माणसं लिहीत होती.
भाषा मरत असताना, संस्कृतीला धोका असताना, ब्रेनड्रेन होत असताना, साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना माणसं लिहीत आलीयेत. माणसं लिहितायत. अजूनही. पायांखालची माती आणि खिशातली चलनं बदलत गेली. छपाईची माध्यमं आणि मक्तेदार्या बदलत गेल्या. लिखाणाची भाषा कात टाकत गेली. लांबी अधिकाधिक आटत गेली. तरीही माणसं लिहितायत. नव्या दमानं. अजूनही. प्रेम, प्रेमभंग, पाऊस. नॉस्टाल्जिया, स्वदेस. कंटाळा, स्टॅग्नेशन. पुन्हा प्रेम. न चुकता पडणारी तीच ती भव्यदिव्य स्वप्नंबिप्नं. त्यांचे तेच ते माती खायला लावणारे अपेक्षित शेवट. आणि याच चिखलामातीतून रसरशीतपणे वर येणारी काही जिवंत झाडं हिरवीगार माणसं भाषेत रुजवत आलीयेत. माणसं लिहितायत. अजूनही. झाडांची दखल घ्या न घ्या. ती असतातच माती आणि पाण्यासकट. सावल्या पेरत. तशीच माणसांची अक्षरं तरत आलीयेत. परभाषांची आक्रमणं, कॉपीराइट्सच्या साठमार्या आणि छापखान्यांच्या मक्तेदारीतून. विचार पेरत. माणसं लिहीत आलीयेत. माणसं लिहितायत. अजूनही. - ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
२२/१०/२००८ reshewarachiakshare08@ymail.com पहिला दिवाळी अंक मनोरंजन वाचकांनी वाचला त्यानंतर आता एक शतक उलटलं.
रेषेवरची अक्षरे हा कोणत्याही रुढार्थाने दिवाळी अंक नसलेला पण तरीही
दिवाळीच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी केलेला एक ब्लॉग्जसंकलनाचा
प्रयत्न. लिथोप्रेस ते इंटरनेट अशा या शंभर वर्षांच्या प्रवासातलंच हे एक
पुढचं पाऊल समजा हवं तर. हे संकलन पी.डी.एफ. स्वरूपात येथे उपलब्ध आहे. ह्या दुव्यावरून ते उतरवून घेता येईल. आपल्या प्रतिक्रिया आम्हांला जरूर कळवा. आपण आपली प्रतिक्रिया रेषेवरची अक्षरे २००८ ह्या ब्लॉगवर नोंदवू शकता, तसेच इपत्राद्वारेसुद्धा आम्हांला कळवू शकता. - ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद reshewarachiakshare08@ymail.com ह्या संकलनातील सर्व लेख मूळ लेखकांच्या संमतीने येथे प्रकाशित करण्यात येत आहेत. सर्व लेखांचे प्रताधिकार मूळ लेखकांकडेच आहेत. लेखकांच्या पूर्वपरवानगीशिवाय सदर लेखांचे अंशतः किंवा पूर्णतः इतरत्र कुठेही प्रकाशन करता येणार नाही. -संपादक |