बद्ध ॥ ३०॥

बहु कल्पना बहु कामना । बहु तृष्णा बहु वासना ।

बहु ममता बहु भावना । या नांव बद्ध ॥ ३१॥

बहु विकल्पी बहु विषादी । बहु मूर्ख बहु समंधी ।

बहु प्रपंची बहु उपाधी । या नांव बद्ध ॥ ३२॥

बहु वाचाळ बहु पाषंडी । बहु दुर्जन बहु थोतांडी ।

बहु पैशून्य बहु खोडी । या नांव बद्ध ॥ ३३॥

बहु अभाव बहु भ्रम । बहु भ्रांति बहु तम ।

बहु विक्षेप बहु विराम । या नांव बद्ध ॥ ३४॥

बहु कृपण बहु खंदस्ती । बहु आदखणा बहु मस्ती ।

बहु असत्क्रिया व्यस्ती । या नांव बद्ध ॥ ३५॥

परमार्थविष‍ईं अज्ञान । प्रपंचाचें उदंड ज्ञान ।

नेणे स्वयें समाधान । या नांव बद्ध ॥ ३६॥

परमार्थाचा अनादर । प्रपंचाचा अत्यादर ।

संसारभार जोजार । या नांव बद्ध ॥ ३७॥

सत्संगाची नाहीं गोडी । संतनिंदेची आवडी ।

देहेबुद्धीची घातली बेडी । या नाव बद्ध ॥ ३८॥

हातीं द्रव्याची जपमाळ । कांताध्यान सर्वकाळ ।

सत्संगाचा दुष्काळ । या नांव बद्ध ॥ ३९॥

नेत्रीं द्रव्य दारा पाहावी । श्रवणीं द्रव्य दारा ऐकावी ।

चिंतनीं द्रव्य दारा चिंतावी । या नांव बद्ध ॥ ४०॥

काया वाचा आणि मन । चित्त वित्त जीव प्राण ।

द्रव्यदारेचें करी भजन । या नांव बद्ध ॥ ४१॥

इंद्रियें करून निश्चळ । चंचळ हो‍ऊं नेदी पळ ।

द्रव्यदारेसि लावी सकळ । या नांव बद्ध ॥ ४२॥

द्रव्य दारा तेंचि तीर्थ । द्रव्य दारा तोचि परमार्थ ।

द्रव्य दारा सकळ स्वार्थ । म्हणे तो बद्ध ॥ ४३॥

वेर्थं जा‍ऊं नेदी काळ । संसारचिंता सर्वकाळ ।

कथा वार्ता तेचि सकळ । या नांव बद्ध ॥ ४४॥

नाना चिंता नाना उद्वेग । नाना दुःखाचे संसर्ग ।

करी परमार्थाचा त्याग । या नांव बद्ध ॥ ४५॥

घटिका पळ निमिष्यभरी । दुश्चीत नव्हतां अंतरीं ।

सर्वकाळ ध्यान करी । द्रव्यदाराप्रपंचाचें ॥ ४६॥

तीर्थ यात्रा दान पुण्य । भक्ति कथा निरूपण ।

मंत्र पूजा जप ध्यान । सर्वही द्रव्य दारा ॥ ४७॥

जागृति स्वप्न रात्रि दिवस । ऐसा लागला विषयेध्यास ।

नाहीं क्षणाचा अवकाश । या नांव बद्ध ॥ ४८॥

ऐसें बद्धाचें लक्षण । मुमुक्षपणीं पालटे जाण ।

ऐक तेही वोळखण । पुढिलीये समासीं ॥ ४९॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बद्धलक्षणनाम

समास सातवा ॥ ७॥

 

 

समास आठवा : मुमुक्षलक्षण

॥ श्रीराम् ॥

संसारमदाचेनि गुणें । नाना हीनें कुलक्षणें ।

जयाचेनि मुखावलोकनें । दोषचि लागे ॥ १॥

ऐसा प्रणी जो कां बद्ध । संसारीं वर्ततां अबद्ध ।

तायस प्राप्त जाला खेद । काळांतरीं ॥ २॥

संसारदुःखें दुखवला । त्रिविधतापें पोळला ।

निरूपणें प्रस्तावला । अंतर्यामीं ॥ ३॥

जाला प्रपंचीं उदास । मनें घेतला विषयत्रास ।

म्हणे आतां पुरे सोस । संसारींचा ॥ ४॥

प्रपंच जा‍ईल सकळ । येथील श्रम तों निर्फळ ।

आतां कांहीं आपुला काळ । सार्थक करूं ॥ ५॥

ऐसी बुद्धि प्रस्तावली । पोटीं आवस्ता लागली ।

म्हणे माझी वयेसा गेली । वेर्थचि आवघी ॥ ६॥

पूर्वी नाना दोष केले । ते अवघेचि आठवले ।

पुढें ये‍उनि उभे ठेले । अंतर्यामीं ॥ ७॥

आठवे येमाची यातना । तेणें भयेचि वाटे मना ।

नाहीं पापासि गणना । म्हणौनियां ॥ ८॥

नाहीं पुण्याचा विचार । जाले पापाचे डोंगर ।

आतां दुस्तर हा संसार । कैसा तरों ॥ ९॥

आपले दोष आछ्यादिले । भल्यांस गुणदोष लाविले ।

देवा म्यां वेर्थच निंदिले । संत साधु सज्जन ॥ १०॥

निंदे ऐसे नाहीं दोष । तें मज घडले कीं विशेष ।

माझे अवगुणीं आकाश । बुडों पाहे ॥ ११॥

नाहीं वोळखिले संत । नाहीं अर्चिला भगवंत ।

नाहीं अतित अभ्यागत । संतुष्ट केले ॥ १२॥

पूर्व पाप वोढवलें । मज कांहींच नाहीं घडलें ।

मन अव्हाटीं पडिलें । सर्वकाळ ॥ १३॥

नाहीं कष्टविलें शेरीर । नाहीं केला परोपकार ।

नाहीं रक्षिला आचार । काममदें ॥ १४॥

भक्तिमाता हे बुडविली । शांति विश्रांति मोडिली ।

मूर्खपणें म्यां विघडिली । सद्‍बुद्धि सद्वासना ॥ १५॥

आतां कैसें घडे सार्थक । दोष केले निरार्थक ।

पाहों जातां विवेक । उरला नाहीं ॥ १६॥

कोण उपाये करावा । कैसा परलोक पावावा ।

कोण्या गुणें देवाधिदेवा । पाविजेल ॥ १७॥

नाहीं सद्भाव उपजला । अवघा लोकिक संपादिला ।

दंभ वरपंगें केला । खटाटोप कर्माचा ॥ १८॥

कीर्तन केलें पोटासाठीं । देव मांडिले हाटवटीं ।

आहा देवा बुद्धि खोटी । माझी मीच जाणें ॥ १९॥

पोटीं धरूनि अभिमान । शब्दीं बोले निराभिमान ।

अंतरीं वांछूनियां धन । ध्यानस्त जालों ॥ २०॥

वित्पत्तीनें लोक भोंदिले । पोटासाठीं संत निंदिले ।

माझे पोटीं दोष भरले । नाना प्रकारींचे ॥ २१॥

सत्य तेंचि उछेदिलें । मिथ्य तेंचि प्रतिपादलें ।

ऐसें नाना कर्म केलें । उदरंभराकारणें ॥ २२॥

ऐसा पोटीं प्रस्तावला । निरूपणें पालटला ।

तोचि मुमुक्ष बोलिला । ग्रंथांतरीं ॥ २३॥

पुण्यमार्ग पोटीं धरी । सत्संगाची वांछा करी ।

विरक्त जाला संसारीं । या नांव मुमुक्ष ॥ २४॥

गेले राजे चक्रवर्ती । माझें वैभव तें किती ।

म्हणे धरूं सत्संगती । या नांव मुमुक्ष ॥ २५॥

आपुले अवगुण देखे । विरक्तिबळें वोळखे ।

आपणासि निंदी दुःखें । या नांव मुमुक्ष ॥ २६॥

म्हणे मी काये अनोपकारी । म्हणे मी काय दंभधारी ।

म्हणे मी काये अनाचारी । या नांव मुमुक्ष ॥ २७॥

म्हणे मी पतित चांडाळ । म्हणे मी दुराचारी खळ ।

म्हणे मी पापी केवळ । या नांव मुमुक्ष ॥ २८॥

म्हणे मी अभक्त दुर्जन । म्हणे मी हीनाहूनि हीन ।

म्हणे मी जन्मलो पाषाण । या नांव मुमुक्ष ॥ २९॥

म्हणे मी दुराभिमानी । म्हणे मी तपीळ जनीं ।

म्हणे मी नाना वेसनी । या नांव मुमुक्ष ॥ ३०॥

म्हणे मी आळसी आंगचोर । म्हणे मी कपटी कातर ।

म्हणे मी मूर्ख अविचार । या नांव मुमुक्ष ॥ ३१॥

म्हणे मी निकामी वाचाळ । म्हणे मी पाषांडी तोंडाळ ।

म्हणे मी कुबुद्धि कुटीळ । या नांव मुमुक्ष ॥ ३२॥

म्हणे मी कांहींच नेणे । म्हणे मी सकळाहूनि उणें ।

आपलीं वर्णी कुलक्षणें । या नांव मुमुक्ष ॥ ३३॥

म्हणे मी अनाधिकारी । म्हणे मी कुश्चिळ अघोरी ।

म्हणे मी नीच नानापरी । या नांव मुमुक्ष ॥ ३४॥

म्हणे मी काये आपस्वार्थी । म्हणे मी काये अनर्थी ।

म्हणे मी नव्हे परमार्थी । या नांव मुमुक्ष ॥ ३५॥

म्हणे मी अवगुणाची रासी । म्हणे मी वेर्थ आलों जन्मासी ।

म्हणे मी भार जालों भूमीसी । या नांव मुमुक्ष ॥ ३६॥

आपणास निंदी सावकास । पोटीं संसाराचा त्रास ।

धरी सत्संगाचा हव्यास । या नांव मुमुक्ष ॥ ३७॥

नाना तीर्थे धुंडाळिलीं । शमदमादि साधनें केलीं ।

नाना ग्रन्थांतरें पाहिलीं । शोधूनियां ॥ ३८॥

तेणें नव्हे समाधान । वाटे अवघाच अनुमान ।

म्हणे रिघों संतांस शरण । या नांव मुमुक्ष ॥ ३९॥

देहाभिमान कुळाभिमान । द्रव्याभिमान नानाभिमान ।

सांडूनि, संतचरणीं अनन्य- । या नांव मुमुक्ष ॥ ४०॥

अहंता सांडूनि दूरी । आपणास निंदी नानापरी ।

मोक्षाची अपेक्षा करी । या नांव मुमुक्ष ॥ ४१॥

ज्याचें थोरपण लाजे । जो परमार्थाकारणें झिजे ।

संतापा‍ईं विश्वास उपजे । या नांव मुमुक्ष ॥ ४२॥

स्वार्थ सांडून प्रपंचाचा । हव्यास धरिला परमार्थाचा ।

अंकित हो‍ईन सज्जनाचा । म्हणे तो मुमुक्ष ॥ ४३॥

ऐसा मुमुक्ष जाणिजे । संकेतचिन्हें वोळखिजे ।

पुढें श्रोतीं अवधान दीजे । साधकलक्षणीं ॥ ४४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मुमुक्षलक्षणनाम

समास आठवा ॥ ८॥

 

 

 

 

 

समास नववा : साधकनिरूपण

॥ श्रीराम् ॥

मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन ।

आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १॥

अवगुणाचा करूनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।

तयासि बोलिजे मग । साधक ऐसा ॥२॥

जो संतांसि शरण गेला । संतजनीं आश्वासिला ।

मग तो साधक बोलिला । ग्रन्थांतरीं ॥ ३॥

उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन ।

दृढतेकारणें करी साधन । या नांव साधक ॥ ४॥

धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरूपणाची गोडी ।

मननें अर्थांतर काढी । या नांव साधक ॥ ५॥

होतां सारासार विचार । ऐके हो‍ऊनि तत्पर ।

संदेह छेदूनि, दृढोत्तर- । आत्मज्ञान पाहे ॥ ६॥

नाना संदेहनिवृत्ती- । व्हावया, धरी सत्संगती ।

आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसी आणी ॥ ७॥

देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी ।

श्रवण मन केलेंचि करी । या नांव साधक ॥ ८॥

विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान ।

विचारें राखे समाधान । या नांव साधक ॥ ९॥

तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी ।

लावी ऐक्यतेची समाधी । या नांव साधक ॥ १०॥

आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार ।

विवेकें पावे पैलपार । या नांव साधक ॥ ११॥

उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरूपणें ।

बळेंचि स्वरूपाकार होणें । या नांव साधक ॥ १२॥

असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली ।

स्वरूपस्थिती बळावली । या नांव साधक ॥ १३॥

अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास ।

स्वरूपीं लावी निजध्यास । या नांव साधक ॥ १४॥

दृढ निश्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे ।

सदा स्वरूपीं मिसळे । या नांव साधक ॥ १५॥

प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं ।

आत्मस्थितीची धारणा धरी । या नांव साधक ॥ १६॥

जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें ।

तेंचि जेणें दृढ केलें । या नांव साधक ॥ १७॥

जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहातांचि अंध करी ।

तें साधी नाना परी । या नांव साधक ॥ १८॥

जें साधूं जाता साधवेना । जें लक्षूं जातां लक्षवेना ।

तेंचि अनुभवें आणी मना । या नांव साधक ॥ १९॥

जेथें मनचि मावळे । जेथे तर्कचि पांगुळे ।

तेंचि अनुभवा आणी बळें । या नांव साधक ॥ २०॥

स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें ।

तेंचि वस्तु होये आंगें । या नांव साधक ॥ २१॥

अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे ।

कांहींच नहोन असणें । या नांव साधक ॥ २२॥

परती सारून उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी ।

स्वरूपीं करी दृढ बुद्धी । या नांव साधक ॥ २३॥

देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ ।

साध्यचि होये तत्काळ । या नांव साधक ॥ २४॥

विवेकबळें गुप्त जाला । आपेंआप मावळला ।

दिसतो, परी देखिला । नाहींच कोणीं ॥ २५॥

मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें ।

तुर्येसहि वोलांडिलें । या नांव साधक ॥ २६॥

पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी ।

अखंड अनुभवीं ज्याची दृष्टी । या नांव साधक ॥ २७॥

द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला ।

देहीं असोनि विदेह जाला । या नांव साधक ॥ २८॥

जयास अखंड स्वरूपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती ।

सकळ संदेहनिवृत्ती । या नांव साधक ॥ २९॥

पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार ।

निर्गुणीं जयाचा निर्धार । या नांव साधक ॥ ३०॥

स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतास नाहीं आलें ।

सकळ मिथ्या निर्धारिलें । या नांव साधक ॥ ३१॥

मायेचें जें प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण ।

स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२॥

निद्रा सांडूनि चे‍इरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला ।

माया सांडून तैसा गेला । साधक स्वरूपीं ॥ ३३॥

ऐसि अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली ।

संसारौपाधी त्यागिली । या नांव साधक ॥ ३४॥

कामापासूनि सुटला । क्रोधापासूनि पळाला ।

मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५॥

कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें ।

परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६॥

अविद्येपासूनि फडकला । प्रपञ्चापासूनि निष्टला ।

लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७॥

थोरपणासि पाडिलें । वैभवासि लाथाडिलें ।

महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८॥

भेदाचा मडगा मोडिला । अहंकार झोडूनि पाडिला ।

पा‍ईं धरूनि आपटिला । संदेहशत्रू ॥ ३९॥

विकल्पाचा केला वधू । थापें मारिला भवसिंधू ।

सकळ भूतांचा विरोधू । तोडूनि टाकिला ॥ ४०॥

भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें ।

मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१॥

देह समंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला ।

कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२॥

अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें ।

पाषांडासि पछाडिलें । विवेकबळें ॥ ४३॥

गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थीं घातला ।

अनर्थ तोही निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४॥

मोहासि मध्येंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें ।

शोकासि खंडून सांडिलें । एकीकडे ॥ ४५॥

द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी ।

धाकें उदर तडाडी । कुतर्काचे ॥ ४६॥

ज्ञानें विवेक माजला । तेणें निश्चयो बळावला ।

अवगुणांचा संव्हार केला । वैराग्यबळें ॥ ४७॥

अधर्मास स्वधर्में लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झुगटिलें ।

लांटुन वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८॥

तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला ।

विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९॥

कोपावरी घालणें घातलें । कापट्य अन्तरीं कुटिलें ।

सख्य आपुलें मानिलें । विश्वजनीं ॥ ५०॥

प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग ।

निवृत्तिपंथें ज्ञानयोग । साधिता जाहला ॥ ५१॥

विषयमैंदासि सिंतरिलें । कुविद्येसी वेढा लाविलें ।

आपणास सोडविलें । आप्ततस्करांपासूनी ॥ ५२॥

पराधीनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला ।

दुराशेचा त्याग केला । येकायेकीं ॥ ५३॥

स्वरूपीं घातलें मना । यातनेसि केली यातना ।

साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४॥

अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला ।

प्रेत्न सांगातीं घेतला । साधनपंथें ॥ ५५॥

सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्यविवेक ।

संग त्यागूनि एक । सत्संग धरी ॥ ५६॥

बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार ।

शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७॥

विसरास विसरला । आळसाचा आळस केला ।

सावध नाहीं दुश्चित्त झाला । दुश्चित्तपणासी ॥ ५८॥

आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरूपणें ।

तो साधक ऐसा येणें- । प्रमाणें बुझावा ॥ ५९॥

बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणोनि साधक बोलिजे ।

आतां सिद्ध तोचि जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६०॥

येथें संशयो उठिला । निस्पृह तोचि साधक जाहला ।

त्याग न घडे संसारिकाला । तरि तो साधक नव्हे कीं ॥ ६१॥

ऐसें श्रोतयाचें उत्तर । त्याचें कैसें प्रत्युत्तर ।

पुढिले समासीं तत्पर । होऊनि ऐका ॥ ६२॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

साधकलक्षणनिरूपण नाम समास नववा ॥ ९॥

 


 

 

 


समास दहावा : सिद्धलक्षण निरूपण

॥ श्रीराम् ॥

मागां बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक ।

ऐका याचा विवेक । ऐसा असे ॥ १॥

सन्मार्ग तोचि जीवीं धरणें । अन्मार्गाचा त्याग करणें ।

संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २॥

कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं ।

संसारिकां त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३॥

प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला ।

तरीच पुढें अवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४॥

त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा ।

त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५॥

ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयतांस घडे सांग ।

निस्पृहास बाह्य त्याग । विशेष आहे ॥ ६॥

संसारिका ठा‍ईं ठा‍ईं । बाह्य त्याग घडे कांहीं ।

नित्य नेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७॥

फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।

पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८॥

मागां झालें निरूपण । साधकाची ओळखण ।

आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९॥

साधु वस्तु होऊनि ठेला । संशयें ब्रह्मांडाबाहेरी गेला ।

निश्चयें चळेना ऐसा झाला । या नांव सिद्ध ॥ १०॥

बद्धपणाचे अवगुण । मुमुक्षुपणीं नाहीं जाण ।

मुमुक्षुपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११॥

साधकासि संदेहवृत्ति । पुढें होतसे निवृत्ती ।

या कारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२॥

संशयरहित ज्ञान । तेंचि साधूचें लक्षण ।

सिद्धाआंगीं संशयो हीन । लागेल कैसा ॥ १३॥

कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशय कालवला ।

सर्वांमध्यें संशयो भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४॥

संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें ।

संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५॥

व्यर्थ संशयाचा देव । व्यर्थ संशयाचा भाव ।

व्यर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांही ॥ १६॥

व्यर्थ संशयाचें व्रत । व्यर्थ संशयाचें तीर्थ ।

व्यर्थ संशयाचा परमार्थ । निश्चयेंवीण ॥ १७॥

व्यर्थ संशयाची भक्ती । व्यर्थ संशयाची प्रीती ।

व्यर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८॥

व्यर्थ संशयाचें जिणें । व्यर्थ संशयाचें धरणें ।

व्यर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९॥

व्यर्थ संशयाची पोथी । व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती ।

व्यर्थ संशयाची गती । निश्चयेंविण ॥ २०॥

व्यर्थ संशयाचा दक्ष । व्यर्थ संशयाचा पक्ष ।

व्यर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१॥

व्यर्थ संशयाचा संत । व्यर्थ संशयाचा पंडित ।

व्यर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्चयेंविण ॥ २२॥

व्यर्थ संशयाची श्रेष्ठता । व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता ।

व्यर्थ संशयाचा ज्ञाता । निश्चयेंविण ॥ २३॥

निश्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।

व्यर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४॥

निश्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।

बाष्कळ बोलिजे वाचाळपणें । निरर्थक ॥ २५॥

असो निश्चयेंविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना ।

संशयें काहीं समाधाना । उरी नाहीं ॥ २६॥

म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचें समाधान ।

तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्चयेंसीं ॥ २७॥

तंव श्रोता करी प्रश्न । निश्चय करावा कवण ।

मुख्य निश्चयाचें लक्षण । मज निरूपावें ॥ २८॥

ऐक निश्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा ।

नाना देवांचा वळसा । करूंचि नये ॥ २९॥

जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार ।

शुद्ध विवेकें परमेश्वर । ओळखावा ॥ ३०॥

मुख्य देव तो कोण । भक्तांचें कैसें लक्षण ।

असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१॥

आपुल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पहावें ।

संग त्यागून रहावें । वस्तुरूप ॥ ३२॥

तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्चयो ।

पहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३॥

पूर्वपक्षें सिद्धांत । पहावा प्रकृतीचा अंत ।

मग पावावा निवांत । निश्चयो देवाचा ॥ ३४॥

देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो ।

चळों नेदावा निश्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५॥

सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान ।

याकारणें समाधान । आत्मनिश्चयें राखावें ॥ ३६॥

आठवतां देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।

याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७॥

आत्मबुद्धी निश्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची ।

अहमात्मा हें कधींची । विसरों नये ॥ ३८॥

निरोपिलें निश्चयाचें लक्षण । परी हें न कळे सत्संगेंविण ।

संतांसी गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९॥

आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धाचीं लक्षणें ।

मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजे ॥ ४०॥

सिद्धस्वरूपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो ।

याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१॥

देहसमंधाचेनि गुणें । लक्षणासि काये उणें ।

देहातीतांचीं लक्षणें । काय म्हणोनि सांगावीं ॥ ४२॥

जें लक्षवेना चक्षूंसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।

निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैंसीं ॥ ४३॥

लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठा‍ईंची निर्गुण ।

तेंचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरूप ॥ ४४॥

तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणोनि वक्तृत्व आटोपिलें ।

न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

सिद्धलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥

 

॥ दशक पांचवा समाप्त ॥

दशक ६ वा  -->