'मी' आणि 'ती', आणि 'ती' आणि 'मी', असे दोघंच गप्पा मारत बसलो होतो... 'ती' म्हणाली, "मला लग्नानंतर कोणी सक्ती केलेली चालणार नाही मी जशी आत्ता आहे ना, अगदी तश्शीच राहणार मी नंतरसुद्धा"... या विषयावर मी जरा शांतच आहे हे बघून ती अस्वस्थ झाली... "तुझी काही हरकत आहे का?" मी नकारात्मक मान डोलावली... "अरे बोलत का नाहीयेस मग?" खरंतर मी तिला सांगण्यासाठी शब्द शोधत होतो पण तिला चिडवण्यासाठी म्हटलं, "जरा वेगळ्या विचारात होतो, हं, बोल, आता लक्ष आहे माझं"... रुसव्याचं एखादं पीस तिच्या गालाला स्पर्शून गेलं, हे असं 'ती'चं रुप मी कितीतरी वेळा पाहिलं असेन, पण अजूनही त्याची गोडी जात नाही... 'ती' म्हणाली, "ए, तूच सांग ना त्यापेक्षा, लग्नानंतर मी तुला कशी आवडेन? अशीच की बदललेली?" 'मी' हसलो, क्षणभर विचार केला, आणि म्हणालो, "मी तुला फक्त साडीच नेस म्हणणार नाही, मी तुला घाल पंजाबी ड्रेस म्हणणार नाही, मी तुला कुंकु-टिकलीच बहाल असं म्हणणार नाही, मी तुला मंगळसुत्र घाल असंही म्हणणार नाही, मी तुला समजेल-उमजेल तेच कर एवढंच म्हणेन, मी तुला शोभेल-साजेल तेच कर एवढंच म्हणेन, कारण मला पटलंय की, प्रेम, ओढ, विश्वास या अंगावर मिरवायच्या कल्पना नाहीत, हे मनात घट्ट रोवायचे दागिने आहेत"... आणि मग, 'ती'च्या घट्ट मिठीत, आमची संध्याकाळ गच्च मिटून गेली...