संतसाहित्य

Navigation

दशक ४ था


दशक ३ रा

॥ श्रीरामसमर्थ ॥

॥ श्रीमत् दासबोध ॥

 

॥ नवविधा भक्तिनाम दशक चवथा ॥ ४॥

समास पहिला : श्रवणभक्ति

॥ श्रीराम ॥

 

जयजय जी गणनाथा । तूं विद्यावैभवें समर्था ।

अध्यात्मविद्येच्या परमार्था । मज बोलवावें ॥ १॥

नमूं शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी ।

मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २॥

आतां आठऊं सद्‍गुरु । जो पराचाहि परु ।

जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ ३॥

श्रोतेन पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें ।

म्हणौनि बोलिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४॥

सावध हो‍ऊन श्रोतेजन । ऐका नवविधा भजन ।

सत्‍शास्त्रीं बोलिले, पावन- । हो‍ईजे येणें ॥ ५॥

श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् ।

अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥

नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें ।

श्रोतीं अवधान दिधलें । पाहिजे आतां ॥ ६॥

प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण ।

नाना अध्यात्मनिरूपण । ऐकत जावें ॥ ७॥

कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।

योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ८॥

नाना व्रतांचे महिमे । नाना तीर्थांचे महिमे ।

नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ ९॥

नाना माहात्म्यें नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें ।

नाना तपें पुरश्चरणें । ऐकत जावीं ॥ १०॥

दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी ।

तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ ११॥

उष्णवास जळवास । सीतवास आरण्यवास ।

भूगर्भ आणी आकाशवास । कैसे ते ऐकावे ॥ १२॥

जपी तपी तामस योगी । नाना निग्रह हटयोगी ।

शाक्तआगम आघोरयोगी । कैसे ते ऐकावे ॥ १३॥

नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्षस्थानें ।

पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तें ऐकावीं ॥ १४॥

नाना पिंडांची रचना । नाना भूगोळरचना ।

नाना सृष्टीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ १५॥

चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें मेघमंडळें ।

येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । कैसीं ते ऐकावीं ॥ १६॥

ब्रह्माविष्णुमहेशस्थानें । इन्द्रदेवऋषीस्थानें ।

वायोवरुणकुबेरस्थानें । कैसीं ते ऐकावीं ॥ १७ ।

नव खंडे चौदा भुवनें । अष्ट दिग्पाळांची स्थानें ।

नाना वनें उपवनें गहनें । कैसीं ते ऐकावीं ॥ १८॥

गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।

अष्ट नायका संगीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ १९॥

रागज्ञान ताळज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान ।

अमृतवेळ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २०॥

चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा ।

बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २१॥

मंत्र मोहरे तोटके सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी ।

धातु रसायण बुद्धी । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २२॥

कोण्या दोषें कोण रोग । कोणा रोगास कोण प्रयोग ।

कोण्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २३॥

रवरवादि कुंभपाक । नाना यातना येमेलोक ।

सुखसुःखादि स्वर्गनर्क । कैसा तो ऐकावा ॥ २४॥

कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती ।

कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २५॥

पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवंचना ।

सारासारविचारणा । कैसी ते ऐकावी ॥ २६॥

सायोज्यता मुक्ती कैसी होते । कैसें पाविजे मोक्षातें ।

याकारणें नाना मतें । शोधित जावीं ॥ २७॥

वेद शास्त्रें आणी पुराणें । माहावाक्याचीं विवरणें ।

तनुशतुष्टयनिर्शनें । कैसीं ते ऐकावीं ॥ २८॥

ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधून घ्यावें ।

असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ति ॥ २९॥

सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां तें निर्गुण अध्यात्में शोधावीं ।

श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३०॥

सगुण देवांचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्वें यंत्रें ।

हे दोनी परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३१॥

जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें ।

कीर्ति स्तुती स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३२॥

ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें ।

विभक्ती सांडून भक्तीचें । मूळ शोधावें ॥ ३३॥

श्रवणभक्तीचें निरूपण । निरोपिलें असे जाण ।

पुढें कीर्तन भजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३४॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणभक्तिनिरूपणनाम

समास पहिला ॥ १॥

 

 

 

समास दुसरा : किर्तन भक्ति

॥ श्रीराम् ॥

श्रोतीं भगवद्‍भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें ।

त्यांत प्रथम श्रवण निरोपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १॥

सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ती वाढवावी ।

अक्षंड वैखरी वदवावी । येथायोग्य ॥ २॥

बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें ग्रन्थांतर ।

भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३॥

अपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा ।

हरिकथेवीण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४॥

नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेप अत्यंतचि करावा ।

हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मगोळ अवघा ॥ ५॥

मनापासून आवडी । जीवापासून अत्यंत गोडी ।

सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६॥

भगवंतास कीर्तन प्रिये । कीर्तनें समाधान होये ।

बहुत जनासी उपाये । हरिकीर्तनें कलयुगीं ॥ ७॥

विविध विचित्रें ध्यानें । वर्णावीं आळंकार भूषणें ।

ध्यानमूर्ति अंतःकरणें- । लक्षून, कथा करावी ॥ ८॥

येश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा ।

जेणें भगवद्‍भक्तांचा आत्मा । संतुष्ट होये ॥ ९॥

कथा अन्वय लापणिका । नामघोष करताळिका ।

प्रसंगें बोलाव्या अनेका । धात माता नेमस्त ॥ १०॥

ताळ मृदांग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान ।

नाना कथानुसंधान । तुटोंचि नेदावें ॥ ११॥

करुणा कीर्तनाच्या लोटें । कथा करावी घडघडाटें ।

श्रोतयांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२॥

कंप रोमांच स्फुराणें । प्रेमाश्रुसहित गाणें ।

देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३॥

पदें दोहडें श्लोक प्रबंद । धाटी मुद्रा अनेक छंद ।

बीरभाटिंव विनोद । प्रसंगें करावे ॥ १४॥

नाना नवरसिक श्रृंघारिक । गद्यपद्याचें कौतुक ।

नाना वचनें प्रस्ताविक । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५॥

भक्तिज्ञान वैराग्य लक्षण । नीतिन्यायस्वधर्मरक्षण ।

साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । प्रांजळ बोलावें ॥ १६॥

प्रसंगें हरिकथा करावी । सगुणीं सगुणकीर्ति धरावी ।

निर्गुणप्रसंगें वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७॥

पूर्वपक्ष त्यागून, सिद्धांत- । निरूपण करावें नेमस्त ।

बहुधा बोलणें अव्यावेस्त । बोलोंचि नये ॥ १८॥

करावें वेदपारायेण । सांगावें जनासी पुराण ।

मायाब्रह्मीचें विवरण । साकल्य वदावें ॥ १९॥

ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें ।

गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच नेदावी ॥ २०॥

करावें वैराग्यरक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण ।

परम दक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१॥

कीर्तन ऐकतां संदेह पडे । सत्य समाधान तें उडे ।

नीतिन्यायसाधन मोडे । ऐसें न बोलावें ॥ २२॥

सगुणकथा या नांव कीर्तन । अद्वैत म्हणिजे निरूपण ।

सगुण रक्षून निर्गुण । बोलत जावें ॥ २३॥

असो वक्‍त्रुत्वाचा अधिकार । अल्पास न घडे सत्योत्तर ।

वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४॥

सकळ रक्षून ज्ञान सांगे । जेणें वेदज्ञा न भंगे ।

उत्तम सन्मार्ग लागे । प्राणीमात्रासी ॥ २५॥

असो हें सकळ सांडून । करावें गुणानुवादकीर्तन ।

या नांव भगवद्‍भजन । दुसरी भक्ती ॥ २६॥

कीर्तनें माहादोष जाती । कीर्तनें होये उत्तमगती ।

कीर्तनें भगवत्प्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ २७॥

कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होये सत्पात्र ।

हरिकीर्तनें प्राणीमात्र । सुसिळ होती ॥ २८॥

कीर्तनें अवेग्रता घडे । कीर्तनें निश्चये सांपडे ।

कीर्तनें संदेह बुडे । श्रोतयांवक्तयांचा ॥ २९॥

सदा सर्वदा हरिकीर्तन । ब्रह्मसुत करी आपण ।

तेणें नारद तोचि नारायेण । बोलिजेत आहे ॥ ३०॥

म्हणोनि कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे परमात्मा ।

सकळ तीर्थें आणी जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनभजननिरूपणनाम

समास दुसरा ॥ २॥

 

 

 

समास तिसरा : नामस्मरणभक्ति

॥ श्रीराम् ॥

मागां निरोपिलें कीर्तन । जें सकळांस करी पावन ।

आतां ऐका विष्णोःस्मरण । तिसरी भक्ती ॥ १॥

स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें ।

नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २॥

नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळीं सायंकाळीं ।

नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३॥

सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां ।

नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंच नये ॥ ४॥

हरुषकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं ।

विश्रांतिकाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५॥

कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट ।

आवस्ता लागतां चटपट । नामस्मरण करावें ॥ ६॥

चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां ।

नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नये ॥ ७॥

संपत्ती अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती ।

नामस्मरणाची स्थिती । सांडूंच नये ॥ ८॥

वैभव सामर्थ्य आणी सत्ता । नाना पदार्थ चालतां ।

उत्कट भाग्यश्री भोगितां । नामस्मरण सांडूं नये ॥ ९॥

आधीं आवदसा मग दसा । अथवा दसे‍उपरी आवदसा ।

प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सोडूं नये ॥ १०॥

नामें संकटें नासतीं । नामें विघ्नें निवारती ।

नामस्मरणें पाविजेती । उत्तम पदें ॥ ११॥

भूत पिशाच्च नाना छंद । ब्रह्मगिर्ह्हो ब्राह्मणसमंध ।

मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२॥

नामें विषबाधा हरती । नामें चेडे चेटकें नासती ।

नामें होये उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३॥

बाळपणीं तारुण्यकाळीं । कठिणकाळीं वृधाप्यकाळीं ।

सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४॥

नामाचा महिमा जाणे शंकर । जना उपदेसी विश्वेश्वर ।

वाराणसी मुक्तिक्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५॥

उफराट्या नामासाठीं । वाल्मिक तरला उठा‍उठी ।

भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६॥

हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातापासून सुटला ।

नारायेणनामें पावन जाला । अजामेळ ॥ १७॥

नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले ।

माहापापी तेचि जाले । परम पवित्र ॥ १८॥

परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्यनेमें ।

नामस्मरण करितां, येमें- । बाधिजेना ॥ १९॥

सहस्रा नामामधें कोणी येक । म्हणतां होतसे सार्थक ।

नाम स्मरतां पुण्यश्लोक । हो‍ईजे स्वयें ॥ २०॥

कांहींच न करूनि प्राणी । रामनाम जपे वाणी ।

तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१॥

नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर ।

माहादोषांचे गिरिवर । रामनामें नासती ॥ २२॥

अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला ।

हळहळापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी ॥ २३॥

चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।

जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४॥

म्हणौन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें ।

तिसरी भक्ती स्वभावें । निरोपिली ॥ २५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नामस्मरणभक्तिनिरूपणनाम

समास तिसरा ॥ ३॥

 

 

 

समास चवथा : पादसेवन भक्ति

॥ श्रीराम् ॥

मागां जालें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण ।

आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १॥

पादसेवन तेंचि जाणावें । कायावाचामनोभावें ।

सद्‍गुरूचे पाय सेवावे । सद्‍गतिकारणें ॥ २॥

या नांव पादसेवन । सद्‍गुरुपदीं अनन्यपण ।

निरसावया जन्ममरण । यातायाती ॥ ३॥

सद्‍गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाव तों नाहीं ।

याकारणें लवलाहीं । सद्‍गुरुपाय सेवावे ॥ ४॥

सद्वस्तु दाखवी सद्‍गुरु । सकळ सारासारविचारु ।

परब्रह्माचा निर्धारु । अंतरीं बाणे ॥ ५॥

जे वस्तु दृष्टीस दिसेना । आणी मनास तेहि भासेना ।

संगत्यागेंविण ये ना । अनुभवासी ॥ ६॥

अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागें अनुभव न दिसे ।

हें अनुभवी यासीच भासे । येरां गथागोवी ॥ ७॥

संगत्याग आणी निवेदन । विदेहस्थिती अलिप्तपण ।

सहजस्थिती उन्मनी विज्ञान । हे सप्तहि येकरूप ॥ ८॥

याहिवेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें ।

सकळ कांहीं पादसेवनें । उमजों लागे ॥ ९॥

वेद वेदगर्भ वेदांत । सिद्ध सिद्धभावगर्भ सिद्धांत ।

अनुभव अनुर्वाच्य धादांत । सत्य वस्तु ॥ १०॥

बहुधा अनुभवाचीं आंगें । सकळ कळती संतसंगें ।

चौथे भक्तीचे प्रसंगें । गोप्य तें प्रगटे ॥ ११॥

प्रगट वसोनि नसे । गोप्य असोनि भासे ।

भासाअभासाहून अनारिसे । गुरुगम्य मार्ग ॥ १२॥

मार्ग होये परी अंतरिक्ष । जेथें सर्वहि पूर्वपक्ष ।

पाहों जातां अलक्ष । लक्षवेना ॥ १३॥

लक्षें जयासी लक्षावें । ध्यानें जयासी ध्यावें ।

तें गे तेंचि आपण व्हावें । त्रिविधा प्रचिती ॥ १४॥

असो हीं अनुभवाचीं द्वारें । कळती सारासारविचारें ।

सत्संगेंकरून सत्योत्तरें । प्रत्ययासि येतीं ॥ १५॥

सत्य पाहातां नाहीं असत्य । असत्य पाहातां नाहीं सत्य ।

सत्याअसत्याचें कृत्य । पाहाणारापासीं ॥ १६॥

पाहाणार पाहाणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जालें ।

तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७॥

नाना समाधानें पाहातां । बाणती सद्‍गुरु करितां ।

सद्‍गुरुविण सर्वथा । सन्मार्ग नसे ॥ १८॥

प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेपें विद्याअभ्यास ।

अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९॥

जें अभ्यासें अभ्यासितां न ये । जें साधनें असाध्य होये ।

तें हें सद्‍गुरुविण काये । उमजों जाणे ॥ २०॥

याकारणें ज्ञानमार्ग- । कळाया, धरावा सत्संग ।

सत्संगेंविण प्रसंग । बोलोंचि नये ॥ २१॥

सेवावे सद्‍गुरूचे चरण । या नांव पादसेवन ।

चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरोपिलें ॥ २२॥

देव ब्राह्मण माहानुभाव । सत्पात्र भजनाचे ठाव ।

ऐसिये ठाईं सद्‍भाव । दृढ धरावा ॥ २३॥

हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें ।

परंतु सद्‍गुरुपाय सेवणें । या नांव पादसेवन ॥ २४॥

पादसेवन चौथी भक्ती । पावन करितसे त्रिजगतीं ।

जयेकरितां सायोज्यमुक्ती । साधकास होये ॥ २५॥

म्हणौनि थोराहून थोर । चौथे भक्तीचा निर्धार ।

जयेकरितां पैलपार । बहुत प्राणी पावती ॥ २६॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पादसेवनभक्तिनिरूपणनाम

समास चवथा ॥ ४॥

 

 

समास पाचवा : अर्चनभक्ति

॥ श्रीराम् ॥

मागां जालें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण ।

आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १॥

पांचवी भक्ती तें आर्चन । आर्चन म्हणिजे देवतार्चन ।

शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २॥

नाना आसनें उपकर्णें । वस्त्रें आळंकार भूषणें ।

मानसपूजा मूर्तिध्यानें । या नांव पांचवी भक्ती ॥ ३॥

देवब्राह्मणाग्नीपूजन । साधुसंतातीतपूजन ।

इति महानुभाव गाइत्रीपूजन । या नांव पांचवी भक्ती ॥ ४॥

धातुपाषाणमृत्तिकापूजन । चित्र लेप सत्पात्रपूजन ।

आपले गृहींचें देवतार्चन । या नांव पांचवी भक्ती ॥ ५॥

सीळा सप्तांकित नवांकित । शालिग्राम शकलें चक्रांकित ।

लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्बदे ॥ ६॥

भैरव भगवती मल्लारी । मुंज्या नृसिंह बनशंकरी ।

नाग नाणी नानापरी । पंचायेत्नपूजा ॥ ७॥

गणेशशारदाविठलमूर्ती । रंगनाथजगंनाथतांडवमूर्ती ।

श्रीरंगहनुमंतगरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८॥

मत्छकूर्मवर्ह्हावमूर्ती । नृसिंहवामनभार्गवमूर्ती ।

रामकृष्णहयग्रीवमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ९॥

केशवनारायणमाधवमूर्ती । गोविंदविष्णुमदसूदनमूर्ती ।

त्रिविक्रमवामनश्रीधरमूर्ती । रुषीकेश पद्मनाभि ॥ १०॥

दामोदरसंकर्षणवासुदेवमूर्ती । प्रद्युम्नानुरधपुरुषोत्तममूर्ती ।

अधोक्षजनारसिंहाच्युतमूर्ती । जनार्दन आणी उपेंद्र ॥ ११॥

हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्माजगदीशमूर्ती ।

शिवशक्तीच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२॥

अश्वत्थनारायेण सूर्यनारायेण । लक्ष्मीनारायेण त्रिमल्लनारायेण ।

श्रीहरीनारायण आदिनारायण । शेषशाई परमात्मा ॥ १३॥

ऐश्या परमेश्वराच्या मूर्ती । पाहों जातां उदंड असती ।

त्यांचें आर्चन करावें, भक्ती- । पांचवी ऐसी ॥ १४॥

याहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम ।

उत्तम अथवा मध्यम । करीत जावें ॥ १५॥

जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी ।

पूजा मांगिणी जोगिणी । कुळधर्में करावीं ॥ १६॥

नाना तीर्थांक्षत्रांस जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें ।

नाना उपचारीं आर्चावें । परमेश्वरासी ॥ १७॥

पंचामृतें गंधाक्षतें । पुष्पें परिमळद्रव्यें बहुतें ।

धूपदीप असंख्यातें । नीरांजनें कर्पुराचीं ॥ १८॥

नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबोलप्रकार ।

दक्षणा नाना आळंकार । दिव्यांबरें वनमाळा ॥ १९॥

सिबिका छत्रें सुखासनें । माहि मेघडंब्रें सूर्यापानें ।

दिंड्या पताका निशाणें । टाळ घोळ मृदांग ॥ २०॥

नाना वाद्यें नाना उत्साव । नाना भक्तसमुदाव ।

गाती हरिदास सद्भाव- । लागला भगवंतीं ॥ २१॥

वापी कूप सरोवरें । नाना देवाळयें सिखरें ।

राजांगणें मनोहरें । वृंदावनें भुयरीं ॥ २२॥

मठ मंड्या धर्मशाळा । देवद्वारीं पडशाळा ।

नाना उपकर्णें नक्षत्रमाळा । नाना वस्त्र सामुग्री ॥ २३॥

नाना पडदे मंडप चांदोवे । नाना रत्नघोष लोंबती बरवे ।

नाना देवाळईं समर्पावे । हस्थि घोडे शक्कटें ॥ २४॥

आळंकार आणि आळंकारपात्रें । द्रव्य आणी द्रव्यपात्रें ।

अन्नोदक आणी अन्नोदकपात्रें । नाना प्रकारीचीं ॥ २५॥

वनें उपवनें पुष्पवाटिका । तापस्यांच्या पर्णकुटिका ।

ऐसी पूजा जगन्नायका । येथासांग समर्पावी ॥ २६॥

शुक शारिका मयोरें । बदकें चक्रवाकें चकोरें ।

कोकिळा चितळें सामरें । देवाळईं समर्पावीं ॥ २७॥

सुगंधमृगें आणी मार्जरें । गाई म्हैसी वृषभ वानरें ।

नाना पदार्थ आणी लेंकुरें । देवाळईं समर्पावीं ॥ २८॥

काया वाचा आणी मनें । चित्तें वित्तें जीवें प्राणें ।

सद्‍भावें भगवंत आर्चनें । या नांव आर्चनभक्ती ॥ २९॥

ऐसेंचि सद्‍गुरूचें भजन- । करून, असावें अनन्य ।

या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३०॥

ऐसी पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी ।

मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१॥

मनें भगवंतास पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें ।

मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२॥

जें जें आपणांस पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे ।

येणें प्रकारें कीजे । मानसपूजा ॥ ३३॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आर्चनभक्तिनाम

समास पंचवा ॥ ५॥

 

 

 

समास सहावा : वंदनभक्ति

॥ श्रीराम् ॥

मागां जालें निरूपण । पांचवे भक्तीचें लक्षण ।

आतां ऐका सावधान । साहावी भक्ती ॥ १॥

साहावी भक्ती तें वंदन । करावें देवासी नमन ।

संत साधु आणी सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २॥

सूर्यासि करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार ।

सद्‍गुरूस करावे नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३॥

साष्टांग नमस्कारास अधिकारु । नानाप्रतिमा देव गुरु ।

अन्यत्र नमनाचा विचारु । अधिकारें करावा ॥ ४॥

छपन्न कोटी वसुमती । मधें विष्णुमूर्ती असती ।

तयांस नमस्कार प्रीतीं । साष्टांग घालावे ॥ ५॥

पशुपति श्रीपति आणी गभस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती ।

तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमे । म् विशेष ॥ ६॥

श्लोक ॥ शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा ।

एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥

भक्त ज्ञानी आणी वीतरागी । माहानुभाव तापसी योगी ।

सत्पात्रें देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७॥

वेदज्ञ शास्त्रज्ञ आणी सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणी विद्वज्जन ।

याज्ञिक वैदिक पवित्रजन । नमस्कारीत जावे ॥ ८॥

जेथें दिसती विशेष गुण । तें सद्‍गुरूचें अधिष्ठान ।

याकारणें तयासी नमन । अत्यादरें करावें ॥ ९॥

गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अवतारमूर्ती ।

नाना देव सांगों किती । पृथकाकारें ॥ १०॥

सर्व देवांस नमस्कारिलें । ते येका भगवंतास पावलें ।

येदर्थीं येक वचन बोलिलें- । आहे, तें ऐका ॥ ११॥

श्लोक ॥ आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरं ।

सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति ॥

याकारणें सर्व देवांसी । नमस्कारावें अत्यादरेंसीं ।

अधिष्ठान मानितां, देवांसी- । परम सौख्य वाटे ॥ १२॥

देव देवाचीं अधिष्ठानें । सत्पात्रें सद्‍गुरूचीं स्थानें ।

या कारणें नमस्कार करणें । उभय मार्गीं ॥ १३॥

नमस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे ।

नमस्कारें सख्य घडे । नाना सत्पात्रासीं ॥ १४॥

नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्ष्मती ।

नमस्कारें मोडलीं जडतीं । समाधानें ॥ १५॥

सिसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड ।

याकारणें अखंड । देव भक्त वंदावे ॥ १६॥

नमस्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे ।

नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकांवरीं ॥ १७॥

निशेष करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर ।

आणी मुख्य परमेश्वर । कृपा करी ॥ १८॥

नमस्कारें पतित पावन । नमस्कारें संतांसी शरण ।

नमस्कारें जन्ममरण । दुरी दुर्ह्हावे ॥ १९॥

परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला ।

तरी तो अन्याये क्ष्मा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥ २०॥

याकारणें नमस्कारापरतें । आणीक नाहीं अनुसरतें ।

नमस्कारें प्राणीयातें । सद्‍बुद्धि लागे ॥ २१॥

नमस्कारास वेचावें नलगे । नमस्कारास कष्टावें नलगे ।

नमस्कारांस कांहींच नलगे । उपकर्ण सामग्री ॥ २२॥

नमस्कारा ऐसें नाहीं सोपें । नमस्कार करावा अनन्यरूपें ।

नाना साधनीं साक्षपें । कासया सिणावें ॥ २३॥

साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली ।

सुगम पंथे ने‍ऊन घाली । जेथील तेथें ॥ २४॥

याकारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ ।

येथें सांगितली पष्ट । साहावी भक्ती ॥ २५॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वंदनभक्तिनाम

समास सहावा ॥ ६॥

 

 

 

समास सातवा : दास्यभक्ति

॥ श्रीराम् ॥

मागां जालें निरूपण । साहवें भक्तीचें लक्षण ।

आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १॥

सातवें भजन तें दास्य जाणावें । पडिलें कार्य तितुकें करावें ।

सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २॥

देवाचें वैभव संभाळावें । न्यूनपूर्ण पडोंचि नेदावें ।

चढतें वाढतें वाढवावें । भजन देवाचें ॥ ३॥

भंगलीं देवाळयें करावीं । मोडलीं सरोवरें बांधावीं ।

सोफे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्यें ॥ ४॥

नाना रचना जीर्ण जर्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार ।

पडिलें कार्य तें सत्वर । चालवित जावें ॥ ५॥

गज रथ तुरंग सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें ।

मंचक डोल्हारे विमानें । नूतनचि करावीं ॥ ६॥

मेघडंब्रें छत्रें चामरें । सूर्यापानें निशाणें अपारें ।

नित्य नूतन अत्यादरें । सांभाळित जावीं ॥ ७॥

नाना प्रकारीचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें ।

बहुविध सुवर्णासनें । येत्नें करीत जावीं ॥ ८॥

भुवनें कोठड्या पेट्या मांदुसा । रांझण कोहळीं घागरी बहुवसा ।

संपूर्ण द्रव्यांश ऐसा । अति येत्नें करावा ॥ ९॥

भुयेरीं तळघरें आणी विवरें । नाना स्थळें गुप्त द्वारें ।

अनर्घ्ये वस्तूंचीं भांडारें । येत्नें करीत जावीं ॥ १०॥

आळंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें ।

नाना धातु सुवर्णपात्रें । येत्नें करीत जावीं ॥ ११॥

पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांचीं बनें ।

पावतीं करावीं जीवनें । तया वृक्षांसी ॥ १२॥

नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा ।

नाना वाद्यें नाट्यशाळा । गुणी गायेक बहुसाल ॥ १३॥

स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामग्रीगृहें धर्मशाळा ।

निद्रिस्तांकारणें पडशाळा । विशाळ स्थळें ॥ १४॥

नाना परिमळद्रव्यांचीं स्थळें । नाना खाद्यफळांचीं स्थळें ।

नाना रसांचीं नाना स्थळें । येत्नें करीत जावीं ॥ १५॥

नाना वस्तांची नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें ।

देवाचें वैभव वचनें । किती म्हणौनि बोलावें ॥ १६॥

सर्वां ठाई अतिसादर । आणी दास्यत्वासहि तत्पर ।

कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७॥

जयंत्या पर्वें मोहोत्साव । असंभाव्य चालवी वैभव ।

जें देखतां स्वर्गींचे देव । तटस्त होती ॥ १८॥

ऐसें वैभव चालवावें । आणी नीच दास्यत्वहि करावें ।

पडिले प्रसंगीं सावध असावें । सर्वकाळ ॥ १९॥

जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळचि देजे ।

अत्यंत आवडीं कीजे । सकळ सेवा ॥ २०॥

चरणक्षाळळें स्नानें आच्मनें । गंधाक्षतें वसनें भूषणें ।

आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१॥

शयेनाकारणें उत्तम स्थळें । जळें ठेवावीं सुसीतळें ।

तांबोल गायनें रसाळें । रागरंगें करावीं ॥ २२॥

परिमळद्रव्यें आणी फुलीलीं । नाना सुगंधेल तेलें ।

खाद्य फळें बहुसालें । सन्निधचि असावीं ॥ २३॥

सडे संमार्जनें करावीं । उदकपात्रें उदकें भरावीं ।

वसनें प्रक्षालून आणावीं । उत्तमोत्तमें ॥ २४॥

सकळांचें करावें पारपत्य । आलयाचें करावें आतित्य ।

ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ती ॥ २५॥

वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं ।

अंतरें निवतीं सकळांचीं । ऐसें वदावें ॥ २६॥

ऐसी हे सातवी भक्ती । निरोपिली येथामती ।

प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७॥

ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्‍गुरूचें ।

प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करित जावें ॥ २८॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे दास्यभक्तिनाम

समास सातवा ॥ ७॥

 

 

 

समास आठवा : सख्यभक्ति

॥ श्रीराम् ॥

मागां जालें निरूपण । सातवे भक्तीचें लक्षण ।

आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १॥

देवासी परम सख्य करावें । प्रेम प्रीतीनें बांधावें ।

आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २॥

देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीतीं ।

येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३॥

भक्ति भाव आणी भजन । निरूपण आणी कथाकीर्तन ।

प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४॥

आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें ।

मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५॥

देवाच्या सख्यत्वाकारणें । आपलें सौख्य सोडून देणें ।

अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६॥

सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता ।

निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ॥ ७॥

देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी ।

सर्व अर्पावें, सेवटीं- । प्राण तोहि वेचावा ॥ ८॥

आपुलें आवघेंचि जावें । परी देवासी सख्य राहावें ।

ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९॥

देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी न करावें निर्वाण ।

परम प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १०॥

ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता ।

पांडव लाखाजोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११॥

देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासी ।

आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२॥

आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे ।

आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ॥ १३॥

श्लोक ॥ ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम् ।

जैसें जयाचे भजन । तैसाचि देवहि आपण ।

म्हणौन हें आवघें जाण । आपणाचि पासीं ॥ १४॥

आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे ।

तरी गोष्टी आपणांकडे । सहजचि आली ॥ १५॥

मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना ।

चंद्र वेळेसि उगवेना । तर्ह्ही चकोर अनन्य ॥ १६॥

ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व ।

भगवंतावरील ममत्व । सांडूंचि नये ॥ १७॥

सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत ।

विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८॥

देवावेगळें कोणीं नाहीं । ऐसें बोलती सर्वहि ।

परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९॥

म्हणौनी ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें ।

अंतरीं सदृढ धरावें । परमेश्वरासी ॥ २०॥

आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोधास येणें ।

ऐसीं नव्हेत किं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१॥

देवाचें जें मनोगत । तेंचि आपुलें उचित ।

इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥ २२॥

देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें ।

मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३॥

पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी ।

माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४॥

देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला ।

शरणागतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५॥

देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी ।

देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६॥

देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी ।

धांविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥ २७॥

देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु ।

देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८॥

देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें ।

जिवलगें आवघीं पिसुणें । कामा न येती ॥ २९॥

सख्य देवाचें तुटीना । प्रीति देवाची विटेना ।

देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३०॥

म्हणौनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें ।

आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१॥

जैसा देव तैसा गुरु । शास्त्रीं बोलिला हा विचारु ।

म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु । सद्‍गुरूसीं असावा ॥ ३२॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्यभक्तिनाम

समास आठवा ॥ ८॥

 

 

 

समास नववा : आत्मनिवेदन

॥ श्रीराम् ॥

मागां जालें निरूपण । आठवे भक्तीचें लक्षण ।

आतां ऐका सावधान । भक्ति नवमी ॥ १॥

नवमी निवेदन जाणावें । आत्मनिवेदन करावें ।

तेंहि सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करूनि ॥ २॥

ऐका निवेदनाचें लक्षण । देवाअसि वाहावें आपण ।

करावें तत्त्वविवरण । म्हणिजे कळे ॥ ३॥

मी भक्त ऐसें म्हणावें । आणी विभक्तपणेंचि भजावें ।

हें आवघेंचि जाणावें । विलक्षण ॥ ४॥

लक्षण असोन विलक्षण । ज्ञान असोन अज्ञान ।

भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥ ५॥

भक्त म्हणिजे विभक्त नव्हे । आणी विभक्त म्हणिजे भक्त नव्हे ।

विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६॥

तस्मात् विचार करावा । देव कोण तो वोळखावा ।

आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७॥

मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां तत्वझाडा ।

विचार करितां उघडा । आपण नाहीं ॥ ८॥

तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे ।

आत्मनिवेदन येणेंप्रकारें । सहजचि जालें ॥ ९॥

तत्वरूप सकळ भासे । विवेक पाहातां निरसे ।

प्रकृतिनिरासें आत्मा असे । आपण कैंचा ॥ १०॥

येक मुख्य परमेश्वरु । दुसरी प्रकृति जगदाकारु ।

तिसरा आपण कैंचा चोरु । आणिला मधें ॥ ११॥

ऐसें हें सिद्धचि असतां । नाथिली लागे देहाहंता ।

परंतु विचारें पाहों जातां । कांहींच नसे ॥ १२॥

पाहातां तत्त्वविवेचना । पिंडब्रह्मांडतत्वरचना ।

विश्वाकारें वेक्ती, नाना- । तत्वें विस्तारलीं ॥ १३॥

तत्वें साक्षत्वें वोसरतीं । साक्षत्व नुरे आत्मप्रचिती ।

आत्मा असे आदि‍अंतीं । आपण कैंचा ॥ १४॥

आत्मा एक स्वानंदघन । आणी अहमात्मा हें वचन ।

तरी मग आपण कैंचा भिन्न । उरला तेथें ॥ १५॥

सोहं हंसा हें उत्तर । याचें पाहावें अर्थांतर ।

पाहतां आत्मयाचा विचार । आपण कैंचा तेथें ॥ १६॥

आत्मा निर्गुण निरंजन । तयासी असावें अनन्य ।

अनन्य म्हणिजे नाहीं अन्य । आपण कैंचा तेथें ॥ १७ ॥

आत्मा म्हणिजे तो अद्वैत । जेथें नाहीं द्वैताद्वैत ।

तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ॥ १८॥

आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण । जेथें नाहीं गुणागुण ।

निखळ निर्गुणी आपण । कोण कैंचा ॥ १९॥

त्वंपद तत्पद असिपद । निरसुनि सकळ भेदाभेद ।

वस्तु ठाईंची अभेद । आपण कैंचा ॥ २०॥

निरसितां जीवशिवौपाधी । जीवशिवचि कैंचे आधी ।

स्वरूपीं होतां दृढबुद्धि । आपण कैंचा ॥ २१॥

आपण मिथ्या, साच देव । देव भक्त अनन्यभाव ।

या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २२॥

या नांव आत्मनिवेदन । ज्ञानियांचें समाधान ।

नवमे भक्तींचे लक्षण । निरोपिलें ॥ २३॥

पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमधें जगदीश ।

नवविधा भक्तीमध्यें विशेष । भक्ति नवमी ॥ २४॥

नवमी भक्ती आत्मनिवेदन । न होतां न चुके जन्ममरण ।

हें वचन सत्य, प्रमाण- । अन्यथा नव्हे ॥ २५॥

ऐसी हे नवविधा भक्ती । केल्यां पाविजे सायोज्यमुक्ती ।

सायोज्यमुक्तीस कल्पांतीं । चळण नाहीं ॥ २६॥

तिहीं मुक्तींस आहे चळण । सायोज्यमुक्ती अचळ जाण ।

त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायोज्यमुक्ती चळेना ॥ २७॥

आवघीया चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती ।

तयांमध्यें तीन नासती । चौथी ते अविनाश ॥ २८॥

पहिली मुक्ती ते स्वलोकता । दुसरी ते समीपता ।

तिसरी ते स्वरूपता । चौथी सायोज्यमुक्ती ॥ २९॥

ऐसिया चत्वार मुक्ती । भगवद्भजनें प्राणी पावती ।

हेंचि निरूपण प्रांजळ श्रोतीं । सावध पुढें परिसावें ॥ ३०॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आत्मनिवेदनभक्तिनाम

समास नववा ॥ ९॥

 

 

 

समास दहावा : मुक्तिचतुष्टय

॥ श्रीराम् ॥

मुळीं ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूप अहंकार ।

तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं बोलिला ॥ १॥

तो अहंकार वायोरूप । तयावरी तेजाचें स्वरूप ।

तया तेजाच्या आधारें आप । आवर्णोदक दाटलें ॥ २॥

तया आवर्णोदकाच्या आधारें । धरा धरिली फणिवरें ।

वरती छपन्न कोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३॥

इयेवरी परिघ सप्त सागर । मध्य मेरू माहां थोर ।

अष्ट दिग्पाळ तो परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४॥

तो सुवर्णाचा माहा मेरू । पृथ्वीस तयाचा आधारु ।

चौरुआसी सहस्र विस्तारु । रुंदी तयाची ॥ ५॥

उंच तरी मर्यादेवेगळा । भूमीमधें सहस्र सोळा ।

तया भोवता वेष्टित पाळा । लोकालोक पर्वताचा ॥ ६ ॥

तया ऐलिकडे हिमाचळ । जेथें पांडव गळाले सकळ ।

धर्म आणी तमाळनीळ । पुढें गेले ॥ ७॥

जेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले माहा अही ।

सितसुखें सुखावले ते ही । पर्वतरूप भासती ॥ ८॥

तया ऐलिकडे सेवटीं जाण । बद्रिकाश्रम बद्रिनारायण ।

तेथें माहां तापसी, निर्वाण- । देहत्यागार्थ जाती ॥ ९॥

तया ऐलिकडे बद्रिकेदार । पाहोन येती लहानथोर ।

ऐसा हा अवघा विस्तार । मेरुपर्वताचा ॥ १०॥

तया मेरुपर्वतापाठारीं । तीन श्रृंगे विषमहारी ।

परिवारें राहिले तयावरी । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ११॥

ब्रह्मश्रृंग तो पर्वताचा । विष्णुश्रृंग तो मर्गजाचा ।

शिवश्रृंग तो स्फटिकाचा । कैळास नाम त्याचें ॥ १२॥

वैकुंठ नाम विष्णुश्रृंगाचें । सत्यलोक नाम ब्रह्मश्रृंगाचें ।

अमरावती इंद्राचें । स्थळ खालतें । १३॥

तेथें गण गंधर्व लोकपाळ । तेतिस कोटी देव सकळ ।

चौदा लोक, सुवर्णाचळ- । वेष्टित राहिले ॥ १४॥

तेथें कामधेनूचीं खिलांरें । कल्पतरूचीं बनें अपारें ।

अमृताचीं सरोवरें । ठाईं ठाईं उचंबळतीं ॥ १५॥

तेथें उदंड चिंतामणी । हिरे परिसांचियां खाणी ।

तेथें सुवर्णमये धरणी । लखलखायमान ॥ १६॥

परम रमणीये फांकती किळा । नव्वरत्नाचिया पाषाणसिळा ।

तेथें अखंड हरुषवेळा । आनंदमये ॥ १७॥

तेथें अमृतांचीं भोजनें । दिव्य गंधें दिव्य सुमनें ।

अष्ट नायका गंधर्वगायनें । निरंतर ॥ १८॥

तेथें तारुण्य वोसरेना । रोगव्याधीहि असेना ।

वृधाप्य आणी मरण येना । कदाकाळीं ॥ १९॥

तेथें येकाहूनि येक सुंदर । तेथें येकाहूनि येक चतुर ।

धीर उदार आणी शूर । मर्यादेवेगळे ॥ २०॥

तेथें दिव्यदेह ज्योतिरूपें । विद्युल्यतेसारिखीं स्वरूपें ।

तेथें येश कीर्ति प्रतापें । सिमा सांडिली ॥ २१॥

ऐसें तें स्वर्गभुवन । सकळ देवांचें वस्तें स्थान ।

तयां स्थळाचें महिमान । बोलिजे तितुकें थोडें ॥ २२॥

येथें ज्या देवाचें भजन करावें । तेथें ते देवलोकीं राहावें ।

स्वलोकता मुक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २३॥

लोकीं राहावें ते स्वलोकता । समीप असावें ते समीपता ।

स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता- । तिसरी मुक्ती ॥ २४॥

देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।

स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ २५॥

सुकृत आहे तों भोगिती । सुकृत सरतांच ढकलून देती ।

आपण देव ते असती । जैसे तैसे ॥ २६॥

म्हणौनि तिनी मुक्ति नासिवंत । सायोज्यमुक्ती ते शाश्वत ।

तेहि निरोपिजेल सावचित्त । ऐक आतां ॥ २७॥

ब्रह्मांड नासेल कल्पांतीं । पर्वतासहित जळेल क्षिती ।

तेव्हां अवघेच देव जाती । मां मुक्ति कैंच्या तेथें ॥ २८॥

तेव्हां निर्गुण परमात्मा निश्चळ । निर्गुण भक्ती तेहि अचळ ।

सायोज्यमुक्ती ते केवळ । जाणिजे ऐसी ॥ २९॥

निर्गुणीं अनन्य असतां । तेणें होये सायोज्यता ।

सायोज्यता म्हणिजे स्वरूपता- । निर्गुण भक्ती ॥ ३०॥

सगुण भक्ती ते चळे । निर्गुण भक्ती ते न चळे ।

हें अवघें प्रांजळ कळे । सद्‍गुरु केलियां ॥ ३१॥

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे

मुक्तिचतुष्टयेनाम समास दहावा ॥ १०॥

 

॥ दशक चवथा समाप्त ॥

 

 दशक ५ वा  -->